चालू घडामोडी : ४ एप्रिल
वैज्ञानिक कीप थॉर्न यांना लुईस थॉमस पारितोषिक
- नोबेल विजेते वैज्ञानिक कीप थॉर्न यांना विज्ञान प्रसारासाठी केलेल्या कार्यासाठी ‘लुईस थॉमस पारितोषिक २०१८’ जाहीर करण्यात आले आहे.
- समजण्यास कठीण असे नोबेलप्राप्त संशोधन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या विज्ञान लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- सापेक्षतावादातून गुरुत्वाची संकल्पना सोपी करण्यासाठी थॉर्न यांचे नाव घेतले जाते. काल, अवकाश या गुरुत्वाच्या भौमितिक गुणधर्माना त्यांनी अचूक, पण सोप्या पद्धतीने लोकांसमोर मांडले.
- पुस्तके, भाषणे व माहितीपट या माध्यमांतून त्यांनी विज्ञान प्रसाराचे काम केले आहे. वर्महोल्स, ब्लॅकहोल्स यांसारख्या संकल्पना त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून दिल्या आहेत.
- ‘ब्लॅक होल्स अँड टाइम वार्पस- आइनस्टाइन आउटरेजिअर लीगली’ हे पुस्तक १९९४मध्ये त्यांनी लिहिले तेव्हापासून त्यांचा हा लेखन प्रवास अखंड सुरूच आहे.
- २०१४मधील ‘इंटरस्टेलर’ या चित्रपटाचे ते सल्लागार होते. या चित्रपटाआधारे सापेक्षतावादाचे गणित उलगडण्यासाठी त्यांनी नंतर ‘दि सायन्स ऑफ इंटरस्टेलर’ हे पुस्तकच लिहिले.
- लुईस थॉमस पुरस्कार हा खास ‘वैज्ञानिकातील कवी’ला दिला जातो, त्या अर्थाने थॉर्न हे विज्ञानाचे निरूपण करणारे प्रतिभाशाली कवीच आहेत.
- थॉर्न यांना गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी २०१७चे भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाले आहे. सध्या ते कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत फेनमन प्रोफेसर आहेत.
संयुक्त राष्ट्रांकडून दहशतवाद्यांची यादी जाहीर
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये १३९ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश आहे.
- या यादीमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचाही समावेश आहे.
- दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांसोबत कार्यरत आहेत किंवा संलग्न आहेत, अशा दहशतवाद्यांचा यादीमध्ये समावेश आहे.
- यादीमध्ये पहिले नाव अयमान अल जवाहिरीचे आहे, ज्याला अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी मानले जाते.
- संयुक्त राष्ट्राने असा दावा केला आहे की, जवाहिरी सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा रेषेजवळच वास्तव्यास आहे.
- याशिवाय ‘लष्कर ए तोयबा’शी संबंधित अल मन्सूरियन, पासबान ए काश्मीर, जमात उद दावा, फलाह ए इन्सानियत फाऊंडेशन या संघटनांचाही दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
रिलायन्स जिओच्या पेमेंट बँकेची सुरुवात
- मोबाइल क्षेत्रात खळबळ उडवून देणारी रिलायन्स जिओ कंपनी आता पेमेंट बँकिंग क्षेत्रातही उतरली आहे.
- जिओने ३ एप्रिल २०१८ पासून पेमेंट बँकेच्या स्वरूपात व्यवहारास सुरूवात केली, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
- ऑगस्ट २०१५ मध्ये पेमेंट बँक सुरू करण्यासाठी ११ जणांना परवानगी देण्यात आली होती. रिलायन्स उद्योगसमूह त्यापैकी एक आहे.
- मोबाइल क्षेत्रातील भारती एअरटेलने नोव्हेंबर २०१६मध्ये सर्वांत पहिल्यांदा पेमेंट बँक सुरू केली होती.
- तर पेटीएमचे संस्थापक विजय शेख शर्मा संचलित पेटीएम बँकेने मे २०१७ आणि फिनो पेमेंट बँकेने मागील वर्षी जूनमध्ये व्यवयासास सुरूवात केली होती.
तामिळ दिग्दर्शक सी.व्ही. राजेंद्रन यांचे निधन
- तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते सी.व्ही. राजेंद्रन यांचे १ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले.
- तमिळ, कन्नड, मल्याळम्, तेलुगू आणि हिंदी अशा भाषांतून चित्रपट केले. त्यांचे बहुतांशी चित्रपट तमिळ होते. गलाटाकल्याणम्, सुमथी एनसुंदरी, पून्नून्जल हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.
- त्यांचे चुलतबंधू दिवंगत सी.व्ही. श्रीधर यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीला सहाय्यक आणि सहकारी दिग्दर्शक म्हणून काम केले.
- जयललिता, रजनीकांत, कमल हासन, राजकुमार, जितेंद्र, जयशंकर, विष्णुवर्धन, व्ही. रविचंद्रन, श्रीनाथ अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा