पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने औषधनिर्मिती, हवाई आणि संरक्षण क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला (एफडीआय) मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.
याशिवाय विमा, ई- कॉमर्स, पेन्शन, ब्रॉडकास्टिंग आणि सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रातदेखील १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे.
व्यवसाय सुलभता वाढून देशात अधिक परकीय गुंतवणूक यावी व त्यातून गुंतवणूक, उत्पन्न व रोजगार यात वाढ व्हावी या उद्देशाने ‘एफडीआय’ धोरण आता अधिक उदार व सुगम करण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातली नोव्हेंबरनंतरची ही दुसरी मोठी सुधारणा आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये सरकारने १२ क्षेत्रांमधील एफडीआयच्या नियमांमध्ये शिथिलता आणली होती.
मलेशियामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा
‘आझाद हिंद सेने’च्या नऊ सदस्यांच्या उपस्थितीत कौलालंपूर (मलेशिया) येथील ‘भारतीय सांस्कृतिक केंद्र’ परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेल्या ‘आझाद हिंद सेने’च्या नऊ सदस्यांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. या तीन महिला ‘आझाद हिंद सेने’च्या ‘झाशी राणी रेजिमेन्ट’चा भाग होत्या.
‘झाशी राणी रेजिमेन्ट’च्या ९० वर्षीय सदस्य मीनाक्षी पेरुमा यांनी कार्यक्रमादरम्यान बंगाली आणि तामीळ भाषेत ‘आझाद हिंद सेने’चे गीतदेखील गायले.
गेल्या वर्षी मलेशिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राचे ‘नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण करण्याची घोषणा केली होती.
ऑलिम्पिक मशाल हाती घेणारी सर्वांत वयस्क व्यक्ती
जगातील सर्वांत वयस्क स्काई डाइव्हरचा गौरव मिळविल्याच्या तीन वर्षांनंतर १०६ वर्षीय ऐडा जेमान्क्यू ऑलिम्पिक मशाल हाती घेणारी सर्वांत वयस्क व्यक्ती बनली आहे.
जेमान्क्यूने अॅलेक्झांडर काप्तारेंकोचा विक्रम मोडला होता. अॅलेक्झांडर याने २०१४च्या सोची हिवाळी ऑलिम्पिक मशाल रिलेत सहभाग नोंदवला होता. तेव्हा त्यांचे वय १०१ होते.
जेमान्क्यूने अमेजेनेयाचे शहर मकापात ऑलिम्पिक मशाल हाती घेतली.
ऑलिम्पिक मशालीचा हा प्रवास ९५ दिवसांचा आहे. ही मशाल ब्राझीलच्या ३२५ शहरांतून जाणार आहे.
मशालीचा प्रवास ५ ऑगस्ट रोजी रियोच्या माराकाना स्टेडियममध्ये संपणार आहे. यादरम्यान जवळपास १२ हजार धावपटू सहभागी होतील.
मोहमद मोर्सी यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा
देशाची गुपिते कतारला पुरवल्याच्या गुन्ह्यासाठी इजिप्तचे पदच्युत इस्लामवादी अध्यक्ष मोहमद मोर्सी यांना स्थानिक न्यायालयाने ४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याच प्रकरणात ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या सहा सदस्यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा न्यायालयाने कायम केली आणि इतर दोघांना २५ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मोर्सी यांना याच प्रकरणी १५ वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवास सुनावण्यात आल्यामुळे त्यांच्या कैदेची मुदत ४० वर्षे झाली आहे. हा निकाल अंतिम नसून त्याविरुद्ध अपील केले जाऊ शकते.
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या देशाच्या पहिल्या अध्यक्षांना २०१३ साली हटवण्यात आल्यानंतर हिंसाचार करण्याच्या आरोपाखाली मुस्लीम ब्रदरहूडचा सर्वोच्च मार्गदर्शक मोहमद बाडी आणि या प्रतिबंधित संघटनेच्या इतर ३५ सदस्यांना गेल्या महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुद्धचे अपील प्रलंबित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा