पुदुच्चेरीचे दहावे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी
- कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांनी ६ जून रोजी पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. व्ही. नारायणसामी हे पुदुच्चेरीचे दहावे मुख्यमंत्री ठरले.
- लेप्टनंट गर्व्हनर किरण बेदी यांनी नारायणसामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील पाच सदस्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- मंत्रिमंडळात ए. नमाशिवायम, एम. कंदासामी, एच.ओ.एच.एफ. शजाहन, आर. कमलाकन्नन आणि मल्लादी राव यांचा समावेश आहे.
- तीस सदस्यीय पुदुच्चेरी विधानसभेत कॉंग्रेस आघाडीचे १७ आमदार आहेत. त्यात कॉंग्रेसच्या १२ आमदारांचा समावेश आहे.
- नारायणसामी हे यूपीएच्या दुसऱ्या सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते, तर यूपीएच्या पहिल्या सरकारमध्ये संसंदीय कार्य राज्यमंत्री होते.
- पुदुच्चेरीत १६ मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायणसामी रिंगणात नव्हते. आता त्यांना पोटनिवडणुकीतून निवडून यावे लागेल. त्यासाठी कॉंग्रेसच्या एखाद्या नवीन आमदाराला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
जोकोविचचे करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण
- जागतिक क्रमवारीतील प्रथम मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने द्वितीय मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेचे कडवे आव्हान ३-६, ६-१, ६-२, ६-४ असे परतवून कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच ओपन चॅम्पियनचा बहुमान मिळवला.
- पहिला सेट ३-६ ने गमावल्यानंतर जोकोविचने शानदार पुनरागमन करत हा सामना जिंकून करिअर ग्रँडस्लॅमही पूर्ण केले. यापूर्वी फ्रेंच ओपनमध्ये त्याला २०११, २०१४ आणि २०१५ ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
- जोकोविचने आता सहा ऑस्ट्रेलियन, तीन विम्बल्डन, दोन यूएस ओपन आणि एक फ्रेंच ओपन विजेतेपदांसह एकूण १२ ग्रँडस्लॅम पटकावले आहेत.
- जोकोविच सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या रॉय एमरसनसोबत तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या पुढे पीट सॅम्प्रास, नदाल (प्रत्येकी १४ ग्रँडस्लॅम) आणि फेडरर (१७ ग्रँडस्लॅम) आहेत.
- टेनिसविश्वात चारही मानाच्या ग्रँडस्लॅम जिंकून करिअर स्लॅम पूर्ण करणारा नोव्हाक जोकोविच आठवा खेळाडू ठरला. १९३५ मध्ये ब्रिटनचे दिग्गज फ्रेड पेरी यांनी सर्वप्रथम करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले.
- त्यानंतर डॉन बज (अमेरिका), रॉड लेवर (ऑस्ट्रेलिया), रॉय एमर्सन (ऑस्ट्रेलिया), आंद्रे अगासी (अमेरिका), रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), राफेल नदाल (स्पेन) आणि त्यानंतर नोव्हाक जोकोविच यांनी करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केला आहे.
नोव्हाक जोकोविचची ग्रँडस्लॅम जेतेपदे | |
---|---|
ऑस्ट्रेलियन ओपन | २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६ |
फ्रेंच ओपन | २०१६ |
विम्बल्डन | २०११, २०१४, २०१५ |
अमेरिकन ओपन | २०११, २०१५ |
भारत आणि कतारदरम्यान सात करार
- कतारमधून हवाला रॅकेटमार्फत भारतात होणाऱ्या बेकायदा अर्थपुरवठ्याला तसेच दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याला यापुढे चाप बसविण्यासाठी भारत आणि कतारदरम्यान महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या कतारच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून त्यांच्यात व कतारचे आमिर शेख तामिम बिन हमाद अल थानी यांनी यावेळी सात विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
- हे करार प्रत्यक्षात येण्यापूर्वी उभय देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तसेच या दोन नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाली.
- दहशतवादांचे पाठिराखे व तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसे पुरवणाऱ्या गुन्हेगारांना एकटे पाडण्याच्या आवश्यकतेवर उभय देशांचे एकमत झाले.
- हवालामार्फत येणारा पैसा तसेच दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी उभय देशांच्या गुप्तहेर यंत्रणांनी परस्परांना माहिती पुरवावी, यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
- या बैठकीपूर्वी मोदी यांना येथील राजशिष्टाचारानुसार मानवंदना देण्यात आली.
मिस्टर युनिव्हर्स मनोहर ऐच यांचे निधन
- बॉडीबिल्डर व माजी मिस्टर युनिव्हर्स मनोहर ऐच यांचे वृद्धापकाळामुळे कोलकाता येथे निधन झाले. ते १०४ वर्षांचे होते.
- अवघी ४ फूट ११ उंची असलेल्या ऐच यांनी १९५२मध्ये मिस्टर युनिव्हर्सचा मान पटकावला. १९५१मध्ये पार पडलेल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
- भारतीय वायुदलात काम करणाऱ्या ऐच यांनी ३० व्या वर्षी म्हणजेच १९४२ साली वेट लिफ्टिंग करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर दशकभराने त्यांनी 'मिस्टर युनिव्हर्स'चा खिताब जिंकला.
- मनोहर ऐच यांनी ‘पॉकेट हर्क्युलिस’ असे संबोधण्यात येत असे. मनोहर यांनी तीनवेळा एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकही जिंकले. त्यांचा शेवटचा बॉडी बिल्डिंग शो २००३ साली झाला होता.
डॉ. एलिनॉर झेलिएट यांचे निधन
- भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील दलित आणि बौद्ध धम्म चळवळीच्या महत्त्वाच्या अभ्यासक, प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, विदुषी डॉ. एलिनॉर झेलिएट यांचे अमेरिकेत निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.
- डॉ. एलिनॉर झेलिएट या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाने भारून आंबेडकरांच्या नेतृत्वातील अस्पृश्योद्धाराच्या चळवळीच्या अभ्यासासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या विदुषी म्हणून प्रसिद्ध होत्या.
- अमेरिकेतील मिनेसोटातील कार्लटन कॉलेजमध्ये त्या दक्षिण भारताचा इतिहास हा विषय शिकवत होत्या. झेलिएट यांची भारत तसेच अमेरिकेत भारतातील दलित चळवळीच्या महत्त्वाच्या अभ्यासक आणि भाष्यकार म्हणून मान्यता आहे.
- दलित चळवळ, भारतातील मध्ययुगीन कालखंडातील संतकवी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित सध्याची बौद्ध धम्मचळवळ अशा विषयांवर त्यांनी ८० लेख आणि ३ ग्रंथांचे संपादन केले आहे.
- वसंत मून यांचे आत्मचरित्रही डॉ. झेलिएट यांनी संपादित केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे पहिले दलित आत्मचरित्र अमेरिकेत नेण्याचे श्रेय डॉ. झेलिएट यांनाच जाते.
एनएसजी गटासाठी स्वित्झर्लंडचा भारताला पाठींबा
- अणुसाहित्य पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी स्वित्झर्लंडने पाठिंबा दिला आहे. या गटाची बैठक होण्याआधी स्वित्झर्लंडने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात हा पाठिंबा जाहीर केला आहे.
- अणुसाहित्य पुरवठादार गटात भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी आमचा पाठिंबा आहे असे स्वित्झर्लंडचे अध्यक्ष जोहान स्नायडर-अम्मान यांनी सांगितले.
- भारताने या सदस्यत्वासाठी १२ मे रोजी अर्ज केला आहे. त्यावर व्हिएन्नामध्ये ९ जून व सोल येथे २४ जून रोजी बैठकांत चर्चा होणार आहे. एकूण ४८ सदस्य देश या गटात आहेत.
- काही भारतीय लोकांचा काळा पैसा स्विस बँकांत असून त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच, व्यापार, गुंतवणूक व व्यावसायिक प्रशिक्षण या क्षेत्रात सहकार्य करण्याचेही दोन्ही देशांनी मान्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा