चालू घडामोडी : १६ एप्रिल

आयुष्यमान भारत योजनेचे पहिले आरोग्यसेवा केंद्र छत्तीसगडमध्ये

  • आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
  • या योजनेंतर्गत पहिले आरोग्य केंद्र मिळवण्याचा मान छत्तीसगडला मिळाला असून या राज्यातील बिजापूर येथे या केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चौथा छत्तीसगड दौरा ठरला आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • बस्तर इंटरनेट योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही मोदी त्यांच्या हस्ते झाले. त्याद्वारे आदिवासीबहुल सात जिल्ह्यांत ४० हजार किमी फायबर ऑप्टिकल केबल टाकून इंटरनेट जाळे निर्माण करण्यात येणार आहे.
  • तसेच त्यांनी गुडुम व भानुप्रतापपूर या दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचे उद्घाटनही केले. यामुळे बस्तर विभाग रेल्वेच्या नकाशावर आला आहे.
 आयुष्यमान भारत 
  • आयुष्यमान भारत ही योजना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना म्हणूनही ओळखली जाते.
  • सर्व स्तरातील जनतेला प्राथमिक आरोग्यसेवा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि देशाच्या ४० टक्के लोकसंख्येला विम्याचे संरक्षण देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.
  • आजवर आरोग्यसेवांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळावा असा त्यामागे उद्देश आहे.
  • ही योजना १० लाख गरिब कुटुंबांना ५ लाखांपर्यंत दुय्यम आणि तृतीय रुग्णालय सेवांसाठी संरक्षण उपलब्ध करुन देणार आहे.
  • आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २०२२ पर्यंत देशात १.५ लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
  • केंद्र सरकारकडून १०,५०० कोटी रुपयांच्या या योजनेला २१ मार्च रोजी मान्यता मिळाली होती.

मक्का मशिदीतील बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपी दोषमुक्त

  • हैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने ११ वर्षानंतर सबळ पुराव्या अभावी स्वामी असीमानंदसह पाचही आरोपींना दोषमुक्त केले आहे.
  • हैदराबादमधील मक्का मशिदीत १८ मे २००७ रोजी नमाज सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये ९ जण ठार तर ५८ जखमी झाले होते.
  • या स्फोटानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी ५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण १६० साक्षीदार होते.
  • हैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये १० आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत.
  • त्यापैकी स्वामी असीमानंदसह पाच जणांना तपास यंत्रणांनी अटक केली होती. यातील स्वामी असीमानंद व भरत भाई या दोघांची जामिनावर सुटका झाली होती. तर उर्वरित तीन आरोपी हैदराबादमधील कारागृहात आहेत.
  • सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. एप्रिल २०११मध्ये या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला.
  • या खटल्याचा निकाल दिल्यानंतर काही तासांतच विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे.
  • रेड्डी यांनी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना आपला राजीनामा पाठवला. वैयक्तिक कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे.
  • राजीनामा देण्याआधी रेड्डी यांनी मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी सबळ पुराव्याअभावी स्वामी असीमानंदसह पाचही आरोपींना दोषमुक्त केले होते.

सीरियावरील मित्रराष्ट्रांच्या हल्ल्याचा रशियाकडून निषेध

  • सीरियात अमेरिका व मित्र देशांनी केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध करण्याचा रशियाचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातील प्रयत्न फसला आहे.
  • अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी हा हल्ला केला होता. त्यावर रशियाने तातडीने सुरक्षा मंडळाची बैठक घेण्यास भाग पाडले. त्यात जे मतदान झाले त्यात निषेधाचा ठराव फसला.
  • रशियाने अमेरिकी आक्रमणाचा निषेध करून ते ताबडतोब थांबवण्याची मागणी करणारा ठराव मांडला होता. त्यात रशियाला चीन व बोलिव्हिया यांचा पाठिंबा मिळाला.
  • रशियाच्या ठरावाविरोधात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स, स्वीडन, कुवेत, पोलंड, आयव्हरी कोस्ट या देशांनी मतदान केले, तर इथिओपिया, कझाकस्तान, इक्विटोरियल गिनिया व पेरू हे देश अलिप्त राहिले.
  • ७ एप्रिलला सीरियात दमास्कसचे उपनगर असलेल्या डौमा येथे करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यात सुमारे ७४ जण मरण पावले होते.
  • या हल्ल्यासाठी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हेच जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत अमेरिकेने १४ एप्रिल रोजी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले. त्याला फ्रान्स आणि ब्रिटननेही पाठिंबा दिला होता.
  • अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन या देशांनी सीरियातील रासायनिक अस्त्रांच्या चौकशीसाठी नव्याने प्रस्ताव मांडला असून तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळ बैठकीत प्रसारित करण्यात आला.

विख्यात चित्रकार रामकुमार यांचे निधन

  • भारतीय भूदृश्यांना चिंतनशील अमूर्त रूप देणारे विख्यात चित्रकार रामकुमार यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
  • रामकुमार यांचे वडील सरकारी अधिकारी होते, तर हिन्दी नवसाहित्याचे अग्रदूत निर्मल वर्मा हे त्यांचे धाकटे बंधू होते.
  • स्वत: रामकुमार यांनीही हिंदीत लिहिलेल्या कादंबऱ्या व निबंधांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण चित्रकार म्हणूनच त्यांना अधिक मान मिळाला.
  • रामकुमार हे मूळचे दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेज या संस्थेत अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. पण आर्थिक समस्यांविषयीची तगमग व्यक्त करण्यासाठी त्यांनी चित्रकलेचा आधार घेतला.
  • रामकुमार यांच्या चित्रांना व्यावसायिक यश मिळवून देण्यात मुंबईच्या काली पंडोल यांनी स्थापलेल्या पंडोल कलादालनाचा मोठा वाटा होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा