चालू घडामोडी : २४ एप्रिल
टीसीएसचे बाजार भांडवल १०० बिलियन डॉलर्स
- देशातली दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टाटा समूहातील एक प्रमुख कंपनी असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) १०० बिलियन डॉलर्स बाजार भांडवल असलेली भारतातील एकमेव कंपनी बनली आहे.
- २३ एप्रिल रोजी या कंपनीच्या समभागाचा भाव वधारल्याने टीसीएसने १०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या (६.७ लाख कोटी रुपये) भांडवली मूल्याचा टप्पा पार केला.
- टीसीएसने इतर कंपन्यांना पछाडत ही उंची गाठली आहे. टीसीएसचे बाजार भांडवल इतर आयटी इंडेक्स कंपन्यांच्या तुलनेत ५२ टक्क्यांहून अधिक आहे.
- टीसीएसचे भागभांडवल २०१०मध्ये २५,००० कोटी, २०१३मध्ये ५०,००० तर २०१४पर्यंत ७५,००० कोटींपर्यंत गेले होते.
- पाकिस्तान शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या एकत्रित भांडवली मूल्यापेक्षा एकट्या टीसीएसचे भांडवल अधिक आहे.
- मार्चअखेरीस संपलेल्या तिमाहीत टीसीएसच्या समभागात ५.७१ टक्क्यांची वाढ झाली होती. मार्चअखेर टीसीएसने ६,९०४ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
- जागतिक स्तरावर १०० अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार करणारी टीसीएस ही ६४वी कंपनी ठरली. अॅमेझॉन, फेसबुक आदी कंपन्या यापूर्वीच या सूचीत आहेत.
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत शाहजार रिझवीला रौप्यपदक
- दक्षिण कोरियाच्या चँगवोन शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या शाहजार रिझवीने रौप्य पदकाची कमाई केलेली आहे.
- रिझवीने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात २३९.८ गुणांची कमाई करत रौप्यपदकावर मोहर उमटवली.
- दक्षिण कोरियात सुरु असलेल्या या स्पर्धेत तब्बल ७० देशांच्या ८०० खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे.
राफेल नदालने माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विक्रमी जेतेपद
- जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू स्पेनच्या राफेल नदालने तुफानी खेळ करताना माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विक्रमी ११व्यांदा जेतेपद पटकावले.
- एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालने जपानच्या केई निशिकोरीचा ६-३, ६-२ असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला.
- या जेतेपदासह नदालने कोणत्याही एका स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद पटकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. एकाच स्पर्धेचे ११ जेतेपदे पटकावणारा नदाल पहिला खेळाडू ठरला. याआधी त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेचे विक्रमी १० वेळा जेतेपद उंचावले आहे.
- त्याचे हे ७६वे एटीपी टूअर जेतेपद ठरले. तसेच मास्टर्स स्पर्धेतील त्याचे हे ३१वे जेतेपद आहे.
- यासह त्याने सर्बियाचा स्टार नोव्हाक जोकोविचच्या ३१ मास्टर्स जेतेपदांच्या विक्रमाचीही बरोबरी केली.
टाटा सन्सच्या कार्पोरेट अध्यक्षपदी एस. जयशंकर
- टाटा सन्सच्या वैश्विक आणि कार्पोरेट विभागाच्या अध्यक्षपदी माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- टाटाच्या जागतिक कार्पोरेट कामकाजाच्या जबाबदारीसह टाटाची जागतिक धोरणं ठरवण्याची जबाबदारीही जयशंकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
- जयशंकर हे जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ दरम्यान देशाच्या परराष्ट्र सचिवपदी होते.
- टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून जयशंकर यांना टाटाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना रिपोर्ट द्यावा लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा