चालू घडामोडी : ८ जून
अनिवासी भारतीयांच्या विवाहाची नोंदणी ४८ तासांत करणे बंधनकारक
- अनिवासी भारतीय व्यक्तीने भारतामध्ये केलेल्या विवाहाची नोंदणी ४८ तासांमध्ये करायला हवी, असे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने दिले आहेत.
- अनेक अनिवासी भारतीय पुरुष इथे विवाह करून निघून जातात आणि महिलेची फसवणूक होते, असे आढळून आल्याने हे आदेश देण्यात आले आहे.
- सध्या भारतात अनिवासी भारतीयांच्या विवाहाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन नाही.
- मात्र विधी आयोगाने या विवाहांची नोंदणी करण्यासाठी ३० दिवसांचे बंधन असले पाहिजे, त्यानंतर प्रत्येक दिवसामागे पाच रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी शिफारस केली आहे.
- भारतीय व्यक्तींच्या इथे झालेल्या विवाहाची नोंदणी ४८ तासांत न झाल्यास, त्याला पासपोर्ट अडवून ठेवला जाईल व व्हिसाची सुविधा मिळणार नाही.
- नोंद झालेल्या अशा सर्व विवाहांची माहिती केंद्र सरकारकडे पाठवणेही रजिस्ट्रारना बंधनकारक असेल.
- केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री : मनेका गांधी
आयआयटी मुंबई देशातील सर्वोत्कृष्ट संस्था
- शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी म्हणून ओळख असलेल्या Quacquarelli Symonds या कंपनीने जगातील विद्यापीठांची रॅकिंग जाहीर केली आहे.
- २०० विद्यापीठांच्या या यादीत आयआयटी मुंबई १६२व्या स्थानावर, आयआयएस बंगळूरू १७०व्या तर आयआयटी दिल्ली १७२व्या स्थानावर आहेत.
- यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीवर मात केली असून ही संस्था देशातील सर्वोत्कृष्ट संस्था ठरली आहे. मात्र, असे असले तरी टॉप १५०मध्ये भारताच्या एकाही संस्थेला स्थान मिळवता आलेले नाही.
इंग्लंडमधील कॅनरा बँकेच्या शाखेला आठ कोटी रुपयांचा दंड
- इंग्लंडच्या आर्थिक क्षेत्रातील नियंत्रक संस्थेने (एफसीए) कॅनरा बँकेला आठ कोटी रुपयांचा (८,९६,१०० पौंड) दंड ठोठावला आहे. तसेच कॅनरा बँकेच्या लंडनस्थित शाखेला १४७ दिवस ठेवी स्वीकारता येणार नाहीत असा आदेशही दिला आहे.
- आर्थिक अफरातफरीविरोधातील नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठावण्यात आला आहे. कॅनरा बँकेने २६ नोव्हेंबर २०१२ ते २९ जानेवारी २०१६ या कालावधीत प्रिन्सिपल ३चा भंग केला.
- जोखीम व्यवस्थापन यंत्रणा चोख असावी यासाठी व्यवस्थापनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी असे हे प्रिन्सिपल ३ सांगते.
- एफसीएच्या सुरूवातीच्या चौकशीमध्येच समस्या व्यवस्थितपणे हाताळण्याची तयारी कॅनरा बँकेने दर्शवली असल्यामुळे बँकेला ठोठावण्यात आलेला दंड ३० टक्क्यांनी कमी करण्यात आला.
- मूळ दंडाची रक्कम १२,८२,१७५ पौंड होती जी कमी करून ८,९६,१०० पौंड करण्यात आली आहे. तसेच ठेवी स्वीकारण्यावर २१० दिवसांचा निर्बंध घालण्यात आला होता, जो कमी करून १४७ दिवसांचा करण्यात आला.
न्यूझिलंड महिला संघाचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
- न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यात आयर्लंड विरुद्ध खेळताना ५० षटकांमध्ये ४ गडी गमावून सर्वाधिक ४९० धावांचा विक्रम केला.
- एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाने त्यांच्याच संघाचा ४५५ धावांचा यापूर्वीचा विक्रमही या खेळीमुळे मोडला.
- यापूर्वी १९९७मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्युझिलंडच्या महिला संघाने ५ गडी गमावून ४५५ धावा केल्या होत्या.
- कप्तान सुझी बॅट्स (९४ चेंडूंत १५१ धावा), फलंदाज मॅडी ग्रीन (७७ चेंडूत १२१ धावा), जेस वॅटकिन (५९ चेंडूंत ६२ धावा), अमेला केर (४५ चेंडूंत ८१ धावा) यांच्या खेळीमुळे न्यूझिलंड संघ ही कामगिरी करू शकला.
- इंग्लंडच्या पुरुषांच्या संघाने २०१६मध्ये पाकिस्तानविरोधात ४४४ धावा केल्या होत्या तो विक्रमही या महिलांनी मोडून काढला.
इंटरकॉन्टिनेंटल चषक : भारत न्यूझीलंडकडून पराभूत
- मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत पाचव्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा २-१ ने पराभव केला.
- भारताच्या सुनील छेत्रीने गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण न्यूझीलंकडून आंद्रे जोंग आणि मोसेस डायरने एक-एक गोल मारत भारतीय संघावर मात केली.
- पराभव झाला असला तरी भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामन्यात भारत केनिया किंवा न्यूझीलंडचा सामना करेल.
- स्पर्धेतील अखेरचा लीग सामना चीनी तायपेई आणि केनियादरम्यान होणार आहे. मोठ्या फरकाने मिळवलेला विजय केनियाला अंतिम सामन्यात पोहोचवू शकतो.
पंजाबचा रणजीपटू अभिषेक गुप्ता डोपिंग चाचणीत दोषी
- पंजाबचा रणजीपटू अभिषेक गुप्ता बीसीसीआयने घेतलेल्या डोपिंग चाचणीत दोषी आढळला आहे.
- चाचणीत दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयकडून त्याच्यावर ८ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
- एका स्थानिक टी-२० स्पर्धेसाठी बीसीसीआयने ही चाचणी घेतली होती. यामध्ये अभिषेकच्या युरीन नमुन्यात टर्ब्युटलाईन हे उत्तेजक द्रव्य आढळून आले. हे द्रव्य सहसा खोकल्यासाठी असलेल्या कफ सिरपमध्येही थोड्या प्रमाणात आढळून येते.
- विश्व डोपिंग विरोधी संस्था (वाडा)च्या यादीत या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
- अभिषेकने रणजी सामन्यात पदार्पण करताना पंजाबकडून पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याने त्या सामन्यात २०२ धावा केल्या होत्या.
- त्याच्या निलंबनाचा कालावधी १४ सप्टेंबर २०१८ पर्यंत असणार आहे. टर्ब्युटलाईन उत्तेजक द्रव्य सेवनामुळे यापूर्वी युसूफ पठाणावरही बंदी घालण्यात आली होती.
जगप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ अँथनी बॉर्डेन यांचे निधन
- जगप्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी शेफ अँथनी बॉर्डेन यांचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन झाले आहे. फ्रान्समध्ये सध्या ते एका शोसाठी चित्रिकरण करत होते.
- हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह ८ जून रोजी फ्रेंच शेफ इरिक रिपर्ट यांना आढळला. अँथनी यांनी आत्महत्या केल्याचा दाट संशय सीएनएनने व्यक्त केला आहे.
- अनेक फूड शोद्वारे अँथनी यांनी आपली ओळख निर्माण केली. कथाकथनांचे उत्तम कौशल्य त्यांच्याजवळ होते.
- प्रत्येक फूड शो होस्ट करताना त्यांच्या या शैलीमुळे ते प्रेक्षकांचे खूप आवडते शेफ बनले होते. जगभरातील अनेक देशांत त्यांनी भ्रमंती केली.
- ते उत्तम खव्वय्ये तर होतेच पण चांगले निवेदकही होते. खाद्यसंस्कृती, भ्रमंती या विषयावरच त्यांनी लेखनही केले होते.
- फ्रान्समध्ये ते ‘पार्ट अननोन’ या ट्रव्हल अँड फूड शोसाठी एपिसोड चित्रीत करत होते. हा शो गेल्या ५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमाने ५ प्रतिष्ठीत अॅमी अवॉर्डही जिंकले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा