चालू घडामोडी : २८ एप्रिल
डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
- रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी २७ एप्रिल रोजी डॉ. पेडणेकर यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.
- डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ५ वर्षे कार्यकाळासाठी किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत करण्यात आली आहे.
- २४ ऑक्टोबर २०१७ रोजी डॉ. संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते.
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
- मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती.
- डॉ. पेडणेकर यांना रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून २५ वर्षांचा अध्यापनाचा दीर्घ अनुभव आहे.
- सेंद्रिय रसायनशास्त्र हा अभ्यासाचा विषय असलेल्या पेडणेकर यांनी अमेरिकेतील ‘स्टिव्हन्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथून पीएचडी केली.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनपत्रिकेत त्यांचे ४३हून अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. या शिवाय सात संशोधन प्रकल्प, एक पेटंट त्यांच्या नावावर जमा आहेत.
- इंडो-अमेरिकन सोसायटी, इंडियन र्मचट्स चेंबर आदी संस्थांमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
- नॅक, काकोडकर समिती, आयसीटीची विद्वत परिषद आदी ठिकाणी त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.
- टाटा केमिकल लिमिटेडकडून त्यांना ‘उत्कृष्ट रसायनशास्त्र शिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले होते.
- डॉ. पेडणेकर यांना २०१२ सालचा महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.
सरकारने लाल किल्ला दालमिया समूहाला दत्तक दिला
- दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला सरकारने दालमिया भारत समूहाला २५ कोटी रुपयांत ५ वर्षांसाठी (वर्षाला ५ कोटी रुपये) दत्तक दिला आहे.
- दालमिया भारत समूह सिमेंट उत्पादक असून, ऐतिहासिक वास्तू दत्तक घेणारा तो देशातील पहिला उद्योग समूह ठरला आहे.
- पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व विभागासोबत दालमिया भारत कंपनीने यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- दालमिया समूहाने आंध्र प्रदेशातील कडापा जिल्ह्यातील गंडीकोटा किल्लाही दत्तक घेतला आहे.
- दत्तक करारानुसार, लाल किल्ल्याची देखभाल, संवर्धन आणि सुशोभीकरण करणे तसेच परिसराचे नूतनीकरण करणे या जबाबदाऱ्या दालमिया समूहावर राहतील.
- किल्ल्याला भेट देणाऱ्यांकडून शुल्क वसूल करून महसूल मिळविण्याचा हक्कही कंपनीला राहील.
- मोगल बादशहा शहाजन याने १७व्या शतकात हा किल्ला बांधलेला आहे. ‘अपनी धरोहर, अपनी पहचान’ या योजनेंतर्गत लाल किल्ला दत्तक देण्यात आला आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २७ सप्टेंबर २०१७ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून या योजनेची घोषणा केली होती.
- या योजनेंतर्गत एकूण २२ ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक देण्याची सरकारची योजना आहे. जगप्रसिद्ध ताजमहालही या यादीत आहे.
पाकिस्तानकडून संरक्षण अंदाजपत्रकात २० टक्के वाढ
- पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत दिवसेंदिवस कमी होत असताना, पाकिस्तानने भारताला समोर ठेवून आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- २०१८-१९साठी पाकिस्तानने आपल्या अंदाजपत्रकात संरक्षण क्षेत्रासाठी २० टक्के वाढीव तरतूद केली आहे.
- पीएमएल-एन सरकारच्या कार्यकाळातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचे सांगण्यात येते
- पाक सरकार आणि लष्करादरम्यान तणाव असतानाही तिन्ही सशस्त्र दलांसाठी १.१ ट्रिलियन रूपयांची (१.१ लाख कोटी रूपये) तरतूद करण्यात आली आहे.
- पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच संरक्षणावरील तरतुदीने १ ट्रिलियनचा आकडा पार केला आहे. मागील आर्थिक वर्षाची तुलना करता २०१८-१९ साठी संरक्षणासाठी १८० अब्ज रूपयांची वृद्धी करण्यात आली आहे.
- यामध्ये २६० अब्ज रूपयांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही रक्कम लष्करी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठी दिली जाते. सर्वसाधारण अर्थसंकल्पातून यासाठी तरतूद केली जाते.
- दहशतवाद ते युद्धाशिवाय पाकिस्तानचा संरक्षण खर्च नेहमी भारतावर केंद्रित असाच राहिलेला आहे. अणुसंपन्न असलेल्या दोन्ही देशांमध्ये नेहमी तणाव असतो.
- गेल्या काही दिवसांत नियंत्रण रेषा आणि सीमेजवळील सततच्या गोळीबारामुळे हा तणाव वाढलेला आहे.
- भारताने संरक्षण क्षेत्राच्या अंदाजपत्रकात ८ टक्क्यांनी वाढ केली होती. परंतु, भारताचे एकूण संरक्षण अंदाजपत्रक पाकिस्तानच्या तुलनेत ६ टक्क्यांनी जास्त आहे.
आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सायना व प्रणॉयला कांस्य
- आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीतील भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरुषांच्या गटात एचएस प्रणॉय यांना कांस्य पदक जिंकले आहे.
- नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सायनाचा चीनची टॉप सीडेड ताई यिंगने २५-२७, १९-२१ असा सलग दोन गेममध्ये पराभव केला. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील सायनाचे हे तिसरे कांस्य पदक आहे.
- पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रणॉयचा चीनच्या तिसऱ्या सीडेड चेन लाँगने २१-१६, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. प्रणॉयचे आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील हे पहिले पदक आहे.
यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून यश मिळवलेल्या उमेदवारांमध्ये यंदा वाढ झाली आहे.
- गेल्या वर्षी ९० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले होते. यंदा हा आकडा १००हून अधिक असण्याची शक्यता आहे.
- या परीक्षेत देशभरातून पहिला येण्याचा मान हैदराबाद येथील अनुदीप दुरीशेट्टी याने मिळविला आहे. त्या खालोखाल अनु कुमारी आणि सचिन गुप्ता यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.
- उस्मानाबादमधील गिरीश बडोले याने राज्यातून पहिला तर देशात २०वा क्रमांक पटकावला आहे.
- या परीक्षेत एकूण परीक्षार्थीपैकी ९९० उमेदवार नियुक्तीकरिता पात्र ठरले आहेत, तर १३२ उमेदवार प्रतीक्षा यादीवर असतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा