भारतातील रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षानीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) सदस्या म्हणून नामांकन मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
‘आयओसी’वर नामांकन मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. ही निवडणूक रिओ दि जानेरिओ येथे २ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘आयओसी’च्या १२९व्या सत्रात घेण्यात येईल.
‘आयओसी’वर नव्या नियुक्तीसाठी स्वतंत्र निवड पद्धती अवलंबण्याचा निर्णय झाला असून, त्याच आधारावर अंबानी यांना नामांकन मिळाले आहे.
अंबानी यांची निवड झाल्यास त्या वयाच्या ७०व्या वर्षापर्यंत ‘आयओसी’च्या सदस्या राहतील. नीता अंबानी यांच्या झपाटून काम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.
भारत अमेरिकेदरम्यान करार
गृह मंत्रालयाने अमेरिकेच्या जागतिक दहशतवाद्यांची माहिती संकलित करणाऱ्या ‘टेररीस्ट स्क्रिनिंग सेंटर’सोबत दहशतवाद्यांसंबंधित माहितीचा देवाण-घेवाणीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आणि अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
‘टेररिस्ट स्क्रिनींग सेंटर’ने आतापर्यंत जवळपास अकरा हजार दहशतवाद्यांची माहिती संकलित केली आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांचे नाव, छायाचित्र, राष्ट्रीयत्व, जन्मतारीख, बोटांचे ठसे आणि पासपोर्ट क्रमांक आदी बाबींचा समावेश आहे.
या करारानुसार दोन्ही देशांना परस्परांकडे असलेली दहशतवाद्यांसंबंधीच्या माहितीचे देवाण-घेवाण करता येणे शक्य होणार आहे.
मात्र या कराराला ‘रॉ’सह भारतीय गुप्तचर यंत्रणांनी विरोध दर्शविला आहे. अमेरिकेने या कराराचा प्रस्ताव २०१२ मध्येच सादर केला होता. मात्र सुरक्षा यंत्रणांच्या विरोधामुळे यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.
या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याने आता भारताने औपचारिकपणे अमेरिकेच्या एचएसपीडी-६ मध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे अमेरिकेकडील दहशतवाद्यांची व्यक्तिगत माहिती भारताला उपलब्ध होणार आहे.
या करारावर स्वाक्षऱ्या होण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि त्यानंतर दोन्ही देशांनी महत्त्वाच्या मुद्दय़ांवरील मतभेद दूर करून करार केला. अमेरिकेने यापूर्वी ३० देशांसमवेत असा करार केला आहे.
फोर्ब्सच्या यादीत भारतीय महिला
आपल्या मेहनतीच्या बळावर उद्योगक्षेत्रात नवीन उंची गाठणाऱ्या अमेरिकेतील ६० श्रीमंत आणि यशस्वी महिलांची यादी फोर्ब्सने जाहीर केली.
यामध्ये मूळ भारतीय असलेल्या निरजा सेठी व जयश्री उल्लाल या दोन महिलांचा यात समावेश आहे. नाविन्यपूर्णता आणि शोधाचा ध्यास या दोन मूलभूत गोष्टींच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले.
भारतात जन्मलेल्या निरजा सेठी या यादीमध्ये १६ व्या स्थानावर, तर जयश्री उल्लाल ३० व्या स्थानावर आहेत.
आपले पती भारत देसाई यांच्यासोबत निरजा यांनी आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग कंपनी ‘सिंटेल’ची सुरुवात केली.
निरजा यांचे वय ६१ वर्षे असून, त्यांची संपत्ती १.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या कंपनीत २५,००० कर्मचारी काम करतात.
या यादीत असलेल्या ५५ वर्षिय जयश्री उल्लाल ह्या ‘अरिस्ता नेटवर्क्स’च्या अध्यक्षा आणि सीईओ आहेत.
४७ कोटी डॉलर्सची मालमत्ता असलेल्या जयश्री २००८ मध्ये ‘अरिस्ता नेटवर्क्स’च्या सीईओ झाल्या. २०१५मध्ये या कंपनीचे उत्पन्न ८३.८० कोटी डॉलर्सवर पोहोचले. २०१४मध्ये कंपनीची शेअरबाजारामध्ये नोंदणी करण्यात आली.
स्वत:च्या मेहनतीवर उद्योगक्षेत्रात उंची गाठणाऱ्या अमेरिकेतील श्रीमंत महिलांच्या या यादीत सर्वात वरच्या स्थानावर डिआन हेंड्रिक्स यांची वर्णी लागते. त्या ‘एबीसी सप्लाय’च्या मालकीण आहेत.
छत आणि स्लायडिंगसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तुंच्या त्या सर्वात मोठ्या घाऊक वितरक आहेत. त्यांची सांपत्तीक स्थिती ४.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
अमेरिकेतील या ६० धनवान महिलांची एकंदर संपत्ती जवळजवळ ५३ अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.
अमेरिकी विमानतळावर भारतीयांना विशेष सूट
भारतीय प्रवाशांचा अमेरिकेतील प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेशी ‘ग्लोबल एन्ट्री प्रोग्राम’ या नावाने ओळखला जाणारा ‘इंटरनॅशनल एक्स्पडिटेड इनिशिएटिव्ह’ हा करार केला आहे.
अमेरिकेसोबत विशेष सवलतीसाठी करार करणारा भारत हा ९वा देश ठरला आहे. या करारामुळे भारतीय प्रवाशांना अमेरिकी विमानतळावर उतरल्यानंतर त्वरित सुरक्षा देण्याची येणार आहे.
भारताचे अमेरिकी राजदूत अरुण सिंह आणि अमेरिकी सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाचे उपायुक्त केविन मॅक्लीनन यांनी या विशेष करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यानुसार, भारतीय नागरिकांना ठराविक अमेरिकी विमानतळावर स्वयंचलित किऑस्कमार्फत अमेरिकेत लगेचच प्रवेश मिळणार आहे.
भारतानेही अमेरिकेहून भारतात येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी, दीर्घकालीन व्हिसा आणि अमेरिकी नागरिकांसाठी इलेक्ट्रिक-टुरिस्ट व्हिसासारखे उपक्रम हाती घेतले आहेत.
सद्यस्थितीत, अमेरिकेत भारतीय वंशाचे ३० लाख नागरिक वास्तव्यास असून, अमेरिकेतील ४० विमानतळांवर, १२ प्री-क्लिअरन्स ठिकाणांवर ग्लोबल एन्ट्री प्रोग्राम उपलब्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा