पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम’मध्ये (एमटीसीआर) भारताचा प्रवेश झाला आहे.
ही संघटना श्रीमंत देशांची मक्तेदारी मानली जाते; आता या संघटनेत भारताचा प्रवेश झाल्याने विकसित देशांप्रमाणे आपल्यालाही आधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळू शकेल.
या संघटनेतील भारताच्या प्रस्तावित प्रवेशाबाबत कोणत्याही सदस्य देशाने विरोध न केल्याने भारताचा या संघटनेतील प्रवेश सोपा झाला.
या संघटनेचे सदस्य होता यावे म्हणून भारताने मागील वर्षीच अर्ज केला होता; पण सदस्य राष्ट्रांनी विरोध केल्याने हा प्रवेश बारगळला होता.
याबरोबरच आण्विक पुरवठादार देशांच्या समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळावे म्हणूनही अमेरिकेने आपला पाठिंबा दिला आहे.
अॅमेझॉनची भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक
अमेरिकेतील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
या गुंतवणूकीमुळे भारतातील स्टार्टअप उद्योगाला चालना मिळेल, तसेच कल्पक आणि डिजिटल उद्योजकतेचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत होईल.
यावेळी पार पडलेल्या एका कार्यक्रमात अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांना मोदींच्या हस्ते जेफ आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अॅमेझॉन भारतातील हैदराबाद येथे यावर्षी ‘वेब सर्व्हिसेस क्लाऊड रिजन’ स्थापन करणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.
मारिया शारापोवावर दोन वर्षांची टेनिस बंदी
पाच ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवाला मेलडोनियम या प्रतिबंधित उत्तेजकाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने दोन वर्षांच्या टेनिस बंदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बंदीविरोधात शारापोव्हाने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान शारापोवा उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) मार्चपासूनच तिच्यावर तात्पुरती बंदी घातली होती.
मार्च महिन्यात पत्रकार परिषदेद्वारे या चाचणीत दोषी आढळल्याचे शारापोव्हाने जाहीर केले. वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून २००६पासून मेलडोनियमचा समावेश असलेले औषध घेत होते, अशी कबुली शारापोव्हाने दिली.
जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) यंदा २०१६च्या सुरुवातालीला या औषधाचा समावेश बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये करण्यात आला.
मात्र ही यादी शारापोव्हाने वाचली नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे सेवन करत असलेले औषध बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत असल्याचे तिला कळले नाही.
टेनिस संघटनेच्या आचारसंहितेनुसार उत्तेजक सेवनप्रकरणी दोषींसाठी चार वर्षांच्या बंदीची तरतूद आहे. मात्र शारापोव्हाने स्वत:हून चुकीची कबुली दिल्याने शारापोव्हाच्या शिक्षेचा कालावधी कमी झाला.
याबाबत सविस्तर पार्श्वभूमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
‘व्हिसलिंग वूड्स’मध्ये लता मंगेशकर शिष्यवृत्ती
व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटने नुकतेच दहाव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष दिग्दर्शक सुभाष घई यांनी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने शिष्यवृत्तीची घोषणा केली.
सुभाष घई त्यांची मुलगी मेघना आणि काही विद्यार्थ्यांनी लता मंगेशकर यांची भेट घेतली. लता मंगेशकर यांना ‘व्हिसलिंग वूड्स माएस्ट्रो अवॉर्ड’ स्वीकारण्याची विनंती त्यांनी केली.
लता मंगेशकर शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थ्यांना दोन-तीन वर्षे १०० टक्के शुल्कमाफी दिली जाईल.
‘व्हिसलिंग वूड्स’मध्ये तीन वर्षांपासून ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या नावानेही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा