कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी कथित संभाषण व भोसरी जमीन गैरव्यवहारामुळे प्रचंड अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मंत्रीपदाचा राजीनामा सूपूर्द केला.
पेस-हिंगिस जोडीला फ्रेंच ओपनचे जेतेपद
भारताचा लिअँडर पेस व त्याची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले.
फिलिप चार्टरर कोर्टवर पार पडलेल्या मिश्रच्या फायनलमध्ये पेस व मार्टिन या जोडीने दुसऱ्या सीडेड सानिया मिर्झा व इव्हान डॉडिग या जोडीचे कडवे आव्हान ४-६, ६-४, (१०-८) असे परतवून लावले.
लिअँडर पेसचे हे फ्रेंच ओपनमधील मिश्रचे पहिले जेतेपद ठरले. हिंगिससह खेळताना पेसने २०१५मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धांत मिश्र दुहेरीची जेतेपदे पटकावली होती.
आता यामध्ये २०१६च्या मोसमातील फ्रेंच ओपनची भर पडली आहे. पेसचे हे कारकिर्दीतील १८वे तर मिश्रचे १०वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले आहे.
सायना-डॉडिग यांनी पेस-मार्टिना यांना कडवी झुंज दिली. मात्र पेस-मार्टिना यांनी दुसऱ्या सेटमध्ये खेळ उंचावत मोक्याच्या क्षणी पुनरागमन सामना जिंकला.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे ४ जून रोजी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.
चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.
त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी ‘सखाराम बाईंडर’मधील चंपा, ‘शांतता..कोर्ट चालू आहे’ मधील बेणारे बाई, ‘मिसेस तेंडुलकर’ या विनोदी मालिकेतील राणे आजी या भूमिका विशेष गाजल्या.
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविले होते. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आईच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या होत्या.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.
‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करून राज्य शासनाने त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेचा यथोचित गौरव केला.
मराठी चित्रपट : जैत रे जैत, भूमिका, हेच माझं माहेर, मला आई व्हायचंय, चौकट राजा, विहीर, हापूस, इन्व्हेस्टमेंट इ.
हेवीवेट चॅम्पीयन महंमद अली यांचे निधन
गेली अनेक वर्षे पार्किन्सन आजाराने त्रस्त असलेले मुष्टियुद्ध खेळातील महान खेळाडू महंमद अली (वय ७४) यांचे ४ जून रोजी निधन झाले.
पार्किन्सनमुळे ते १९८४ पासून त्रस्त होते. त्या रोगाशी तेव्हापासून ते लढा देत होते. २०१४मध्ये ते न्युमोनियामुळे आजारी पडले होते.
मुष्टियुद्धमधील महान खेळाडू अली यांची हेवीवेट चॅम्पीयन म्हणून ओळख होती. वयाच्या १८व्या वर्षीच अली यांनी रोम ऑलिम्पिकमध्ये पदार्पणातच सुवर्णपदकाची कमाई केली.
जागतिक बॉक्सिंगमध्ये तीनवेळा विजेतेपद पटकावणारे मोहम्मद अली यांचा २०व्या शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवही करण्यात आला होता.
अली यांनी १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र सदिच्छादूत म्हणून अली यांची नियुक्ती करण्यात आली.
२००५ मध्ये अमेरिकेतल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले. २००१मध्ये अली यांच्या कारकीर्दीवर चित्रपट प्रदर्शित झाला.
'द ग्रेटेस्ट' अशा टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद अली यांनी १९८१ साली बॉक्सिंग रिंगमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी त्यांच्या नावावर ५६ विजय (त्यातील ३७ नॉकआउट) आणि अवघे पाच पराभव होते.
मोहम्मद अली यांचे मूळ नाव कॅशियस क्ले असे होते. पहिल्यांदा चॅम्पियन बनल्यानंतर ते मॅल्कम एक्सच्या मानवी हक्काच्या काळ्या मुस्लिम चळवळीशी जो़डले गेले.
त्यानंतर प्रभावित होऊन त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. कॅशियस क्ले हे नाव गुलामीचे प्रतिक आहे असे मोहम्मद अलींना वाटत होते. म्हणून त्यांनी आपले नाव बदलून मोहम्मद अली असे केले.
व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या लष्करात सामील होण्यास अली यांनी नकार दिला. नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या युद्धात सहभागी होण्यास नकार दिल्याने अली यांचे अजिंक्यपद स्पर्धेतील पदक काढून घेण्यात आले.
त्यांना १०,००० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आणि ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ३ वर्षांनंतर त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा