चालू घडामोडी - ११ एप्रिल २०१५
- ११ एप्रिल : राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन
- फ्रान्सकडून तयार स्थितीतील ३६ ‘राफेल’ ही लढाऊ जेट विमाने खरेदी करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.
- मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांच्यात सेन नदीत बोटीवर झालेल्या भेटीदरम्यान याबाबत निश्चित चर्चा झाली, तसेच विविध प्रकारच्या १७ करारांवरही या वेळी सह्या करण्यात आल्या.
- फ्रान्सकडून १२६ राफेल विमाने खरेदी करण्याचा १२ अब्ज डॉलरचा करार गेली तीन वर्षे रेंगाळला असून, विमानाच्या किमतीवरून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.
- भारताने फ्रान्सकडे उड्डाणास तयार स्थितीतील ३६ ‘राफेल’ विमाने लवकरात लवकर देण्याची विनंती केली. फ्रान्समधील डॅसॉल्ट एव्हिएशन या कंपनीकडून राफेल विमाने खरेदी केली जाणार आहेत.
- मोदी आणि ओलॉंद यांनी चर्चेदरम्यान संरक्षण, अणू, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
- दृष्टिक्षेपात मोदी-ओलॉंद भेट -
- भारत-फ्रान्स दरम्यान १७ सामंजस्य करार
- फ्रान्स भारतामध्ये दोन अब्ज युरोंची गुंतवणूक करणार
- भारतामध्ये पुदुच्चेरी, नागपूरसह तीन शहरांना स्मार्ट सिटी करण्यात सहकार्य करणार
- दिल्ली-चंडीगड दरम्यान अतिवेगवान लोहमार्ग बांधण्यासाठी करार
- २३ ते २७ एप्रिल दरम्यान दोन देशांच्या नौदल आणि हवाई दलांचा संयुक्त सराव
- भारतीयांना २४ तासांत फ्रान्सचा पर्यटन व्हिसा
- भारत-फ्रान्स मैत्रीला ५० वर्षे झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन
- जैतापूर येथे अणुभट्टी उभारण्याबाबत करार
- राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
- यातील ११ टोलनाक्यांची यादी पुढीलप्रमाणे: १) वडखळ (अलिबाग-पेण-खोपोली रस्ता), २) शिक्रापूर (वडगाव-चाकण), ३) मोहोळ (मोहोळ-कुरुल-कामती), ४) भंडारा डोंगर (वडगाव-चाकण-शिक्रापूर), ५) कुसळच (टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर), ६) अकोले (खु.) (नगर-करमाळा), ७) ढकांबे (नाशिक-वणी), ८) नांदुरी (नाशिक-वणी), ९) सप्तश्रृंगी गड (चेकनाका) (नाशिक-वणी), १०) तापी पुलाजवळ (भुसावळ-यावल-फैजपूर), ११) रावणटेकडी (खामगाव वळण मार्ग)
- पुढील वर्षी रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताची नेमबाज अपूर्वी चंडेला पात्र ठरली आहे.
- दक्षिण कोरियातील चँगवान शहरात सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत अपूर्वीने १० मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझपदक पटकाविले. अपूर्वीने १८५.६ गुण मिळवून तिसरे स्थान मिळविले.
- अपूर्वीने २०१४मध्ये ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक मिळविले होते.
- या प्रकारात पहिल्या सहा खेळाडूंमध्ये येणारे खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार होते. क्रोएशियाच्या शान्जेना जेकिक हिने सुवर्ण व सर्बियाच्या इव्हाना मकसिमोविच हिने रौप्यपदक मिळविले.
- भारतातर्फे यापूर्वी नेमबाज जितू राय रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला आहे. आता अपूर्वी ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्याने ती दुसरी भारताची खेळाडू ठरली आहे.
- अरुण कुमार झा यांची खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केवीआयसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती करण्यात आली.
- याआधी ते लघु उद्योग विकास राष्ट्रीय संस्थेच्या (एनआयईएसबीयूडी) महानिर्देशक पदी कार्यरत होते.
- झा हे वर्ष १९८५च्या बॅच चे भारतीय अर्थशास्त्र सेवा (आईईएस) अधिकारी आहेत.
- खादी व ग्रामोद्योग आयोग
- हा खादी व ग्रामोद्योग आयोग अधिनियम, १९५६ नुसार स्थापित करण्यात आलेला सांविधानिक आयोग असून तो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्य करतो.
- मुख्य उद्देश : गरीब लोकांना स्वावलंबी बनविणे तसेच ग्रामीण भागात विक्रीयोग्य उत्पादन व स्वयंरोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणे.
- अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन या २०१६ मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून आपली उमेदवारी लवकरच जाहीर करणार असल्याचे वॉशिंग्टन येथील माध्यमांनी म्हटले आहे.
- २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेल्या हिलरी यांना बराक ओबामा यांनी ‘प्रायमरीज’मध्ये मागे टाकले होते. यंदा मात्र ओबामा यांना पक्षातून मोठा विरोध नसल्याचे दिसत आहे.
- मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या झकीउर रेहमान लख्वी याला तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले.
- लाहोर उच्च न्यायालयाने त्याला तत्काळ सोडण्याचे आदेश सरकारला दिले. लख्वीला २००९ मध्ये अटक झाल्यानंतर प्रथमच तो जामिनावर बाहेर आला आहे.
- येमेनविरुद्ध लढण्याचे सौदी अरेबियाने केलेले आव्हान नाकारत पाकिस्तानच्या संसदेने एकमताने लष्करी कारवाईत भाग घेण्यास विरोध दर्शविला. यामुळे या मुद्द्यावर पाकिस्तान तटस्थ राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
- येमेनमधील बंडखोरी मोडून काढण्यासाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली दहा देशांनी आघाडी उघडली असून, यामध्ये पाकिस्ताननेही सहभागी व्हावे, असे आवाहन सौदीने केले होते.
- या युद्धात पाकिस्तानने सैन्य, जेट विमाने आणि युद्धनौका पुरवाव्यात, असे सौदीची मागणी होती.
- राज्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार दर देण्यासाठी साखर कारखान्यांना २००० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीबाबत सरकारने २० टक्के वाढ देण्याचे निश्चित केले असून, तसे लवादाला निर्देश देण्यात येणार आहेत. लवादाकडून याबाबत ठोस निर्णय होत नसल्यामुळे सरकार हा निर्देश देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल हृषिकेश मूळगावकर (वय ९५) यांचे कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले.
- त्यांच्या पार्थिवावर गोळीबार मैदानाजवळील मुक्तिधाम येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
- भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा पाया मुळगावकर यांनी घातला होता. विमान सुरक्षेसाठी त्यांनी दूरदृष्टीने धोरणे राबविली होती.
- दुसऱ्या महायुद्धातील बर्मा कॅम्पेन युद्धात ते सहभागी झाले. १९४७-४८ च्या पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी पराक्रम गाजविला होता.
- लढाऊ, प्रशिक्षण, जेट अशा वेगवेगळ्या विमानांमधून त्यांनी उड्डाण केले होते.
- १ फेब्रुवारी १९७६ रोजी त्यांची हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. ३१ ऑगस्ट १९७८ रोजी ते निवृत्त झाले.
- मुळगावकर हे सेवानिवृत्त होईपर्यंत विमान उड्डाण करीत होते. निवृत्तीनंतर ते पुण्यात वास्तव्यास होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा