चालू घडामोडी : १५ जून
भारतासंबंधी विधेयक अमेरिकन सिनेटने फेटाळले
- भारतास ‘व्यूहात्मक व संरक्षणात्मक क्षेत्रातील जागतिक भागीदार’ असे विशेष स्थान देण्यासंदर्भातील तरतूद असलेले विधेयक अमेरिकेमधील सिनेटने फेटाळून लावले.
- हा प्रस्ताव संमत झाल्यास भारतास अमेरिकेचा व्यूहात्मक व संरक्षणात्मक क्षेत्रातील जागतिक भागीदार देश असा दर्जा मिळणार होता.
- मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर भारताला अमेरिका ‘मेजर डिफेन्स पार्टनर’ करून घेणार असल्याची घोषणा केली होती.
- यामुळे अमेरिकेच्या अत्यंत निकटवर्तीय मित्रदेशांना पुरविण्यात येणाऱ्या संरक्षणविषयक तंत्रज्ञान व व्यापारासाठी भारत पात्र ठरणार होता
- एनडीएएला सिनेटने मोठ्या बहुमताने मंजुरी दर्शविली होती. परंतु, यानंतर सुचविण्यात आलेल्या काही दुरुस्त्या संमत करण्यात सिनेटला अपयश आले.
- रिपब्लिकन पक्षाचे प्रभावशाली नेते जॉन मॅककेन यांनी भारताला राष्ट्रीय संरक्षण अधिकार कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. भारताला भागीदार न करता आल्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
भारत व घानामध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य
- भारत व घानाला दहशतवादाचा समान धोका असल्याने सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या दोन्ही देशांनी जाहीर केले.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पश्चिम आफ्रिकी देशांच्या दौऱ्यात घानाला भेट दिली. घानाचे अध्यक्ष जॉन द्रमाणी महामा यांच्याशी मुखर्जी यांची विविध विषयांवर चर्चा झाली.
- आंतरराष्ट्रीय दहशतवाद ही एक आपत्ती असून, दोन्ही देश त्याच्या छायेखाली आहे. त्यामुळेच अधिक सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
- घानाच्या विकासासाठी सवलतीच्या दरातील कर्जरूपाने भारतातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल घानाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
- तसेच कॉन्टिनंट कोमेंडा साखर कारखाना व एलमिना मत्स्यप्रक्रिया प्रकल्पांसारख्या आर्थिक-सामाजिक योजनांमध्ये भारताच्या सहकार्याबद्दल घानाच्या अध्यक्षांनी मुखर्जी यांचे आभार मानले.
स्टेट बँकेच्या संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी
- स्टेट बँकेच्या पाच संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचा समावेश आहे.
- सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात स्टेट बँक आणि संलग्न बँकांच्या समभागांच्या किमतीत २० टक्क्यांपर्यंतची वाढ पाहायला मिळाली.
- विलीनीकरणाची ही प्रक्रिया मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे.
फेसबुकचे आत्महत्या प्रतिबंधक टूल
- आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबुकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले.
- फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती. त्यामुळेच फेसबुकने पुढाकार घेऊन ‘सुसाईड प्रिव्हेंन्शन’ हे नवे टूल भारतात दाखल केले.
- ज्या व्यक्ती तणावात आहेत, अशा व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी काही पोस्ट टाकत असतील तर त्या पोस्टचा अंदाज घेऊन हे टूल मित्रपरिवाराला नोटिफिकेशन पाठवते.
- फेसबुक यूजरच्या पोस्टमध्ये काही विपरीत दिसल्यास ते कळविण्याची सोय या टूलमध्ये करण्यात आली आहे.
- दरम्यान, हे टूल अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये याआधीच सुरू करण्यात आले होते. फेसबुकच्या या टूलला या देशांत चांगला प्रतिसाददेखील मिळाला.
- फेसबुकने हे टूल भारतात ‘एएएसआरए’ आणि ‘द लाइव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ या स्थानिक कंपन्यांच्या मदतीने सुरू केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा