दिनविशेष : जागतिक पर्यावरण दिन
उपराष्ट्रपतींचा ट्युनिशिया दौरा
- उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या ट्युनिशियाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत आणि ट्यूनिशिया यांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
- उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ट्युनिशियाचे पंतप्रधान हबीब एस्सिदी यांच्यासोबत प्रामुख्याने दहशतवादावर चर्चा केली.
- हस्तशिल्प आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एका करारावर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तसेच डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित दोन करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या.
- आगामी पाच वर्षांत भारत ट्युनिशियातील ३५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान प्राप्त करण्यास भारताच्या प्रयत्नांना ट्युनिशियाने जे समर्थन दिले आहे त्याबद्दल अन्सारी यांनी समाधान व्यक्त केले.
हरितगृह वायूंच्या मोजमापासाठी साठ देशांच्या अवकाश संस्था एकत्र
- हरितगृह वायूंच्या प्रमाणाचे मोजमाप करून त्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था व फ्रेंच अवकाश संस्था यांच्यासह साठ देशांच्या अवकाश संस्था सहकार्य करणार आहेत.
- सीओपी-२१ हवामान बदल परिषद डिसेंबर २०१५मध्ये पॅरिस येथे झाली होती त्यावेळी हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्याचे ठरले होते.
- या कामात आता उपग्रहांची मदत माहिती गोळा करण्यासाठी घेतली जाणार आहे. उपग्रहांच्या मदतीने पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा आढावा घेता येणार आहे.
- पॅरिस कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हरितगृहवायू कमी करण्याची क्षमता तपासणे गरजेचे असते व ते फक्त उपग्रहांच्या मदतीने शक्य आहे.
- सर्व अवकाश संस्थांनी हवामान बदलांच्या अभ्यासासाठी माहिती उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. इस्रोही त्याला वचनबद्ध असून भारताच्या उपग्रहांना मिळालेली पृथ्वी निरीक्षणातील माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- साठ देशांच्या अवकाश संस्थांनी पृथ्वीच्या कल्याणासाठी त्यांच्या यंत्रणा, मानवी बुद्धिमत्ता व साधने उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून हवामान बदल रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात यश मिळू शकते.
एल अॅण्ड टी विमा व्यवसायातून बाहेर
- अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अॅण्ड टुब्रोने सामान्य विमा व्यवसायातून पाय मागे घेतला असून याच क्षेत्रातील स्पर्धक कंपनी एचडीएफसी अर्गोने त्यावर ताबा मिळविला आहे.
- गेल्या आर्थिक वर्षांत ४८३ कोटींचे हप्ता संकलन नोंदविणाऱ्या एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनीचा हा ताबा व्यवहार ५५१ कोटी रुपयांमध्ये पार पडला.
- एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनी ही सामान्य विमा व्यवसायतील उपकंपनी लार्सन अॅण्ड टुब्रो समूहाने सहा वर्षांपूर्वी स्थापित केली.
- समूहाने कोणत्याही विदेशी भागीदाराशिवाय प्रथमच या व्यवसायात शिरकाव केला होता. विविध २८ कार्यालये असलेल्या एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनीत ८०० हून अधिक कर्मचारी आहेत.
- आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ४८३ कोटी रुपयांचे विमा संकलन नोंदविणाऱ्या या कंपनीने वार्षिक तुलनेत ४० टक्के वाढ नोंदविली आहे.
- एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्सला एचडीएफसी अर्गोमध्ये विलीन करून करून घेण्याबाबत विमा नियामक (आयआरडीएआय)कडे परवानगी मागितली आहे.
- एचडीएफसी आणि जर्मनीतील म्युनिच रे समूहातील अर्गो यांची एकत्रित सर्वसाधारण विमा कंपनी एचडीएफसी अर्गो भारतात या क्षेत्रात चौथ्या स्थानावर आहे.
गरबाईन मुगुरुजा फ्रेंच ओपन विजेती
- गरबाईन मुगुरुजा हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सेरेना विलियम्सचा ७-५, ६-४ असा पराभव करीत आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
- या विजयाबरोबरच चौथ्या मानांकित मुगुरुजाने जगातील नंबर वन सेरेनाला स्टेफी ग्राफच्या २२ एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करणाऱ्या जेतेपदापासून वंचित ठेवले.
- २२ वर्षीय मुगुरुजा १९९८नंतर अरांत्सा सँचेज विकारियोनंतर पॅरिसमध्ये महिला चॅम्पियन बनणारी पहिली स्पेनची खेळाडू ठरली.
- प्रथमच मोठ्या स्पर्धेत फायनल गाठून विजेतेपद पटकावण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. याआधी फ्लाविया पेनेटाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन जिंकली, तर एंजेलिक कर्बरने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ही कामगिरी केली होती.
भक्ती कुलकर्णीला सुवर्णपदक
- भारताच्या महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी आणि ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामन यांनी आशियाई खंडनिहाय महिला आणि खुल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला.
- संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या भक्तीने अखेरच्या फेरीत व्हिएतनामच्या होआंग थि बाओविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून अव्वल स्थान पटकावले. भक्तीने सर्वाधिक ७ गुणांची कमाई केली.
- कझाकस्तानच्या दिनारा सादुआकासोव्हा आणि भारताच्या सौम्या स्वामिनाथन यांच्यापेक्षा ती अर्ध्या गुणाने वरचढ ठरली. सौम्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- याचप्रमाणे पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी भक्ती आता पात्र ठरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा