हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमानतळाने२०१६मधील जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत प्रथम स्थान गाठले आहे.
प्रतिवर्ष ५० लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात हैदराबादने बाजी मारली आहे.
तर प्रतिवर्ष ४ कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दक्षिण कोरियातील विमानतळानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) विमानतळावर मिळणाऱ्या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी: एएसआय) आधारे दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम विमानतळांची निवड केली जाते.
यात विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे विमानतळांची विभागणी केली जाते.
नर्मदा नदीवर देशातील सर्वाधिक लांब केबल ब्रिज
गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भडोचमध्ये बांधलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७ मार्च रोजी करण्यात आले.
१३४४ मीटर लांब व २०.८ मीटर्स रुंदीच्या या केबल पुलाचे काम २ वर्षांत पूर्ण झाले असून त्यासाठी ३७९ कोटींचा खर्च झाला आहे.
या चार लेनच्या पुलावरील वाहतूक सुरू होताच, मुंबई अहमदाबाद महामार्गावर भडोच येथे होणारी वाहतूक कोंडी दूर होईल.
मुंबईतल्या वरळी-वांद्रे येथील सी लिंक पुलासारखा दिसणारा हा भव्य केबल ब्रिज १८ मीटर्स उंचीच्या इंग्रजी वाय आकाराच्या १० स्तंभावर उभा असून प्रत्येक स्तंभ आहे.
स्ट्रेच तंत्रज्ञानानुसार एकुण २१६ केबल्स या पुलासाठी वापरल्या आहेत. प्रत्येक केबलची लांबी २५ ते ४० मीटर्सच्या दरम्यान आहे.
१७.४ मीटर रुंदीच्या ४ लेन रस्त्यासह ३ मीटर्स रुंदीचे भव्य फुटपाथ पुलाच्या दोन्ही बाजूला आहेत. पुलावर ४०० पेक्षा अधिक एलईडी दिव्यांची सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार करण्यात आली आहे.
ट्रम्प यांची सुधारित प्रवेशबंदी अध्यादेशावर स्वाक्षरी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ मार्च रोजी सहा मुस्लिम देशातील शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश करण्यास प्रतिबंध करणाऱ्या सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली.
या सुधारित अध्यादेशातून इराकला वगळण्यात आले आहे. पूर्वी या प्रतिबंधित देशांच्या यादीत इराकसह सात देशांचा समावेश होता.
अमेरिका सध्या इराकमधील इस्लामिक स्टेटच्या विरोधात व्यापक मोहीम आखण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अनुकुल वातावरण निर्माण व्हावे म्हणून इराकवरील ही बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी सीरिया, इराण, इराक, लीबिया, सुदान, येमेन आणि सोमालिया या सात मुस्लिम देशातून येणाऱ्या मुस्लिम शरणार्थींवर बंदी घातली होती.
त्यांच्या या निर्णयाचे पडसाद जगात तसेच अमेरिकेतही उमटले होते. त्यानंतर अमेरिकेतील न्यायालयानेही त्यांच्या या निर्णयाला विरोध केला होता.
नव्या अध्यादेशानुसार आता येमेन, सीरिया, इराण, सुदान, लीबिया आणि सोमालिया या मुस्लिम देशांतील नागरिकांना नव्वद दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे हक्क ओप्पोकडे
चीनची मोबाइल निर्माती कंपनी ओप्पो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले आहेत.
बीसीसीआयने ओप्पोसोबत पुढील पाच वर्षांसाठी करार केला असून येत्या १ एप्रिल २०१७पासून या कराराला सुरूवात होणार आहे.
बीसीसीआयने संघाच्या स्पॉन्सशीपसाठी पायाभूत किंमत (बेस प्राईस) यावेळी सुमारे ५३८ कोटी इतकी ठेवली होती.
याआधी भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे अधिकार स्टार इंडियाकडे होते. स्टारसोबतचा करार मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे.
रिलायन्स कॅपिटलकडून पेटीएममधील भागिदारीची विक्री
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलने मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएममधील भागिदारी चीनच्या अलिबाबा समुहाला विकली आहे.
लोकप्रिय डिजिटल कंपनी असलेल्या पेटीएममधील १ टक्का हिस्सेदारीची सुमारे २७५ कोटींना विक्री करण्यात आली आहे.
रिलायन्स कॅपिटलने पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्सकडून १ टक्का भागिदारी खरेदी केली होती. त्यात फक्त १० कोटी रुपये गुंतवणूक केली होती.
नोटबंदीनंतर बाजारात चलनाची टंचाई निर्माण झाली होती. त्याचा फायदा पेटीएमच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचाला झाला आहे.
जानेवारी महिन्यात कंपनीच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचावरुन सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले होते.
उत्तर कोरिया आणि मलेशियामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता
उत्तर कोरियाने मलेशियन नागरिकांना देश सोडण्यास मनाई केल्यानंतर आता मलेशियानेही त्यांच्या देशातील उत्तर कोरियन नागरिकांना देश सोडण्यास मनाई केली आहे.
यामुळे या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून, आगामी काळात या दोन्ही देशांमधील संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मलेशियातील क्लालालांपूर विमानतळावर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊनचा सावत्र भाऊ किम जाँग नामची हत्या करण्यात आली होती.
ओ ईथाइल एस २ डायसोप्रोपिल अमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट या रसायनाच्या मदतीने किम जाँग नामवर विषप्रयोग झाला होता.
किम जाँग नामच्या हत्येप्रकरणी मलेशियन पोलिसांनी उत्तर कोरियाच्या काही नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
मलेशियन पोलिसांच्या तपासावर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन संतापला आहे आणि त्याने उत्तर कोरियातील मलेशियन नागरिकांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.
मलेशियानेही उत्तर कोरियाच्या उच्चायुक्तांना पुन्हा मायदेशी जाण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच मलेशियामधील उत्तर कोरियाच्या नागरिकांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.
क्रिकेटमध्येही रेड कार्ड
येत्या १ ऑक्टोबर २०१७पासून फुटबॉलप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातल्या बेशिस्तीला लगाम लावण्यासाठी आता हा रेड कार्डचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
त्यामुळे बेशिस्त खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अधिकार पंचांना मिळणार आहे.
डिसेंबरमध्ये पार पडलेल्या एमसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत क्रिकेटच्या सुधारित नियमांना मंजुरी देण्यात आली होती. ते १ ऑक्टोबर २०१७पासून लागू करण्यात येणार आहेत.
एअर इंडियाकडून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा
एअर इंडियाने जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर देशासह परदेशातील दहापेक्षा अधिक ठिकाणांना जोडणाऱ्या विमानांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करत महिला सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे.
२६ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत एअर इंडियाच्या ११ फेऱ्यांमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
यासोबतच हवाई उड्डाण क्षेत्राशी संबंधित असलेल्या, मात्र कधीही विमान प्रवास न केलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एअर इंडियाने ८ मार्च रोजी दिल्ली ते आग्रा अशा हवाई प्रवासाचे आयोजन केले आहे.
काही दिवसांपूर्वीच संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली हे अंतर यशस्वीपणे कापत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.
याआधी फक्त महिलांचा समावेश असलेल्या कोणत्याही विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलेली नाही. या विक्रमी कामगिरीचा गौरव जागतिक महिला दिनी करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा