चालू घडामोडी : ३० एप्रिल

भारत आणि पाकिस्तानचा प्रथमच एकत्रित लष्करी सराव

  • भारत आणि पाकिस्तानचे संबंध दहशतवादाच्या मुद्द्यावरून कमालीचे ताणलेले असतानाच या दोन्ही देशांचे सैन्य प्रथमच दहशतवादविरोधी कारवाईच्या बहुराष्ट्रीय सरावात एकत्रितपणे सहभागी होणार आहे.
  • स्वातंत्र्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तीन युद्धे झाली असली तरी दोन्ही देशांच्या सैन्यदलांनी एकत्रित लष्करी सराव करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
  • यापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेच्या कामात भारत व पाकिस्तानच्या सैन्याने एकत्रित सहभाग घेतलेला आहे.
  • चीनच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) वतीने या सरावाचे आयोजन करण्यात आले असून त्यात या संघटनेचे चीनसह सर्व ८ही सदस्य देश सहभागी होतील.
  • ‘पीस इनिशिएटिव्ह’ नावाचा हा दहशतवादविरोधी सराव येत्या सप्टेंबरमध्ये रशियाच्या उराल पर्वतराजींमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
  • जगभरात शांतता नांदावी यासाठी घेण्यात येणाऱ्या या युद्ध सरावाचा मुख्य उद्देश एससीओच्या ८ सदस्य देशांमध्ये दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी सहकार्य वाढवणे हे आहे.
  • २००१साली स्थापन झालेल्या ‘एससीओ’मध्ये सन २००५मध्ये भारत व पाकिस्तानला प्रथम निरीक्षक म्हणून व गेल्या वर्षी पूर्ण सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात आले.
  • भारताला सदस्य करून घेण्यासाठी रशियाने आग्रही भूमिका घेतली तर चीनने पाकिस्तानच्या सदस्यत्वासाठी पुढाकार घेतला होता.
  • पाश्चात्य देशांच्या ‘नाटो’ या लष्करी संघटनेस शह देण्यासाठी स्थापन केलेल्या या संघटनेचे रशिया, चीन, किर्गीज गणराज्य, कजाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान,भारत व पाकिस्तान हे देश सदस्य आहेत.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताला ३ सुवर्णपदके

  • सुमित सांगवान (९१ किलो), निखट झरीन (५१ किलो) आणि हिमांशू शर्मा (४९ किलो) यांनी ५६व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
  • सर्बिया येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदके पटकावली.
  • दुखापतीतून सावरणाऱ्या सुमितने इक्वेडोरच्या कॅस्टीलो टोरेसचा ५-० असा सहज पराभव केला.
  • कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी विजेत्या निखटनेही खांद्याच्या दुखापतीवर मात करताना अंतिम लढतीत ग्रीसच्या कौत्सोइऑर्गोपौलोयू एकाटेरीनीवर सहज पराभव केला.
  • महिला गटात जमुना बोरो (५४ किलो) आणि राल्टे लाल्फाकमावीई (८१ किलोवरील) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

चालू घडामोडी : २९ एप्रिल

नेपाळमधील हायड्रोइलेक्ट्रिसिटी प्रकल्पाच्या कार्यालयात स्फोट

  • पूर्व नेपाळमध्ये भारताकडून विकसित करण्यात आलेल्या अरुण-३ या हायड्रोइलेक्ट्रिसिटी (पाण्यापासून वीजनिर्मिती) प्रकल्पाच्या कार्यालयात २९ एप्रिल रोजी स्फोट झाला.
  • या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही आठवड्यांनंतर या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. मात्र, तत्पूर्वी ही घटना समोर आली आहे.
  • ९०० मेगावॅट क्षमतेचा अरुण-३ हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प २०२०पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.
  • मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मे रोजी आपल्या नेपाळ दौऱ्यादरम्यान या प्रकल्पाचे शिलान्यास करणार होते.
  • अरुण- ३ प्रकल्पासाठी नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी या प्रकल्प विकासासाठी करार झाला होता. भारताच्यावतीने सतलज जलविद्युत विभागाने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

डायना एडलजी आणि पंकज रॉय यांना जीवनगौरव पुरस्कार

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि माजी महान कसोटीपटू पंकज रॉय यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
  • डायना यांनी महिला क्रिकेटसाठी अत्यंत मोलाचे योगदान देताना २० कसोटी सामने आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले.
  • त्यांच्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत या दोन्ही प्रकारात त्यांनी अनुक्रमे ६३ आणि ४६ बळी मिळवले.
  • डायना एडलजी आणि पंकज रॉय यांना २०१६-१७ या वर्षांसाठी तर माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड आणि महिला संघाच्या माजी कर्णधार सुधा शाह यांना २०१७-१८ या वर्षांसाठी हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • त्याशिवाय अब्बास अली बेग, दिवंगत कसोटीपटू नरेन ताम्हणे, आणि दिवंगत कसोटीपटू बुधी कुंदरन यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
  • जूनमध्ये भारत-अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याप्रसंगी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला कांस्यपदक

  • तिरंदाजी विश्वचषकाच्या मिश्र गटात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नाम यांच्या भारतीय संघाने तुर्कीचा पराभव करून कांस्यपदक पटकावले.
  • कांस्यपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने १५४-१४८ असा विजय मिळवला.
  • विश्वचषकात मिश्र गटातील भारताचे हे दुसरे कांस्यपदक असून यापूर्वी गतवर्षी अभिषेकने दिव्या धयालच्या साथीने ही कामगिरी करून दाखवली होती.
  • वर्माचे हे यश विश्वकरंडक स्पर्धेतील सातवे यश आहे. अंताल्या येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत वर्माने दिव्या दयाळसह ब्राँझपदक जिंकले होते. याच स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक गटात त्याने भारताचे पहिले सुवर्णपदक मिळवले होते.
  • तसेच मेक्सिको येथे २०१५मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत वैयक्तिक गटात त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यावर्षी पोलंड येथील विश्वस्पर्धेत याच गटात त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

चालू घडामोडी : २८ एप्रिल

डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

  • रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी २७ एप्रिल रोजी डॉ. पेडणेकर यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.
  • डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ५ वर्षे कार्यकाळासाठी किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत करण्यात आली आहे.
  • २४ ऑक्टोबर २०१७ रोजी डॉ. संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते.
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
  • मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती.
  • डॉ. पेडणेकर यांना रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून २५ वर्षांचा अध्यापनाचा दीर्घ अनुभव आहे.
  • सेंद्रिय रसायनशास्त्र हा अभ्यासाचा विषय असलेल्या पेडणेकर यांनी अमेरिकेतील ‘स्टिव्हन्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथून पीएचडी केली.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनपत्रिकेत त्यांचे ४३हून अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. या शिवाय सात  संशोधन प्रकल्प, एक पेटंट त्यांच्या नावावर जमा आहेत.
  • इंडो-अमेरिकन सोसायटी, इंडियन र्मचट्स चेंबर आदी संस्थांमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
  • नॅक, काकोडकर समिती, आयसीटीची विद्वत परिषद आदी ठिकाणी त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.
  • टाटा केमिकल लिमिटेडकडून त्यांना ‘उत्कृष्ट रसायनशास्त्र शिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले होते.
  • डॉ. पेडणेकर यांना २०१२ सालचा महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.

सरकारने लाल किल्ला दालमिया समूहाला दत्तक दिला

  • दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला सरकारने दालमिया भारत समूहाला २५ कोटी रुपयांत ५ वर्षांसाठी (वर्षाला ५ कोटी रुपये) दत्तक दिला आहे.
  • दालमिया भारत समूह सिमेंट उत्पादक असून, ऐतिहासिक वास्तू दत्तक घेणारा तो देशातील पहिला उद्योग समूह ठरला आहे.
  • पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व विभागासोबत दालमिया भारत कंपनीने यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • दालमिया समूहाने आंध्र प्रदेशातील कडापा जिल्ह्यातील गंडीकोटा किल्लाही दत्तक घेतला आहे.
  • दत्तक करारानुसार, लाल किल्ल्याची देखभाल, संवर्धन आणि सुशोभीकरण करणे तसेच परिसराचे नूतनीकरण करणे या जबाबदाऱ्या दालमिया समूहावर राहतील.
  • किल्ल्याला भेट देणाऱ्यांकडून शुल्क वसूल करून महसूल मिळविण्याचा हक्कही कंपनीला राहील.
  • मोगल बादशहा शहाजन याने १७व्या शतकात हा किल्ला बांधलेला आहे. ‘अपनी धरोहर, अपनी पहचान’ या योजनेंतर्गत लाल किल्ला दत्तक देण्यात आला आहे.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २७ सप्टेंबर २०१७ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून या योजनेची घोषणा केली होती.
  • या योजनेंतर्गत एकूण २२ ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक देण्याची सरकारची योजना आहे. जगप्रसिद्ध ताजमहालही या यादीत आहे.

पाकिस्तानकडून संरक्षण अंदाजपत्रकात २० टक्के वाढ

  • पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत दिवसेंदिवस कमी होत असताना, पाकिस्तानने भारताला समोर ठेवून आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • २०१८-१९साठी पाकिस्तानने आपल्या अंदाजपत्रकात संरक्षण क्षेत्रासाठी २० टक्के वाढीव तरतूद केली आहे.
  • पीएमएल-एन सरकारच्या कार्यकाळातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचे सांगण्यात येते
  • पाक सरकार आणि लष्करादरम्यान तणाव असतानाही तिन्ही सशस्त्र दलांसाठी १.१ ट्रिलियन रूपयांची (१.१ लाख कोटी रूपये) तरतूद करण्यात आली आहे.
  • पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच संरक्षणावरील तरतुदीने १ ट्रिलियनचा आकडा पार केला आहे. मागील आर्थिक वर्षाची तुलना करता २०१८-१९ साठी संरक्षणासाठी १८० अब्ज रूपयांची वृद्धी करण्यात आली आहे.
  • यामध्ये २६० अब्ज रूपयांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही रक्कम लष्करी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठी दिली जाते. सर्वसाधारण अर्थसंकल्पातून यासाठी तरतूद केली जाते.
  • दहशतवाद ते युद्धाशिवाय पाकिस्तानचा संरक्षण खर्च नेहमी भारतावर केंद्रित असाच राहिलेला आहे. अणुसंपन्न असलेल्या दोन्ही देशांमध्ये नेहमी तणाव असतो.
  • गेल्या काही दिवसांत नियंत्रण रेषा आणि सीमेजवळील सततच्या गोळीबारामुळे हा तणाव वाढलेला आहे.
  • भारताने संरक्षण क्षेत्राच्या अंदाजपत्रकात ८ टक्क्यांनी वाढ केली होती. परंतु, भारताचे एकूण संरक्षण अंदाजपत्रक पाकिस्तानच्या तुलनेत ६ टक्क्यांनी जास्त आहे.

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सायना व प्रणॉयला कांस्य

  • आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीतील भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरुषांच्या गटात एचएस प्रणॉय यांना कांस्य पदक जिंकले आहे.
  • नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सायनाचा चीनची टॉप सीडेड ताई यिंगने २५-२७, १९-२१ असा सलग दोन गेममध्ये पराभव केला. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील सायनाचे हे तिसरे कांस्य पदक  आहे.
  • पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रणॉयचा चीनच्या तिसऱ्या सीडेड चेन लाँगने २१-१६, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. प्रणॉयचे आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील हे पहिले पदक आहे.

यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून यश मिळवलेल्या उमेदवारांमध्ये यंदा वाढ झाली आहे.
  • गेल्या वर्षी ९० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले होते. यंदा हा आकडा १००हून अधिक असण्याची शक्यता आहे.
  • या परीक्षेत देशभरातून पहिला येण्याचा मान हैदराबाद येथील अनुदीप दुरीशेट्टी याने मिळविला आहे. त्या खालोखाल अनु कुमारी आणि सचिन गुप्ता यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.
  • उस्मानाबादमधील गिरीश बडोले याने राज्यातून पहिला तर देशात २०वा क्रमांक पटकावला आहे.
  • या परीक्षेत एकूण परीक्षार्थीपैकी ९९० उमेदवार नियुक्तीकरिता पात्र ठरले आहेत, तर १३२ उमेदवार प्रतीक्षा यादीवर असतील.

चालू घडामोडी : २७ एप्रिल

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये अनौपचारिक चर्चा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये वुहानमध्ये झालेल्या दोन दिवसीय (२७ व २८ एप्रिल) अनौपचारिक शिखर परिषदेत अनेक महत्वाच्या विषयांवर आश्वासक चर्चा झाली.
  • दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या मुद्यांवर एकमत झाले असून, यामध्ये सीमेवर शांतता ठेवण्याच्या विषयाचा समावेश आहे.
  • लष्करी संघर्ष टाळण्यासाठी यापुढे दोन्ही देश रणनितीक संवाद वाढवण्यावर भर देणार आहेत. सीमेवरील संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  • फक्त लष्करीच नाही अन्य क्षेत्रांमध्येही भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले आहे.
  • या अनौपचारिक शिखर परिषदेत कुठल्याही करारावर स्वाक्षरी झाली नाही किंवा घोषणा झाली नाही फक्त द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.
  • डोकलामच्या संघर्षापासून भारत-चीन संबंधात निर्माण झालेला कडवटपणा संपवणे हा मोदी-जिनपिंग यांच्या भेटीमागे उद्देश होता.
  • या शिखर परिषदेत भारत आणि चीनने अफगाणिस्तानमध्ये प्रथमच संयुक्त आर्थिक प्रकल्पावर एकत्र काम करण्याचा निर्णयही घेतला आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये या प्रकल्पाबद्दल एकमत झाले आहे.
  • महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिंनपिंग यांच्यात पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. त्यानंतर आता चीनमधील वुहान येथे या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

फुटबॉलपटू बायचुंग भुतियाकडून राजकीय पक्षाची स्थापना

  • भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने ‘हमरो सिक्कीम पार्टी’ या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
  • युवकांची टीम बांधून सिक्कीमच्या विकासासाठी काम करणे आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देणे असे या पक्ष स्थापनेमागील उद्देश आहे.
  • २०१४मध्ये बायचुंग भुतियाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत एस एस अहलुवालीया यांनी त्याचा पराभव केला होता.

दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची ऐतिहासिक भेट

  • दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग २७ एप्रिल रोजी दोन्ही देशांना विभागणारी सीमारेषा पार करत परस्परांशी ऐतिहासिक हस्तांदोलन केले.
  • या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमधील नव्या पर्वाला सुरुवात झाल्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. 
  • तसेच आण्विक युद्धाचे ढग जमा झालेल्या कोरियन द्वीपकल्पात सध्या शांततेचे वारे वाहू लागतील, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.
  • आता कोरियन द्वीपकल्पावर कोणत्याही स्वरुपात युद्ध होणार नाही तसेच या द्वीपकल्पावरील अण्वस्त्रे पूर्णतः नष्ट केली जातील असे नमूद करणारा करार उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये करण्यात आला आहे.
  • गेली सात दशके युद्धजन्य स्थितीत असणाऱ्या या देशांनी शांततेचा काळ आता सुरु झाल्याचे द्योतक असणाऱ्या या करारावर स्वाक्षरी केली.
  • १९५३नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उत्तर कोरियन नेते ठरले आहेत.

चालू घडामोडी : २६ एप्रिल

इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

  • सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा या सातव्या महिला आहेत.
  • १९८९ मध्ये ३९ वर्षीय एम. फातिमा बिबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
  • त्यांच्यानंतर सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना देसाई आणि आर भानुमती ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान झाल्या होत्या.
  • सध्या सर्वोच्च न्यायालयातील २४ न्यायाधीशांमध्ये न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत.
  • इंदू मल्होत्रा यांचा जन्म १९५६साली बंगळुरुमध्ये झाला. त्यांनी लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मल्होत्रा यांनी राज्यशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले.
  • दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेज आणि विवेकानंद कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. १९८३मध्ये त्यांनी आपल्या वकिली कारकीर्दीची सुरुवात केली.
  • ऑगस्ट २००७मध्ये इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
  • १९७७मध्ये लीला सेठ सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील बनल्या होत्या. तसंच हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा व उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या नावाची शिफारस केली होती.
  • परंतु सरकारने न्यायाधीश के एम जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिस जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत.
  • २०१६मध्ये उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या खंडपीठात जोसेफ यांचा सहभाग होता.

पाकिस्तानच्या प्रसिद्ध नाटककार मदिहा गौहर यांचे निधन

  • पाकिस्तानच्या प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संगीतकार व अजोका थिएटरच्या संस्थापिका मदिहा गौहर यांचे २६ एप्रिल रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म १९५६ मध्ये कराचीत झाला. त्यांना सुरुवातीपासून कलेत रस होता. भारत-पाकिस्तान मैत्रीचा पुरस्कार करणाऱ्या कलावंतांपैकी त्या एक होत्या.
  • त्यांनी लाहोर येथे त्यांच्या घराच्या लॉनवर जुलूस नावाचे नाटक १९८४मध्ये सादर केले. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा कलाप्रवास आतापर्यंत सुरूच होता.
  • त्यांनी अजोका थिएटरच्या माध्यमातून पाकिस्तानात रंगभूमीची चळवळ सुरू केली. त्यात महिला हक्क, सामाजिक जागरूकता डोकावत होती.
  • त्यामुळेच त्यांनी ऑनर किलिंग, स्त्री साक्षरता, मानवी हक्क अशा अनेक मुद्दय़ांवर नाटय़कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
  • नाटय़ चळवळीत पाकिस्तानसारख्या देशात काम करण्याचे धाडस दाखवल्याने त्यांना नेदरलँड्सच्या राजदूतांनी ‘प्रिन्स क्लॉस’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
  • पाकिस्तान सरकारने त्यांना ‘तमघा ए इम्तियाझ’ हा सन्मान दिला. २००५मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी पाठवण्यात आले होते.
  • तोबातेक सिंग, एक थी नानी, बुल्हा, लेटर्स टू अंकल सॅम, मेरा रंग दे बसंती चोला, दारा, कौन है ये गुस्ताख, लो फिर बसंत आयी अशी अनेक नाटके त्यांच्या अजोका थिएटरने आणली.
  • भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, ओमान अशा अनेक देशांत त्यांचा हा नाटय़ प्रवास झाला. लाहोरच्या रंगभूमी वर्तुळातील एक परिचित व प्रभावी कलाकार म्हणून त्यांचा करिश्मा होता.
  • त्यांनी १९८४मध्ये पाकिस्तानसारख्या देशात समांतर रंगभूमीची सुरू केलेली चळवळ हे त्यांचे मोठे योगदान.
  • त्यांच्या निधनाने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतिदूत असलेल्या हरहुन्नरी कलावंतास जग मुकले आहे.

राष्ट्रकुल खेळ २०१८


चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersची PDF स्वरूपातील ही नोट्स मोफत डाउनलोड करा.
नोट्स आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.
ही नोट्स फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : २५ एप्रिल

विख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन

  • योगोपचाराने आरोग्यसंपदेचे जतन करण्याचा वस्तुपाठ घालून देणारे विख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे २५ एप्रिल रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
  • इचलकरंजीलगतचे बोरगाव (ता. चिकोडी) हे त्यांचे मूळ गाव. स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक अशी त्यांची ओळख होती.
  • वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरात व्यवसाय करू केला. १८८८मध्ये त्यांच्याकडे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या योग विभागाची जबाबदारी राज्यात सर्वप्रथम देण्यात आली.
  • योगसाधनेने हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदि रोगांना आवर कसा घालता येतो, याची माहिती त्यांनी डॉक्टरसह रुग्णांना दिली.
  • यासह वृत्तपत्र, नियतकालिके, मासिके यांतून त्यांनी याविषयावर भरपूर लिखाण करून योग विद्येबाबत जागृती केली.
  • त्यांच्या ‘निरोगी राहू या आनंदाने जगू या’ हा संदेश देणाऱ्या शिबिरांनी आजवर ९००चा आकडा पूर्ण केला आहे. त्यांनी परदेशातही १४५ शिबिरे घेतली आहेत.
  • त्यांनी पहिली हास्ययोग चळवळ १९८८साली सुरू केली. पहिला शेतकरी लढा, जैन धर्मीय तरुणांत लोकप्रिय ठरलेल्या वीर सेवा दलाच्या कामाची पायाभरणी त्यांनीच केली.
  • त्यांची योग विषयी ६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्याच्या सीडी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी भाषेत उपलब्ध आहेत.
  • तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन, माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यावर त्यांनी योगोपचार केले होते.

आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेप

  • जोधपूर न्यायालयाने बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूसह शिल्पी आणि शरदचंद्र या आरोपींना दोषी ठरवले असून आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
  • न्यायालयाने शरदचंद्र व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली.
  • आसारामच्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती.
  • आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता.
  • आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
  • संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर शरदचंद्र छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता.
  • शिल्पी व शरद यांनी आसारामला या कृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यामुळे त्यांनाही शिक्षा झाली.

महमूद अबू झैद यांना युनेस्कोचा वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार

  • तुरुंगवास भोगत असलेले इजिप्तमधील वृत्तछायाचित्रकार महमूद अबू झैद यांना ‘युनेस्को गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम २०१८’ पारितोषिक जाहीर झाले आहे.
  • २०१३साली काहिरामध्ये सुरक्षा दल आणि माजी राष्ट्रपती मुहम्मद मोर्सी यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीला कॅमेरात कैद करतांना त्यांना अटक करण्यात आली होती. ते पाच वर्षांपासून तुरुंगवास भोगत आहेत.
  • त्याला मृत्युदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. २ मे रोजी त्याला बहुधा अनुपस्थितीतच हा पुरस्कार दिला जाईल.
 गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक 
  • संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे (युनेस्को) ‘गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम’ पारितोषिक दिले जाते. २५००० डॉलरचे रोख बक्षीस आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • हा पुरस्कार कोलंबियाच्या गुईलर्मो कानो इसाझा या पत्रकाराच्या सन्मानार्थ दिला जातो, ज्याची १९८६साली त्याच्याच कार्यालयासमोर हत्या करण्यात आली.
  • हा पुरस्कार अश्या व्यक्तीला, संघटनेला किंवा संस्थेला दिला जातो, ज्यांनी विशेषतः धोक्याच्या परिस्थितीत वृत्त स्वातंत्र्य जपण्यास किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपले उत्कृष्ट योगदान दिले आहे.
  • पुरस्कारासाठी कानो फाऊंडेशन (कोलंबिया) आणि हेलसिंगन सॅनोमत फाऊंडेशन (फिनलँड) यांच्याकडून निधी मिळतो.

मोहम्मद सलाहला ईपीएल सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार

  • इजिप्तमध्ये जन्मलेल्या मोहम्मद सलाह या उत्तर आफ्रिकन फुटबॉलपटूला इंग्लिश प्रीमियर लीग या व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या संघटनेने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार बहाल केला आहे. हा बहुमान मिळविणारा तो पहिला आफ्रिकन फुटबॉलपटू ठरला.
  • लिव्हरपूल क्लबकडून खेळताना मोहम्मद सलाहने यंदाच्या फुटबॉल हंगामात आतापर्यंत ४१ गोल झळकावलेले आहेत. यांत इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये झळकावलेल्या ३१ गोलांचा समावेश आहे.

चालू घडामोडी : २४ एप्रिल

टीसीएसचे बाजार भांडवल १०० बिलियन डॉलर्स

  • देशातली दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टाटा समूहातील एक प्रमुख कंपनी असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) १०० बिलियन डॉलर्स बाजार भांडवल असलेली भारतातील एकमेव कंपनी बनली आहे.
  • २३ एप्रिल रोजी या कंपनीच्या समभागाचा भाव वधारल्याने टीसीएसने १०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या (६.७ लाख कोटी रुपये) भांडवली मूल्याचा टप्पा पार केला.
  • टीसीएसने इतर कंपन्यांना पछाडत ही उंची गाठली आहे. टीसीएसचे बाजार भांडवल इतर आयटी इंडेक्स कंपन्यांच्या तुलनेत ५२ टक्क्यांहून अधिक आहे.
  • टीसीएसचे भागभांडवल २०१०मध्ये २५,००० कोटी, २०१३मध्ये ५०,००० तर २०१४पर्यंत ७५,००० कोटींपर्यंत गेले होते.
  • पाकिस्तान शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या एकत्रित भांडवली मूल्यापेक्षा एकट्या टीसीएसचे भांडवल अधिक आहे.
  • मार्चअखेरीस संपलेल्या तिमाहीत टीसीएसच्या समभागात ५.७१ टक्क्यांची वाढ झाली होती. मार्चअखेर टीसीएसने ६,९०४ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
  • जागतिक स्तरावर १०० अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार करणारी टीसीएस ही ६४वी कंपनी ठरली. अॅमेझॉन, फेसबुक आदी कंपन्या यापूर्वीच या सूचीत आहेत. 

नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत शाहजार रिझवीला रौप्यपदक

  • दक्षिण कोरियाच्या चँगवोन शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या शाहजार रिझवीने रौप्य पदकाची कमाई केलेली आहे.
  • रिझवीने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात २३९.८ गुणांची कमाई करत रौप्यपदकावर मोहर उमटवली.
  • दक्षिण कोरियात सुरु असलेल्या या स्पर्धेत तब्बल ७० देशांच्या ८०० खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे.

राफेल नदालने माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विक्रमी जेतेपद

  • जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू स्पेनच्या राफेल नदालने तुफानी खेळ करताना माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विक्रमी ११व्यांदा जेतेपद पटकावले.
  • एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालने जपानच्या केई निशिकोरीचा ६-३, ६-२ असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला.
  • या जेतेपदासह नदालने कोणत्याही एका स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद पटकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. एकाच स्पर्धेचे ११ जेतेपदे पटकावणारा नदाल पहिला खेळाडू ठरला. याआधी त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेचे विक्रमी १० वेळा जेतेपद उंचावले आहे.
  • त्याचे हे ७६वे एटीपी टूअर जेतेपद ठरले. तसेच मास्टर्स स्पर्धेतील त्याचे हे ३१वे जेतेपद आहे.
  • यासह त्याने सर्बियाचा स्टार नोव्हाक जोकोविचच्या ३१ मास्टर्स जेतेपदांच्या विक्रमाचीही बरोबरी केली.

टाटा सन्सच्या कार्पोरेट अध्यक्षपदी एस. जयशंकर

  • टाटा सन्सच्या वैश्विक आणि कार्पोरेट विभागाच्या अध्यक्षपदी माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • टाटाच्या जागतिक कार्पोरेट कामकाजाच्या जबाबदारीसह टाटाची जागतिक धोरणं ठरवण्याची जबाबदारीही जयशंकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 
  • जयशंकर हे जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ दरम्यान देशाच्या परराष्ट्र सचिवपदी होते.
  • टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून जयशंकर यांना टाटाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना रिपोर्ट द्यावा लागणार आहे.

चालू घडामोडी : २३ एप्रिल

सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला

  • स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दाखल झालेला सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे.
  • गैरवर्तणूक व अधिकारांचा गैरवापर असे दोन प्रमुख आरोप ठेवून काँग्रेससह एकूण ७ विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी ७१ खासदारांच्या (६४ राज्यसभा सदस्यांसह ७ निवृत्त खासदारांच्या) स्वाक्षऱ्या असलेला प्रस्ताव २० एप्रिल रोजी व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवला होता.
  • न्यायाधीश चौकशी कायदा १९६८नुसार न्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभेतील १०० किंवा राज्यसभेतील ५० खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात.
  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग या पक्षांचा प्रस्तावाला पाठिंबा होता.
  • विविध कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर २३ एप्रिल रोजी व्यंकय्या नायडू यांनी हा महाभियोग प्रस्ताव फेटाळून लावला.
  • उपराष्ट्रपतींनी प्रस्ताव फेटाळला तर सुप्रीम कोर्टात जाऊ, असा इशारा काँग्रेसने यापूर्वीच दिला होता. त्यामुळे काँग्रेस आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या ४ ज्येष्ठ न्यायाधीशांनी जानेवारी २०१८मध्ये इतिहासात प्रथमच पत्रकार परिषद घेत सध्याच्या न्यायव्यवस्थेवर टीका केल्यानंतर, माकप नेते सीताराम येचुरी यांनी महाभियोग प्रस्तावाचा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित केला होता.

मेघालयातून व अरुणाचल प्रदेशमधून अफ्स्पा कायदा हटविला

  • मेघालयातून पूर्णतः तर अरुणाचल प्रदेशमधून अंशतः सैन्य दल विशेष अधिकार कायदा अर्थात (अफ्स्पा) कायदा हटवण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली.
  • सप्टेंबर २०१७पासून मेघालयातील ४० टक्के भागात तर, २०१७पासून अरुणाचल प्रदेशातील १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अफ्स्पा कायदा लागू करण्यात आला होता.
  • मेघालयातून पूर्णतः तर अरुणाचलच्या १६ पैकी ८ ठाण्यांच्या हद्दीतून अफस्पा हटवण्यात आल्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहखात्याने जाहीर केला.
  • गेल्या ४ वर्षांत ईशान्य भारतातील बंडखोरांच्या हिंसक घटनांमध्ये ६३ टक्के कपात झाली आहे.
  • २०१७मध्ये नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात ८३ टक्के तर सुरक्षा दलांतील शहिदांच्या प्रमाणात ४० टक्के घट झाली आहे.
  • सन २०००च्या तुलनेत २०१७मध्ये ईशान्य भारतातील हिंसक घटनांमध्ये ८५ टक्के घट पहायला मिळाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • याशिवाय ईशान्येतील बंडखोरांच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मदत निधीची १ लाखांवरून ४ लाख रुपये इतकी वाढ केली आहे.
  • सरकारने मणिपूर, मिझोराम आणि नागालँड या राज्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रतिबंधित आणि संरक्षित क्षेत्रासाठीच्या परवानग्याही शिथिल केल्या आहेत. मात्र, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनसारख्या देशांसाठी ही बंदी कायम राहणार आहे.
 ‘अफ्स्पा’ कायद्याबद्दल... 
  • आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट (अफ्स्पा) लष्कराला जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील वादग्रस्त भागात विशेषाधिकार देतो.
  • हा कायदा अनेक कारणांनी वादग्रस्त असून, या कायद्याचा लष्कराकडून दुरुपयोगकेला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात आहे आणि तो हटवण्यात यावा अशी मागणीही दीर्घ काळापासून होत आहे.
  • अफस्पाच्या कलम ४नुसार, सुरक्षा रक्षकांना कोणत्याही परिसराची तपासणी करण्याचे तसेच विना वॉरंट कोणालाही अटक करण्याचा अधिकार आहे.
  • यामुळे वादग्रस्त भागात सुरक्षा रक्षक कोणत्याही थराला जाऊन आपल्या ताकदीचा वापर करू शकतात.
  • संशयास्पद स्थितीत त्यांना कोणत्याही वाहनाला रोखण्याचे, त्याची तपासणी करण्याचे तसेच त्यावर जप्ती आणण्याचा अधिकार आहे.
  • १९५८मध्ये पहिल्यांदा ईशान्य भारतात बंडखोरांशी मुकाबला करण्यासाठी संसदेत हा कायदा पारित करण्यात आला.
  • सुरक्षा दलांच्या मतानुसार, या कायद्यामुळे कठीण परिस्थितीत दहशतवादी किंवा इतर धोक्यांशी लढणाऱ्या जवानांना कारवाईत सहकार्य मिळण्याबरोबरच सुरक्षादेखील मिळते.

५० माजी आयआयटी विद्यार्थ्यांचा राजकारणात प्रवेश

  • देशातील प्रतिष्ठित अशा भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) ५० माजी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष स्थापन केला आहे.
  • या गटाने आपल्या पक्षाचे नाव ‘बहुजन आझाद पार्टी’ ठेवले असून निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.
  • या गटात प्रामुख्याने अनुसूचित जाती व जमाती, तसेच ओबीसींमधील उच्चशिक्षितांचा समावेश आहे.
  • कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या वा विचारधारेच्या विरोधात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
  • मागासवर्गीयांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये त्यांचा न्याय्य वाटा मिळालेला नाही, असे या गटाचे मत आहे.
  • या पक्षाने जारी केलेल्या पोस्टरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा आहेत.

मासिक : फेब्रुवारी २०१८

चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील हे मासिक मोफत डाउनलोड करा.
मासिक आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.
हे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : २२ एप्रिल

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशी

  • अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून पॉक्सो अॅक्टमध्ये दुरूस्ती करण्यात आलेल्या वटहुकूमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.
  • नवीन अध्यादेशानुसार....
  • १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्यास फाशीची शिक्षा दिली जाईल.
  • १६ वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना अटकपूर्व जामीन देण्यास पूर्ण प्रतिबंध असणार आहे.
  • अशा गुन्हेगारांनी नियमित जामिनासाठी अर्ज केल्यास पब्लिक प्रॉसिक्युटरला व पीडितेच्या प्रतिनिधीला किमान १५ दिवसांची नोटीस दिल्याखेरीज त्या अर्जावर न्यायालय निर्णय देऊ शकणार नाही.
  • या वटहुकूमात बलात्कारपीडितेच्या वयानुसार आरोपीस शिक्षा देण्याची तरतूद आहे. पीडितेचे वय जेवढे कमी तेवढी शिक्षा अधिक असे हे व्यस्त प्रमाण असेल.
  • पीडित मुलगी १६ वर्षांहून कमी वयाची असेल तर आरोपीस किमान २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे.
  • गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार ही शिक्षा जन्मठेपेपर्यंतही वाढविता येईल. ही जन्मठेप गुन्हेगाराचा नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत लागू असेल.
  • पीडित मुलगी १२ वर्षांहून कमी वयाची असेल तर वरील शिक्षांखेरीज गुन्हेगारास फाशीची शिक्षाही देण्याची न्यायालयास मुभा असेल.
  • एकूणच बलात्काराच्या गुन्ह्यासाठी सध्या किमान ७ ते १० वर्षांची शिक्षा आहे. त्याऐवजी यापुढे जन्मठेप ही किमान शिक्षा होणार आहे.

फरारी आर्थिक गुन्हेगारांच्या वटहुकूमावर शिक्कामोर्तब

  • पळपुट्या आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर टांच आणणे किंवा त्या जप्त करण्याचा अधिकार सरकारला देणाऱ्या फरारी आर्थिक गुन्हेगारांच्या वटहुकूमावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले.
  • फरारी आर्थिक गुन्हेगारांविषयी निगडीत वटहुकूम संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात सादर करण्यात आला होता. पण गोंधळ आणि स्थगन प्रस्तावामुळे हा पारित होऊ शकला नव्हता. त्यामुळे सरकारने वटहुकूमाचा पर्याय निवडला.
  • कोणताही वटहुकूम लागू केल्यानंतर सरकारला त्याच्याशी निगडीत विधेयक सहा महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत करणे आवश्यक असते.
  • या वटहुकूमानुसार....
  • ज्याच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरन्ट जारी केले आहे व जी व्यक्ती देशाबाहेर पलायन करून किंवा मायदेशी परत येण्यास नकार देऊन खटल्याला सामोरे जाणे टाळत आहे, अशी व्यक्ती ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ मानली जाईल.
  • अशा कारवाईसाठी संबंधित व्यक्तीला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून जाहीर करण्याचा अधिकार मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखालील विशेष न्यायालयास असेल.
  • मात्र न्यायालयांवर अनावश्यक ताण पडू नये यासाठी सरसकट सर्वच आर्थिक गुन्हेगारांऐवजी फक्त मोठ्या गुन्हेगारांना हा वटहुकूम लागू होईल. यासाठी आर्थिक गुन्ह्याची किमान मर्यादा १०० कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.
  • अशा आरोपींना ६ आठवड्याच्या आत फरारी घोषित केले जाईल. त्याचबरोबर आरोप सिद्ध होण्यापूर्वी अशा आरोपींची संपत्ती जप्त करणे किंवा विकण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
  • अशा गुन्हेगारांचा त्या मालमत्तांविषयी कोणताही दिवाणी दावा दाखल करण्याचा अधिकारही या वटहुकूमाने संपुष्टात येईल.
  • जप्त केलेल्या मालमत्तांची देखभाल व विल्हेवाट यासाठी प्रशासकही त्यामुळे नेमता येईल.
  • मात्र संबंधित व्यक्तीला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ जाहीर करण्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ती व्यक्ती स्वत:हून भारतात परत आली तर तिच्याविरुद्धची ही प्रस्तावित कारवाई आपोआप संपुष्टात येईल.
  • अशा व्यक्तीला भारतात किंवा परदेशात समन्स बजावणे, उत्तरासाठी वाजवी मुदत देणे, वकिलाकरवी बाजू मांडणे व होणाऱ्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणे हे सर्व कायदेशीर अधिकारही असतील.

माकपच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची फेरनिवड

  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २२व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली.
  • माकपच्या मध्यवर्ती समितीतील ९५ नवनियुक्त सदस्यांनी या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब केले.
  • २०१५साली विशाखापट्टणम येथे झालेल्या पक्षाच्या याआधीच्या येचुरी यांची पहिल्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. त्याआधी या पदावर ज्येष्ठ नेते प्रकाश करात होते.

बँकेत खाते नसलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसरा

  • जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल फाइंडेक्स डाटाबेस’ या अहवालानुसार बँकेत खाते नसलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागला आहे.
  • महत्त्वाकांक्षी जनधन योजना यशस्वी झाली असली तरी भारतातील १९ कोटी नागरिकांचे अजूनही कुठल्याही बँकेत खाते नाही, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे.
  • भारतातील एकूण बँक खात्यांपैकी अर्धी बँक खाती गेले वर्षभर निष्क्रिय आहेत, असेही यात म्हटले आहे.
  • जनधन योजनेमुळे मार्च २०१८पर्यंत ३१ कोटी लोक औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले, असा गौरवपूर्ण उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. बँक खाते असणे हे गरिबी निर्मूलनातील पहिले पाऊल समजले जाते.
  • बँकेत खाते असणाऱ्या लोकांची संख्या २०११पासून दुपटीने वाढून ८० टक्के झाली आहे.
  • २०१४मध्ये मोदी सरकारने राबविलेल्या जनधन योजनेमुळे लोक बँकिंग व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत. तरीही बँकेत खाते नसलेल्या जागतिक लोकसंख्येपैकी ११ टक्के लोक भारतातील आहेत.
  • जगाच्या लोकसंख्येपैकी ६९ टक्के म्हणजेच ३.८ अब्ज प्रौढ लोकांकडे आता स्वत:चे बँक खाते अथवा मोबाइल मनी प्रोव्हायडर आहे. २०१४मध्ये हे प्रमाण ६२ टक्के, तर २०११मध्ये अवघे ५१ टक्के होते.
  • अहवालानुसार, बँक खाती नसलेल्या लोकसंख्येचे प्रमाण चीन आणि भारतात अधिक आहे.
  • चीनमधील २२.५ कोटी, भारतातील १९ कोटी, पाकिस्तानातील १० कोटी आणि इंडोनेशियातील ९.५ कोटी प्रौढ नागरिकांचे बँकेत खाते नाही.

चालू घडामोडी : २१ एप्रिल

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा

  • अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
  • अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.
  • कथुआतील मुलीवर झालेला बलात्कार व तिची हत्या यामुळे देशात संतापाचे वातावरण असतानाच सुरत व इंदौरमध्येही तशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे.

उत्तर कोरियाचा अण्वस्त्र परीक्षण थांबविण्याचा निर्णय

  • वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी २१ एप्रिलपासून अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण थांबविण्यात येईल असे जाहीर केले आहे.
  • किम जोंग उन यांनी घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे जगासाठी आनंदाची बातमी आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
  • किम जोंग यांनी अण्वस्त्र आणि क्षेपणस्त्रांचे परीक्षण थांबवण्याबरोबरच त्याचे केंद्रीही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
  • किम जोंग यांनी याआधी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरियामधील तणाव वाढला होता.
  • मात्र गेल्या काही दिवसांपासून किम जोंग यांनी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • देशाची आर्थिक परिस्थिती बघता किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तूळात होत आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

माजी न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे निधन

  • दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे २० एप्रिल रोजी निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते.
  • भारतातील मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी ९ मार्च २००५ रोजी सच्चर यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. ‘सच्चर समिती’ म्हणून ही समिती ओळखली जाते.
  • सच्चर यांनी १९५२साली वकिलीस सुरुवात केली. त्यांनी मानवाधिकारासाठीही मोठे काम केले होते.
  • ५ जुलै १९७२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. याशिवाय सिक्कीम आणि राजस्थान उच्च न्यायालयात त्यांनी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले.

सूर्यनारायण रणसुभे यांना गंगाशरण सिंह पुरस्कार

  • केंद्रीय हिंदी संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘गंगाशरण सिंह पुरस्कार’ सूर्यनारायण रणसुभे यांना जाहीर करण्यात आला.
  • हिंदी भाषेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पाच लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो.
  • भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील हिंदी साहित्याचा अभ्यास करून पीएचडी मिळविल्यानंतर हिंदू-मुस्लिमांमधील प्रश्नांची उकल करणारा विचारवंत अशी रणसुभे यांची ओळख आहे.
  • मराठीतील साहित्य देशभर पोहोचविण्याचा दुवा म्हणून रणसुभे आयुष्यभर झटले.
  • ‘अक्करमाशी’, ‘उचल्या’, ‘आठवणींचे पक्षी’ हे दलित साहित्य त्यांनी हिंदी भाषिकांसाठी अनुवादित केले.
  • मार्क्सवाद आणि आंबेडकर हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय. या व्यक्तींच्या विचारविश्वातील अनेक पुस्तके अनुवादित व्हायला हवी, असे ठरवून त्यांनी केलेले काम देशपातळीवर नावाजले गेले.
  • त्यांना महाराष्ट्र हिंदी अकादमीचा माधव मुक्तिबोध, यशपाल यांचे ‘झूठा सच’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकास सौहार्द पुरस्कार मिळाले आहेत.

टॉप-५० ग्रेटेस्ट लीडर्सच्या यादीत मुकेश अंबानी

  • देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि मानवाधिकार कार्यकर्त्या वकील इंदिरा जयसिंह यांचा ‘फॉर्च्यून’ मासिकाने जगातील टॉप-५० ग्रेटेस्ट लीडर्सच्या यादीत समावेश केला आहे.
  • फॉर्च्यूनने ‘वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ २०१८’ ही जगातील ५० महान पथदर्शकांची यादी जाहीर केली. या यादीत जगभरात बदल घडविणाऱ्या नामांकित व्यक्तींचा समावेश आहे.
  • मानाचा ‘प्रित्जकर पुरस्कार’ मिळालेले स्थापत्य विशारद बाळकृष्ण दोशी, अॅपलचे सीईओ टिम कुक, न्यूझीलँडचे पंतप्रधान जसिंडा आर्डर्न आणि फुटबॉल कोच निक सबान यांच्या नावांचा समावेश या यादीत आहे.
  • अंबानी यांना या यादीत २४वे स्थान मिळाले आहे. मोबाइल डेटा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी फॉर्च्यून मासिकाने अंबानी यांचा गौरव केला आहे.

संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांच्या यादीत भारत

  • अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश केला आहे. या यादीत चीन, जर्मनी, जपान, कोरिया आणि स्वित्झर्लंड यांचाही समावेश आहे.
  • या संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांचे चलन व्यवहार काळजीपूर्वक तपासले जाणार आहेत.
  • संसदेसमोर याबाबत सहामाही अहवाल सादर करण्यात आला असून, पुढील आणखी दोन अहवाल संसदेसमोर सादर होईपर्यंतच्या काळात हे देश यादीत कायम राहणार आहेत.
  • या देशांच्या परकी चलन धोरणात सुधारणा झाल्यास त्यांना यादीतून काढण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
  • या यादीतील देशांकडून चलनामध्ये फेरफार केले जात असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यासाठी दोन ते तीन निकष आहेत.
  • या देशांच्या चलन व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून, व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी नवे धोरण आणण्यास आणि सुधारणा करण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • या यादीत समावेश होण्यामागील प्रमुख कारणे
    • व्यापारातील फायद्यासाठी स्थानिक चलनाच्या मूल्यात बदल.
    • स्वस्त निर्यातीसाठी स्थानिक चलनाचे मूल्य कमी ठेवणे.
    • परकी चलनाची खरेदी वाढूनही स्थानिक चलन वधारणे.
    • व्यापारातील तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न नाहीत.

क्युबा देशावरील कॅस्ट्रो कुटुंबीयांची सत्ता संपुष्टात

  • क्युबाच्या अध्यक्षपदावरून राऊल कॅस्ट्रो पायउतार होणार असून दीर्घकाळ उपाध्यक्षपद भूषवलेले मिगल डायझ-कॅनेल (५७) यांच्याकडे ते सत्तेची सूत्रे सोपवणार आहेत.
  • यामुळे कॅरेबियन समुद्रातील या देशावर कॅस्ट्रो कुटुंबीयांची ६ दशकांची सत्ता संपुष्टात येणार आहे. कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते असलेले डायझ-कॅनेल हे २०१३पासून त्या देशाचे उपाध्यक्ष आहेत.
  • ते कॅस्ट्रो कुटुंबाबाहेरील, तसेच क्युबामधील १९५९च्या क्रांतीनंतर जन्माला आलेल्या पिढीमधील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.
  • क्युबाच्या क्रांतीचे जनक मानले जाणारे फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांचे भाऊ राऊल कॅस्ट्रो यांनी शीतयुद्धात मोठी भूमिका बजावली.
  • सध्या ८६ वर्षांचे असलेले राऊल यांनी २००८मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांच्या आजारपणामुळे सत्ता आपल्या हाती घेतली होती. त्यापूर्वी फिडेल कॅस्ट्रो यांनी सुमारे ५० वर्षे क्युबावर एकहाती वर्चस्व राखले होते.

चालू घडामोडी : १९ व २० एप्रिल

९८व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार

  • ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची निवड करण्यात आली आहे.
  • अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कीर्ती शिलेदार, श्रीनिवास भणगे आणि सुरेश साखवळकर यांच्यात चुरस होती.
  • ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांनीही नगर येथे झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या इतिहासात आई आणि मुलगी अशा दोघींना हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • नाट्य परिषद कार्यकारिणी आणि नियामक मंडळाच्या बैठकीत यावर्षीचे संमेलन १३ ते १५ जून दरम्यान मुंबईत होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
  • याआधी १९९३साली मुंबईत नाट्य संमेलन झाले होते. आता बरोबर पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये नाट्य संमेलनाचे बिगूल वाजणार आहे.
  • नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे हे पहिलेच नाट्य संमेलन असणार आहे.
  • मुंबईत नाट्य संमेलन कुठे घ्यायचे याच्या निवडीचे सर्वाधिकार नियामक मंडळाने प्रसाद कांबळी यांच्याकडे दिले आहेत.

प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत एकही भारतीय राजकारणी नाही

  • नुकतीच ‘टाइम’ मासिकाने २०१८मधील जगातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची यादी जाहीर केली.
  • यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, अभिनेत्री दीपिका पादुकोण, ओला कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल, भारतात जन्मलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचा समावेश आहे.
  • या यादीत समाविष्ट झालेली दीपिका ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री आहे. २०१६मध्ये या यादीत प्रियांका चोप्राचा समावेश होता.
  • परंतु दुर्दैवाने भारतातील एकाही राजकारणी व्यक्तीचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही.
  • ‘टाइम’च्या गतवर्षाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींचा समावेश होता, मात्र यावर्षी मोदींना या यादीतून वगळण्यात आले आहे.
  • भारतात प्रभावशाली नेता म्हणून गणल्या जाणाऱ्या मोदींचा प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.
  • नरेंद्र मोदी यांचा जागतिक प्रभाव उन्नाव, कठुआ, सुरत बलात्कार प्रकरण, जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या अनेक कारणांमुळे कमी झाल्याचे बोलले जात आहे.
  • ‘टाइम’च्या यावर्षीच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग, ब्रिटनचे प्रिन्स हॅरी, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या नावांचा समावेश आहे.

नरोडा पाटिया नरसंहाराप्रकरणी माया कोडनानी दोषमुक्त

  • गुजरातमधील बहुचर्चित नरोडा पाटिया नरसंहाराप्रकरणी गुजरात हायकोर्टाने भाजपाच्या माजी नेत्या माया कोडनानी यांना दोषमुक्त केले आहे.
  • तर बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी पटेलची आजीवन तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला आहे.
  • अहमदाबाद शहराच्या सीमेवर असलेल्या नरोडा पाटिया उपनगरात गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत ९७ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. तर ३३ जण जखमी झाले होते.
  • नरोडा पाटिया हे प्रकरण गुजरात दंगलीशी संबंधित विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) तपास करण्यात येत असलेल्या नऊ प्रकरणांपैकी एक होते.
  • या हत्याकांडाप्रकरणी ऑगस्ट २०१२मध्ये विशेष न्यायालयाने कोडनानी, बाबू बजरंगीसह ३२ जणांना दोषी ठरवले होते. यातील ३० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
  • विशेष न्यायालयाने त्यावेळी बाबू बजरंगीला आजीवन तुरुंगवासाची, तर कोडनानी यांना २८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली होती.
  • नरोडा येथून ३ वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या कोडनानी या नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्य सरकारमध्ये मंत्री होत्या.
  • माया कोडनानी यांच्याविरोधात ठोस पुरावा नसल्याने गुजरात हायकोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे.
  • या खटल्यातील ३२ दोषींपैकी गुजरात हायकोर्टाने कोडनानींसह १७ जणांना दोषमुक्त केले. तर १२ जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी काँग्रेसचा प्रस्ताव

  • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी काँग्रेसने ७१ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेला प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवला.
  • राज्यसभा अध्यक्षांनी या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
  • न्यायाधीश चौकशी कायदा १९६८नुसार न्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभेतील १०० किंवा राज्यसभेतील ५० खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात.
  • दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची चर्चा पहिल्यांदा जानेवारी महिन्यात झाली होती. सीपीएमचे सचिव सीताराम येचुरी यांनी सर्वप्रथम याबद्दल भाष्य केले होते.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी इतिहासात प्रथमच पत्रकार परिषद घेतल्यानंतर येचुरी यांनी महाभियोग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला होता.

चालू घडामोडी : १८ एप्रिल

एमपीएससीच्या परीक्षेला दोन ओळखपत्रे बंधनकारक

  • राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा देताना प्रवेश प्रमाणपत्रासोबत परीक्षार्थीला आता इतर दोन ओळखपत्रे सोबत आणावी लागणार आहेत.
  • बोगस परीक्षार्थींची वाढती प्रकरणे पाहता त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आयोगाना हा निर्णय घेतला आहे.
  • यासाठी परीक्षार्थी उमेदवाराचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट (पारपत्र), पॅनकार्ड आणि स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही दोन ओळखपत्रे व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे आयोगाने बंधनकारक केले आहे.
  • परीक्षार्थीने परीक्षेला येताना या ओळखपत्रांपैकी पुरावा सादर करणारी कोणतीही दोन ओळखपत्रे सोबत आणली नाहीत, तर त्यांना परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येईल, अशी घोषणा आयोगाने केली आहे.
  • याशिवाय, आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांकरता उमेदवारांनी परीक्षेच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा कक्षात हजर राहणे अनिवार्य असल्याचेही आयोगाने कळवले आहे.

दानिश सिद्दीक्की यांचा पुलित्झर पुरस्काराने गौरव

  • रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे मुंबईचे फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीक्की यांना त्यांच्या रोहिंग्या रेफ्युजीच्या फोटोसाठी मानाच्या पुलित्झर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • म्यानमारमधून बांगलादेशमध्ये जाणाऱ्या रोहिंग्या विस्थापितांचे फोटो दानिश सिद्दीक्की यांनी काढले आहेत.
  • यापैकी एका फोटोत एक रोहिंग्या माणूस आपल्या मुलाला खेचून घेऊन चालला आहे अशा आशयाचा एक फोटो आहे. या फोटोला सर्वाधिक पसंती लाभली आहे.
  • दानिश सिद्दीक्की यांचे सहकारी अदनान अबिदी यांनाही पुलित्झर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • मुंबई प्रेस क्लबनेही एक प्रेस नोट काढून फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीक्की यांचे अभिनंदन केले आहे.
  • पत्रकारितेतील मानाच्या पुलित्झर पुरस्कारांची सुरुवात १९१७मध्ये झाली. १५ हजार अमेरिकी डॉलर्स आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • पत्रकारिता, साहित्य. संगीत रचना, वृत्तपत्रासाठीची पत्रकारिता, फोटोग्राफी या सर्वांसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

जेष्ठ पत्रकार एस. निहाल सिंग यांचे निधन

  • प्रसिध्द जेष्ठ पत्रकार एस. निहाल सिंग यांचे १६ एप्रिल रोजी वयाच्या ८९व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • १९२९मध्ये रावळिपडीत जन्मलेल्या निहाल सिंग यांची लोकशाही विचारांचे उदारमतवादी संपादक अशी ख्याती होती.
  • निहाल सिंह इंडियन एक्स्प्रेसचे संपादक होते. याशिवाय, द स्टॅट्समॅनचे मुख्य संपादक आणि खलील टाइम्स व इंडियन पोस्टचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
  • आणीबाणीविरोधात ताठ मानेने उभे राहिलेल्या थोडय़ा पत्रकारांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.
  • आणीबाणीत त्यांनी ‘स्टेट्मन’च्या पहिल्या पानावर ‘आजचा अंक सेन्सॉरशिपखाली छापला गेला आहे’ असे वाक्य ठळकपणे छापून इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणीचा निषेध केला होता.
  • न्यूयॉर्कमधील ‘इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर’ (१९७७) या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
  • गेली २० वर्षे ते स्तंभलेखन करत होते. ओघवत्या शैलीत ते सरकारी धोरणांतील चुकांवर बोट ठेवत त्यामुळे त्याचे लेखन लोकप्रिय होते.
  • संपादक होण्याआधी निहाल सिंग यांनी पाकिस्तान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर, अमेरिका, इंडोनेशिया या देशांत प्रतिनिधी म्हणून काम केले. यामुळे निहाल सिंग यांच्याकडे विदेशनीतीतज्ज्ञ म्हणूनही पाहिले जाई.
  • त्यांचे वडील गुरमुख सिंग दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री होते, नंतर राजस्थानचे राज्यपालही होते.

बीसीसीआयला आरटीआयअंतर्गतआणण्याची शिफारस

  • बीसीसीआयच्या कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक बनवण्यासाठी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आणण्याचा सल्ला विधी आयोगाने दिला आहे.
  • खासगी संस्था असल्याने बीसीसीआयला आतापर्यंत माहितीच्या अधिकार कायद्यातून सूट मिळाली आहे.
  • मात्र आता क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत असलेल्या या मंडळातील व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हा सल्ला देण्यात आला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली विधी आयोगाने यासंबंधीचा अहवाल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे पाठवला आहे.
  • विधी आयोगाने आपल्या सल्ल्यामध्ये बीसीसीआय आणि तिच्याशी संबंधित सर्व घटकांना आरटीआयअंतर्गत आणण्याची शिफारस केली आहे.
  • २०१३साली आयपीएलमध्ये उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर क्रिकेट मंडळात सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.
  • बीसीसीआयला एका राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा दर्जा बहाल करण्यात यावा आणि ही संघटना लोकांना उत्तरदायी असेल, असे विधी आयोगाने म्हटले आहे.
  • बीसीसीआयचा दर्जा लोकाभिमुख संघटनेसारखा असावा, असे विधी आयोगाचे मत आहे.
  • सरकारने विधी आयोगाच्या शिफारशी मान्य केल्यास बीसीसीआयमध्ये मोठे बदल पहायला मिळतील.

चालू घडामोडी : १७ एप्रिल

भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा ७.३ टक्के राहणार : जागतिक बँक

  • यंदाच्या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा ७.३ टक्के इतका राहिल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
  • याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या परिणामांमधून बाहेर पडली असल्याचेही जागतिक बँकेने म्हटले आहे.
  • २०१९ आणि २०२०मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्के वेगाने वाढेल, असाही अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. 
  • जागतिक बँकेकडून वर्षातून दोनदा 'साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट' प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालात हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
  • भारताच्या आर्थिक वाढीचा वेग स्थिर असेल. याशिवाय खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदेखील चांगली राहिल, असा अंदाज आहे.
  • जागतिक स्तरावर आर्थिक स्तरावर मुसंडी मारायची असल्यास, भारताने गुंतवणूक आणि निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे जागतिक बँकेचा अहवाल सांगतो. 
  • नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा फटका भारतातील गरिबांना बसल्याचा उल्लेखदेखील अहवालात करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांची घोषणा

  • राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.
  • राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना जाहीर झाला.
  • तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला.
  • मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. 
  • यातील जीवनगौरव पुरस्कार पाच लाख रुपयांचा, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपयांचा आहे.
  • चित्रपटसृष्टीत १९६०मध्ये पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आतापर्यंत सुमारे २५०हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांना २०१२मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक अशी राजकुमार हिरानी यांची ओळख आहे. विधू विनोद चोप्रा यांचे सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाला सुरवात केली.
  • त्यांनी स्वतः प्रमुख दिग्दर्शक म्हणून मुन्नाभाई एम.बी.बी.एस. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • राजकुमार हिरानी यांना आजवर फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • विजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत सहायक कलाकार म्हणून आले. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक.
  • मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी या तिन्ही क्षेत्रांत काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
  • रमा माधव या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पाकिस्तानामध्ये तृतीयपंथीयासांठी पहिली शाळा सुरु

  • पाकिस्तानामध्ये तृतीयपंथीयासांठीच्या पहिल्या शाळेचे १६ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशनचा हा प्रकल्प आहे.
  • २०१६साली इंडोनेशियात तृतीयपंथीयांच्या शाळेला बॉम्बने उडवून देण्यात आले. मुस्लीम देशांमध्ये तृतीयपंथीयांसाठी असणारी ती एकमेव शाळा होती.
  • त्यानंतर तृतीयपंथीयांना शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशनचा ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
  • या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही अट नसेल. सध्या या शाळेत तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
  • शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्याआधारीत प्रशिक्षणही या शाळेत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या शैक्षणिक संस्थेमधून मुलांना डिप्लोमाचे शिक्षण घेता येणार आहे. 
  • या शिक्षणाच्या जोरावर त्यांना नोकरी मिळवणे शक्य होणार आहे किंवा त्यांना व्यवसाय करायचा असेल तर एनजीओची मदत मिळणार आहे.
  • २०१७सालच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये १०,४१८ तृतीयपंथी आहेत.

अमेरिकेच्या माजी प्रथम महिला बारबरा बुश यांचे निधन

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या पत्नी बारबरा बुश यांचे १७ एप्रिल रोजी ९२व्या वर्षी निधन झाले. राष्ट्राध्यक्षांची पत्नी या नात्याने त्या अमेरिकेच्या माजी प्रथम महिला होत्या.
  • बारबरा अशा एकमेव महिला होत्या ज्यांनी आपल्या जीवनात पती आणि मुलगा या दोघांनाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले पाहिले आहे.
  • बारबरा बुश या अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या पत्नी तर ४३वे ऱाष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या आई होत्या.
  • बुश या गेल्या काही वर्षांपासून क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पलमोनरी पोग आणि कॉन्जेस्टीव्ह हार्ट या आजाराने ग्रस्त होत्या. निधनापूर्वी बारबरा बुश यांना आजारामुळे अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चालू घडामोडी : १६ एप्रिल

आयुष्यमान भारत योजनेचे पहिले आरोग्यसेवा केंद्र छत्तीसगडमध्ये

  • आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
  • या योजनेंतर्गत पहिले आरोग्य केंद्र मिळवण्याचा मान छत्तीसगडला मिळाला असून या राज्यातील बिजापूर येथे या केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चौथा छत्तीसगड दौरा ठरला आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • बस्तर इंटरनेट योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही मोदी त्यांच्या हस्ते झाले. त्याद्वारे आदिवासीबहुल सात जिल्ह्यांत ४० हजार किमी फायबर ऑप्टिकल केबल टाकून इंटरनेट जाळे निर्माण करण्यात येणार आहे.
  • तसेच त्यांनी गुडुम व भानुप्रतापपूर या दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचे उद्घाटनही केले. यामुळे बस्तर विभाग रेल्वेच्या नकाशावर आला आहे.
 आयुष्यमान भारत 
  • आयुष्यमान भारत ही योजना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना म्हणूनही ओळखली जाते.
  • सर्व स्तरातील जनतेला प्राथमिक आरोग्यसेवा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि देशाच्या ४० टक्के लोकसंख्येला विम्याचे संरक्षण देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.
  • आजवर आरोग्यसेवांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळावा असा त्यामागे उद्देश आहे.
  • ही योजना १० लाख गरिब कुटुंबांना ५ लाखांपर्यंत दुय्यम आणि तृतीय रुग्णालय सेवांसाठी संरक्षण उपलब्ध करुन देणार आहे.
  • आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २०२२ पर्यंत देशात १.५ लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
  • केंद्र सरकारकडून १०,५०० कोटी रुपयांच्या या योजनेला २१ मार्च रोजी मान्यता मिळाली होती.

मक्का मशिदीतील बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपी दोषमुक्त

  • हैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने ११ वर्षानंतर सबळ पुराव्या अभावी स्वामी असीमानंदसह पाचही आरोपींना दोषमुक्त केले आहे.
  • हैदराबादमधील मक्का मशिदीत १८ मे २००७ रोजी नमाज सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये ९ जण ठार तर ५८ जखमी झाले होते.
  • या स्फोटानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी ५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण १६० साक्षीदार होते.
  • हैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये १० आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत.
  • त्यापैकी स्वामी असीमानंदसह पाच जणांना तपास यंत्रणांनी अटक केली होती. यातील स्वामी असीमानंद व भरत भाई या दोघांची जामिनावर सुटका झाली होती. तर उर्वरित तीन आरोपी हैदराबादमधील कारागृहात आहेत.
  • सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. एप्रिल २०११मध्ये या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला.
  • या खटल्याचा निकाल दिल्यानंतर काही तासांतच विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे.
  • रेड्डी यांनी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना आपला राजीनामा पाठवला. वैयक्तिक कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे.
  • राजीनामा देण्याआधी रेड्डी यांनी मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी सबळ पुराव्याअभावी स्वामी असीमानंदसह पाचही आरोपींना दोषमुक्त केले होते.

सीरियावरील मित्रराष्ट्रांच्या हल्ल्याचा रशियाकडून निषेध

  • सीरियात अमेरिका व मित्र देशांनी केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध करण्याचा रशियाचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातील प्रयत्न फसला आहे.
  • अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी हा हल्ला केला होता. त्यावर रशियाने तातडीने सुरक्षा मंडळाची बैठक घेण्यास भाग पाडले. त्यात जे मतदान झाले त्यात निषेधाचा ठराव फसला.
  • रशियाने अमेरिकी आक्रमणाचा निषेध करून ते ताबडतोब थांबवण्याची मागणी करणारा ठराव मांडला होता. त्यात रशियाला चीन व बोलिव्हिया यांचा पाठिंबा मिळाला.
  • रशियाच्या ठरावाविरोधात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स, स्वीडन, कुवेत, पोलंड, आयव्हरी कोस्ट या देशांनी मतदान केले, तर इथिओपिया, कझाकस्तान, इक्विटोरियल गिनिया व पेरू हे देश अलिप्त राहिले.
  • ७ एप्रिलला सीरियात दमास्कसचे उपनगर असलेल्या डौमा येथे करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यात सुमारे ७४ जण मरण पावले होते.
  • या हल्ल्यासाठी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हेच जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत अमेरिकेने १४ एप्रिल रोजी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले. त्याला फ्रान्स आणि ब्रिटननेही पाठिंबा दिला होता.
  • अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन या देशांनी सीरियातील रासायनिक अस्त्रांच्या चौकशीसाठी नव्याने प्रस्ताव मांडला असून तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळ बैठकीत प्रसारित करण्यात आला.

विख्यात चित्रकार रामकुमार यांचे निधन

  • भारतीय भूदृश्यांना चिंतनशील अमूर्त रूप देणारे विख्यात चित्रकार रामकुमार यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
  • रामकुमार यांचे वडील सरकारी अधिकारी होते, तर हिन्दी नवसाहित्याचे अग्रदूत निर्मल वर्मा हे त्यांचे धाकटे बंधू होते.
  • स्वत: रामकुमार यांनीही हिंदीत लिहिलेल्या कादंबऱ्या व निबंधांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण चित्रकार म्हणूनच त्यांना अधिक मान मिळाला.
  • रामकुमार हे मूळचे दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेज या संस्थेत अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. पण आर्थिक समस्यांविषयीची तगमग व्यक्त करण्यासाठी त्यांनी चित्रकलेचा आधार घेतला.
  • रामकुमार यांच्या चित्रांना व्यावसायिक यश मिळवून देण्यात मुंबईच्या काली पंडोल यांनी स्थापलेल्या पंडोल कलादालनाचा मोठा वाटा होता.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९

आगामी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या 'केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९' या विषयावरील नोट्स MT Appवरून आजच डाउनलोड करा. 


Join us on Telegram >> https://t.me/MPSC_Toppers

ही नोट्स मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)

चालू घडामोडी : १४ व १५ एप्रिल

राष्ट्रकुल स्पर्धा : पदकतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी कायम

  • बॉक्सिंग
  • मेरी कोमने ४५-४८ किलो वजनीगटात सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. मेरीचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक ठरले.
  • ५२ किलो वजनी गटात भारताच्या गौरव सोळंकीने सुवर्णपदकाची कमाई केली.
  • ६० किलो वजनी गटात मनीष कुमारला तर ४९ किलो वजनी गटात अमित फोंगलला रौप्यपदक.
  • महम्मद हुसामुद्दिन ५६ किलो गटात, मनोजला ६९ किलो गटात, नमन तन्वरला ९१ किलो गटात कांस्यपदक.
  • याबरोबरच सतीश कुमार व विकास कृष्णन यांनी बॉक्सिंगच्या अंतिम फेरीकडे वाटचाल करीत किमान रौप्यपदक निश्चित केले आहेत.
  • कुस्ती
  • कुस्तीपटू सुमित मलिकने १२५ किलो फ्रिस्टाईल कुस्तीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
  • विनेश फोगाटने ५० किलो फ्रिस्टाईल कुस्तीत कॅनडाची खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन जेसिका मॅक्डोनाल्डवर मात करत सुवर्णपदक पटकावले.
  • साक्षी मलिकने ६२ किलो फ्रिस्टाईल कुस्तीत न्यूझीलंडच्या टायला फोर्डला पराभूत करत कांस्यपदक मिळवले.
  • सोमवीरने ८६ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
  • नेमबाजी
  • ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात ४५४.५ गुणांची कमाई करत संजीव राजपूतने सुवर्णपदकाची कमाई केली. २०१४साली ग्लास्गो राष्ट्रकुल खेळांमध्ये संजीव राजपूतला कांस्यपदक मिळाले होते.
  • टेबल टेनिस
  • भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये ऐतिहासीक सुवर्णपदक जिंकले.
  • टेबल टेनिसच्या एकेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणारी मनिका बत्रा पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
  • या राष्ट्रकुल स्पर्धेतील मनिकाचे हे तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघात मनिकाने भारताच्या विजयात मोठा हातभार लावला होता.
  • यानंतर महिला दुहेरी सामन्यात मौमा दासच्या साथीने खेळताना मनिका बत्राने रौप्य पदकावर नाव कोरले होते.
  • अॅथलेटिक्स
  • भालाफेकपटू नीरज चोप्राने ८६.४७ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • स्क्वॉश
  • दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच स्क्वॉश मिश्र दुहेरीमध्ये रौप्यपदक पटकावले.

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विष्णू कोकजे

  • हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल निवृत्त न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • केवळ विद्यमान अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची उचलबांगडी करण्याच्या उद्देशाने ५२ वर्षांनंतर पहिल्यांदाच विहिंपच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती, असे म्हटले जात आहे.
  • केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा तोगडिया यांच्यावर नाराज होते.
  • या निवडणुकीमध्ये विष्णु सदाशिव कोकजे यांना १९२ पैकी १३१ मते मिळाली. तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना ६० मते मिळाली. एक मत अवैध ठरवण्यात आले.
  • आता विश्व हिंदू परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नव्या कार्यकारिणीत तोगडिया गटातील एकाही व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला नाही.
  • विंहिपच्या कार्याध्यक्षपदी आलोककुमार, कार्याध्यक्ष (विदेश विभाग) अशोकराव चौगुले, महामंत्रीपदी मिलिंद पांडे, संघटन महामंत्रीपदी विनायकराव देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
  • डिसेंबर २०१७मध्ये तोगडिया यांच्या पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी २९ डिसेंबर २०१७ला भुवनेश्वरमध्ये बैठकदेखील झाली होती. मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत कोकजे यांच्या नावाला विरोध केला होता.

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द

  • गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या उग्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीनायांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण पद्धत जवळपास रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
  • या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि बेरोजगारांचा समावेश असलेले १०,००० आंदोलक ढाका शहरात ठाण मांडून बसले होते.
  • अखेर या आंदोलनापुढे नमते घेत पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
  • बांगलादेशातील प्रचलित व्यवस्थेनुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये विविध घटकांना सुमारे ५६ टक्के आरक्षण आहे.
  • यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची मुले, महिला, पारंपरिक अल्पसंख्याक, दिव्यांग आणि काही मागास प्रदेशातील लोकांचा समावेश होता.
  • मात्र, नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर आता सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ १० टक्के आरक्षण असेल.
  • या आंदोलनाच्यानिमित्ताने बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे ढाका शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
  • बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ २ टक्के असलेल्या लोकांना ५६ टक्के आरक्षण दिले जाते. उर्वरित ९८ टक्के लोकांसाठी फक्त ४४ टक्के संधी उपलब्ध असण्यावर आंदोलकांचा आक्षेप होता.
  • या आरक्षणामुळे अनेक लोकांवर अन्याय होत असून सगळ्यांसाठी समान न्याय असावा, अशी मागणी या आंदोलकांनी लावून धरली होती.
  • या आंदोलनामुळे देशातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर अखेर पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत आरक्षण पद्धती रद्द करत असल्याची ऐतिहासिक घोषणा केली.

सीरियावर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनचा हवाई हल्ला

  • सीरियातील डुमा शहरात ७ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यासाठी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हेच जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले. त्याला फ्रान्स आणि ब्रिटननेही पाठिंबा दिला.
  • अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी सीरियावर केलेल्या तुफान हल्ल्याने संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • रशियाने या परिस्थितीत उघड उघड सीरियाची कड घेतल्याने पुन्हा एकदा शीतयुद्धाचे अस्थिर पर्व सुरू होणार का, अशी शंका भेडसावू लागली आहे.
  • सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डुमा येथे ७ एप्रिल रोजी रासायनिक हल्ला करण्यात आला. त्यात लहान मुलांसह एकूण ७४ जणांनी जीव गमावला.
  • क्रौर्य व अमानुषता यावर अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी हा हल्लाबोल केला आहे. रासायनिक अस्त्रांची निर्मिती, फैलाव व वापर यांना अटकाव करण्यासाठी हे कठोर पाऊल टाकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
  • या हल्ल्यात तिन्ही देशांना बी-१ बॉम्बर्स, टोरनॅडो जेट्ससारख्या काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला.
  • अमेरिकेकडून आरलीग ब्रूक क्लास आणि टिकोनडर्गो क्लास क्रूझर्ससोबतच अनेक टॉमहॉक क्रूझ मिसाइलचा वापर करण्यात आला.
  • सीरियाची राजधानी दमास्कस, तसेच होम्स या शहरानजीकची दोन ठिकाणे या हल्ल्याचे मुख्य लक्ष्यहोती.
  • सीरियातील यादवी, अनन्वित हिंसाचार, रशियाचा त्या देशातील हस्तक्षेप, अध्यक्ष असद यांच्याविषयी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना असलेले ममत्व, असद यांना अमेरिकेचा असलेला विरोध अशा अनेक बाबींमुळे सीरियातील स्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे.