स्पेनमधील माद्रिद येथे १७व्या आयफा २०१६च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी‘ चित्रपटाला सर्वाधिक नऊ पुरस्कार मिळाले.
यापाठोपाठ पिकू चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले. सलमान खानची भूमिका असलेल्या 'बजरंगी भाईजान'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
हॉवित्झर तोफा खरेदीस मंजुरी
सुमारे ७५० दशलक्ष डॉलर खर्च करून भारतीय लष्करासाठी हलक्या वजनाच्या १४५ हॉवित्झर तोफा अमेरिकेकडून घेण्याच्या प्रस्तावाला सरंक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
तसेच देशी बोफोर्स म्हणून विकसित करण्यात आलेल्या धनुष तोफांचे देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या प्रस्तावांनादेखील संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली.
मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल’च्या (डीएसी) बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीत सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या नव्या संरक्षणसामग्री खरेदीच्या प्रस्तावांवरही चर्चा झाली.
अमेरिकेकडून घेतल्या जाणाऱ्या हॉवित्झर तोफांची २५ किमी अंतरावर मारा करण्याची क्षमता असून, चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश आणि तिबेटमधील डोंगराळ भागात त्या तैनात करण्याची योजना आहे.
जितु रायला रौप्य
पिस्तूल किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या जितू रायने तीनवेळा ऑलिम्पिक पटकावणाऱ्या कोरियन जाँगोह जिनवर मात करत आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले.
१० मीटर एअर पिस्तूलच्या फायनल्यमध्ये केलेली १९९.५ गुणांची कमाई त्याला रौप्यपदक मिळवून देणारी ठरली.
तीनवेळा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या जाँगोहने प्राथमिक फेरीत १७८.८ गुणांची कमाई करत अव्वल क्रमांक पटकावला होता; पण फायनल्समध्ये जितूने मागे टाकल्याने त्याला ब्राँझवर समाधान मानावे लागले.
जितूचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे तर वर्ल्डकपमधील एकूण सहावे पदक ठरले आहे.
रिओ ऑलिम्पिकचा यजमान देश असलेल्या ब्राझीलच्या फेलिप अल्मिदा वूने सुवर्णपदक पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे सुवर्ण आहे.
द्युती चंदचा रिओप्रवेश
भारताची अॅथलिट द्युती चंद ही रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित झालेली ९९वी खेळाडू ठरली आहे. अलमती, कझाखस्तान येथे पार पडलेल्या १०० मीटरच्या शर्यतीत चमकदार कामगिरी करत द्युतीने ही कामगिरी केली.
ऑलिम्पिक प्रवेशासाठी १०० मीटरच्या शर्यतीत ११.३२ सेकंद हा मार्क पार करणे महत्त्वाचे होते. द्युतीने ही शर्यत ११.३० सेकंदात पूर्ण केली.
यंदा नवी दिल्लीत एप्रिलमध्ये पार पडलेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत द्युतीचा रिओ ऑलिम्पिक प्रवेश थोडक्यात हुकला होता. तेव्हा तिने १०० मीटरची शर्यत ११.३३ सेकंदात पूर्ण केली होती.
द्युतीव्यतिरिक्त ओपी जैशा आणि ललिता बाबर या भारतीय अॅथलिट्सने ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे.
तैवान येथे पार पडलेल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही द्युतीने सुवर्णपदक पटकावले होते.
१९८०मधील पी.टी उषानंतर प्रथमच भारताची अॅथलिट ऑलिम्पिकमधील १०० मीटरसाठी पात्र ठरली आहे.
२०१४मध्ये द्युतीवर बंदी घालण्यात आली होती. तिच्या शरीरातील हॉरमॉन्समध्ये तुलनेत पुरुषांचे हॉरमॉन्स जास्त असल्याने आयएएएफने ही बंदी घातली होती.
टीएनसीए अध्यक्षपदी एन. श्रीनिवासन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी चेअरमन एन. श्रीनिवासन यांची १५व्यांदा तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे.
टीएनसीएच्या ८६व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत श्रीनिवासन यांना अध्यक्षपदी बिनविरोध निवडण्यात आले.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन हे २००२-०३ मध्ये पहिल्यांना टीएनसीएचे अध्यक्ष निवडले गेले होते. त्या वेळी त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एसी मुथय्या यांना पराभूत केले होते.
२०१३साली आयपीएलमध्ये त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पनचे नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये पुढे आल्यामुळे त्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा