चालू घडामोडी - ६ एप्रिल २०१५


  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कचरेवाडी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील अभयसिंह मोहिते हा विद्यार्थी राज्यात पहिला आला. 
  • मुलींमध्ये वाघाळा (जि. नांदेड) येथील वनश्री लाभशेटवारने प्रथम क्रमांक पटकाविला. 
  • १३६७ उमेदवारांपैकी ४३८ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. 

  • केंद्र सरकारने १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार देशातील सर्व राज्यांना २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा ३७ हजार ४२० कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक वाटा मिळाला आहे.
  • केंद्राने दिलेल्या निधीत सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला ६ हजार ७३५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ बिहारला ३ हजार ६२४.३७ कोटी, मध्य प्रदेशला २ हजार ९३५.७५ कोटी, पश्चिम बंगालला २ हजार ७४६.९१ तर महाराष्ट्राला २ हजार ०७५.५९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 
  • काही राज्यांच्या वाट्याला किरकोळ निधी आला आहे. त्यात सिक्कीमला १३७.४६ कोटी, गोवा राज्याला १४१.५१ कोटी, मिझोराम १७२.४० कोटी, तर नागालँड आणि  मणिपूरला अनुक्रमे १८६.६८ कोटी व  २३१.२७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
  • चौदाव्या वित्त आयोगाने राज्यांना केंद्रीय करातून राज्यांना १० टक्के जास्त निधी देण्याची शिफारस केली आहे. त्याप्रमाणे १४ व्या वित्त आयोगाची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला राज्यांना २०१५-१६ या आर्थिक वर्षात १.७८ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यावा लागणार आहे.
  • चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष : व्हाय. व्ही. रेड्डी

  • भारतीय नौदलात नव्याने दाखल होणाऱ्या ‘स्कॉर्पिन’ या डिझेल-विद्युत पाणबुड्यांत बॅटरीच्या स्फोटामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अद्ययावत उपाययोजना केल्या आहेत. 
  • बॅटरीतून धूर आल्यास हायड्रोजन डिटेक्टरद्वारे तत्काळ इशारा मिळेल, त्यामुळे अग्निशमन यंत्रणा तातडीने कार्यान्वित होऊन दुर्घटना टाळता येईल. 
    Scorpene Submarine
  • स्कॉर्पिनची वैशिष्ट्ये : 
    • पाण्याखाली ४५ ते ५५ दिवस राहण्याची क्षमता 
    • ३०० मीटर पाण्याखाली राहून तब्बल २०० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या युद्धनौकांचा क्षेपणास्त्राने अचूक वेध घेते.
    • खोल समुद्रात पाण्याखाली असतानाही पाणबुडीवर कुठल्याही भागातून लॅपटॉपवरून नियंत्रण ठेवता येणार
    • बांधणीत १० किलोमीटर पाइप, १५ किलोमीटर इलेक्ट्रिक केबल. 
    • वजन : १६१५ टन; फ्रान्सच्या एचएलईएस पोलादाचा वापर.
    • अनोख्या रचनेमुळे शत्रुसैन्याच्या रडारला सुगावा लागणार नाही.

  • जागतिक पातळीवरील कथा मराठीमध्ये आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या लेखिका व कवयित्री प्रा. छाया राम कोलारकर यांचे निधन झाले.
  • कोलारकर यांनी ‘शब्द’ व ‘चिरंतन तरंग’ हे काव्यसंग्रह लिहिले होते. पतीसमवेत त्यांनी ‘नवे लेखन’ या मासिकाची जबाबदारी तब्बल ५५ वर्षे सांभाळली. 
  • ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’ या खंडाच्या सहसंपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. त्याचे तब्बल वीस खंड निघाले. या खंडांना २००९  मध्ये राज्य पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला.

    Sania Mirza & Martina Hingis wins Miami open 2015
  • भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी मियामी टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. सानिया व हिंगीस यांनी अंतिम फेरीत द्वितीय मानांकित रशियाच्या एकातेरिना माकारोवा-एलेना व्हेस्नीना यांचा ७-५, ६-१ असा पराभव केला.
  • सानिया व हिंगीस यांचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. या दोघींनी दोनच आठवड्यापूर्वी माकारोवा व व्हेस्नीना या जोडीचाच पराभव करून  इंडियन वेल्स स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.

  • सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने मायामी ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याचे हे सलग दुसरे आणि एकूण पाचवे मायामी जेतेपद ठरले आहे. अंतिम लढतीत जोकोविचने ब्रिटनच्या अँडी मरेची कडवी झुंज ७-६ (७-३), ४-६, ६-० अशी परतवून लावले. 
  • जोकोविचचे कारकिर्दीतील एकूण ५१वे आणि मायामी स्पर्धेतील पाचवे विजेतेपद ठरले. यापूर्वी जोकोविचने २००७, २०११, २०१२ आणि २०१४मध्ये मायामी स्पर्धा जिंकली होती. 
  • मायामी स्पर्धेतील पुरुष एकेरीत सर्वाधिक सहा वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आंद्रे अगासीच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ आता जोकोविच आहे.
  • जागतिक टेनिस रँकिंगमध्ये जोकोविच अव्वल, तर मरे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या सेरेना विल्यम्स हिने मियामी टेनिस स्पर्धेत आठव्यांदा विजेतेपद मिळविले. सेरेनाने यापूर्वी २००२, २००३, २००४, २००७, २००८, २०१३, २०१४मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. अंतिम फेरीच्या लढतीत तिने स्पेनच्या कार्ला सुआरेझ हिचा ६-२, ६-० असा सहज पराभव केला. 
  • सेरेनाने यावर्षी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकून कारकिर्दीत १९वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले होते. कारकिर्दीमधील हे तिचे ६६वे विजेतेपद ठरले.
  • त्यानंतर आज तिने डब्ल्यूटीएच्या मालिकेतील या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले. यापूर्वी तिने या स्पर्धेत २००२ ते २००४ अशी सलग तीन आणि २००७ आणि २००८ अशी सलग दोन वर्षे विजेतीपदे मिळविली होती.

  • सरकारकडून घरगुती गॅसवर मिळणारी सबसिडी श्रीमंतांनी स्वेच्छेनं नाकारावी, जेणेकरून तो पैसा गरीबांसाठी वापरला जाईल,' असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत झालेल्या 'ऊर्जा संगम-२०१५' या कार्यक्रमात केले आहे.

  • संगीतकार यशवंत देव यांना ‘राम कदम कलागौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

  • शियापंथीय हौथी यांनी येमेनच्या बहुतांश भागावर नियंत्रण मिळविल्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने हौथींविरोधात जोरदार हल्ले सुरु केल्यामुळे येथे रक्तरंजित हिंसाचार व अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. 
  • या पार्श्वभूमीवर या देशातील नागरिकांना आरोग्यविषय मदत करण्यासाठी मदत पथके पाठविण्यास रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेस परवानगी मिळाली आहे. 
  • हौथींविरोधातील आंतरराष्ट्रीय आघाडीने गेल्या ११ दिवसांपासून येमेनवर जोरदार हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. 
  • हिंसाचाराच्या गर्तेत अडकलेल्या नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करु देण्याची विनंती रेड क्रॉसने या आघाडीस केली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या काळानंतर रेड क्रॉसला ही अनुमती देण्यात आली आहे. ही मदत विमान मार्गाने देण्यात येणार आहे. 

  • चीनच्या चेन लाँग याने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे, तर स्पेनच्या कॅरोलिना मरीनने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
  • मलेशियन ओपन स्पर्धेत सायना नेहवालला उपांत्य फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन ली शूरईकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे तिला अव्वल स्थान गमवावे लागले आहे.
  • सायना नेहवाल अव्वल क्रमांक केवळ ३ दिवस टिकविण्यात यशस्वी ठरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा