चालू घडामोडी : ६ एप्रिल
राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताला एक सुवर्ण व एक कांस्यपदक
- ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दुसऱ्या दिवशी भारताच्या संजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ५३ किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली.
- स्नॅच प्रकारात संजिता चानूने ८४ किलो वजन उचलत नवीन विक्रमाची नोंद केली.
- यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात संजिता चानूने १०८ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले.
- गत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येही संजिता चानूने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते.
- त्यानंतर भारताच्या दिपक लाथेरने वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात तिसरा क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.
- दीपकने स्नॅच प्रकारात १३६ आणि क्लीन व जर्क प्रकारात १५९ असे एकूण २९५ किलो वजन उचलत भारताला पदक मिळवून दिले.
- या कामगिरीसह दिपक राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा सर्वात तरुण अॅथलिट ठरला आहे.
- या स्पर्धेतील भारताचे हे चौथे पदक आहे. आतापर्यंत भारताने या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक पटकावले आहे.
राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या महासंचालकपदी विनीत जोशी
- केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचे (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) महासंचालक म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी विनीत जोशी यांची नियुक्ती केली आहे.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएससी) (२०१०-१४) माजी प्रमुख अशी विनीत जोशी यांची ओळख आहे.
- १९९२च्या तुकडीतील मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी असलेले विनीत जोशी हे मूळचे अलाहाबादचे आहेत.
- आयआयटी कानपूर येथून पदवी घेतल्यानंतर त्यांनी लखनऊ आयआयएममधून एमबीए केले.
- प्रशासकीय सेवेत आल्यानंतर युवक कल्याण व क्रीडा, खाद्यान्न प्रक्रिया मंत्रालय अशा अनेक विभागांत त्यांनी जबाबदारीची पदे भूषवली.
- २०१०मध्ये सीबीएससीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. या कारकीर्दीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या.
- तेथून एनटीएचे महासंचालक या नव्यानेच निर्माण झालेल्या महत्त्वाच्या पदावर त्यांना आणण्यात आले आहे.
- देशभरातील सुमारे ४० लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीच्या विविध स्पर्धा परीक्षा देत असतात.
- त्यामुळे या परीक्षांचा दर्जा कायम राखणे, सर्व परीक्षा वेळेत घेणे, त्यांचे निकाल योग्य कालावधीत लागणे, नंतरची प्रवेश प्रक्रिया पारदर्शक ठेवणे अशी अनेक आव्हाने जोशी यांच्यासमोर आता असतील.
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गतवर्षी अर्थसंकल्प सादर करताना उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा केली होती.
- आतापर्यंत सीबीएसई, एआयसीटीईसारख्या विविध संस्थांमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जात असे.
- हे काम एकाच संस्थेमार्फत व्हावे यासाठी आता एनटीएची स्थापना झाली असून पुढील वर्षी प्रथमच जेईईची प्रवेश परीक्षा एनटीएमार्फत घेतली जाणार आहे.
अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी
- अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड झाली आहे. ते २०२३पर्यंत नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी राहणार आहेत.
- मोहन जोशी पॅनलकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अमोल कोल्हेंचा त्यांनी पराभव केला.
- याशिवाय अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या उपाध्यक्ष प्रशासनपदी गिरीश ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- नाट्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदी शरद पोंक्षेंची निवड झाली आहे. तर कोषाध्यक्ष म्हणून जगन्नाथ चितळे हे निवडून आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा