चालू घडामोडी : २१ एप्रिल

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा

 • अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 • अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.
 • कथुआतील मुलीवर झालेला बलात्कार व तिची हत्या यामुळे देशात संतापाचे वातावरण असतानाच सुरत व इंदौरमध्येही तशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे.

उत्तर कोरियाचा अण्वस्त्र परीक्षण थांबविण्याचा निर्णय

 • वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी २१ एप्रिलपासून अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण थांबविण्यात येईल असे जाहीर केले आहे.
 • किम जोंग उन यांनी घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे जगासाठी आनंदाची बातमी आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
 • किम जोंग यांनी अण्वस्त्र आणि क्षेपणस्त्रांचे परीक्षण थांबवण्याबरोबरच त्याचे केंद्रीही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
 • किम जोंग यांनी याआधी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरियामधील तणाव वाढला होता.
 • मात्र गेल्या काही दिवसांपासून किम जोंग यांनी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • देशाची आर्थिक परिस्थिती बघता किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तूळात होत आहे.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

माजी न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे निधन

 • दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे २० एप्रिल रोजी निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते.
 • भारतातील मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी ९ मार्च २००५ रोजी सच्चर यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. ‘सच्चर समिती’ म्हणून ही समिती ओळखली जाते.
 • सच्चर यांनी १९५२साली वकिलीस सुरुवात केली. त्यांनी मानवाधिकारासाठीही मोठे काम केले होते.
 • ५ जुलै १९७२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. याशिवाय सिक्कीम आणि राजस्थान उच्च न्यायालयात त्यांनी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले.

सूर्यनारायण रणसुभे यांना गंगाशरण सिंह पुरस्कार

 • केंद्रीय हिंदी संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘गंगाशरण सिंह पुरस्कार’ सूर्यनारायण रणसुभे यांना जाहीर करण्यात आला.
 • हिंदी भाषेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पाच लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो.
 • भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील हिंदी साहित्याचा अभ्यास करून पीएचडी मिळविल्यानंतर हिंदू-मुस्लिमांमधील प्रश्नांची उकल करणारा विचारवंत अशी रणसुभे यांची ओळख आहे.
 • मराठीतील साहित्य देशभर पोहोचविण्याचा दुवा म्हणून रणसुभे आयुष्यभर झटले.
 • ‘अक्करमाशी’, ‘उचल्या’, ‘आठवणींचे पक्षी’ हे दलित साहित्य त्यांनी हिंदी भाषिकांसाठी अनुवादित केले.
 • मार्क्सवाद आणि आंबेडकर हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय. या व्यक्तींच्या विचारविश्वातील अनेक पुस्तके अनुवादित व्हायला हवी, असे ठरवून त्यांनी केलेले काम देशपातळीवर नावाजले गेले.
 • त्यांना महाराष्ट्र हिंदी अकादमीचा माधव मुक्तिबोध, यशपाल यांचे ‘झूठा सच’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकास सौहार्द पुरस्कार मिळाले आहेत.

टॉप-५० ग्रेटेस्ट लीडर्सच्या यादीत मुकेश अंबानी

 • देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि मानवाधिकार कार्यकर्त्या वकील इंदिरा जयसिंह यांचा ‘फॉर्च्यून’ मासिकाने जगातील टॉप-५० ग्रेटेस्ट लीडर्सच्या यादीत समावेश केला आहे.
 • फॉर्च्यूनने ‘वर्ल्ड्स ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ २०१८’ ही जगातील ५० महान पथदर्शकांची यादी जाहीर केली. या यादीत जगभरात बदल घडविणाऱ्या नामांकित व्यक्तींचा समावेश आहे.
 • मानाचा ‘प्रित्जकर पुरस्कार’ मिळालेले स्थापत्य विशारद बाळकृष्ण दोशी, अॅपलचे सीईओ टिम कुक, न्यूझीलँडचे पंतप्रधान जसिंडा आर्डर्न आणि फुटबॉल कोच निक सबान यांच्या नावांचा समावेश या यादीत आहे.
 • अंबानी यांना या यादीत २४वे स्थान मिळाले आहे. मोबाइल डेटा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी फॉर्च्यून मासिकाने अंबानी यांचा गौरव केला आहे.

संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांच्या यादीत भारत

 • अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश केला आहे. या यादीत चीन, जर्मनी, जपान, कोरिया आणि स्वित्झर्लंड यांचाही समावेश आहे.
 • या संशयास्पद परकी चलन धोरण असलेल्या देशांचे चलन व्यवहार काळजीपूर्वक तपासले जाणार आहेत.
 • संसदेसमोर याबाबत सहामाही अहवाल सादर करण्यात आला असून, पुढील आणखी दोन अहवाल संसदेसमोर सादर होईपर्यंतच्या काळात हे देश यादीत कायम राहणार आहेत.
 • या देशांच्या परकी चलन धोरणात सुधारणा झाल्यास त्यांना यादीतून काढण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
 • या यादीतील देशांकडून चलनामध्ये फेरफार केले जात असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यासाठी दोन ते तीन निकष आहेत.
 • या देशांच्या चलन व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून, व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी नवे धोरण आणण्यास आणि सुधारणा करण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
 • या यादीत समावेश होण्यामागील प्रमुख कारणे
  • व्यापारातील फायद्यासाठी स्थानिक चलनाच्या मूल्यात बदल.
  • स्वस्त निर्यातीसाठी स्थानिक चलनाचे मूल्य कमी ठेवणे.
  • परकी चलनाची खरेदी वाढूनही स्थानिक चलन वधारणे.
  • व्यापारातील तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न नाहीत.

क्युबा देशावरील कॅस्ट्रो कुटुंबीयांची सत्ता संपुष्टात

 • क्युबाच्या अध्यक्षपदावरून राऊल कॅस्ट्रो पायउतार होणार असून दीर्घकाळ उपाध्यक्षपद भूषवलेले मिगल डायझ-कॅनेल (५७) यांच्याकडे ते सत्तेची सूत्रे सोपवणार आहेत.
 • यामुळे कॅरेबियन समुद्रातील या देशावर कॅस्ट्रो कुटुंबीयांची ६ दशकांची सत्ता संपुष्टात येणार आहे. कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते असलेले डायझ-कॅनेल हे २०१३पासून त्या देशाचे उपाध्यक्ष आहेत.
 • ते कॅस्ट्रो कुटुंबाबाहेरील, तसेच क्युबामधील १९५९च्या क्रांतीनंतर जन्माला आलेल्या पिढीमधील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.
 • क्युबाच्या क्रांतीचे जनक मानले जाणारे फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांचे भाऊ राऊल कॅस्ट्रो यांनी शीतयुद्धात मोठी भूमिका बजावली.
 • सध्या ८६ वर्षांचे असलेले राऊल यांनी २००८मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांच्या आजारपणामुळे सत्ता आपल्या हाती घेतली होती. त्यापूर्वी फिडेल कॅस्ट्रो यांनी सुमारे ५० वर्षे क्युबावर एकहाती वर्चस्व राखले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा