चालू घडामोडी : २७ मार्च

आधार कार्डची सक्ती अयोग्य

  • केंद्र सरकारने विविध कल्याणकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा हा निर्णय अयोग्य ठरवला आहे.
  • गरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारची सक्ती सरकारला करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • तसेच सरकारी पेन्शन आणि इतर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी सरकार आधारची सक्ती करू शकत नाही.
  • मात्र बँक अकाऊंट उघडणे, प्राप्तिकर भरण्यासाठी सरकार किंवा आर्थिक फायदा मिळवणाऱ्या योजनांमध्ये आधार कार्डची सक्ती सरकार करू शकते.
  • केंद्र सरकारने मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसह अनेक सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या मते, आधार कार्डला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणी करण्यासाठी ७ सदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्याची गरज आहे.

बांगलादेश मुक्ती युद्धातील शहीदांचा होणार सन्मान

  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद त्यांच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान बांगलादेश मुक्ती युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा गौरव करणार आहेत.
  • बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय सैन्य दलांमधील एकूण १६६१ जवानांनी प्राणांची आहुती दिली होती.
  • त्यापैकी सात जवानांच्या कुटुंबांचा शेख हसिना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ८ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान करतील.
  • यात लष्करातील चार व हवाई दल, नौदल आणि सीमा सुरक्षा दलातील एका हुतात्मा जवानाच्या कुटुंबाचा समावेश असेल.
  • यावेळी या जवानांच्या कुटुंबियांना तीन भाषांमध्ये लिहिलेले सन्मानपत्र व पाच लाख रुपयांचा धनादेश शेख हसिना यांच्या हस्ते दिला जाईल.
  • हुतात्मा झालेले इतर सैनिक ज्या भागातील आहेत त्या भागांत नंतर स्वतंत्र कार्यक्रम करून बांगलादेश सरकारमधील मंत्र्यांच्या हस्ते या सैनिकांच्या गौरवाचे कार्यक्रम आयोजित केले जातील.
  • याआधी बांगलादेशने मुक्ती लढ्यात भारतातील ज्या विविध वर्गांतील लोकांचा मोलाचा सहभाग राहिला अशा अनेक मान्यवरांचा ‘बंगमित्र’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता.
  • त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अटल बिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याखेरीज अनेक लष्करी अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर व राजनैतिक मुत्सद्यांचा समावेश होता.
 बांगलादेश मुक्ती लढा 
  • मार्च ते डिसेंबर १९७१ या काळात झालेल्या बांगलादेश मुक्ती लढ्यात अंदाजे ३ ते ३० लाख लोकांचा नरसंहार केला गेला. यात हिंदू, मुस्लिम, बंगाली व बिगर बंगालींचा समावेश होता. 
  • पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानातील नागरिकांविरुद्ध ‘ऑपरेशन सर्चलाइट’ नावाची दडपशाहीची क्रूर मोहीम हाती घेतली. त्यातून मुक्ती संग्राम उभा राहिला.
  • त्या विनाशकारी कालखंडाची आठवण म्हणून ज्या दिवशी ‘ऑपरेशन सर्चलाइट’ सुरु झाले तो २५ मार्चचा दिवस ‘बागलादेश नरसंहार दिन’ म्हणून तेथे पाळला जातो.
  • १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तान मुक्त होऊन स्वतंत्र बांगलादेश झाला. 

बीएसएफमध्ये प्रथमच महिला अधिकाऱ्याची नेमणूक

  • सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बीएसएफमध्ये तनुश्री परीक या महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
  • तनुश्री ही राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी असून सीमा सुरक्षा दलातील ती पहिलीच महिला लढाऊ अधिकारी ठरली आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१४मध्ये घेतलेल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली होती. यानंतर तिची सीमा सुरक्षा दलात निवड झाली.
  • भारत-पाकिस्तानच्या सीमेवर पंजाब येथे तैनात असलेल्या १०५ बटालियनच्या ‘असिस्टंट कमांडंट’ पदाची धुरा तनुश्रीकडे सोपविण्यात आली आहे.
  • १८६ बटालियनचा अंतर्भाव आणि अडीच लाख मनुष्यबळ असणारी बीएसएफ हे आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करणारे जगातील सर्वात मोठे दल म्हणून ओळखले जाते.
  • सद्य:स्थितीत सीमेचे संरक्षण करताना घुसखोरी रोखणे हे बीएसएफसमोर सर्वात मोठे आव्हान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा