चालू घडामोडी - २५ एप्रिल २०१५
- २५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिन.
- नेपाळला शक्तीशाली भूकंपाचा तीव्र धक्का बसल्याने, राजधानी काठमांडूतील ९ मजली ऐतिहासिक धरहारा टॉवर कोसळला आहे. या टॉवरजवळ ४०० हून अधिक जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- या भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर इतकी भीषण होती. भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून, अनेक इमारतींना तडे गेले आहेत. रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दोन मिनिटे भूकंपाचा धक्का जाणवत असल्याने नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.
- भूकंपामुळे काठमांडू शहरातील ऐतिहासिक धरहारा (भीमसेन) टॉवर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हा टॉवर ९ मजली असून, १९ व्या शतकात तो बांधण्यात आला होता. नेपाळमधील कुतुबमिनार अशी याची ओळख होती. पर्यटकांची येथे खूप गर्दी असते.
- या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातदेखील जाणवले असून यामुळे बिहारमध्ये ६ जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये एका महिलेसह दोन जणांचा मृत्यु झाला असून ५० जण जखमी झाले आहेत.
- फुटीरतावादी नेता मसरत आलम भट्ट याचा जामीन अर्ज बडगाम स्थानिक न्यायालयाने फेटाळला.
- देशविरोधी कृत्यांमुळे पोलिसांनी आलमसह हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी व अन्य काही फुटीरतावादी नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
- गिलानी यांनी आयोजित केलेल्या सभेत त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावीत देशविरोधी घोषणा दिल्याने मससरतविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- यानंतर अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्याविरुद्ध सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- तृतीयपंथीयांनाही देशाच्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कायदेशीर अधिकार मिळावेत, यासाठीचे ‘तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क – २०१४’ हे खासगी विधेयक (प्रायव्हेट मेंबर्स बिल) राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजूर केले.
- ही घटना ऐतिहासिक ठरली, कारण वरिष्ठ सभागृहाने खासगी विधेयकांना मंजुरी न देण्याच्या तब्बल साडेचार दशकांच्या परंपरेला मोडीत काढले आहे.
- तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबत संसदेत म्हणजे लोकसभेत यापूर्वी ४५ वर्षांपूर्वी म्हणजे १९७० मध्ये एक खासगी विधेयक आले होते. मात्र, ते मंजूर झाले नाही.
- द्रमुकचे नेते तिरूची सिवा यांनी २७ फेब्रुवारी २०१५ला हे विधेयक सादर केले होते.
- संसदीय प्रथेनुसार खासगी विधेयके ही केवळ प्रस्ताव असतात, ती सरकारी धोरण किंवा कामकाजाचा भाग असत नाहीत. यामुळे संसद सदस्यांचे खासगी विधेयक मंजूरही होत नाही. अशी बहुतांश म्हणजे ९९ टक्के विधेयके चर्चेअंती मागे घेतली जातात. यातील एखादे विधेयक सरकारला अत्यावश्यक वाटले तर नंतर सरकार स्वतः त्यात सुधारणा वा बदल करून ते सादर करते. अर्थात, हे विधेयक अधिकृतरीत्या मान्य करणे सरकारवर बंधनकारक नाही.
- विधेयकातील ठळक मुद्दे :
- सिवा यांनी सादर केलेल्या तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबतच्या या विधेयकात १० प्रकरणे व ५८ कलमे आहेत.
- यात तृतीयपंथीयांना मुळात जगण्याचा अधिकार मान्य करणे, त्यांच्यासाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करणे, त्यांना त्रास देणाऱ्यांना कायदेशीररीत्या शिक्षा करणे, तृतीयपंथीयांच्या मुलांच्या शिक्षण व नोकऱ्यांसाठी देशपातळीवर धोरण आखून तरतूद करणे, तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिक्षणाचा हक्क देणे, त्यांना स्वयंरोजगाराची साधने व शिक्षण देणे, सामाजिक सुरक्षा, वेगळे रोजगार केंद्र विनिमय स्थापणे आदी महत्त्वाच्या तरतुदी आहेत.
- पाली भाषेचा आठव्या परिशिष्टात समावेश करावा, यासाठी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी एक खासगी विधेयक मांडण्याचा प्रस्ताव केला आहे.
- बहुतेक बौद्ध तत्त्वज्ञान हे पाली भाषेत आहे. पाली ही तत्कालीन सर्वसामान्य माणसांची भाषा होती आणि आपले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे यासाठी गौतम बुद्धांनी पाली भाषेत आपले तत्त्वज्ञान सांगितले.
- तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी किंवा अन्य स्पर्धा परीक्षांमध्येही ग्रामीण भागातील किंवा गरीब विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय म्हणून पाली भाषा घेता येत नसल्याचे मुणगेकर यांनी नमूद केले आहे.
- या बाबी लक्षात घेऊनच आता खासगी विधेयकाद्वारे या भाषेला अधिकृत दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्याचे या निवेदनात म्हटले आहे. सध्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात २२ भाषांचा समावेश आहे.
- तेलंगणामध्ये सध्या सत्तेवर असलेल्या तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या (टीआरएस) अध्यक्षपदी के. चंद्रशेखर राव यांची पुन्हा निवड करण्यात आली.
- तेलंगणचे गृहमंत्री नैनी नरसिम्हा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. टीआरएसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राव यांचाच एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे अध्यक्षपदी राव यांची निवड झाल्याची घोषणा नरसिम्हा यांनी केली.
- चिलीमधील कालबुको ज्वालामुखीचा बुधवारी २ वेळा उदेक झाला. हा देशातील ९० सक्रीय ज्वालामुखींपैकी तिसरा सर्वाधिक घातक ज्वालामुखी आहे.
- गेल्या ४३ वर्षांपासून हा ज्वालामुखी निद्रिस्त अवस्थेत होता. याची उंची ६५६२ फुट आहे.
- चिलीच्या आसपास ५०० सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यांना पॅसिफिक रिम ऑफ फायर म्हणून ओळखले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा