सातव्या वेतन आयोगाच्या बहुतांश शिफारशी स्वीकारून देशातील सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांवर केंद्र सरकारने वेतनवर्षांव केला आहे.
यामुळे सुमारे २३.५ टक्के वेतनवाढ झाली असून सुमारे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ५८ लाख निवृत्तिवेतनधारकांना१ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
या वेतनवाढीचा तिजोरीवर १.०२ लाख कोटींचा म्हणजे देशांतर्गत एकूण उत्पन्नाच्या ०.७ टक्के इतका भार पडणार आहे. या वेतन आयोगासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वेतन आयोगाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १४.२७ टक्के वाढ सुचवली होती.
सहाव्या वेतन आयोगाने २० टक्के वाढ सुचवली होती. पण सरकारने ती २००८ मध्ये अंमलबजावणी करताना दुप्पट केली होती.
आता सातव्या आयोगाच्या वेतनवाढीत सर्व भत्ते मिळून २३.५५ टक्के वाढ होत आहे. ७० वर्षांत प्रथमच सर्वात कमी वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मिळाली आहे, असे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
टोर्पेडो पाणतीर भारतीय नौदलाकडे सुपूर्त
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अधिकृतपणे ‘वरुणास्त्र’ पाणतीर (टोर्पेडो) भारतीय नौदलाकडे सुपूर्त केले.
जड वजनाच्या पाणबुडीविरोधी पाणतीर नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत डीआरडीओ येथे झालेल्या कार्यक्रमात नौदलाकडे सोपविण्यात आले.
नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने (एनएसटीएल) हे पाणतीर विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वरुणास्त्राची रचना करण्यात आली आहे.
भारत डायनामिक्स लिमिटेडने वरुणास्त्राची निर्मिती केली आहे. हे वरुणास्त्र पाणबुडीबरोबरच मोठी जहाजेही उद्ध्वस्त करू शकते.
वरुणास्त्राच्या निर्मितीत डीआरडीओला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसन टेक्नॉलॉजीनेही मदत केली आहे.
अलीकडेच बंगालच्या खाडीत वरुणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. प्रक्षेपणादरम्यान वरुणास्त्र समुद्रात शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यात यशस्वी ठरले.
लढाऊ विमानानंतर स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीच्या दिशेने देशाची ही एक मोठी कामगिरी आहे. वरुणास्त्र दिल्ली श्रेणी, कोलकाता श्रेणी, कमोर्ता श्रेणी यांसारख्या मोठ्या जहाजांमध्ये बसविले जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा