कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याबरोबर नवीकरणीय ऊर्जा वापरास दिलेले प्राधान्य यामुळे गुजरातमधील राजकोट शहराला ‘नॅशनल अर्थ अवर कॅपिटल २०१६’ पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.
‘वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर’च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ)वतीने आयोजित ‘ग्लोबल अर्थ अवर सिटी चॅंलेज’ (ईएचसीसी) स्पर्धेत २१ देशांतील १२५ शहरांचा सहभाग होता,
या वेळी ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल पुरस्कारासाठी समितीने फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहराची निवड केली.
हवामान बदलाविरोधात लढा देण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करणाऱ्या शहरांची निवड ईएचसीसी स्पर्धेतून केली जाते.
यंदा राजकोटला हा मान मिळाला असून, विविध देशांतील इतर १७ शहरांनाही नॅशनल अर्थ अवर कॅपिटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकास साधताना कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जा वापरास प्राधान्य देणे यासाठी राजकोटने अवलंबलेली धोरणे उल्लेखनीय असून, त्याची दखल घेत या शहराची निवड करण्यात आली.
या स्पर्धेत राजकोटशिवाय भारतातील ११ शहरांनीही सहभाग दर्शविला होता. त्यापैकी पुणे, कोइमतूर या शहरांनी अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली होती.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांचे मूल्यमापन करून जगातील एका शहराची ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल व प्रत्येक देशातील एका शहराची नॅशनल अर्थ अवर कॅपिटल या पुरस्कारांसाठी निवड केली जाते.
यापूर्वी ठाणे, कोइमतूर तसेच नवी दिल्ली या शहरांना नॅशनल अर्थ अवर कॅपिटल हा सन्मान प्राप्त झाला आहे.
मेहबुबा मुफ्ती विजयी
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग विधानसभा पोटनिवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी विजय मिळवला आहे.
मुफ्ती यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हिलाल शाह अहमद यांचा ११ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार इफ्तिकार हुसेन मिसगर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे अनंतनाग विधानसभेची जागा रिक्त झाली होती. सईद यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदी आलेल्या मेहबुबा यांनी येथून निवडणूक लढविली.
बांगलादेशातील श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री
भारत व बांगलादेशातील श्रोत्यांसाठी ‘आकाशवाणी’ येत्या २८ जूनपासून ‘आकाशवाणी मैत्री’ नावाची नवी वाहिनी सुरू करणार आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते कोलकत्यात होणाऱ्या समारंभात या बंगाली भाषेतील वाहिनीचे उद्घाटन होणार आहे.
या वाहिनीवर भारत व बांगलादेशातील कला, संस्कृती, साहित्य, संगीत, क्रीडा संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत.
पश्चिम बंगाल सरकारच्या ‘बांगलादेश बेतार’ या वाहिनीकडे येथील कार्यक्रमांसाठी कंटेंट तयार करण्यात येणार आहे.
या वाहिनीवर संगीत कार्यक्रम तसेच प्रश्नमंजुषा, विविध विषयांवर चर्चा अशांसारखे कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यामध्ये भारत व बांगलादेशातील नागरिक एकाचवेळी सहभाग घेऊ शकणार आहेत.
पश्चिम बंगाल व बांगलादेशातील शेती तसेच निसर्ग साधारणतः सारखाच आहे, त्यामुळे दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना या वाहिनीचा लाभ होणार आहे.
बांगलादेशातील अनेक लोक भारतात आरोग्य सुविधा घेण्यास येतात, त्यांच्यासाठीही कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
साधारणपणे दिवसभरात साडेसहा तास या वाहिनीवरून कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यानंतर हा कालावधी सोळा तासांपर्यंत वाढविला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा