भारताच्या आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिकेचे जलावतरण २० एप्रिलला मुंबई येथील माझगाव डॉकला होणार आहे.
नौदलाच्या १५-बी या प्रकल्पाअंतर्गत तयार होणारी ही पहिलीच रडारवर दिसू न शकणारी विनाशिका आहे.
परंपरेप्रमाणे युद्धनौकेचे जलावतरण महिलेकडून होत असल्याने यंदा नौदलप्रमुख ऍडमिरल आर. के. धवन यांच्या पत्नी मीनू धवन यांच्या हस्ते होणार आहे.
प्रकल्प १५-बी अंतर्गत तयार होणाऱ्या विनाशिका आयएनएस कोलकताच्या पुढील वर्गातील असणार आहेत. नव्या वर्गातील चार विनाशिका तयार करण्याचा करार २०११ मध्ये झाला होता.
या विनाशिकेवर विविध क्षेपणास्त्र आणि सेन्सर बसविण्यात आले आहेत.
‘आयएनएस विशाखापट्टणम’ची वैशिष्ट्ये
१६३ मीटर : लांबी
१७.४ मीटर : उंची
४ : गॅस टर्बाईन्स
३० नॉट्स : वेग
३०० : कर्मचारी-अधिकारी
इतर वैशिष्ट्ये
किनाऱ्यावरील आणि समुद्रावर दूत अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेली ‘व्हर्टिकली लॉंच्ड मिसाईल’ यंत्रणा
धोक्याची आगाऊ सूचना देणारी बहुउद्देशीय रडार यंत्रणा. जगात अशा प्रकारच्या फार कमी विनाशिका आहेत.
भारताची सर्वांत मोठी युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ला लवकरच स्वत:ची हवाई सुरक्षा मिळणार आहे.
‘गोदावरी’ वर्गातील एक जहाज लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यावरील बराक क्षेपणास्त्र यंत्रणा हलविण्याचा नौदलाचा विचार आहे.
यामुळे २०१३ मध्ये नौदलात दाखल झालेल्या या युद्धनौकेला आता स्वसंरक्षण करता येणार आहे.
स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राची व्हिलर बेटावर यशस्वी चाचणी करण्यात आली.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडतर्फे ही चाचणी झाली. या क्षेपणास्त्राची ही तिसरी चाचणी होती.
रशियाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात होणाऱ्या विजय दिनाच्या संचलनात भारतीय लष्कराची ७१ सैनिकांची तुकडी सहभागी होणार आहे.
पुढील महिन्यात ९ मे रोजी होणाऱ्या या संचलनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय लष्कराची तुकडी प्रथमच या संचलनात सहभागी होत आहे. ग्रेनेडियर रेजिमेंटच्या ७५ जणांचे पथक पुढील महिन्यात मॉस्कोला रवाना होणार असून, यातील ७१ जण प्रत्यक्ष संचलनात सहभागी होतील आणि ४ जण राखीव असतील.
भारतीय लष्कराने २००९ मध्ये प्रथम फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संचलनात सहभाग घेतला होता.
रशिया विजय दिन :
जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतर युरोपमधील दुसरे महायुद्ध संपुष्टात आले होते.
युरोपमध्ये हा विजय दिन ८ मे रोजी साजरा केला जातो. या तारखेला संध्याकाळी नाझी सैन्याने पराभव मान्य करत शरणागतीच्या करारावर सही केली होती.
मात्र, या वेळी रशियामध्ये पुढील दिवस उगवला असल्याने ते ९ मे रोजी हा विजय दिन साजरा करतात.
हरियाणातील राखी गडी खेड्यामध्ये उत्खनन करताना पुरातत्त्व शास्त्रज्ञांना पाच हजार वर्षांपूर्वीचे हडप्पा संस्कृतीतील चार मानवी सांगाडे सापडले आहेत.
दक्षिण कोरियातील सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी, डेक्कन कॉलेज पुणे आणि हरियाणा सरकारच्या पुरातत्त्व संशोधन विभागातील संशोधकांनी या ठिकाणी उत्खनन केले होते.
मोहन कुमार यांची फ्रांसमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याचे फ्रांसमधील राजदूत अरुण कुमार यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून त्यांच्याजागी मोहन कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोहन कुमार १९८१च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. याआधी ते बहारीनमध्ये भारतीय राजदूत होते.
भारताचे पंतप्रधान प्रथमच कॅनडा भेटीवर आले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी मोदी यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर कौशल्य विकास क्षेत्रात दोन्हीही देशांनी १३ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
विजेच्या तीव्र टंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा यावर्षीपासूनच पाच वर्षे युरेनियम देणार आहे. तीन हजार मेट्रीक टन युरेनियमसाठी २५४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा खर्च येणार आहे.
सध्या रशिया आणि कझाकस्तानकडून भारताला युरेनिमयमचा पुरवठा होत आहे. युरेनियमचा हा पुरवठा आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने ठरवून दिलेल्या सुरक्षा माणकांप्रमाणे केला जाईल.
या करारानुसार कॅनडाची कंपनी कॅमिको कॉर्प भारतातील अणुभट्ट्यांना इंधनाचा पुरवठा करील.
फ्रान्स, जर्मनी व कॅनडा या तीन देशांच्या दौऱ्यातील पंतप्रधानांचा कॅनडा हा अखेरचा टप्पा आहे.
फ्रान्सने भारतीय पर्यटकांना ४८ तासांत व्हिसा देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तर भारताने फ्रेंच पर्यटकांना इलेक्ट्रॉनिक व्हिसा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.
भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी विजेंद्र गुप्ता यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली.
७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने ६७ तर भाजपने ३ जागा जिंकल्या आहेत.
आसाराम बापू यांचे पुत्र नारायणसाईला गुजरात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी डिसेंबर २०१३ पासून नारायण साई शिक्षा भोगत आहे. आजारी आईची देखभाल करण्यासाठी त्याने तीन आठवड्यांचा जामीन मागितला होता.
संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी रशिया आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच युद्धसराव होणार आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांची आणि रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी शोईगू यांच्यात मॉस्को येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नेपाळचे माजी पंतप्रधान सूर्यबहाद्दूर थापा (वय ८७) यांचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले.
थापांनी आपल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तब्बल पाच वेळा नेपाळचे पंतप्रधानपद भूषविले होते.
येमेनमध्ये सध्या शियापंथीय हौथी व सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये सुरु असलेल्या संघर्षाने देशामध्ये हिंसाचाराचे थैमान असतानाच संयुक्त राष्ट्रसंघाचे येमेनमधील विशेष प्रतिनिधी जमाल बेनोमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा