चालू घडामोडी : ११ व १२ एप्रिल
इस्त्रोकडून आयआरएनएसएस-१आय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
- भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो)ने आयआरएनएसएस-१आय या उपग्रहाचे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून यशस्वी उड्डाण केले.
- संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या उपग्रहाचे पीएसएलव्ही-सी४१ प्रक्षेपकाद्वारे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीचे हे ४३ वे उड्डाण आहे.
- दिशादर्शनच्या सात उपग्रहांची एक साखळी आहे. आयआरएनएसएस-१आय अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर या उपग्रहांच्या समूहामध्ये दाखल होईल.
- आयआरएनएसएस-१आय उपग्रह आयआरएनएसएस-१ए या दिशादर्शक उपग्रहाची जागा घेणार आहे. आयआरएनएसएस-१ए या दिशादर्शक उपग्रहात बिघाड झाल्याने हा उपग्रह पाठवण्यात आला आहे.
- या उपग्रहाची लांबी १.५८ मीटर, उंची १.५ मीटर आणि रुंदी १.५ मीटर असून, त्याचे वजन १४२५ किलो आहे. हा उपग्रह बनवण्यासाठी १४२० कोटी रुपये खर्च आला आहे.
- या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.
- समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनादेखील या उपग्रहाचा फायदा होईल.
राष्ट्रकुल स्पर्धा – भारतीय खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
- कुस्ती
- महाराष्ट्राच्या राहुल आवारेने भारताला कुस्तीतले पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ५७ किलो वजनी गटात राहुलने कॅनडाचा प्रतिस्पर्धी स्टिव्हन ताकाशाहीवर मात करत भारताच्या खात्यावर आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली.
- सुशील कुमारने हेविवेट गटात सुवर्णपदकाची कमाई करत भारताला कुस्तीतून दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
- याव्यतिरीक्त ५३ किलो वजनी गटात भारताच्या बबिता कुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली.
- ७६ किलो हेवीवेट वजनी गटात भारताच्या किरणनेही कांस्यपदकाची कमाई केली.
- अॅथलेटिक्स
- थाळीफेक प्रकारात भारताच्या सीमा पुनिया आणि नवजीत कौर धिल्लोनने अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.
- नेमबाजी
- महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. नेमबाजीत भारताला मिळालेलं हे १२वे पदक ठरले आहे.
- याआधी २००६ मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तेजस्विनीने १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्ण तर ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक मिळवले होते.
- दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तेजस्विनीने ५०. मी रायफल थ्री पोजीशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती.
- डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या श्रेयसी सिंहने सुवर्णपदकाची कमाई केली.
- ओम मिथरवालने ५० मीटर पिस्तुल तसेच २५ मी. पिस्तुल शुटींगमध्ये असे दोन कांस्यपदक मिळविले.
- डबल ट्रॅप नेमबाजीत भारताच्या अंकुर मित्तलने कांस्यपदक पटकावले.
किदम्बी श्रीकांत जागतिक क्रमवारी पहिल्या स्थानी
- बॅडमिंटनमधील भारताचा स्टार खेळाडू किदम्बी श्रीकांत याने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने या क्रमवारीची यादी जाहीर केली.
- पुरुषांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा श्रीकांत हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.
- सायना नेहवालनमागोमाग आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये प्रशंसनीय कामगिरी करत भारताचे प्रतिनिधीत्व करणारा श्रीकांत दुसरा खेळाडू ठरला आहे.
- श्रीकांतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारतीय संघाच्या खेळात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. या स्पर्धेत भारतीय टीमला बॅडमिंटनमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
भारताने ७.३ टक्के विकासदर गाठणे शक्य - एडीबी
- भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षांत ७.३ टक्क्यांपेक्षा अधिक राहील तर त्यानंतरच्या वर्षांत तो ७.६ टक्क्यांवर जाईल, असा आशावाद आशियाई विकास बँक अर्थात एडीबीने वर्तविला आहे.
- वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी आणि बँकिंग सुधारणांचे हे फलित असेल आणि भारताला आशिया खंडातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून लौकिक कायम राखता येईल, असा या वित्तसंस्थेचा कयास आहे.
- एडीबीने 'आपल्या आशियाई विकासावर दृष्टिक्षेप'असे शीर्षक असलेल्या अहवालात, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशादायी संकेत दिले आहेत.
- अन्य आशियाई देशांसाठी व्यापारातील जोखीम उच्च राहील आणि त्याच्या मुकाबल्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांतून आर्थिक विकासदराला हानी पोहचेल, असे भाकीत एडीबीने केले आहे.
- वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी ही नजीकच्या भविष्यात भारताच्या अर्थवृद्धीला चालना देणारी मोठी शक्ती ठरेल, असे एडीबीचे मुख्य अर्थतज्ज्ञ यासूयुकी सावाडा यांनी मत व्यक्त केले आहे.
- व्यापारानुकूल वातावरणासाठी सरकारचे प्रयत्न आणि उदारीकरणाचे धोरण यामुळे थेट विदेशी गुंतवणुकीचा दमदार ओघ हा अर्थव्यवस्थेला आणखी बळ देईल, असा सावाडा यांचा कयास आहे.
नासकॉमच्या अध्यक्षपदी रिशाद प्रेमजी
- माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नासकॉम या संघटनेच्या अध्यक्षपदी विप्रोचे मुख्य धोरणात्मक अधिकारी रिशाद प्रेमजी यांची २०१८-१९ सालासाठी निवड करण्यात आली आहे.
- तसेच डब्ल्यूएनएस समूहाचे मुख्याधिकारी केशव मुरुगेश यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
- प्रेमजी हे नासकॉमच्या कार्यकारी मंडळाचे सध्या सदस्य असून, २०१७-१८ सालात त्यांनी संघटनेचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. ते विद्यमान अध्यक्ष रमण रॉय यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा