नेपाळमध्ये केंद्र असलेल्या या भूकंपाचा हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्राशी थेट संबंध आहे. इंडियन आणि युरेशिअन या दोन प्लेट एकमेकांना दाबतात व त्या दरवर्षी सुमारे ३५ ते ३७ मिलिमीटर पुढे सरकतात. या हालचालींमध्ये वाढ झाल्यास दबाव दूर करण्यासाठी भूकंपाचा धक्का बसतो व नुकताच भूकंप त्याचाच भाग आहे. तर जाणून घेऊया भूकंपाबद्दल महत्वाची माहिती ..................
भूकंप का होतात?
- भूगर्भातील दोन खडक किंवा प्लेट्सचे एकमेकांवर जोरदार घर्षण होते. हे खडक प्लेट्स एकमेकांना ढकलत असतानाच प्रचंड दबावामुळे दुभंगतात. या प्रक्रियेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवणारा परिणाम म्हणजेच भूकंप होय.
- हे खडक किंवा प्लेटची भूकंपादरम्यान आणि नंतरही पुन्हा एकत्र होईपर्यंत हालचाल होत राहते.
भूकंपाचे मोजमाप :
- भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ’ अथवा ‘सेस्मॉमीटर’ असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते.
- भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
- ३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते.
- भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.
- समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भूकंप प्रलयंकारी लाटा (त्सुनामी) निर्माण करू शकतो.
भूकंपाची नाभी आणि अपिकेंद्र :
- पृथ्वीच्या कवचात ज्या ठिकाणी भूकंपाच्या धक्क्यास कारणीभूत होणारा विभंग घडून येतो, ज्या ठिकाणी खडक किंवा प्लेट्स दुभंगतात त्या उगमकेंद्राच्या जागेला भूकंपाची नाभी म्हणतात.
- त्या स्थानाच्या सरळ वर भूपृष्ठावर असणाऱ्या स्थानाला अपिकेंद्र म्हणतात. भूगर्भात केंद्रबिंदूवरील भूभागाला भूकंपाचे केंद्र म्हणतात.
भूकंपतरंग :
- पृथ्वीच्या कवचातील विक्षोभामुळे भूकंपाचा धक्का बसल्यावर धक्क्यामुळे उत्पन्न होणारे भूकंपतरंग नाभीपासून पृथ्वीच्या सर्व भागांत पसरतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जागोजागी असणाऱ्या भूकंपमापक उपकरणांत आलेखाच्या (भूकंपलेखाच्या) स्वरूपात त्या त्या जागी हे तरंग येऊन पोहोचल्याची नोंद होते.
- कोणत्याही ठिकाणच्या भूकंपमापकात एखाद्या विशिष्ट भूकंप स्थानापासून निघालेले जे तरंग सर्वांत आधी येऊन पोहोचतात, त्यांना प्राथमिक तरंग म्हणतात. हे तरंग ध्वनितरंगासारखे अनुतरंग (ज्यांमध्ये माध्यमातील कण तरंग प्रसारणाच्या दिशेत पुढेमागे याप्रमाणे कंप पावतात असे तरंग) असतात.
- प्राथमिक तरंगाच्या पाठोपाठ भूकंपलेखकात येऊन पोहोचणाऱ्या तरंगाना द्वितीयक तरंग म्हणतात. हे तरंग दोरीवरील तरंगाप्रमाणे अवतरंग (म्हणजे ज्यांत माध्यमातील कण तरंगाच्या प्रसारणाच्या दिशेशी लंब दिशेत कंप पावतात असे तरंग) असतात.
- प्राथमिक व द्वितीयक या दोन्ही तरंगांचा वेग ते ज्या खडकांतून प्रवास करतात त्यांच्या घनतेवर व दृढतेवर अवलंबून असतो; पण कोणत्याही घनतेच्या व दृढतेच्या खडकात प्राथमिक तरंगांचा वेग द्वितीयक तरंगापेक्षा जास्त असतो.
- प्राथमिक व द्वितीयक तरंगांखेरीज आणखी एका वेगळ्याच प्रकारच्या तरंगाची नोंद भूकंपलेखात केली जाते. हे तरंग भूपृष्ठाखाली फार खोलवर न घुसता पृष्ठालगतच्या थरांतूनच प्रवास करतात त्यामुळे त्यांना पृष्ठतरंग असे म्हणतात. यांचा आवर्तकाल (एका पूर्ण आवर्तनास लागणारा काल) दीर्घ असल्याने त्यांना दीर्घ तरंग असे नाव आहे.
भूकंपाचा अंदाज :
- भूकंपाचा अंदाज वर्तविणे आजही शक्य झालेले नाही.
- परिसरातील भूकंपाचा इतिहास, भौगोलिक रचना ध्यानात घेऊन अंदाज वर्तविण्याचे प्रयत्न.
- मोठ्या भूकंपापूर्वी प्राणी व पक्ष्यांच्या वर्तनात बदल होत असल्याची निरीक्षणे.
जगातील सर्वांत मोठा भूकंप :
- चिलीमध्ये २२ मे १९६० मध्ये झालेला भूकंप सर्वांत मोठा समजला जातो.
- रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ९.५ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली.
- देशातील कॅनिटजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
- यातून सुमारे एक हजार अणुबॉम्बएवढ्या ऊर्जेची निर्मिती
हिमालय आणि भूकंप :
- हिमालय पर्वतरांगांच्या ठिकाणी पृथ्वीचे दोन विभिन्न भूस्तर एकत्र येतात.
- अंदाजे साडेपाच कोटी वर्षांपूर्वी भारत- ऑस्ट्रेलिया खंड विलग झाले.
- ‘इंडियन प्लेट’च्या थोड्या हालचालीनेही भूपृष्ठावर मोठा भूकंप होत असतो. जाड दगडी कवचाच्या या प्लेट ‘टेक्टॉनिक प्लेट्स’ म्हणून ओळखल्या जातात.
- ‘इंडियन प्लेट’ दर वर्षी पाच सेंटिमीटर या वेगाने उत्तर दिशेला, तिबेटकडे सरकत आहे. तिची ‘युरेशियन प्लेट’सोबत धडक होत असते. त्यातून तयार होणारा दबाव दूर होण्याचा मार्ग म्हणून भूकंप होतात.
- भूपृष्ठाखाली दहा किलोमीटरवर टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली झाल्याची नोंद.
जगातील प्रलयंकारी भूकंप :
- चीन (१५५६) - शांक्झी प्रांताला भूकंपाचा तीव्र धक्का. त्यात सुमारे ८ लाख ३० हजार मृत्युमुखी.
- चीन (१९७६) - तांगशान प्रांताला ७.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, अडीच लाख जणांचा मृत्यू.
- इंडोनेशिया (२६ डिसेंबर २००४) - ९.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रचंड त्सुनामी. दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू.