चालू घडामोडी : २२ जून

जगातील सर्वात मोठे कॅमेरा संग्रहालय

  • भारतीय छायाचित्रणाचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने गुडगावमध्ये जगातील सर्वात मोठे कॅमेरा संग्रहालय उभे राहत आहे.
  • ऑगस्ट महिन्यात जागतिक छायाचित्रणदिनी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी हे संग्रहालय खुले करण्याचा मानस आहे.
  • गुडगाव महानगरपालिका आणि छायाचित्रकार आदित्य आर्य यांच्या सहकार्यातून हे संग्रहालय उभे राहणार आहे. आर्य यांच्याकडे सध्या कॅमेऱ्याचे दुर्मिळ ६०० ते ७०० मॉडेल आहेत.
  • रघू राय, रघुबीर सिंग, कुलवंत राय, दयानिता सिंग, पाब्लो बार्थलोमेव, होमाई वायरवाला या महान व्यक्तींनी भारताचे नाव छायाचित्रण क्षेत्रात उज्ज्वल केले आहे.

पाकिस्तानातील कव्वाली गायक साबरी यांची हत्या

  • पाकिस्तानातील प्रख्यात कव्वाली गायक अमजद साबरी यांची अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येऊन गोळ्या घालून हत्या केली.
  • साबरी कारने प्रवास करीत असताना काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार सुरू केला, त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना कराचीतील अब्बासी शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • अमजद साबरी हे पाकिस्तानचे प्रख्यात गझलगायक गुलाम फरीद साबरी यांचे चिरंजीव होते. साबरी हे आत्मविभोर मुक्त कव्वाली गायनासाठी सुपरिचित होते.
  • पाकिस्तानातील साबरी गायन घराणे सुफी संगीत व गूढ कवितांसाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी

  • उत्तर कोरियाने देशाच्या पूर्व सागरी तटाजवळील भागामध्ये दोन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली. 
  • यांपैकी पहिली चाचणी अपयशी ठरली. या चाचणींतर्गत डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सुमारे १५० किमी अंतर कापल्यानंतर समुद्रामध्ये कोसळले. मात्र यानंतर काही तासांनी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने ४०० किमी अंतर पार केले.
  • गेल्या काही महिन्यांत उत्तर कोरियाकडून चार वेळा क्षेपणास्त्र चाचणीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. 
  • क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया आण्विक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मेस्सीचा विक्रमी ५५वा गोल

  • अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गोल करून आपल्या देशाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान मिळवला आहे.
  • अमेरिकेसोबत झालेल्या उपांत्य लढतीत मेस्सीने कारकीर्दीतील ५५वा गोल केला. या सामन्यात ४-० असा विजय मिळवत अर्जेंटिना संघ सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला. 
  • अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू गॅब्रिएल बटिस्टुटाच्या नावावर सर्वाधिक ५४ गोल्सची नोंद होती. मेस्सीने ५५ वा गोल करून गॅब्रिएलला मागे टाकले. 
  • १९९३ नंतर अर्जेंटिनाला एकदाही कोपा अमेरिका चषक जिंकता आलेला नाही. २०१५ मध्ये अंतिम सामन्यात चिलीने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला होता.

सॉफ्टबँक अध्यक्षपदावरून निकेश अरोरा पायउतार

  • जगभर ई-कॉमर्स कंपन्यांसाठी अर्थबळ निर्माण करणाऱ्या जपानच्या बलाढ्य सॉफ्टबँक समूहाच्या अध्यक्षपदावरून भारतीय वंशाचे निकेश अरोरा यांना अखेर पायउतार व्हावे लागले.
  • सॉफ्टबँकचे संस्थापक मासायोशी सन यांचे वारसदार मानले गेलेले अरोरा यांच्याबद्दल गुंतवणूकदारांमधील नाराजी याचे कारण ठरली.
  • एकेकाळी गुगलमध्ये वरिष्ठ स्थानावर असलेले अरोरा हे दोनच वर्षांपूर्वी सॉफ्टबँकमध्ये रुजू झाले होते. आता ते कंपनीच्या सल्लागाराची भूमिका पार पाडतील.
  • त्यांच्या राजीनाम्यानंतर सॉफ्टबँकचे संस्थापक ५९ वर्षीय सन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदासह अध्यक्षपदही स्वत:कडे घेतले आहे.
 सॉफ्टबँक 
  • सन यांनी १९८१मध्ये सॉफ्टवेअर वितरण कंपनी म्हणून सॉफ्टबँकची स्थापना केली. तिचा जपानमधील व्यवसाय दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या व्होडाफोनने २००६ मध्ये ताब्यात घेतला.
  • यानंतर तिचे रूपांतर मोबाइलवर आधारित सेवा कंपनीत करण्यात आले. या क्षेत्रातील जपानमधील तिसरी मोठी कंपनी सॉफ्टबँक बनली.
  • जूनच्या सुरुवातीला सॉफ्टबँकने आघाडीची चिनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबामधील हिस्सा आधीच्या ३२ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर १० अब्ज डॉलर मोबदल्यात आणला.
  • सॉफ्टबँकची भारतातील गुंतवणूक १ अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. स्नॅपडिल, ओला कॅब्स, हाऊसिंग डॉट कॉम, ओयो रुम्ससारख्या कंपन्यांमध्ये तिची गुंतवणूक आहे.
  • स्नॅपडीलसारख्या कंपनीत ६२ कोटी डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या सॉफ्टबँकच्या इतिहासात अरोरा यांच्या रूपात प्रथमच समूहाबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपद गेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा