भारताने शांघाय सहकार्य संघटनेत (एससीओ) २३ जून रोजी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश केला. भारताबरोबर पाकिस्तानने देखील एससीओमध्ये पूर्ण सदस्यत्व प्राप्त केले आहे.
एससीओच्या पूर्ण सदस्यत्वावर शिक्कामोर्तब होण्यासाठी भारताला एक वर्षाच्या कालावधीत ३५ आक्षेप नोंदवावे लागणार आहेत आणि आता भारत संघटनेच्या सर्व बैठकांना उपस्थित राहू शकणार आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी विशेष पॅकेज
केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगारनिर्मिती व निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पॅकेजला २३ जून रोजी मंजुरी दिली.
वस्त्रोद्योग व परिधान क्षेत्रातील विशेष पॅकेज हे रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे भारताला निर्यातवृद्धीसाठी चांगली संधी निर्माण होणार आहे.
सरकारच्या निर्णयामुळे येत्या तीन वर्षांत एक कोटी रोजगार तयार होतील. या क्षेत्रात ७० टक्के रोजगार महिलांना मिळतो, त्यामुळे एका अर्थाने महिला सक्षमीकरणाला हातभार लागणार आहे.
स्वीडनमध्ये ‘इलेक्ट्रिक रोड’
इंधनावर चालणाऱ्या वाहनांतून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वीडनमध्ये ‘इलेक्ट्रिक रोड’ तयार केला असून, या रस्त्याची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.
इलेक्ट्रिक रस्त्यावर धावणाऱ्या एका ट्रकला हायब्रिड इलेक्ट्रिक मोटारीच्या माध्यमातून ऊर्जा पुरविण्याचा प्रयोग यावेळी करण्यात आला.
सार्वजनिक रस्त्यावर अवजड वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर करण्याचा प्रयोग करणारा स्वीडन हा जगातील पहिला देश ठरला आहे.
स्वीडनमधील ‘ट्रॅफिकव्हर्केट’ नावाच्या वाहतूक प्रशासन विभागाने हा रस्ता तयार केला आहे.
‘व्हाइस मीडिया’चा ‘टाइम्स’सोबत सहकार्य करार
‘व्हाइस मीडिया’ कंपनीने विस्ताराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतातील सर्वात मोठी मीडिया कंपनी असलेल्या ‘टाइम्स’ समूहाशी सहकार्य करार केला आहे.
‘टाइम्स’शी झालेल्या भागीदारी करारानुसार, ‘व्हाइस मीडिया’ मुंबईत निर्मिती केंद्र सुरू करणार असून टेलिव्हिजन, मोबाइल, डिजिटल मीडिया क्षेत्रात संयुक्तपणे काम करणार आहे.
त्याचबरोबर, ‘व्हाइसलँड’ हे पेड टीव्ही नेटवर्कही सुरू करणार आहे. या करारामुळं ‘व्हाइस’ला मीडियातील विस्तारासाठी टाइम्स ब्रँडची मोठी मदत मिळणार आहे.
या कराराअंतर्गत व्हाइस मीडिया देशात ठिकठिकाणी स्टुडिओ उभारणार असून त्याद्वारे दैनंदिन घडामोडींसह लाइफस्टाइलशी संबंधित विविध कार्यक्रम २४ तास प्रसारित करणार आहे.
मेरी कोमचे रिओमध्ये प्रवेश नाही
लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती भारताची बॉक्सर मेरी कोमला रिओ ऑलिंपिकमध्ये विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान देण्याची विनंती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) फेटाळली आहे.
भारतीय ऑलिंपिक असोसिएशन आणि बॉक्सिंग इंडियाच्या अस्थायी समितीने तिला विशेष प्रवेशिकेद्वारे रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्याची विनंती केली होती.
मेरी कोमला पात्रता स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळेच तिच्याकरिता विशेष प्रवेशिका मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते.
अंजू जॉर्जचा केरळ क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
केरळचे क्रीडा मंत्री ई. पी. जयराजन यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यामुळे भारताची आघाडीची धावपटू अंजू बॉबी जॉर्जने केरळ क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
अंजूने राजीनामा दिल्यानंतर या परिषदेत असलेल्या अन्य १३ सदस्यांनीही पदे सोडली आहेत. त्यात नामांकित व्हॉलीबॉलपटू टॉम जोस यांचाही समावेश आहे.
अंजूच्या जागी आता तिचे बंधू अजित मार्कोस यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे ते आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले प्रशिक्षक आहेत.
अंजूला ओमन चंडी यांच्या नेतृत्वाखालील याआधीच्या यूडीएफ सरकारने क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते.
क्रीडा परिषदेच्या अन्य सदस्यांत भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश, व्हॉलीबॉलपटू टॉम जोसेफ आणि अॅथलिट प्रीजा श्रीधरन यांचा समावेश आहे.
अंजू बॉबी जॉर्ज विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची एकमेव महिला अॅथलिट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा