चालू घडामोडी : २४ एप्रिल २०१५
- २४ एप्रिल : राष्ट्रीय पंचायत राज दिन
- २४ एप्रिल १९७३ : सचिन तेंडुलकर जन्मदिन
- भारत आणि फ्रांस दरम्यान १० दिवसाचा संयुक्त नाविक सराव २३ एप्रिल रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर सुरु झाला.
- या सरावाला ‘वरूण’ असे नाव देण्यात आले.
- नेट न्यूट्रॅलिटीच्या समर्थनार्थ ‘सेव्ह द इंटरनेट’ नावाने राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, भारतीय दूरसंचार नियामक मंडळाकडे (ट्राय) दर मिनिटाला सरासरी ५० ई-मेल प्राप्त होत आहे.
- देशभरातील ४० पेक्षा अधिक व्यावसायिक ‘सेव्ह द इंटरनेट’ नावाची मोहीम राबवीत आहेत. विशेष म्हणजे ही मोहीम केवळ इंटरनेटच्या साहाय्याने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोशल नेटवर्किंग साइट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.
- दूरसंचार मंत्रालयाने नेट न्यूट्रॅलिटीबाबत स्वतंत्र समिती स्थापन केली असून समितीचा अहवाल ९ मे रोजी अपेक्षित आहे.
- भारतीय अमेरिकन विवेक मूर्ती (वय ३७) हे अमेरिकेचे सर्जन जनरल बनले असून, उपाध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात विवेक मूर्ती यांचा शपथविधी झाला. अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्याचे इन्चार्ज असणारे विवेक मूर्ती या पदावर असणारे सर्वात तरुण अधिकारी ठरले आहेत.
- फोर्ट मायर येथील लष्करी तळावर झालेल्या या समारंभात मूर्ती यांनी पदाची शपथ भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली. ओबामा प्रशासनातील ते सर्वात उच्च पदावरील भारतीय अधिकारी ठरले आहेत.
- ‘बोनहॅम्स इस्लामिक अँड इंडियन आर्ट सेल’ या संस्थेने २१ एप्रिल रोजी टिपू सूलतानशी संबंधित ३० गोष्टींचा लिलाव केला होता. त्यातून साठ लाख पौंडांची विक्रमी किंमत मिळाली.
- टिपूच्या रत्नजडित व्याघ्रमूठ असलेल्या शाही तलवारीस तब्बल सहापटीने अधिक म्हणजे २१ लाख ५४ हजार ५०० पौंड एवढी किंमत मिळाली या तलवारीस ६० हजार ते ८० हजार पौंड एवढी किंमत मिळणे अपेक्षित होते.
- याशिवाय टिपूच्या आवडत्या तोफगाड्याचाही या वेळी लिलाव करण्यात आला. यासाठी ‘बोनहॅम्स’ने ४० ते ६० हजार पौंडांची मर्यादा ठेवण्यात आली होती, त्यालाही अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे १४ लाख २६ हजार ५०० पौंड एवढी किंमत मिळाली.
- तसेच, टिपू वापरत त्या लघू पल्ल्याच्या बंदुकीचाही या वेळी लिलाव करण्यात आला, तिला ७ लाख पौंडांची किंमत मिळाली.
- पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदूंना भारतामध्ये येण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाइन व्हिसा सुविधा सुरू केली आहे.
- पाकिस्तानमधील हिंदूंना यापूर्वी भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. व्हिसा मिळण्यासाठी यामुळे वेळ लागत होता. अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व्हिसा मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
- १ ऑगस्ट २०१५ नंतर कागदपत्रे जमा करून व्हिसा मिळविण्याची सुविधा बंद होणार आहे. त्यानंतर केवळ ऑनलाइन सुविधेचा वापर करता येणार आहे.
- बिहारमधील डुमराव राजघराण्याची बदनामी करण्यात आल्याचा आरोपामुळे चेतन भगत यांचे ‘हाफ गर्लफ्रेंड’ हे पुस्तक सध्या चर्चेत आले आहे.
- या कादंबरीत डुमरावच्या राजघराण्याविषयी वादग्रस्त लिखाण असून, बिहारमधील जनतेला इंग्रजी येत नसल्याचे म्हटले आहे. तसेच घराण्यातील पुरुषांना नकारात्मक पद्धतीने चित्रित करण्यात आले असून वास्तव मांडण्याचे सोडून चुकीचे आणि बदनामी करणारे लिखाण केल्याचा आरोपही या राजघराण्याचे युवराज चंद्रविजयसिंह यांनी केला आहे.
- याविरुद्ध चेतन भगतविरुद्ध एक कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करण्यात आला आहे.
- चेतन भगत यांनी सारे आरोप फेटाळून लावत या कादंबरीत उल्लेख करण्यात आलेल्या कुटुंबाचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे.
- डुमराव घराण्याचा इतिहास
- डुमराव घराण्याचा पहिला राजा नारायणमल होता. ते १६०४ ते १६२२ दरम्यान शासक होते. त्यानंतर त्यांचे वंशज होऊन गेले. या घराण्याचे वंशज म्हणून आजही कमलसिंह हयात आहेत. त्यांचा १३ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्याभिषेक झाला होता. ते या घराण्याचे पंधरावे वंशज आहेत.
- न्यूझीलंड देशास शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का बसला. अमेरिकेच्या भूकंपमापन संस्थेनुसार, ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचे केंद्रस्थान दक्षिण न्यूझीलंडमधील कैकौरा शहरापासून ६६ किमी अंतरावर, सुमारे ५५ किमी खोलीवर होते. या भूकंपाची खोली जास्त असल्याने न्यूझीलंडमध्ये मोठी जीवितहानी वा वित्तहानी टळली.
- न्यूझीलंड हा देश ‘रिंग ऑफ फायर’ या नावाने जगामध्ये ओळखल्या जात असलेल्या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येतो. या देशास वर्षामधून सुमारे १५ हजार भूकंपाचे धक्के जाणवतात.
- दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स याची पत्नी मिलानी जेने हिने येथील सांताक्रूझ येथील एका हॉस्पिटलमध्ये कन्येला जन्म दिला. भारतात जन्म झाल्यामुळे व आयपीएल क्रिकेटचा हंगाम सुरू असल्याने दांपत्याने कन्येचे नाव ‘इंडिया‘ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- सौदी अरेबिया सरकारने एका भारतीय नागरिकास शिरच्छेदाची शिक्षा केली आहे. सजदा अन्सारी या भारतीय नागरिकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्यात हातोडा घालून त्याचा खून केला होता. याप्रकरणी त्याला दोषी ठरवत ही शिक्षा देण्यात आली आहे.
- सौदी अरेबिया सरकारने या वर्षी आतापर्यंत ६५ जणांना शिरच्छेदाची शिक्षा केलेली आहे. गेल्यावर्षी हीच संख्या ८७ इतकी होती.
- सौदीतील इस्लामिक शरियत कायद्यानुसार खून, बलात्कार, अमली पदार्थांची देवाणघेवाण, शस्त्रास्त्रांची चोरी व धर्मांतर या गुन्ह्यांमध्ये शिरच्छेदाची शिक्षा करण्यात येते.
- ‘व्हायबर’ या इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉईस कॉलिंगची सेवा देणाऱ्या कंपनीने भारतामध्ये ४ कोटी युजर्सचा आकडा गाठला आहे.
- व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) अर्थात व्हॉईस कॉलिंगच्या सेवेसाठी भारतामध्ये ‘स्काईप’ लोकप्रिय आहे. परंतु स्काईपला आपली प्रमुख स्पर्धक मानणाऱ्या व्हायबरनेही भारतामध्येही आपले जाळे वाढविण्यास भर दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा