राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य आणि सुवर्णपदक
ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे रंगलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या गुरुराजा आणि मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टींग प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदकाची कमाई केली.
गुरू राजाने ५६ किलो वजनी गटात २४९ किलो वजन उचलत भारताला स्पर्धतील पहिले पदक (रौप्य) मिळवून दिले.
मीराबाई चानूने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे.
चानूने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. यानंतर तिने ८४ आणि ८६ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी कामगिरीची नोंद केली.
याआधी ऑगस्टिना नवाओकोलोने २०१० मध्ये नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७७ किलो वजन उचलून विक्रम केला होता. हा विक्रम मीराबाई चानूने मोडीत काढला.
आतापर्यंत पदकतालिकेत भारत १ सुवर्ण, १ रौप्य, ० कांस्य मिळवून सातव्या स्थानावर आहे. तर इंग्लंड ६ सुवर्ण, ३ रोप्य आणि ३ कांस्य पदकासह पहिल्या स्थानावर आहेत.
चालू वर्षातील पहिल्या पतधोरणात व्याजदर जैसे थे
चालू वर्षातील पहिल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के असा कायम ठेवला आहे.
इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर जात असल्याने महागाई दरात वाढ होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात महत्त्वाच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही.
यापूर्वी देखील सलग तीन पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. रेपो दरात शेवटची पाव टक्क्यांची कपात ऑगस्ट २०१७मध्ये झाली होती.
महत्त्वाचे दर असे :
रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना कर्ज देण्यासाठी (रेपो रेट) : ६ टक्के
रिझर्व्ह बँकेला कर्ज घ्यायचे असल्यास (रिव्हर्स रेपो रेट) : ५.७५ टक्के
बँकांना आपत्कालीन कर्ज हवे असल्यास (मार्जिनल फॅसिलिटी) : ६.२५ टक्के
बँकांनी रिझर्व्ह बँकेत ठेवण्याची किमान रक्कम (सीआरआर) : ४ टक्के
बँकांची किमान रोख तरलता (एसएलआर) : १९.५ टक्के
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे.
या प्रकरणातील अन्य आरोपी तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम आणि सैफ अली खान यांना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त केले.
वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते.
सलमानने १ व २ ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री कांकाणी गावात २ काळवीटांची शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते.
या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल झाला होता.
या शिकारीसाठी वापरण्यात आलेले शस्त्र हे विना परवाना असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.
सलमानविरुद्धच्या खटल्यात पूनमचंद बिष्णोई व छोगाराम हे दोन साक्षीदार अखेरपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम राहिले. त्या दोघांनी दिलेल्या साक्षीमुळे सलमान खानला शिक्षा होऊ शकली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा