चालू घडामोडी - २६ एप्रिल २०१५
- नेपाळमध्ये काठमांडू येथून जवळच असलेल्या लामजुंगमध्ये आज अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या ७.९ आणि ६.६ रिश्टर स्केल क्षमतेच्या दोन तीव्र भूकंपामुळे नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसला.
- या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले असून, सुमारे २००० जणांचा मृत्यू झाल्याचे व ४७१८ जण जखमी असल्याचे नेपाळच्या गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे.
- त्याशिवाय हजारो जण जखमी झाले आहेत. ढिगारे उपसण्याचे काम सुरू असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- नेपाळमध्ये गेल्या ८० वर्षांमध्ये झालेला हा सर्वांत मोठा भूकंप आहे. भारताने नेपाळच्या मदतीसाठी तातडीने मदतपथके रवाना केली आहेत.
- भारतातील उत्तर, दक्षिण आणि ईशान्येकडील २२ राज्यांसह बांगलादेश, पश्चिमेकडे पाकिस्तानात लाहोर, तसेच तिबेटपर्यंत धक्के जाणवले. तिबेटमध्ये भूकंपामुळे १२ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. बांगलादेशातही भूकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला असून शंभराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
- भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्यानंतरही सुमारे तासभर त्याचे हादरे जाणवत होते. भारतातही विविध राज्यांमध्ये मिळून ४५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
- धरहरा टॉवर कोसळला
- नेपाळमध्ये १९ व्या शतकात बांधलेला आणि जागतिक वारसा यादीत असलेला नऊ मजली धरहरा टॉवरही भूकंपाच्या धक्क्याने कोसळला.
- हा ५०.५ मीटर उंचीचे टॉवर नेपाळचा कुतुबमिनार म्हणून ओळखला जातो. नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान भीमसेन थापा यांनी १८३२ मध्ये हा टॉवर बांधला. त्याला दोनशे पायऱ्या होत्या.
- मुघल आणि युरोपीय शैलीत बांधलेल्या या टॉवरच्या माथ्यावर शंकराची मूर्ती होती. सुटीचा दिवस असल्याने काठमांडूच्या मध्यभागात असलेले अनेक पर्यटक येथे आले होते. त्यामुळे टॉवरच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेल्याची शक्यता वर्तविली आहे. हे ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत.
- नेपाळमध्ये.....
- भूकंपाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नेपाळमध्ये आणीबाणी जाहीर
- जनकपुरा येथील प्रसिद्ध जानकी मंदिराची पडझड; अनेक पर्यटन स्थळांचीही वाताहत
- मोबाईल सेवा पूर्णपणे ठप्प. अनेक रस्ते खचले असल्याने अनेक भागांचा संपर्कही तुटला
- एव्हरेस्ट पर्वतावर गेलेल्या आठ गिर्यारोहकांचा मृत्यू
- काठमांडू विमानतळ बंद करण्यात आले; सर्व विमाने भारताकडे वळविण्यात आली.
- भारतामध्ये.....
- औषधे, खाद्यपदार्थ व ‘एनडीआरएफ’च्या १० पथकांसह चार विमाने नेपाळला रवाना
- भूकंपातील मृतांच्या नातेवाइकांना उत्तर प्रदेश सरकारची प्रत्येकी पाच लाख, तर बिहार सरकारची प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर
- नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना
- भूकंपाचे झटके बसलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा
- नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी बीएसएनएल स्थानिक दरानुसार आकारणी करणार.
- एअरटेलने भूकंपानंतर पुढील ४८ तासांसाठी नेपाळमधील आपल्या नेटवर्कवरील सर्व कॉल्स मोफत करण्याचे जाहीर केले.
- भारताने नेपाळमध्ये मदतकार्य सुरू केले असून, भारताने याला ‘ऑपरेशन मैत्री’ असे नाव दिले आहे. काठमांडूमधून आतापर्यंत ५४० भारतीयांना सुखरूप भारतात आणले आहे.
- भूकंपातील शोधासाठी ‘गुगल पर्सन फाइंडर’
- लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल’ने नेपाळमधील भूकंपातील पीडितांचा शोध घेण्यासाठी ‘पर्सन फाइंडर’ या नावाची सेवा सुरू केली आहे.
- या सेवेद्वारे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणाऱ्या त्यांच्या मित्रांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी या संकेतस्थळावर हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेता येणार आहे. तसेच सापडलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल माहितीही देता येणार आहे.
- ‘गुगल’ची ही सेवा २०१० पासून कार्यरत आहे. विविध आपत्तींच्या कालावधीत आपल्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी या सेवेचा उपयोग होत आहे. ही सेवा http://google.org/personfinder/2015-nepal-earthquake/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- पाकिस्तानी समाजसेविका आणि मानव अधिकार कार्यकर्त्या सबीन महमूद (वय ४०) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
- बलुचिस्तानमधील अस्थिरतेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमातून घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. सबीन यांना पाच गोळ्या लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवासाचा अनुभव घेतला. धौला कुआँ ते द्वारका या स्थानकांदरम्यान मोदी यांनी मेट्रोने प्रवास केला.
- पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही ‘मेट्रो राइड’ अनुभवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा