चालू घडामोडी : ३१ मार्च

गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्यास जन्मठेप

  • गुजरात सरकारने गोहत्याबंदी कायदा अधिक कठोर केला असून गायींची हत्या करणाऱ्यास आता जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
  • या नव्या ‘गो संरक्षण दुरुस्ती’ कायद्यानुसार गोहत्या आता अजामीनपात्र गुन्हा समजला जाणार आहे.
  • ‘गुजरात प्राणी संरक्षण कायदा १९५४’ अन्वये आता गोमांस बाळगणे अथवा त्याची वाहतूक करणाऱ्यासही दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
  • यापूर्वी या कायद्यामध्ये २०११मध्येही दुरुस्ती करण्यात आली होती. याआधी गोहत्या केल्यास केवळ सात वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद होती.
  • या कायद्यान्वये ठोठावल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही वाढविण्यात आली असून, ती ५ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.
  • गुजरातचे मुख्यमंत्री : विजय रूपानी

खेळाडूंच्या आयोगाच्या प्रमुखपदी राजू भावसार

  • राष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेनुसार प्रथमच स्थापन केलेल्या खेळाडूंच्या आयोगाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे आघाडीचे कबड्डीपटू व विश्लेषक श्रीराम ऊर्फ राजू भावसार यांची निवड झाली आहे.
  • राजस्थान येथे झालेल्या अखिल भारतीय कबड्डी महासंघ निमंत्रित आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंच्या उपस्थितीत संघटनेच्या अध्यक्षा मृदुला भदौरिया यांनी खेळाडू आयोग स्थापन करण्याची घोषणा केली.
  • या सभेला आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांच्यासह भारताच्या विविध राज्यांतील ८० पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
  • कबड्डीच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंच्या हिताचा विचार करून अशा प्रकारे खेळाडूंच्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. खेळाडूंच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी हा आयोग काम करेल.
  • कबड्डीपटूंसाठी काही महत्त्वपूर्ण योजना तयार करून त्या कार्यान्वित करण्यासाठी ही संघटना प्रयत्न करेल. खेळाडू आणि महासंघ यामधील दुवा म्हणून हा आयोग महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

सुनील व हरमनप्रीतला आशियाई हॉकी महासंघाचे पुरस्कार

  • भारताचा आघाडीचा फॉरवर्ड एस व्ही सुनील व युवा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग यांचा आशियाई हॉकी महासंघाने २०१६चे अनुक्रमे सर्वोत्कृष्ट खेळाडू व सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू म्हणून गौरव केला आहे.
  • आशियातील राष्ट्रीय संघांच्या कोचेसकडून या पुरस्कारांसाठी नामांकन मागविण्यात आले होते. यासाठी वर्षभरातील कामगिरीचा निकष ठरविण्यात आला होता.
  • हरमनप्रीतचा समावेश असलेल्या भारताच्या ज्युनियर संघाने हॉकी विश्वचषकात जेतेपद पटकवले होते. सध्या तो भारताच्या सिनियर संघात आहे.
  • सुनीलने गतवर्षी लंडनमधील एफआयएच चॅम्पियन्स चषकात मोलाची भूमिका बजावली होती. जागतिक हॉकीत सर्वांत वेगवान फॉरवर्डमध्ये सुनीलची गणना होते.

चालू घडामोडी : ३० मार्च

उडान योजनेतंर्गत ४५ विमानमार्गांवर स्वस्त विमानसेवा

  • केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेतंर्गत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ४५ नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.
  • यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड आणि जळगाव या पाच शहरांचा समवेश असून, या शहरातून स्वस्तातील विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
  • या सर्व शहरांमधून सप्टेंबरपर्यंत तर नांदेडमधून जून महिन्यापासून सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
  • सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व जळगाव येथे एअर डेक्कनच्या माध्यमातून तर नांदेड येथून ट्रू जेट विमानसेवा पुरवणार आहे.
  • या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील सुरुवातीच्या ५० टक्के आसनांसाठी फक्त २५०० रूपये तिकिट आकारले जाणार आहे. उर्वरित आसनांसाठी मात्र नियमित मूल्य मोजावे लागेल.
  • उडान ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना असून, या योजनेमुळे देशातील हवाई वाहतुकीला चालना मिळण्याची आशा आहे.

 महाराष्ट्रातील हवाई मार्ग 
  • नांदेड - मुंबई (जून २०१७)
  • नांदेड – हैदराबाद (जून २०१७)
  • सोलापूर – मुंबई (सप्टेंबर २०१७)
  • नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर २०१७)
  • नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर २०१७)
  • कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर २०१७)
  • जळगाव -मुंबई (सप्टेंबर २०१७)

एग्जिट पोलवर निवडणूक आयोगाकडून बंदी

  • निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत निकालाचा अंदाज वर्तवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यामुळे मतदान पूर्ण होईपर्यंत इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट माध्यमांना एग्जिट पोल दाखवता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
  • त्याबरोबरच निवडणूक निकालाचे ज्योतिषाचार्यांनी भविष्य वर्तवणे किंवा टॅरोट कार्डाच्या साहाय्याने भविष्य वर्तवण्यावरही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
  • पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये एग्जिट पोलवर बंदी असून देखील काही वेबसाइटने निकालाचे अंदाज मतदानाच्या काळात प्रसिद्ध केले होते. त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते.
  • याबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे सर्व माध्यमांना पाठवली आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६अ नुसार कारवाई केली जाणार आहे.

आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी कार्यकर्ते अहमद कथराडा यांचे निधन

  • नेल्सन मंडेला यांचे निकटचे सहकारी भारतीय वंशाचे दक्षिण आफ्रिकी वर्णभेदविरोधी कार्यकर्ते अहमद कथराडा यांचे २८ मार्च रोजी जोहान्सबर्ग येथे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
  • कॅथी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अहमद कथराडा यांचे आई-वडील सुरतचे रहिवासी होते. नंतर ते दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले.
  • वयाच्या १७ व्या वर्षी ते वर्णद्वेषविरोधी चळवळीत ओढले गेले. १९५१मध्ये ते ट्रान्सवाल इंडियन युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
  • १९६०मध्ये तेथील राजवटीने आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) वर बंदी घातली. त्यानंतर दोन वर्षे कथराडा हे नजरकैदेत होते.
  • १९६४च्या कुख्यात रिव्होनिया खटल्यात मंडेलांखेरीज ज्या तीन राजकीय कैद्यांना जन्मठेप ठोठाविण्यात आली त्यात अहमद यांचा समावेश होता. २६ वर्षे आणि ३ महिने कथराडा मंडेलांसोबत तुरुंगात राहिले.
  • तुरुंगात त्यांना अत्यंत कठोर व मेहनतीचे काम देण्यात आले. तशाही परिस्थितीत त्यांनी  तेथे राहूनच इतिहास आणि गुन्हेशास्त्रात त्यांनी बीए केले. पुढे आणखी दोन पदव्या त्यांनी मिळवल्या.
  • वर्णविद्वेषी राजवट संपुष्टात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत कथराडा हे खासदार म्हणून निवडून आले. १९९४ ते ९९ या काळात राष्ट्राध्यक्ष मंडेला यांचे ते संसदीय सल्लागार होते.
  • दक्षिण आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल मिशिगन, मॅसेच्युसेट्स आदी चार विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन कथराडा यांचा गौरव केला.
  • २००५मध्ये प्रवासी भारतीय हा सन्मानही त्यांना मिळाला होता. त्यांनी सुरू केलेल्या अहमद कथराडा फाऊंडेशनला गेल्याच वर्षी केंद्र सरकारने २० लाख रुपयांची मदत केली होती.

ट्रम्प यांची पुन्हा एका वादग्रस्त आदेशावर स्वाक्षरी

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यावरण संरक्षण संस्थेच्या (ईपीए) मुख्यालयात एका वादग्रस्त आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
  • यानुसार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पर्यावरणासंदर्भात घेतलेले सर्व निर्णय मागे घेण्यात येणार आहेत.
  • अमेरिकेतील संपत्ती आणि नोकऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने अमेरिकेतील ऊर्जेवर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे.
  • या निर्णयामुळे ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
  • ट्रम्प यांच्या या आदेशावर विरोधी डेमोक्रॅटिक पक्षासह पर्यावरणाशी संबंधित अनेक गटांनी टीका केली आहे.

ब्रेक्झिट प्रक्रियेला सुरुवात

  • लिस्बन करारातील कलम ५० लागू करण्यासंबंधी पंतप्रधान थेरेसा मे यांनी स्वाक्षरी केलेले पत्र ब्रिटनच्या राजदूतांनी ब्रसेल्समध्ये युरोपियन संघाला सादर केले आहे.
  • त्यामुळे ब्रिटनची युरोपियन संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच त्यासाठी द्विवार्षिक चर्चा प्रक्रिया सुरू होणार आहे.
  • युरोपियन संघातून बाहेर पडल्यामुळे नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करणे शक्य होणार आहे. तसेच, देशांतर्गत संधी वाढतील असे थेरेसा मे म्हणाल्या.

चालू घडामोडी : २९ मार्च

बीएस-III वाहनांच्या विक्रीवर बंदी

  • सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून भारत स्टेज-III (बीएस-III) इंजिनावर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
  • याबरोबरच सरकारने ३१ मार्चनंतर प्रदूषण वाढवणाऱ्या बीएस-III गाडयांच्या नोंदणीला परवानगी देऊ नये असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • वाहनांच्या कार्बन उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी १ एप्रिलपासून बीएस-IV ही नवी मानके लागू होणार आहेत.
  • या निर्णयामुळे बेस्टसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. ऑटो कंपन्यांकडे सध्या बीएस-III मानकाच्या ८.२४ लाख वाहनांचा साठा आहे. 
  • सरकारी वकील आणि वाहन निर्मार्त्यांच्या संघटनेने न्यायालयाकडे बीएस-III वाहनांचा सध्या असलेला साठा विकण्यासाठी एक वर्षांचा कालावधी देण्याची मागणी केली होती.
  • यापूर्वी २००५ आणि २०१०मध्ये उत्सर्जनाचे नवीन नियम लागू झाले त्यावेळी कंपन्यांना स्टॉकमध्ये असलेली वाहने विकण्याची परवानगी देण्यात आली होती.
  • परंतु उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लाखो नागरीकांचे आरोग्य महत्वाचे आहे असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
  • एप्रिलपासून बीएस-IV इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीलाच परवानगी मिळेल, हे कार कंपन्यांना माहीत होते. त्यामुळे आता या निर्णयावर आक्षेप घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

मेड इन कंट्री इंडेक्स-२०१७मध्ये भारताची प्रगती

  • युरोपीय संघ आणि जगातील ४९ देशांचा समावेश असलेल्या ‘मेड इन कंट्री इंडेक्स-२०१७’ (एमआयसीआय-२०१७)ची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
  • या सर्वेक्षणात उत्पादनांची गुणवत्ता, डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान, किंमतीची वसूली, वैशिष्ट्ये, सुरक्षेचे मापदंड, विश्वासार्हता, टिकाऊपणा आदींचे मुल्यमापन करण्यात आले.
  • या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • आतापर्यंत स्वस्त किंमतीमुळे चीनच्या उत्पादने नेहमीच वरचढ ठरत आली आहेत. मात्र, यावेळी भारताने ‘मेड इन कंट्री इंडेक्स’च्या यादीत चीनच्या उत्पादनांनाही मागे टाकले आहे.
  • भारतीय उत्पादनांनी यादीत ३६ गुणांसह ४२वे स्थान पटकावले आहे. तर चीन २८ गुणांसह ४९व्या स्थानावर आहे.
  • तर जर्मनीने या यादीत १०० गुणांसह प्रथम स्थान मिळवले आहे. ९८ गुण मिळवणारा स्वित्झर्लंड यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४मध्ये सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या दृष्टीने हे  आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे.

जीएसटीला लोकसभेत मंजुरी

  • देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकांना २९ मार्च रोजी लोकसभेत मंजुरी मिळाली.
  • सेंट्रल जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी, युनियन टेरिटरी जीएसटी आणि नुकसान भरपाई कायद्यावर संसदेमध्ये बऱ्याच चर्चेनंतर मंजुरी मिळाली.
  • जीएसटी अंमलात आणल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत ज्या राज्य सरकारांना महसुली उत्पन्नात तोटा सहन करावा लागेल, त्यांना पुरेशी नुकसानभरपाई देण्याची तरतूद विधेयकात आहे.

चालू घडामोडी : २८ मार्च

स्टीफन मॅकाफ्री यांचा स्टॉकहोम वॉटर प्राइझने सन्मान

  • जगातील नागरिकांना ‘पाण्याचा हक्क’ मिळवून देणारे अमेरिकी प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय पाणीवाटप कायद्याचे तज्ज्ञ स्टीफन मॅकाफ्री यांना यावर्षीचे स्टॉकहोम वॉटर प्राइझ जाहीर झाले.
  • जलसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या स्टीफन मॅकाफ्री यांच्या प्रयत्नांमुळे पाणी मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, याला संयुक्त राष्ट्रांनी २०१०साली मानवी अधिकार म्हणून मान्यता दिली.
  • तसेच पाणी वाटपाविषयीचा १९९७ सालचा आंतरराष्ट्रीय कायदाही संमत करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
  • सॅक्रेमॅन्टो (कॅलिफोर्निया) येथील पॅसिफिक विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक असलेले प्रा. मॅकाफ्री संयुक्त राष्ट्रांसाठी गेली ३५ वर्षे काम करतात.
  • संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कायदेविषयक आयोगावर त्यांनी १९८२ ते १९९१ या कालावधीत काम केले. याच आयोगाच्या १९८७मधील अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते.
  • आधी पाण्याबद्दलचे आंतरराष्ट्रीय कायदे हे केवळ जलवाहतुकीपुरते असल्यामुळे १९८५साली प्रत्यक्ष पाणीवापरासंबंधीचे आंतरराष्ट्रीय कायदे करण्यासाठी त्यांना ‘खास संवादक’ म्हणून नेमण्यात आले.
  • जगभरच्या अनेक पाणी-प्रश्नांचा अदमास घेऊन त्यांनी १९९१मध्ये जो मसुदा बनवला, तो पाणी-तंटे सोडवणुकीचा आणि हे संघर्ष होऊच नयेत यासाठी सर्वमान्य नियम घालून देणारा पहिला जागतिक मसुदा होता.
  • मॅकाफ्री यांनी जगातील अनेक पाणी तंट्यांमध्ये मध्यस्थ व सल्लागाराची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. नाईल नदीच्या पाणीवाटपाचा करार यशस्वी होण्यातही त्यांचे योगदान मोठे आहे.
  • अर्जेटिना-उरुग्वे, भारत-पाकिस्तान, इस्रायल-पॅलेस्टाइन आणि स्लोव्हाकिया-हंगेरी यांच्या पाणी तंटय़ांमध्ये त्यांची कामगिरी महत्त्वाची आहे. 
  • त्यांची अनेक पुस्तके व लेख म्हणजे जलसंवर्धन या विषयावरचे संदर्भ साहित्य बनले आहे. त्यातही ‘द लॉ ऑफ इंटरनॅशनल वॉटरकोर्सेस’ (२००७) हा जगन्मान्यता मिळवलेला ग्रंथ आहे.
  • पाणी जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी दिला जाणारा ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाला आहे.
  • २०१५मध्ये भारताचे ‘वॉटर मॅन’ म्हणून ओळखले जाणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. 

मानसोपचारांसंबंधीचा नवा कायदा मंजूर

  • मानसोपचारांसंबंधीचा नवा कायदा २७ मार्च रोजी संसदेने मंजूर केल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणे हा यापुढे फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही.
  • या कायद्यानुसार मनोरुग्ण लहान मुलांना उपचार म्हणून विजेचे शॉक देण्यासही पूर्ण मज्जाव असेल. हे विधेयक ऑगस्टमध्ये राज्यसभेने मंजूर केले होते.
  • आत्महत्येचा प्रयत्न करणे या गुन्ह्याची भारतीय दंड विधानापासून फारकत करणे ही या विधेयकातील महत्त्वाची तरतूद आहे.
  • ही कृती व्यक्ती पराकोटीच्या मानसिक उद्वेगापोटी करत असल्याने तो फौजदारी गुन्हा न मानता मानसिक असंतुलन मानले जाईल व त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येतील.
  • वयाने लहान असलेल्या मनोरुग्णांना विजेचे शॉक अजिबात न देणे व प्रौढांनाही भूल देऊन व स्नायू शिथिल होणारे औषध देऊन मगच हा उपचार करण्याचे बंधन नव्या कायद्यात आहे.
  • व्यक्तीचे मानसिक संतुलन ठीक नसले तरी त्याच्या मूलभूत मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही व अप्रतिष्ठा होणार नाही, अशा पद्धतीने त्याच्यावर मानसोपचार करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
  • भविष्यात आपल्याला मानसिक आजार झाल्यास आपल्यावर असे उपचार करायचे व त्याची व्यवस्था कोणी करायची हे आधीपासून ठरविण्याचा हक्क प्रत्येक नागरिकास असेल.
  • मनोरुग्ण व्यक्तीस इस्पितळांत न डांबता घरी आणि समाजात राहूनच त्याचे मानसिक आरोग्य ठाकठीक करण्यावरही कायद्यात भर आहे.

तुपेलेव १२४ एम विमानांचा ताफा नौदलातून निवृत्त

  • शत्रूच्या पाणबुड्यांवर अखंड नजर ठेवून भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या सोविएत बनावटीच्या ‘तुपेलेव १२४ एम’ विमानांचा ताफा २९ वर्षांच्या गौरवपूर्ण सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे.
  • पूर्वीच्या सोविएत संघाकडून घेतलेली ही लांब पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने सन १९८८मध्ये गोव्यात दाभोळी येथे सर्वप्रथम नौदलात दाखल झाली.
  • जगभर नावाजलेल्या या विमानांनी तेव्हापासून नौदलाच्या प्रत्येक कारवाईत व युद्धसरावात आपली मातब्बरी दाखवून दिली.
  • टप्प्याटप्प्याने एकूण आठ तुपोलेव विमाने नौदलात दाखल झाली. सध्या त्यापैकी फक्त तीन प्रत्यक्ष सेवेत होती.
  • तमिळनाडूतील ‘आयएनएस राजली’ हा या विमानांच्या ताफ्याचा सन १९९२ पासून स्थायी तळ आहे.
  • ‘टीयू १४२ एम’ विमानांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळात एकूण ३० हजार तासांची विनाअपघात उड्डाणे केली.
  • जुनी झाली असली तरी ही विमाने सुस्थितीत आहेत व काही दिवसांपूर्वी ‘ट्रॉपेक्स २०१७’ या नौदल युद्धसरावातही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती.
  • ‘तुपोलेव’ विमाने निवृत्त झाल्यावर त्यांची जागा बोर्इंगच्या ‘पी ८१’ जातीच्या १२ सागरी टेहळणी विमानांचा ताफा घेईल.
  • ही नवी विमाने युद्धनौकाविरोधी ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, हलक्या वजनाचे पाणसुरुंग, अग्निबाण तसेच अतिप्रगत राडार व सेन्सॉरनी सुसज्ज आहेत.

ज्येष्ठ वकील टी आर अंध्यारुजिना यांचे निधन

  • सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी आर) अंध्यारुजिना यांचे २८ मार्च रोजी वयाच्या ८३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात सन १९९६ ते १९९८ पर्यंत अंध्यारुजिना भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्याआधी सन १९९३ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल होते.
  • अंध्यारुजिना यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून सर चार्लस सार्जंट शिष्यवृत्ती व विष्णू धुरंधर सुवर्णपदकासह कायद्याची पदवी प्राप्त केली.
  • यानंतर लगेचच त्यांनी अ. भा. सेवा परीक्षा दिली व त्यात उत्तीर्ण झाल्याने त्यांची भारतीय विदेश सेवेसाठी निवड झाली. परंतु त्यांनी वकिलीच करण्याचे ठरविले.
  • सुमारे ६० वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी खास करून सर्वोच्च न्यायालयात किचकट घटनात्म मुद्दे असलेली असंख्य प्रकरणे हाताळली.
  • अंध्यारुजिना मृत्यूदंडाची शिक्षा कायद्यातून कायमची रद्द करण्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.
  • त्यांनी अनेक महत्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले व त्यांच्याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार आताचा ‘सरफासी’ कायदा केला गेला.
  • अंध्यारुजिना यांनी अनेक पुस्तकांखेरीज कायदा आणि न्यायालये या विषयांवर वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून विपूल लेखन केले.
 त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्वाची प्रकरणे 
  • संसदही राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही, असा निकाल दिला गेलेले केशवानंद भारती प्रकरण
  • कर्नाटक राज्य सरकार बरखास्तीचे एस आर बोम्मई प्रकरण
  • कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक शोषणासंबंधीचे विशाखा प्रकरण
  • माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरुद्धचे विश्वासदर्शक ठरावासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच दिल्याचे प्रकरण
  • संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्यावरून १४ खासदारांना बडतर्फ केले गेल्याचे प्रकरण
  • अरुणा शानभाग हिचे इच्छामरण प्रकरण

चालू घडामोडी : २७ मार्च

आधार कार्डची सक्ती अयोग्य

  • केंद्र सरकारने विविध कल्याणकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा हा निर्णय अयोग्य ठरवला आहे.
  • गरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारची सक्ती सरकारला करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • तसेच सरकारी पेन्शन आणि इतर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी सरकार आधारची सक्ती करू शकत नाही.
  • मात्र बँक अकाऊंट उघडणे, प्राप्तिकर भरण्यासाठी सरकार किंवा आर्थिक फायदा मिळवणाऱ्या योजनांमध्ये आधार कार्डची सक्ती सरकार करू शकते.
  • केंद्र सरकारने मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसह अनेक सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या मते, आधार कार्डला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणी करण्यासाठी ७ सदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्याची गरज आहे.

बांगलादेश मुक्ती युद्धातील शहीदांचा होणार सन्मान

  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद त्यांच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान बांगलादेश मुक्ती युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा गौरव करणार आहेत.
  • बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय सैन्य दलांमधील एकूण १६६१ जवानांनी प्राणांची आहुती दिली होती.
  • त्यापैकी सात जवानांच्या कुटुंबांचा शेख हसिना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ८ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान करतील.
  • यात लष्करातील चार व हवाई दल, नौदल आणि सीमा सुरक्षा दलातील एका हुतात्मा जवानाच्या कुटुंबाचा समावेश असेल.
  • यावेळी या जवानांच्या कुटुंबियांना तीन भाषांमध्ये लिहिलेले सन्मानपत्र व पाच लाख रुपयांचा धनादेश शेख हसिना यांच्या हस्ते दिला जाईल.
  • हुतात्मा झालेले इतर सैनिक ज्या भागातील आहेत त्या भागांत नंतर स्वतंत्र कार्यक्रम करून बांगलादेश सरकारमधील मंत्र्यांच्या हस्ते या सैनिकांच्या गौरवाचे कार्यक्रम आयोजित केले जातील.
  • याआधी बांगलादेशने मुक्ती लढ्यात भारतातील ज्या विविध वर्गांतील लोकांचा मोलाचा सहभाग राहिला अशा अनेक मान्यवरांचा ‘बंगमित्र’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता.
  • त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अटल बिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याखेरीज अनेक लष्करी अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर व राजनैतिक मुत्सद्यांचा समावेश होता.
 बांगलादेश मुक्ती लढा 
  • मार्च ते डिसेंबर १९७१ या काळात झालेल्या बांगलादेश मुक्ती लढ्यात अंदाजे ३ ते ३० लाख लोकांचा नरसंहार केला गेला. यात हिंदू, मुस्लिम, बंगाली व बिगर बंगालींचा समावेश होता. 
  • पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानातील नागरिकांविरुद्ध ‘ऑपरेशन सर्चलाइट’ नावाची दडपशाहीची क्रूर मोहीम हाती घेतली. त्यातून मुक्ती संग्राम उभा राहिला.
  • त्या विनाशकारी कालखंडाची आठवण म्हणून ज्या दिवशी ‘ऑपरेशन सर्चलाइट’ सुरु झाले तो २५ मार्चचा दिवस ‘बागलादेश नरसंहार दिन’ म्हणून तेथे पाळला जातो.
  • १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तान मुक्त होऊन स्वतंत्र बांगलादेश झाला. 

बीएसएफमध्ये प्रथमच महिला अधिकाऱ्याची नेमणूक

  • सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बीएसएफमध्ये तनुश्री परीक या महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
  • तनुश्री ही राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी असून सीमा सुरक्षा दलातील ती पहिलीच महिला लढाऊ अधिकारी ठरली आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१४मध्ये घेतलेल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली होती. यानंतर तिची सीमा सुरक्षा दलात निवड झाली.
  • भारत-पाकिस्तानच्या सीमेवर पंजाब येथे तैनात असलेल्या १०५ बटालियनच्या ‘असिस्टंट कमांडंट’ पदाची धुरा तनुश्रीकडे सोपविण्यात आली आहे.
  • १८६ बटालियनचा अंतर्भाव आणि अडीच लाख मनुष्यबळ असणारी बीएसएफ हे आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करणारे जगातील सर्वात मोठे दल म्हणून ओळखले जाते.
  • सद्य:स्थितीत सीमेचे संरक्षण करताना घुसखोरी रोखणे हे बीएसएफसमोर सर्वात मोठे आव्हान आहे.

आयएनएस विराटला अखेरचा सलाम

  • सागरी सेवेचा जागतिक विक्रम करणारी आणि सुमारे ३० वर्षे भारतीय नौदलाचे शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट ६ मार्च २०१७ रोजी निवृत्त झाली.
  • या युद्धनौकेने देशाच्या सागरी सीमांना पोलादी संरक्षण पुरवत भारतीय नौदलाचा हिंदी महासागरातील दरारा कायम राखण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
  • नवीन विमानवाहू नौका विक्रमादित्य आता पूर्ण क्षमतेने नोदलाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर विराट निवृत्त होत आहे.
  • निवृत्त झाल्यानंतर पुढील चार महिन्यात युद्धनौकेसाठी खरेदीदार मिळाला नाही तर तिला भंगारात काढले जाणार आहे.
  • आंध्रप्रदेश सरकारने आयएनएस विराटवर संग्रहालय सुरु करण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र यासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
  • सुमारे ५० वर्षे जगाचे महासागर पालथे घालणाऱ्या आयएनएस विराटची निवृत्ती ही एक युगान्त ठरला.

आयएनएस विराट

  • ब्रीदवाक्य: ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ (ज्याच्या हाती सागर, त्याचीच सत्ता)
  • २२० मी. लांब, ४५ मीटर रुंद.
  • सेंटॉर वर्गातील या विमानवाहून युद्धनौकेची भारतीय झेंड्याखाली ३० वर्षे सेवा.
  • १५० अधिकारी, १५०० खालाश्यांचा चमु राहण्याची क्षमता.
  • ९ मेगावॉट वीजनिर्मिती करणारी यंत्रणा.
  • सलग तीन महिने समुद्रात मुक्कामी राहण्याची क्षमता. 
  • कमी लांबीच्या रनवेवर टेक ऑफ आणि हेलिकॉप्टर सारखे जागेवर लॅण्डींग करण्याची क्षमता असलेली ३० सी हॉरीयर लढावू विमाने राहण्याची क्षमता. 
  • सी किंग विमाने (ब्रिटीश बनावट), कमोव्ह ३१ (रशियन), धृव तसेच चेतक (भारतीय) हेलीकॉप्टरचे विराटवर वास्तव्य.
  • या युद्धनौकेवरील विमानांनी एकूण २२ हजार ६२२ तासांचा प्रवास केला आहे.
  • एकूण २२८२ दिवस समुद्रात घालवले. 
  • १० लाख ९४ हजार २१५ किलोमीटरचा एकूण जलप्रवास.
  • चालू स्थितीत असलेल्या सगळ्यात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद.
  • पश्चिमी ताफ्याची सर्वोत्तम नौका म्हणून चारवेळा गौरव.
 इतिहास 
  • आयएनएस विक्रांत सेवा बजावत असताना हिंद महासागरावर आपला वरचष्मा कायम राखता यावा यासाठी भारतीय नौदलाला दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची गरज भासली.
  • त्यामुळे १२ मे १९८७ रोजी आयएनएस विराटचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. त्यापूर्वी तिने २७ वर्षे ‘एचएमएस हरमीस’ या नावाने इंग्लंडच्या रॉयल नेव्हीमध्ये सेवा बजावली होती.
  • अशा प्रकारे ५७ वर्षांची सलग नौदल सेवा केल्याने या युद्धनौकेची गिनीज बुकच्या जागतिक विक्रमात नोंददेखील झाली आहे.
  • द्वितीय विश्वयुद्धादरम्यान १९४३साली या युद्धनौकेचा आराखडा तयार करण्यात आला होता. विकर्स शिपयार्ड येथे १९५९साली तिची बांधणी करण्यात आली.
  • ४६५ मिलीयन डॉलर किमतीत विकत घेण्यात आलेली आयएनएस विराटची सेवा ही पुढे ५ ते १० वर्षांची राहील असा अंदाज होता पण सगळे अंदाज खोटे ठरवत आयएनएस विराटने सुमारे ३० वर्षे देशसेवा बजावली.
 कामगिरी 
  • १९८१साली सुमारे शंभर दिवस चाललेल्या फॉल्कलॅण्ड युद्धात सी हॉरीयर विमानांनी हरमीस वरून झेप घेत शत्रूची २३ विमाने जमीनदोस्त केली होती. 
  • १९८९साली श्रीलंकेत भारताने राबविलेल्या शांती मोहिमेत विराटने ‘ऑपरेशन ज्युपिटर’अंतर्गत गढवाल रायफल्सच्या ३५० जवानांना सगळ्या सामुग्रीसहित युद्धभूमीवर उतरवले होते.
  • १३ डिसेंबर २००१साली भारताच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर युद्धाचे ढग जमायला सुरू झाली. त्यावेळी सुमारे दहा महिने ही युद्धनौका कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज राहीली.
 नेतृत्व 
  • आयएनएस विराट या युद्धनौकेला आत्तापर्यंत २२ कमांडर लाभले आहेत. देशाच्या आत्तापर्यंतच्या २३ नौदल प्रमुखांपैकी ५ जणांनी आयएनएस विराटचे कमांडर म्हणून काम पाहीले आहे.
  • माधवेंद्र सिंग (१९८८-९०), अरूण प्रकाश (१९९०-९१), निर्मलकुमार वर्मा (१९९६-९७) डि के जोशी (२००१-०३), गिरीश लुथरा (२००६-०७) या पाच नौदल प्रमुखांनी विराटचे नेतृत्व केले.
  • भारतीय नौदलात १ जुलै १९८७ साली दाखल झालेले कॅप्टन पुनीत चड्डा हे आयएनएस विराटचे शेवटचे कर्णधार ठरले. २३ ऑक्टोबर २०१५ला त्यांनी आयएनएस विराटचे नेतृत्व स्वीकारले होते.

चालू घडामोडी : २६ मार्च

दिव्यांग खेळाडूंना हिवाळी ऑलिम्पिकमध्ये ७३ पदके

  • भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी ऑस्ट्रियातील विशेष जागतिक हिवाळी ऑलिम्पिकमध्ये ७३ पदकांची कमाई केली आहे.
  • १०५ देशांच्या सुमारे २,६०० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ३७ सुवर्णपदके जिंकली.
  • दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात येणारी जागतिक हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा १८ ते २४ मार्च दरम्यान ऑस्ट्रियामध्ये संपन्न झाली.
  • या स्पर्धेमध्ये अल्पाईन स्कीईंग, स्नो बोर्डिंग, स्नो शुईंग, फिगर स्केटिंग, स्पीड स्केटिंग, फ्लोर हॉकी या खेळांचा समावेश होता.
  • यामध्ये भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत ३७ सुवर्ण पदकांसह १० रौप्य आणि २६ कांस्य पदकांची कमाई केली. 
  • भारताने अल्पाईन स्कीईंगमध्ये १० पदकांची कमाई केली. तर स्नो बोर्डिंगमध्ये भारतीय संघाने ८ पदके पटकावली.
  • भारतीय पुरुषांनी युनिफाईड फ्लोअरबॉलमध्ये नायजेरियाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.
  • तर फ्लोअर हॉकीमध्ये भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रियाचा ८-० असा धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील पदकांची संख्या ७३ वर नेली.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठीही आधार अनिवार्य

  • वाहतूक विभागाने ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) मिळवण्यासाठी किंवा त्याच्या नूतनीकरणासाठी आधारकार्ड अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे.
  • आधारकार्ड नसल्यास नोंदणी करावी आणि तो क्रमांक वाहतूक विभागाला द्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
  • यापूर्वी केंद्र सरकारने माध्यान्ह भोजन, नवीन गॅस कनेक्शन इत्यादी विविध सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केले होते.
  • तसेच काही दिवसांपूर्वीच मोबाइल नंबर आधारकार्डासोबत जोडून घ्यावेत असे आदेश टेलीकॉम कंपन्यांना देण्यात आले आहेत.
  • यापुढे सरकारने दिलेल्या सवलतीचा किंवा सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड अनिवार्य असेल असे केंद्र  सरकारने म्हटले आहे.
  • परंतु, आधारकार्ड नसेल तरीही कुणीकोणत्याही सेवेपासून वंचित राहणार नाही. आधारकार्ड नोंदणी केली असेल तर त्या पावतीच्या आधारेही सर्व सेवांचा लाभ मिळेल असे सरकारने म्हटले आहे.

तामिळ भाषेतील प्रभावी साहित्यिक अशोकमित्रन यांचे निधन

  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तामिळ भाषेतील प्रभावी साहित्यिक अशोकमित्रन यांचे २३ मार्च रोजी चेन्नईमध्ये निधन झाले.
  • १९३१मध्ये सिकंदराबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव त्यागराजन होते. पण नंतर त्यांनी १९५२मध्ये ‘अशोकमित्रन’ हे टोपणनाव धारण केले.
  • उपहासगर्भ अशी त्यांची लेखनशैली असल्याने ‘अनबिन पारिसू’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाची बरीच चर्चा झाली.
  • साधी पण टोकदार शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़, त्यातूनच त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला अस्वस्थ केले.
  • चेन्नईला आल्यानंतर त्यांनी १० वर्षे जेमिनी स्टुडिओत काम केले. त्यांच्या ‘माय इयर्स विथ बॉस’ या पुस्तकात त्यांनी जेमिनी स्टुडिओतील अनुभव कथन केले आहेत.
  • थानीर, अपाविन स्नेगीधर, १८ अवधू अटचाकोडू (दी एटिंथ पॅरलल), द घोस्ट ऑफ मीनांबकम व स्टील ब्लीडिंग फ्रॉम द वुंड ही त्यांची पुस्तके संस्मरणीय ठरली.
  • १९९८मध्ये त्यांनी एका ऑनलाइन नियतकालिकासाठी चेन्नईवर माहितीपूर्ण लेखन केले. त्यावर नंतर ‘चेन्नई सिटी- अ कॅलिडोस्कोप’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
  • अशोकमित्रन हे शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. याशिवाय त्यांनी ‘कनाईयाझी’ या तामिळ साहित्य नियतकालिकाचे २५ वर्षे संपादन केले.
  • त्यांनी ८ कादंबऱ्या व २०० लघुकथा लिहिल्या. युरोपीय भाषांत प्रचलित लघुकथेपेक्षा मोठा व कादंबरीपेक्षा लहान अशा नॉव्हेल या प्रकारातही त्यांनी १५ पुस्तके लिहिली.
  • ‘अप्पाविन स्नेगीधर’ या लघुकथा संग्रहासाठी त्यांना १९९६मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • तसेच त्यांना १९९६मध्ये अक्षर पुरस्कार व २०१३मध्ये भारतीय भाषा परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सर्जनशील लेखनासाठी आयोवा विद्यापीठाची विद्यावृत्ती त्यांना मिळाली.

हॅवलॉक बेट चर्चेत

  • काही दिवसांपूर्वी भाजपाचे राज्यसभेतील खासदार एल ए गणेशन यांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे अंदमान-निकोबार द्वीपसमुहातील एक बेट चर्चेत आले आहे.
  • १८५७साली झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या विरोधात लढणाऱ्या ब्रिटीश लष्करी अधिकारी हेन्री हॅवलॉकचे या बेटाला दिलेले नाव लवकरात लवकर बदलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 हॅवलॉक बेटाबद्दल 
  • हॅवलॉक बेट हे अंदमान निकोबार द्वीपसमुहातील एखाद्या पाचूच्या रत्नाप्रमाणे सुंदर आहे.
  • हिरवीगार भूमी, प्रवाळ खडक, सभोवती स्वच्छ निळे पाणी यामुळे पर्यटकांची या बेटाला नेहमीच सर्वाधिक पसंती असते.
  • या बेटाचे क्षेत्रफळ ११३ चौकिमी असून पोर्ट ब्लेअर पासून ते ३९ किमी अंतरावर आहे. या बेटावर विमानतळही असून येथील निवासी मुख्यत्वे बंगाली आहेत.
  • या बेटावरील राधानगर किनाऱ्यास आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा असा सन्मानही मिळाला आहे.
 हेन्री हॅवलॉक 
  • हेन्री हॅवलॉक यांचा जन्म इंग्लंडमध्ये ५ एप्रिल १७९५ रोजी झाला. १८२२साली त्यांचा ब्रिटीश लष्कराच्या १३व्या रेजिमेंटमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना सेवेसाठी भारतामध्ये पाठवण्यात आले.
  • भारतात येण्यापूर्वी त्यांनी पर्शियन आणि हिंदी भाषा शिकून घेतल्या होत्या. १८२४साली झालेल्या पहिल्या अँग्लो बर्मिज युद्धामध्ये त्यांनी कामगिरी बजावली, हे युद्ध दोन वर्षे चालले. 
  • त्यानंतर ते इंग्लंडला परत गेले. १८३९साली त्यांची नेमणूक अँग्लो अफगाण युद्धासाठी करण्यात आली काबूलवर ताबा मिळवण्यासाठी इंग्रज फौजांनी केलेल्या कामगिरीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
  • यानंतर त्यांच्यावर १८५७साली बंड करणाऱ्या शिपाई आणि संस्थानिकांविरोधात लढण्याची महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली.
  • या बंडामध्ये हॅवलॉकनी कानपूरचा पाडाव करण्यात यश मिळवले. त्यानंतर २४ नोव्हेंबर १८५७ रोजी आजारपणामुळे हॅवलॉक यांचे निधन झाले.

रिलायन्सला डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यावर एक वर्षाची बंदी

  • भांडवल बाजार नियंत्रक सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजवर शेअर बाजारात डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे.
  • मुकेश अंबानींच्या या कंपनीवर फ्यूचर अॅण्ड ऑप्शन्स व्यवहारात फसवणूक केल्याच्या दहा वर्ष जुन्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. 
  • यासोबतच सेबीने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सुमारे एक हजार कोटींचा दंडही ठोठावला आहे.
  • परंतु सेबीच्या या निर्णयाविरोधात रिलायन्स इंडस्ट्रीज सिक्युरिटीज ट्रिब्युनलकडे दाद मागणार आहे.
  • हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स पेट्रोलिअमशी संबंधित आहे. रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअरमध्ये डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 
  • शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या या कंपनीचे नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले होते.
  • रिलायन्ससोबतच सेबीने अन्य १२ कंपन्यांवरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेअर बाजारात एक वर्ष डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.

चालू घडामोडी : २५ मार्च

मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडणे अनिवार्य

  • दूरसंचार मंत्रालयाने सर्व मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांना आपल्या ग्राहकांचे सर्व मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडण्याचे आदेश दिले आहेत.
  • यामुळे आधारकार्डवर आधारित नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रियेद्वारे मोबाइल नंबर आधार सोबत जोडावे लागणार आहेत.
  • ज्या ग्राहकांनी आधार कार्ड देऊनच मोबाइल नंबर घेतले त्यांची पुन्हा तपासणी होणार आहे. ही प्रक्रिया ६ फेब्रुवारी २०१८पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
  • यामुळे आता प्रिपेड आणि पोस्टपेडच्या ग्राहकांना आधारकार्डासोबत आपले नंबर जोडणे बंधनकारक राहणार आहे.
  • भारतामध्ये एकूण १.१ अब्ज मोबाइल ग्राहक आहेत. त्यामुळे या प्रक्रियेसाठी टेलिकॉम कंपन्यांना सुमारे १,००० कोटी खर्च येईल असा अंदाज आहे.
  • मोबाइल क्रमांक आधारला जोडण्याच्या प्रक्रियेची माहिती देशभरात प्रसारित करण्यासाठी सरकार जाहिरातींची मदत घेणार आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून सरकारने सर्व सरकारी योजनांच्या लाभासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमचे नंतर होणार

  • केंद्र सरकारने सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमचे (सीबीईसी) नामांतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड (सीबीआयसी) असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • अप्रत्यक्ष करांची नवी व्यवस्था वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी देशात १ जुलैपासून केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी करून याबद्दल माहिती दिली. कायदेशीर मंजुरीनंतर ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण होईल.

ढाक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर इसिसकडून हल्ला

  • बांगलादेशची राजधानी ढाका येथील हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ मार्च रोजी एका आत्मघातकी बाँबरने स्वत:ला उडवून दिले.
  • या इसमाने पोलीस चौकीसमोर बाँबचा स्फोट केला व स्वत:ला उडवून दिले. या स्फोटात इतर कुणी इसम जखमी झाला नाही. 
  • इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
  • या हल्लेखोराचा उद्देश पोलीस चौकीवर हल्ला करण्याचा होता, मात्र विमानतळावरील कडक बंदोबस्तामुळे त्याला त्यापूर्वीच आत्महत्या करणे भाग पडले.
  • या विमानतळापासून जवळच असलेल्या बांगलादेशच्या रॅपिड अॅक्शन बटालियनच्या शिबिरावर १७ मार्च रोजी अशाच प्रकारचा हल्ला झाला होता.
  • त्यानंतर बांगलादेशच्या सिलहेत प्रांतातील एका पाचमजली इमारतीमध्ये दडून बसलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांवर बांगलादेश लष्कराच्या कमांडोंनी ‘ऑपरेशन ट्विलाइट’अंतर्गत आक्रमण केले होते.
  • दहशतवाद्यांनी या इमारतीमधील तीन फ्लॅटचा ताबा घेतला आहे. या इमारतीमध्ये अजूनही अनेक नागरिक अडकून पडले आहेत.

चालू घडामोडी : २४ मार्च

मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकार सकारात्मक

  • बँकांकडून नऊ हजार कोटींचे घेतलेले कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकारने परवानगी दिली आहे.
  • ब्रिटनच्या स्थानिक न्यायालयाने मल्ल्याविरोधात वॉरंट काढण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
  • फेब्रुवारी २०१७मध्ये केंद्र सरकारने भारतातून पलायन केलेल्या मल्ल्याला भारताच्या हवाली करावे अशी विनंती ब्रिटन सरकारला केली होती.
  • त्यावर ब्रिटिश सरकारने सकारात्मक पावले उचलत मल्ल्याच्या प्रत्यार्पणास परवानगी दिली आहे.
  • विजय मल्ल्याला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह १७ बॅंकांनी कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज असे बॅंकांचे ९,००० कोटी रुपये बुडवून त्याने २०१६मध्ये ब्रिटनमध्ये पळ काढला होता.

अंकुर मित्तलला विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

  • अंकुर मित्तलने मेक्सिको आयएसएसएफ शॉटगन विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात कारकिर्दीतील पहिले विश्वकरंडक सुवर्णपदक जिंकले.
  • अंकुरने अंतिम फेरीत आपला ऑस्ट्रेलियाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी जेम्स विलेटला मागे टाकून विलेटच्याच जागतिक विक्रमाशी बरोबरी केली.
  • नुकत्याच दिल्लीत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अंकुरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, तर जेम्सने सुवर्णपदक मिळवले होते.
  • त्यावेळी जेम्सने ७५ गुणांची कमाई करून जागतिक विक्रम रचला होता. तर अंकुरने ७४ गुणांची कमाई केली होती.
  • मेक्सिकोमध्ये अंकुरने ७५ गुणांची कमाई करून अव्वल क्रमांक मिळवला. जेम्स ७३ गुणांसह दुसऱ्या, तर चीनचा यिंग क्वी ५२ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला.
  • नेमबाजीतील बदलानुसार ऑलिंपिकमध्ये डबल ट्रॅप स्पर्धेऐवजी ट्रॅपची मिश्र दुहेरी स्पर्धा होणार आहे. या निर्णयास जागतिक संघटनेने मान्यता दिली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मंजुरी बाकी आहे.

शशांक मनोहर आयसीसी अध्यक्षपदी कायम

  • शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत, पुढील अध्यक्ष निवडला जाईपर्यंत या पदावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आयसीसीमधील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत हे पद सांभाळण्याची विनंती केल्यामुळे मनोहर यांनी राजीनामा तूर्तास मागे घेतला आहे.
  • आयसीसीची वार्षिक परिषद एप्रिलमध्ये होत असून, त्यात नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
  • त्याचप्रमाणे प्रशासन आणि आर्थिक पुनर्रचनेतील बदल जोवर पूर्णत्वास येत नाहीत तोवर अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी विनंती आयसीसीने मनोहर यांना केली होती. 
  • शशांक मनोहर यांची मे २०१६मध्ये दोन वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.
  • परंतु मनोहर यांनी १५ मार्च रोजी वैयक्तिक कारण पुढे करत आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते.

चालू घडामोडी : २३ मार्च

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या जागी नवीन आयोग स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
  • मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, १९९३चा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कायदा रद्द होणार असल्याने ‘नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस’चे (एनसीबीसी- मागासवर्गीय जातींसाठीचा राष्ट्रीय आयोग) अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
  • त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर सोशली अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस’ (एनएसईबीसी) या आयोगाची स्थापना केली जाणार आहे.
  • देशातील ओबीसी प्रवर्गातील घटकांसाठी असलेल्या या आयोगावर एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.
  • एनएसईबीसीच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र सरकार संसदेत विधेयकातील सुधारणा प्रस्ताव मांडणार आहे.
  • एनएसईबीसी ही घटनात्मक संस्था असणार आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये नव्या जातींचा समावेश करण्यासाठी अथवा त्यातून नावे हटवण्यासाठी संसदेची परवानगी लागणार आहे.
  • सद्यस्थितीत ओबीसीमध्ये नवीन जातींचा समावेश अथवा नावे हटवण्यासंदर्भात सरकार पातळीवर निर्णय घेतला जात होता.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसंदर्भातील आयोगांना घटनात्मक दर्जा असल्यामुळे त्या यादीत फेरबदलासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असते. 
  • इतर मागासवर्गीय जातींच्या समावेशाचे अधिकार असलेल्या ‘एनसीबीसी’ला कायदेशीर दर्जा असला, तरी घटनात्मक दर्जा नव्हता.
  • इतर मागासवर्गीयांशी संबंधित तक्रारींची दखल घेण्याचा आणि त्यावर कारवाईचा अधिकारही ‘एनसीबीसी’ऐवजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे होता.

भारतीय हवाई दलाचा इस्रायलमध्ये संयुक्त युद्धाभ्यास

  • भारतीय हवाई दलाचे वैमानिक अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासह इस्रायलमध्ये संयुक्त युद्धाभ्यास करणार आहेत. 
  • हा संयुक्त युद्धाभ्यास हवाई ड्रिल इतिहासातील सर्वात मोठा आणि जटिल संयुक्त युद्धाभ्यास मानला जात आहे. ब्लू फ्लॅग एक्सरसाइज असे या युद्धाभ्यासाचे नाव आहे.
  • जवळपास १०० लढाऊ विमानांचा या युद्धाभ्यासात सहभाग असणार आहे. भारतासह सात देश या युद्धाभ्यासात सहभाग घेणार आहेत. चीन आणि पाकिस्तानला या युद्धाभ्यासात स्थान देण्यात आलेले नाही.
  • इस्रायल भारताला लष्करी साहित्य आणि हत्यारे पुरवणारा प्रमुख देश आहे. भारत पहिल्यांदाच इस्रायलमध्ये इतर देशांसह संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे.
  • याआधी भारतीय हवाई दलाने मे २०१६मध्ये अमेरिकेतील अलास्कामध्ये रेड फ्लॅग एक्सरसाइजमध्ये संयुक्त युद्धाभ्यास केला होता.

अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले

  • तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे दोन पाने हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे.
  • अण्णाद्रमुकमधल्या ओ पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • चेन्नईमधल्या आरके नगर या भागातल्या पोटनिवडणूकीसाठी शशिकला आणि पनीरसेल्वम या दोन्ही गटांनी एआयडीएमकेच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर दावा केला होता.
  • निवडणूक आयोगाने व्ही के शशिकला यांच्या गटाला टोपी हे चिन्ह दिले असून ओ पनीरसेल्वम यांच्या गटाला वीजेचा खांब हे निवडणूक चिन्ह दिले आहे.
  • जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षामध्ये सुरू झालेल्या सत्तास्पर्धेत शशिकला आणि ओ पन्नीरसेल्व्हम यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता.
  • शशिकलांनी या स्पर्धेत बाजी मारली होती पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठोवल्याने त्यांना मोठा हादरा बसला होता.
  • बेहिशेबी मालमत्ता तुरूंगवासाची शिक्षा झाल्यानंतर शशिकला यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत त्यांच्यात गटातल्या पलानीस्वामी यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी बसविले.

मानवी विकास निर्देशांक यादीमध्ये भारत १३१वा

  • संयुक्त राष्ट्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मानवी विकास निर्देशांकाच्या अहवाल भारताला १३१वे स्थान मिळाले आहे.
  • जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेची म्हणजेच भारताची स्थिती मानवी विकास निर्देशांकाबाबतीत खूप खालावली आहे.
  • यामुळे जगातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, झपाट्याने वाढणारी आणि लक्षवेधी अर्थव्यवस्था मात्र मानवी विकासाबाबत उदासीन दिसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
  • २०१४मध्ये देखील भारताचा या यादीतील क्रमांक १३१वा होता. गेल्या काही वर्षात यामध्ये काहीच बदल न झाल्याने अद्यापही भारताचा या यादीतील क्रमांक १३१ आहे.
  • संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या या अहवालानुसार भारत हा मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत मध्यम स्तरात येतो. बांग्लादेश, भूटान, पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळ सारखे देशही याच स्तरात येतात.
  • भारतीय व्यक्तीचे सरासरी आयुष्यमान ६८.३ वर्षे इतके आहे. या देशात तुम्हाला सुरक्षित वाटते का या प्रश्नाला ६९ टक्के उत्तरार्थींनी हो म्हटले.
  • ६९ टक्के लोकांचा भारताच्या केंद्र सरकारवर विश्वास आहे. तर देशातील ७४ टक्के लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

भारती एअरटेलकडून टिकोनाची खरेदी

  • भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने वायरलेस ब्रॉडबँड कंपनी टिकोनाची १६०० कोटीं रुपयात खरेदी केली आहे.
  • टिकोनाचे ५ जागांवरील डिजीटल सर्कल एअरटेलने खरेदी केले आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर टेलिकॉम कंपनीत झालेले हे दुसरे मोठ विलिनीकरण आहे.
  • गुजरात, पूर्व व पश्चिम उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील सर्व हक्क एअरटेलेने विकत घेतले आहेत. तर राज्यस्थानमध्ये दोन्ही कंपन्या मिळून ग्राहकांना फोर-जी सेवा देणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शॉन टेटला भारताचे नागरिकत्व

  • ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याला १९ मार्च रोजी भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.
  • शॉन टेटने २००५साली ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये, तर २००७साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
  • २०११साली त्याने आंतरराष्ट्रीय वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. सध्या तो फक्त ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाचे प्रतिनिधीत्व करतो.
  • २०१०च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान त्यांची भारतीय वंशाची मॉडेल माशुम सिंघासोबत ओळख झाली होती आणि दोघांनी २०१४साली विवाह केला.
  • शॉन टेटने ३ कसोटी, ३५ एकदिवसीय आणि १७१ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे ५, ६२ आणि २१८ विकेट्स घेतल्या आहेत.
  • क्रिकेट विश्वात सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणाऱ्या क्रिकेटपटूच्या यादीत शॉन टेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६१.१ किमी वेगाने चेंडू टाकला होता.

ब्रिटनच्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला इसिस जबादार

  • ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवर २२ मार्च रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. 
  • ब्रिटन संसदेबाहेरच्या परिसरात हल्लोखोरांनी पादचाऱ्यांना कारने चिरडणे, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला होता.
  • यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा ठिकाणी छापे टाकले असून आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

चालू घडामोडी : २२ मार्च

विकल्प योजना १ एप्रिलपासून सुरु

  • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २२ मार्च रोजी नव्या आरक्षण योजनेची घोषणा केली आहे. विकल्प योजना असे या नव्या योजनेचे नाव आहे.
  • या योजनेमुळे १ एप्रिलपासून विकल्प योजनेची निवड केलेल्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये आसन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना राजधानी आणि शताब्दीसारख्या ट्रेनमधून कोणतीही अधिक किंमत न मोजता प्रवास करता येणार आहे.
  • मात्र सध्याच्या ट्रेनमधील प्रवाशांची यादी निश्चित झाल्यावरच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनचा पर्याय निवडता येईल. 
  • प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशाने दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करण्यास नकार देत तिकीट रद्द केल्यास त्याच्याकडून दंड वसूल केला जाईल.
  • ट्रेन सुटण्याच्या ४ ते १२ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.
  • रेल्वे मंत्रालयाकडून ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे. सुरुवातीला ‘विकल्प’ हा पर्याय फक्त ई-तिकीट असलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असेल.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-जम्मू क्षेत्रात विकल्प योजना लागू करण्यात आली होती आणि येथे ही योजना रेल्वेसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली.
  • राजधानी, शताब्दी ट्रेनमधील आसने रिक्त राहू नयेत, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या ट्रेन्समधील सरासरी १२% आसने रिक्त राहात असल्याने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या नव्या योजनेमुळे तिकीट कन्फर्म होण्याचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे प्रवाशांकडून तिकीट रद्द करण्याचे प्रमाण घटले. त्यामुळे रेल्वेच्या नफ्यात मोठी वाढ झाली.
  • तिकीटे कन्फर्म न झाल्यामुळे दरवर्षी रेल्वेला ३,५०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यामध्ये विकल्प योजनेमुळे मोठी घट झाली आहे.

महावेध प्रकल्पाचे कंत्राट स्कायमेटला

  • महाराष्ट्रात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणीचा रखडलेला ‘महावेध प्रकल्प’ सुरू करण्याचे कंत्राट ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड’ या खासगी कंपनीला मिळाले आहे.
  • या हवामान केंद्रांसाठी २०६५ ठिकाणी स्कायमेटला पाच मीटर बाय सात मीटरची मोफत जागा देण्यात येणार आहे. मात्र, जमिनीवर मालकी शासनाची राहील.
  • सरकारी जागा उपलब्ध नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा दिल्या जातील. मात्र, सात वर्षांनंतर हा प्रकल्प समाप्त होईल. त्यामुळे स्कायमेटला सर्व जागा सोडाव्या लागतील. 
  • त्या मोबदल्यात स्कायमेट शेतकऱ्यांसाठी मोफत माहिती पुरविणार आहे. कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी शासनाने आधीच घेतली आहे.
  • महावेध प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागिदारीतून ‘बांधा-मालक व्हा-चालवा (बीओओ)’ तत्त्वाने चालविला जाणार आहे.
  • स्कायमेट कंपनी पीकविमा कंपन्यांना माहिती विकून आपला खर्च भागविणार आहे. त्यासाठी प्रतिमहिना ३२५० रुपयांपेक्षा जास्त दराने माहितीची विक्री करता येणार नाही.
  • तीन वर्षांनंतर ३५७५ रुपये तर सहा वर्षांनंतर ३९०० रुपये प्रतिमहिन्याने माहिती विकण्याची परवानगी कंपनीला मिळाली आहे. विमा कंपन्यांना ही माहिती स्कायमेटकडूनच घेण्याचे बंधन राहणार आहे. 

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

  • राजकीय घडामोडींचे साक्षेपी विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक गोविंद तळवलकर यांचे २१ मार्च रोजी अमेरिकेत निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
  • महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची धुरा तब्बल २७ वर्षं सांभाळलेले गोविंद तळवलकर हे पत्रकारितेतील मानदंड ठरले होते.
  • भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते.
  • ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी त्यांचा उल्लेख ‘ज्ञान गुण सागर’ असा केला होता. लोकमान्य टिळक, एम एन रॉय यांच्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव होता.
  • २२ जुलै १९२५ रोजी डोंबिवलीतील सुसंस्कृत घरात जन्मलेले गोविंद तळवलकर यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेत प्रवेश केला होता.
  • एका नियतकालिकामध्ये ते लिखाण करू लागले. त्यानंतर, २३व्या वर्षी ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले होते.
  • त्यांचे लिखाण अत्यंत परखड, अभ्यासपूर्ण आणि अभिजात दर्जाचे होते. त्यांचे अनेक लेख, त्यांनी मांडलेले विचार आजही कालसुसंगत वाटतात.
  • राजकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर निर्भिडपणे प्रहार करत, सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या लेखणीचा प्रभावी वापर केला होता. 
  • गोविंद तळवलकर यांनी मराठीसोबत इंग्रजीतही विपुल लिखाण केले. द टाइम्स ऑफ इंडिया, द टेलिग्राफ, द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, फ्रंटलाइन मॅगझिन, डेक्कन हेरॉल्ड या वृत्तपत्रांमधील त्यांचे लेखही गाजले होते.
  • पत्रकारितेतील या योगदानाबद्दल गोविंद तळवलकर यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले होत.
  • त्याचप्रमाणे, बी डी गोयंका, दुर्गा रतन पुरस्कार आणि रामशास्त्री पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता.
  • त्यांची नौरोजी ते नेहरू, विराट ज्ञानी - न्यायमूर्ती रानडे, नेक नामदार गोखले, भारत आणि जग, इराकदहन, अग्निकांड, अग्रलेख, पुष्पांजली, नियतीशी करार, बदलता युरोप अशी २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

ब्रिटननेमध्येही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी

  • अमेरिकेपाठोपाठ आता ब्रिटननेही ६ मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांवर ब्रिटनमध्ये येताना विमानातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी घातली आहे.
  • यामध्ये टर्की, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे.
  • सुरक्षाकारणास्तव खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारण ब्रिटनने दिलं आहे.
  • या नियमानुसार या ६ देशातील प्रवाशांना विमानात लॅपटॉप, टॅबलेट, डीव्हीडी प्लेयर, आयपॅड आणि मोठ्या आकाराचे मोबाइल फोन नेता येणार नाहीत.
  • यापुर्वी २१ मार्च रोजी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने १० मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांना अमेरिकेत येताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी घातली होती.

अमूल थापर यांची अमेरिकेतील न्यायालयात प्रमुख पदावर नियुक्ती

  • भारतीय वंशाचे अमेरिकी कायदेतज्ज्ञ अमूल थापर यांची अमेरिकेतील अपिली न्यायालयात प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. सिनेटच्या मंजुरीनंतर थापर हे अपिलीय न्यायालयाचा एक महत्त्वाचा भाग बनतील.
  • केंटकी, टेनिसी, ओहियो आणि मिशीगन येथील अपिलांवर येथे सुनावणी होते. या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे थापर हे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.

चालू घडामोडी : २१ मार्च

भारताचे ‘मान्सून मॅन’ डॉ. देवराज सिक्का यांचे निधन

  • हवामान अंदाज क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि हवामानशास्त्रातील प्रसिध्द संशोधक डॉ. देवराज सिक्का यांचे २१ मार्च रोजी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांच्या मान्सूनबाबत ज्ञानातील पारंगततेमुळे ते  भारताचे ‘मान्सून मॅन’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मान्सून मिशन कार्यक्रमामुळे लघू व दीर्घकालीन हवामान अंदाज करणे शक्य झाले.
  • देवराज यांचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग असलेल्या झांग मघनिया येथे झाला होता. फाळणीनंतर ते कुटुंबीयांसमवेत भारतात आले.
  • आग्रा विद्यापीठातून त्यांनी फिजिकल केमिस्ट्री या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. नंतर १९५४ ते १९६३ या काळात त्यांनी भारतीय हवामान खात्यात काम केले.
  • प्रशांत महासागरात सागरी जलातील तापमानाच्या चढउतारांमुळे एल निनो परिणाम घडून येतो व त्याचा संबंध थेट भारतीय मान्सूनशी आहे, हे १९८२मध्ये डॉ. देवराज सिक्का यांनी सर्वात आधी सांगितले होते.
  • त्यांच्या या सिद्धांतास अनेकांनी विरोध करूनही ते ठाम राहिले आणि त्यांच्या अनुमानाप्रमाणे एल निनोशी संबंधित दहा वर्षांपैकी सहा वर्षांत भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.
  • भारतीय हवामान खात्यात कारकीर्द सुरू करणारे सिक्का यांनी अनेक हवामान प्रारूपे तयार केली होती व मान्सूनच्या अंदाजासाठी संगणकाधारित प्रारूप तंत्र विकसित केले होते.
  • १९६४ मध्ये ते पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी या संस्थेत संचालक झाले व नंतर त्याच संस्थेतून ते निवृत्त झाले.
  • त्यांनी या संस्थेत काम करताना मान्सून गतिकी, वातावरणीय रसायनशास्त्र, उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र यावर मोठे काम करताना संस्थेला मोठी उंची गाठून दिली.
  • मान्सून व एल निनो, वॉकर सर्क्युलेशन, टोकाची हवामान स्थिती, भारतीय मान्सून हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.
  • मान्सून अंदाज सुधारण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मान्सून मिशन सुरू केले होते, त्याचे ते अध्यक्ष होते.
  • सीएसआयआरच्या हवामान बदल अभ्यास समितीचे व नॅशनल सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्टचे ते अध्यक्ष होते.
  • इंडियन मिटिरिऑलॉजिकल सोसायटीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. सर गिलबर्ट वॉकर सुवर्णपदक हा मानाचा पुरस्कार त्यांना  मान्सूनवरील संशोधनासाठी मिळाला होता.
  • ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस लि.’ या खासगी हवामान अंदाज कंपनीच्या वतीने दरवर्षी मान्सून व हवामान अंदाजाबाबत उत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्या वैज्ञानिकास देवराज सिक्का उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार दिला जातो. 

बिल गेट्स सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

  • फोर्ब्सने जारी केलेल्या जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळविला आहे.
  • गेट्स यांनी सलग चौथ्या वर्षी या यादीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. गेल्या २३ वर्षांत १८वेळा ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे. 
  • तर भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी प्रथम स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.२ अब्ज डॉलर आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या यादीतील स्थान घसरले असून, २२० क्रमांकावरून ५४४व्या स्थानी त्यांची घसरण झाली आहे.
  • या यादीत बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट दुसऱ्या स्थानी तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस तिसऱ्या स्थानी आहेत.
  • जगातील अब्जाधीशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ होऊन ती २०४३ वर पोहोचली आहे. या सर्वांची एकूण संपत्ती गतवर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढली आहे.
  • अब्जाधीशांच्या संख्येच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून या यादीत अमेरिकेतील ५६५, चीनमधील ३१९, जर्मनीतील ११४ आणि भारतातील १०१ व्यक्तींचा समावेश आहे.
  • भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी या यादीत ते ३३व्या स्थानी आहेत. गेल्या वर्षी ते ३६ व्या स्थानी होते.
  • त्यांच्यानंतर लक्ष्मी मित्तल ५६व्या स्थानी, तर अझीम प्रेमजी ७२व्या स्थानी आहेत. दिलीप संघवी ८४ तर शीव नाडर १०२व्या स्थानी आहेत.
  • अब्जाधीशांच्या या यादीत केवळ ४ भारतीय महिलांचा समावेश असून, यामध्ये ५.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सावित्री जिंदल प्रथम स्थानी आहे. या यादीत त्यांनी ३०३वे स्थान मिळविले आहे.
  • गोदरेज समूहाच्या स्मिता कृष्णा गोदरेज ८१४व्या स्थानी असून बायोकॉनच्या किरण मजूमदार ९७३व्या स्थानी आहे. युएसव्ही इंडियाच्या चेअरपर्सन लिना तिवारी या यादीमध्ये १,०३०व्या स्थानावर आहेत.

अमेरिकमध्ये आठ देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये ई-बंदी

  • अमेरिकन सरकारने आठ देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवासी विमानांमध्ये लॅपटॉप, आयपॅड्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगण्यास बंदी घातली आहे.
  • त्यामुळे आता इजिप्त, जॉर्डन, कुवेत, मोरोक्को, कतार, सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या देशांतून अमेरिकेला जाणाऱ्या विमानांमधून प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेता येणार नाहीत.
  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सात मुस्लीमबहुल देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर र्निबध लादले होते. त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
  • अमेरिकेकडून या निर्णयामागचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच ही बंदी अनिश्चित काळासाठी लागू केली आहे.

दानशूर उद्यमी डेव्हिड रॉकफेलर निधन

  • अमेरिकेत खनिज तेल उद्योगाचा पाया रचणारे जॉन डेव्हिडसन रॉकफेलर यांचे नातू आणि दानशूर उद्यमी डेव्हिड रॉकफेलर यांचे २१ मार्च रोजी वयाच्या १०१व्या वर्षी न्यूयॉर्क येथे निधन झाले.
  • वडिलोपार्जित अब्जावधींच्या मालमत्तेचे धनी असूनही त्यांनी रॉकफेलर घराण्याची दानशूरतेची परंपरा अबाधित राखली. त्यांचे आजोबा अमेरिकेतील पहिले अब्जाधीश म्हणून गणले जातात.
  • लहानपणापासून त्यांना मिळणाऱ्या खर्चाच्या पैशातून काही हिस्सा समाजकार्यासाठी राखून ठेवण्याचे त्यांच्यावर संस्कार झाले होते.
  • २०१५साली १००वा वाढदिवस साजरा करताना त्यांनी अमेरिकेतील मेन या राज्याला राष्ट्रीय उद्यानाजवळील १००० एकर जमीन दान केली होती.
  • न्यूयॉर्क शहर आणि जगभरातील अनेक संस्था व प्रकल्पांना त्यांनी मुक्त हस्ताने मदत केली होती. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांना त्यांनी सल्ला दिला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
  • हार्वर्ड विद्यापीठातून ते १९३६ साली पदवीधर झाले आणि १९४०साली शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लष्करी सेवाही बजावली.
  • त्यानंतर चेस बँकेत रुजू होऊन यथावकाश अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत पोहोचले.
  • दक्षिण आफ्रिकेच्या तत्कालीन वर्णद्वेषी राजवटीशी व्यावसायिक संबंध आणि १९७९च्या इस्लामी क्रांतीनंतर पदच्यूत झालेल्या इराणच्या शाह यांना अमेरिकेत वैद्यकीय उपचारांसाठी केलेली मदत यामुळे ते वादात सापडले.
  • आपल्या हयातीत त्यांनी १०० देशांच्या २००हून अधिक प्रमुखांच्या भेटी घेतल्या होत्या.

रविंद्र जडेजाने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम स्थानी

  • भारतीय संघाचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले. तर अवघ्या सात गुणांच्या फरकाने अश्विनला क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे.
  • रांची कसोटीपूर्वी अश्विन आणि जडेजा क्रमवारीत सामाईकरित्या अव्वल स्थानी होते. पण रांची कसोटीत जडेजा अश्विनपेक्षा वरचढ ठरला आणि त्यामुळे त्याला प्रथम स्थान मिळाले.
  • फलंदाजांच्या बाबतीत भारताच्या चेतेश्वर पुजाराने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९४१ गुणांसह प्रथम स्थानावर आहे.
  • तर पुजाराने ८६१ गुण मिळवत इंग्लंडचा जो रुट (८४८) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (८२६) यांना मागे टाकले आहे.

चालू घडामोडी : २० मार्च

आनंदी देशांच्या यादीत भारत १२२व्या क्रमांकावर

  • द वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१७ने जगातील सर्वाधिक आनंदी १५५ देशांची यादी तयार केली असून, या यादीत नॉर्वे देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • नॉर्वेने मागील वर्षापेक्षा तीन अंक जास्त मिळवत डेन्मार्कला मागे टाकले आहे. गेल्या चार वर्षांपैकी तीन वर्षे डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर होता.
  • दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक स्थिती, आरोग्यदायी जीवनशैली, भ्रष्टाचाराबाबतचा दृष्टिकोन आदी निकषांवरून आनंदाचे मोजमाप करण्यात आले आहे.
  • या यादीत भारताची गेल्या वर्षीच्या तुलनेत चार अंकांनी घसरण झाली असून सध्या भारत १२२व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत चीन, पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे.
  • भारताचा २०१३-१४मध्ये ११८वा क्रमांक होता तो आता १२२व्या क्रमांकावर गेला आहे. चीन (७९), पाकिस्तान (८०), नेपाळ (९९), बांगलादेश (११०) आणि श्रीलंका (१२०) हे शेजारील देश या यादीत भारताच्या पुढे आहेत.
  • नॉर्वेपाठोपाठ डेन्मार्क, आइसलॅण्ड, स्वित्झर्लंड, फिनलॅण्ड, नेदरलॅण्डस, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडन यांचा क्रमांक आहे.

मणिपूर विधानसभेतही भाजपचे बहुमत सिद्ध

  • भाजप सरकारने गोव्यापाठोपाठ ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेतही बहुमत सिद्ध केले आहे. बहुमत चाचणीत भाजप सरकारच्या बाजूने ३२ मते पडली.
  • राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू असलेले एन बिरेन सिंह हे मणिपुरमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
  • ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपला २१ तर काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या.
  • दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरुनही भाजपने छोट्या पक्षांच्या साथीने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. 
  • भाजपला नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाच्या ४, नागा पीपल्स फ्रंट पक्षाचे ४, लोकजनशक्ती पक्षाचे १ आणि २ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला. 
  • पाच वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता. पण यावेळी पक्षाने २१ आमदारांसह थेट सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे मणिपूरमधील यश हे भाजपसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय गटात सौम्या स्वामिनाथन यांची नियुक्ती

  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संचालक सौम्या स्वामिनाथन यांची संयुक्त राष्ट्रांच्या जीवाणूरोधक समन्वय गटात नेमणूक झाली आहे.
  • त्या जीवाणू प्रतिरोध तज्ज्ञ म्हणून या गटात सल्लागाराची भूमिका पार पाडणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे उप-सरचिटणीस अमीन महंमद या गटाचे सहअध्यक्ष असतील.
  • जीवाणू प्रतिबंध उपाययोजना गटात संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे प्रतिनधी, आरोग्य तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
  • यात जीवाणू प्रतिरोधकता वाढवण्यासाठी जागतिक कृती योजना तयार केली जाणार आहे.
  • गटाची बठक येत्या काही आठवड्यात होत असून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.
  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस : अँटोनियो गुट्रेस
 सौम्या स्वामिनाथन 
  • स्वामिनाथन या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी क्षय रोगावर संशोधन केले असून १९९२मध्ये त्या चेन्नईतील क्षयरोग संशोधन केंद्रात काम करू लागल्या.
  • सध्या त्या भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव आहेत. गेली २३ वर्षे त्या आरोग्य संशोधनात काम करीत आहेत.
  • निओनॅटोलॉजी अँड पेडिअट्रिक पलमॉनॉलॉजी या विषयात त्यांना दक्षिण कॅलिफोíनयातील लॉस एंजल्स रूग्णालयाची शिष्यवृत्ती मिळाली होती.
  • इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अँड लंग डिसिजेस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एचआयव्ही विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत.
  • पुण्याच्या एएफएमसी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालवैद्यकीत एमडी पदवी प्राप्त केली..

व्होडाफोन आयडिया विलिनीकरणावर शिक्कामोर्तब

  • भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोनने आयडियासोबत विलिनीकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • व्होडाफोन इंडिया आणि याअंतर्गत येणारे व्होडाफोन मोबाईल सर्व्हिसेस लिमिटेड आता आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयडिया सेल्यूलरमध्ये विलीन होणार आहे.
  • हचिसनकडून मोबाईल व्यवसाय खरेदी करत मूळच्या ब्रिटनमधील व्होडाफोनने २००७मध्ये भारतीय दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केले होते.
  • या संदर्भातील व्यवहारापोटी सरकारने व्होडाफोनवर २ अब्ज डॉलरचा कर लावला होता. यामुळे त्रस्त झालेल्या व्होडाफोनने आपला भारतातील व्यवसाय आयडियाला विकण्याचा निर्णय घेतला होता.
  • यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये जानेवारीपासून चर्चाही सुरु होती. दोन महिन्यांच्या चर्चेनंतर आता विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
  • व्होडाफोनचे विलिनीकरण झाल्यानंतर आयडिया सेल्युलर ही देशातील सर्वात मोठी मोबाईलधारक ग्राहक असणारी कंपनी असेल.
  • नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनची भागीदारी ४५ टक्के आणि आयडियाची भागीदारी २६ टक्के असणार आहे. पुढे आदित्य बिर्ला ग्रूप आणि व्होडाफोनची भागीदारी समान होईल.
  • नव्या कंपनीचे नेतृत्व चेअरमन या नात्याने कुमार मंगलम बिर्ला हे करतील. तर एकिकृत कंपनीचा मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) व्होडाफोन ठरवेल.

रॉजर फेडररला इंडियन वेल्स स्पर्धेचे पाचवे जेतेपद

  • स्वित्झर्लंडच्या प्रसिध्द टेनिसपटू रॉजर फेडररने स्टेन वॉवरिन्कावर ६-४, ७-५ अशी मात मात करून एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले.
  • या स्पर्धेचे हे फेडररचे पाचवे जेतेपद ठरले. याआधी फेडररने २००४, २००५, २००६ आणि २०१२ साली ही स्पर्धा जिंकली होती.
  • इंडियन वेल्सचे जेतेपद पटकावून फेडररने आता नोव्हाक जोकोव्हीच याच्या पाच वेळा स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
  • फेडररने जानेवारी महिन्यात दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावून १८वे ग्रॅंडस्लॅम जिंकले होते.

नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी डेरेक वॉलकॉट कालवश

  • साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळविणारे ज्येष्ठ कवी, नाटककार, चित्रकार डेरेक वॉलकॉट यांचे १७ मार्च रोजी निधन झाले.
  • २३ जानेवारी १९३० रोजी सेंट ल्युसियाची राजधानी कॅस्ट्रिज येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी स्वत:च त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध केला.
  • १९९०मध्ये त्यांची गाजलेली साहित्यरचना ‘ओमेरॉस’ यासाठी त्यांना १९९२मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • ग्रीक मिथककथेला केंद्रस्थानी ठेवून आणि त्या कथेची आजच्या काळाशी असलेली संगती जुळवत वॉलकॉट यांनी ‘ओमेरॉस’ हा काव्यखंड रचला.
  • तीन-तीन ओळींचा एक गुच्छ, सात पुस्तके व त्यात ६४ प्रकरणे अशी ‘ओमेरॉस’ची मांडणी आहे.
  • ‘वेस्ट इंडियन संस्कृतीला लाभलेला एक थोर कवी’, असे कौतुक वॉलकॉट यांना नोबेल देणाऱ्या स्वीडिश अकादमीने केले होते.
  • ‘ओमेरॉस’मधून वॉलकॉट यांनी वेस्ट इंडियन माणसाच्या जगण्याचे, त्याच्या सुखदु:खाचे दर्शन घडवले.
  • कॅरेबियन जगण्याचे समृद्ध आणि तेवढेच गुंतागुंतीचे पैलू हे वॉलकॉट यांच्या लिखाणाचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या निधनाने इंग्रजी साहित्यातील एक थोर कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

बीसीसीआयमध्ये एमसीएने मतदानाचा हक्क गमवला

  • भारतीय क्रिकेट नियामक लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) बीसीसीआयमधील कायमस्वरूपी मतदानाचा हक्क गमवावा लागला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या प्रशासकांच्या समितीने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
 या नवीन नियमांनुसार 
  • एका राज्याला एकच मत देण्याचा अधिकार असेल. त्यानुसार मुंबईला कायमस्वरूपी मतदान करण्याचा हक्क यापुढे मिळणार नाही.
  • मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या ईशान्येकडील लहान राज्यांना पूर्ण मतदानाचा हक्क मिळाला आहे.
  • बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी ३० सप्टेंबरला होईल आणि ३ वर्षांनी निवडणुका घेतल्या जातील.
  • बीसीसीआयच्या कार्यकारिणीमध्ये ९ जणांचा समावेश असेल. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणुका घेतल्या जातील.
  • अन्य चार कार्यकारिणी सदस्यांमध्ये एक बीसीसीआयचा पूर्ण सदस्य, पुरुष व महिला खेळाडूंचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि एक ‘कॅग’मधील अधिकाऱ्याचा समावेश असेल.
  • बीसीसीआयचे दैनंदिन कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी सांभाळेल, त्यांच्या मदतीला सहा व्यवस्थापक असतील.
  • निवड समितीबाबतच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

झाकीर नाईकच्या १८ कोटींच्या संपत्तीवर ईडीची जप्ती

  • झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) व इतर संबंधितांची १८.३७ कोटी संपत्ती मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आली आहे.
  • ईडीने आपल्या तपासात झाकीर नाईक आणि त्याच्या एनजीओने सुमारे २०० कोटी रूपयांचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचे सिद्ध केले आहे.
  • यापूर्वी ईडीने झाकीर नाईक आणि आयआरएफशी निगडीत मनी लॉन्ड्रिंगच्या या प्रकरणात त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती.
  • ईडीकडून वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक झाकीर नाईकचा शोधही सुरू आहे. सध्या झाकीर नाईक हा सौदी अरबमध्ये आहे.
  • दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) नाईकविरोधात नोटीस जारी केली असून दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ३० मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
  • नाईक हा अवैध कामात गुंतला असल्याचे व दहशतवाद्यांशी त्याचा संबंध असल्याचा मुंबई पोलिसांनी यापूर्वीच महाराष्ट्र सरकारला अहवाल दिला आहे.
  • गतवर्षी ढाका येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. नाईकमुळे आपण प्रेरित झाल्याचे या दहशतवाद्यांनी म्हटले होते.
  • नोव्हेंबर २०१६मध्ये एनआयएने नाईक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. नाईकवर धर्माच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला आहे.