‘आयआरएनएसएस-१डी’ या भारताच्या १४२५ किलो वजनाच्या चौथ्या नौकानयन उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही सी-२७’ या धृवीय प्रक्षेपण यानाद्वारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या काही मिनिटातच हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारत आता स्वत:ची नौकानयन प्रणाली (इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम) सुरू करण्यास सज्ज झाला आहे.
अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या (जीपीएस) धर्तीवर संपूर्ण भारतीय बनावटीची प्रणाली स्थापित करण्याच्या उद्देशाने आयआरएनएसएस (इंडियन रिजनल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टिम) या ७ उपग्रहांची मालिका अवकाशात प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली आहे.
‘आयआरएनएसएस-१डी’ हा दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील चौथा उपग्रह आहे. ‘आयआरएनएसएस-१ए’ हा उपग्रह एक जुलै २०१३ रोजी, तर ‘आयआरएनएसएस-१बी’ हा चार एप्रिल २०१४ आणि ‘आयआरएनएसएस-१सी’ हा १६ ऑक्टोबर २०१४ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.
इस्रोचे अध्यक्ष : ए. एस. किरण कुमार
आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने भारतासाठी चमकदार कामगिरी करणारी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नवा इतिहास रचला.
सायना जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.
स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा इंडियन ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यफेरीत पराभव झाल्याने सायनाला कारकीर्दीत प्रथमच अव्वल स्थान मिळाले आहे.
अशी कामगिरी करणारी सायना पहिली भारतीय महिला असली तरी, अव्वल स्थानावर पोहोचणारी ती दुसरी भारतीय आहे. याआधी प्रकाश पदुकोण यांनी पुरुष बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत पहिले स्थान भूषवले आहे.
लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेत्या सायनाने कारकीर्दीत १४ आंतरराष्ट्रीय जेतेपदे मिळवली आहेत. प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.
मिझोरामचे माजी मुख्यमंत्री ब्रिगेडियर थेनफुंगा साईलो यांचे २७ मार्च रोजी निधन झाले.
ब्रिगेडियर थेनफुंगा साईलो यांच्याविषयी :
जन्म : १ जानेवारी १९२२
१९४२ साली त्यांनी ब्रिटीश भारतीय आर्मी मध्ये रुजू झाले.
मिझो समाजातील ते पहिले आर्मी अधिकारी होते.
१९७५ साली त्यांनी पीपल्स कॉन्फरन्स पार्टीची (सध्या मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स) स्थापना केली.
१९७७ साली ते मिझोराम केंद्रशासित प्रदेशाचे दुसरे मुख्यमंत्री बनले.
१९९९ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
उंटांची संख्या वाढविण्यासाठी राजस्थान सरकारने उंटांच्या हत्येवर बंदी घालणारे राजस्थान उंट विधेयक मान्य करण्यात केले आहे. उंटांच्या हत्याबंदी तथा तात्पुरते स्थलांवर किंवा निर्यात बंदी विधेयक सभागृहात मान्य करण्यात आले.
या नियमानुसार उंटांची हत्या, तात्पुरते स्थलांतर किंवा निर्यात केल्यास ५ वर्षे कारावासाची शिक्षा तसेच दंड भरावा लागेल. तसेच उंटाला इजा पोहचविणारी व्यक्ती देखील शिक्षेस पात्र असेल.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने विश्वचषक २०१५ स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीमध्ये २४५ सामन्यांमध्ये ४४.५८ च्या सरासरीने ७९८१ धावा केल्या आहेत. त्यात ८ शतके आणि ५८ अर्धशतकांचा सामावेश आहे.
भारतीय वंशाच्या जीवशास्त्राच्या प्राध्यापकांना अमेरिकेतील मानाच्या अध्यक्षीय पुरस्काराने गौरविण्यात आले. न्यू ऑर्लिन्समधील सदर्न युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक मुर्टी एस. कंभांपती असे या प्राध्यापकांचे नाव आहे.
या पुरस्कारासाठी अमेरिकेतील १५ प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे.
कंभांपती हे संशोधक विद्यार्थ्यांचे गुरू व सल्लागार आहेत. कंभांपती यांनी जॅक्सन स्टेट विद्यापीठात पर्यावरणशास्त्रात, तर आंध्र विद्यापीठात परिसर अभ्यासावर पीएच.डी. केली आहे.
याच पुरस्कारासाठी भारतीय उपखंडातील श्रीलंकन वंशाच्या रत्नानादर यांचीही निवड करण्यात आली आहे. .
रशियाचे सोयुझ हे अवकाशयान तीन अवकाशवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोचले.
अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचा अवकाशवीर मिखाईल कोर्निएंको, अमेरिकी अवकाशवीर स्कॉट केली हे दोघे अवकाश स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत ३४२ दिवस राहणार आहेत.
मानवी शरीरावर वजनविरहित अवस्थेत होणाऱ्या परिणामाचा अभ्यास हे दोघे करणार आहेत. या अभ्यासाचा उपयोग भविष्यात मंगळ आणि त्या पलीकडच्या दीर्घ कालावधीच्या अवकाश मोहिमांसाठी होणार आहे.
सोयुझ अवकाशयानात रशियाचा अवकाशवीर जेनेडी पाडाल्का हा असून, तो अवकाश स्थानकावर सहा महिने राहणार आहे. या मोहिमेत दोन अवकाशवीर सर्वाधिक काळ अवकाश स्थानकात राहण्याचा विक्रम करणार आहेत.
मिखाईल आणि केली यांनी याआधी सहा महिने अवकाश स्थानकात वास्तव्य केले आहे. ते मार्च २०१६ पर्यंत अवकाश स्थानकात राहतील.
सध्या रशियाचे अंतोन श्काप्लेरॉव्ह, इटलीचे सामंथा क्रिस्तोफोरेती आणि अमेरिकेचे टेरी विर्टस् हे तीन अवकाशवीर अवकाश स्थानकात असून, ते या वर्षी मे महिन्यात पृथ्वीवर परतणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा