चालू घडामोडी : ९ जून
जागतिक शांतता निर्देशांकात भारत १४१वा
- इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने जगातील एकूण १६३ देशांची शांततेच्या मुद्द्यावर यादी जाहीर केली. या जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा १४१वा क्रमांक लागला आहे.
- बुरूंडी, सर्बिया व बुर्किना फोसो या देशांपेक्षाही भारतात अशांतता जास्त आहे असा या क्रमवारीचा अर्थ होतो. २०१५ मध्ये हिंसाचारामुळे भारतात ६८० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असे या पाहणी अहवालात म्हटले आहे.
- या यादीत सीरिया पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण सुदान, इराक, अफगाणिस्तान व सोमालिया यांचे क्रमांक आले आहेत.
- आइसलँड हा जगातील सर्वात शांततापूर्ण देश ठरला असून त्याखालोखाल डेन्मार्क व ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. या यादीत पाकिस्तान १५३वा तर अफगाणिस्तान १६०वा आहे.
- या अहवालानुसार भारतातील देशांतर्गत हिंसाचार, अंतर्गत कलह, लष्करीकरण यामुळे भारताची स्थिती वाईट आहे. देशात दहशतवादाचा धोका पाकिस्तानला सीमा लागून असल्यामुळे आहे.
एनएसजी सदस्यत्वासाठी मेक्सिकोचाही भारताला पाठिंबा
- आण्विक पुरवठादार देशांच्या समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी स्वित्झर्लंड, अमेरिकेपाठोपाठ मेक्सिकोनेही भारताला पाठिंबा दिला आहे.
- पाच देशांच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी मेक्सिकोमध्ये पोहचले. मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना नितो यांची त्यांनी भेट घेतली.
- नितो यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि मेक्सिको मिळून अंतराळ क्षेत्रात एकत्रितरित्या काम करणार आहेत.
अमेरिकेत भारताचा सहावा वाणिज्य दूतावास
- अमेरिकेतील भारतीयांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वायव्य अमेरिकेतील भागात सहावा वाणिज्य दूतावास सियाटल येथे सुरू करण्यात येणार आहे.
- वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को, शिकागो, हय़ूस्टन, अॅटलांटा येथे भारताचे वाणिज्य दूतावास आहेत.
- संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकपातळीवर संपर्कासाठी काही नवीन उपाययोजनाही जाहीर केल्या आहेत. दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
- अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३३ हजार असून, ती २०१४-१५ मध्ये १९ टक्क्यांनी वाढली आहे.
- अमेरिकी दूतावास व वाणिज्य दूतावास यांनी २०१५ या आर्थिक वर्षांत ७६ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा दिला आहे.
- अमेरिकेतील विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत. २०१५ मध्ये काही लाख अमेरिकी लोकांनी भारताला भेट दिली आहे.
मुरगांव बंदराला २ पुरस्कार
- नौकानयन मंत्रालयाकडून मुरगांव पोर्ट ट्रस्टला दोन प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
- २०१५-१६ सालात सर्वाधिक रहदारी राहिलेले बंदर म्हणून मुरगांवने बहुमान मिळविला. तसेच ‘आरएफडी’ निकषावरही मुरगांवने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम पुरस्कार पटकावला.
- केंद्रीय जहाज बांधणी, भूषृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुरगांव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आय. जेयकुमार यांनी पुरस्कार स्वीकारले.
‘पॅन’संदर्भात तक्रारींसाठी ‘इन्कम टॅक्स स्पर्श’ पोर्टल
- पॅन (पर्मनन्ट अकाउंट नंबर) कार्डासंदर्भात कोणतीही तक्रार आयकराच्या संकेतस्थळावर नोंदवता यावी, यासाठी आयकर विभागाने 'इन्कम टॅक्स स्पर्श' हे पोर्टल सुरू केले आहे.
- पॅनविषयक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी incometax.sparshindia.com या पोर्टलवर लॉगइन करून तक्रार नोंदवता येईल.
- यामध्ये यूटीआयटीएसएल किंवा एनएसडीएल या संस्थांकडे नोंदणी झालेल्या पॅन कार्डांसंदर्भातही तक्रार दाखल करता येणार आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
- फोर्ब्जने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.
- सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत अव्वल स्थानी असून, त्याची कमाई ८ कोटी ८० लाख अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.
- यातील ५ कोटी ६० लाख अमेरिकी डॉलर्स रोनाल्डोचे मानधन आहे, तर ३ कोटी २० लाख अमेरिकी डॉलर तो जाहिरातींच्या माध्यमातून कमावत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
- अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेसी यादीत दुसऱ्या स्थानावर असून, त्याची कमाई ८ कोटी १० लाख अमेरिकी डॉलरच्या घरात आहे.
- तिसऱ्या स्थानावर बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स, तर चौथ्या स्थानावर टेनिसपटू रॉजर फेडरर आहे.
सुझूकी मोटर्सच्या अध्यक्षांचा राजीनामा
- जपानस्थित मोटार कंपनी सुझूकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी ओसामू सुझूकी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला आहे.
- सुझूकीच्या लहान वाहनांची इंधन कार्यक्षमता ही अधिक दाखविणारी सदोष चाचणी यंत्रणा वापरात असल्याने निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कापनीचे अध्यक्ष सुझूकी यांनी हा निर्णय घेतला आहे.
- कंपनीने या प्रकरणात दोषी असलेल्यांसाठी शिक्षेचे स्वरूप निश्चित केले आहे. यामध्ये कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ओसामू होंडा यांना निवृत्ती देण्यात आली आहे.
- शिवाय सदोष चाचणी यंत्रणेशीसंबंधित कंपनीच्या काही संचालकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे.
- कंपनीने घडलेल्या प्रकरणासाठी ग्राहकांकडे दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन कंपनीने प्रसिद्ध केले आहे.
टी. एस. जॉन यांचे निधन
- केरळचे माजी विधानसभा अध्यक्ष टी. एस. जॉन यांचे ९ जून रोजी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे रुग्णालयात निधन झाले.
- व्यवसायाने वकील असलेले जॉन केरळ कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य होते. कलोप्परा विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले होते.
- शिवाय, ए. के. अँथनी यांच्या मंत्रिमंडळात जॉन मंत्री होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा