चालू घडामोडी : ३ एप्रिल
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन
- ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य (भालचंद्र सदाशिव वैद्य) यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे २ एप्रिल रोजी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
- स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र 'भाई वैद्य' याच नावाने परिचित होते.
- भाई वैद्य यांचा जन्म २२ जून १९२७ रोजी झाला होता. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता.
- १९४३पासून ते राष्ट्रसेवा दलाचे सेवक झाले. त्यानंतर १९४६मध्ये कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.
- १९५५मध्ये गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. १९५७मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांनी ३ आठवडे तुरुंगवास भोगला होता.
- १९६२ ते ७८ दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. याचबरोबर, १९७४-७५ दरम्यान त्यांनी पुणे शहराचे महापौरपदही भूषविले होते.
- देशातील आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला.
- १९८३मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रामध्ये ४००० किमी अंतराच्या यात्रेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
- पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन सांभाळले होते.
- कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या भाई वैद्य यांनी त्यांना सुमारे २५ वेळा कारावास भोगला होता. अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.
- त्यांनी ‘लोकशाही समाजवाद’ ही विचारधारा स्वीकारली आणि अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
हाफिज सईदचा एमएमएल पक्ष दहशतवादी संघटना घोषित
- मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
- याशिवाय तेहरिक ए आझादी ए काश्मीर (टीएजीके) या संघटनेलाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- मिल्ली मुस्लिम लीगशी संबंधित ७ जणांनादेखील अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले.
- एमएमएल आणि टीएजीके या दोन्ही संघटना लष्कर-ए-तोयबाचा भाग आहेत. लष्कर ए तोयबाचे डाव उधळून लावून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
- या कारवाईनंतर आता अमेरिकेला ‘लष्कर’च्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करता येणार आहे.
- यापूर्वी हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. या अर्जावर पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने जोरदार आक्षेप घेतला होता.
नेल्सन मंडेला यांच्या पत्नी विनी मंडेला यांचे निधन
- दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची पत्नी आणि वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यां विनी मंडेला यांचे २ एप्रिल रोजी जोहान्सबर्गमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
- नेल्सन मंडेला यांच्याशी विनी १९५८ ते १९९६ अशी ३८ वर्षे विवाहबद्ध राहिल्या. नेल्सन मंडेला यांचे २०१३ साली निधन झाले होते.
- दक्षिण आफ्रिकेतील वंशवादविरोधी लढय़ाचे नेतृत्व नेल्सन मंडेला यांनी केले असले तरी विनी-मडिकीझेला मंडेला यांचीही वंशवादविरोधी कार्यकर्ती म्हणून स्वतंत्र ओळख होती.
- पतीप्रमाणेच त्यांचीही उमेदीची बहुतांशी वर्षे कारावासात गेली. प्रत्यक्ष कारावास संपल्यानंतरही अनेक वर्षे त्या घरी स्थानबद्धतेत होत्या. नेल्सन मंडेला तुरुंगात असताना विनी यांनी त्यांचा लढा तेवत ठेवला होता.
- विनी यांची नंतरची कारकीर्द मात्र अनेक आरोपांनी डागाळली गेली होती. वर्णभेदविरोधी लढय़ादरम्यान झालेल्या अत्याचारप्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता.
- अपहरण आणि हल्ल्याच्या प्रकरणात १९९१साली त्या दोषी ठरल्याने त्यांना दंडही भरावा लागला होता.
- दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या बहुवांशिक निवडणुकीत त्या संसदेत निवडून गेल्या. त्यानंतर त्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा