चालू घडामोडी : २१ मार्च
भारताचे ‘मान्सून मॅन’ डॉ. देवराज सिक्का यांचे निधन
- हवामान अंदाज क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि हवामानशास्त्रातील प्रसिध्द संशोधक डॉ. देवराज सिक्का यांचे २१ मार्च रोजी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
- त्यांच्या मान्सूनबाबत ज्ञानातील पारंगततेमुळे ते भारताचे ‘मान्सून मॅन’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मान्सून मिशन कार्यक्रमामुळे लघू व दीर्घकालीन हवामान अंदाज करणे शक्य झाले.
- देवराज यांचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग असलेल्या झांग मघनिया येथे झाला होता. फाळणीनंतर ते कुटुंबीयांसमवेत भारतात आले.
- आग्रा विद्यापीठातून त्यांनी फिजिकल केमिस्ट्री या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. नंतर १९५४ ते १९६३ या काळात त्यांनी भारतीय हवामान खात्यात काम केले.
- प्रशांत महासागरात सागरी जलातील तापमानाच्या चढउतारांमुळे एल निनो परिणाम घडून येतो व त्याचा संबंध थेट भारतीय मान्सूनशी आहे, हे १९८२मध्ये डॉ. देवराज सिक्का यांनी सर्वात आधी सांगितले होते.
- त्यांच्या या सिद्धांतास अनेकांनी विरोध करूनही ते ठाम राहिले आणि त्यांच्या अनुमानाप्रमाणे एल निनोशी संबंधित दहा वर्षांपैकी सहा वर्षांत भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.
- भारतीय हवामान खात्यात कारकीर्द सुरू करणारे सिक्का यांनी अनेक हवामान प्रारूपे तयार केली होती व मान्सूनच्या अंदाजासाठी संगणकाधारित प्रारूप तंत्र विकसित केले होते.
- १९६४ मध्ये ते पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी या संस्थेत संचालक झाले व नंतर त्याच संस्थेतून ते निवृत्त झाले.
- त्यांनी या संस्थेत काम करताना मान्सून गतिकी, वातावरणीय रसायनशास्त्र, उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र यावर मोठे काम करताना संस्थेला मोठी उंची गाठून दिली.
- मान्सून व एल निनो, वॉकर सर्क्युलेशन, टोकाची हवामान स्थिती, भारतीय मान्सून हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.
- मान्सून अंदाज सुधारण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मान्सून मिशन सुरू केले होते, त्याचे ते अध्यक्ष होते.
- सीएसआयआरच्या हवामान बदल अभ्यास समितीचे व नॅशनल सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्टचे ते अध्यक्ष होते.
- इंडियन मिटिरिऑलॉजिकल सोसायटीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. सर गिलबर्ट वॉकर सुवर्णपदक हा मानाचा पुरस्कार त्यांना मान्सूनवरील संशोधनासाठी मिळाला होता.
- ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस लि.’ या खासगी हवामान अंदाज कंपनीच्या वतीने दरवर्षी मान्सून व हवामान अंदाजाबाबत उत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्या वैज्ञानिकास देवराज सिक्का उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार दिला जातो.
बिल गेट्स सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- फोर्ब्सने जारी केलेल्या जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळविला आहे.
- गेट्स यांनी सलग चौथ्या वर्षी या यादीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. गेल्या २३ वर्षांत १८वेळा ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे.
- तर भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी प्रथम स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.२ अब्ज डॉलर आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या यादीतील स्थान घसरले असून, २२० क्रमांकावरून ५४४व्या स्थानी त्यांची घसरण झाली आहे.
- या यादीत बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट दुसऱ्या स्थानी तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस तिसऱ्या स्थानी आहेत.
- जगातील अब्जाधीशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ होऊन ती २०४३ वर पोहोचली आहे. या सर्वांची एकूण संपत्ती गतवर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढली आहे.
- अब्जाधीशांच्या संख्येच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून या यादीत अमेरिकेतील ५६५, चीनमधील ३१९, जर्मनीतील ११४ आणि भारतातील १०१ व्यक्तींचा समावेश आहे.
- भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी या यादीत ते ३३व्या स्थानी आहेत. गेल्या वर्षी ते ३६ व्या स्थानी होते.
- त्यांच्यानंतर लक्ष्मी मित्तल ५६व्या स्थानी, तर अझीम प्रेमजी ७२व्या स्थानी आहेत. दिलीप संघवी ८४ तर शीव नाडर १०२व्या स्थानी आहेत.
- अब्जाधीशांच्या या यादीत केवळ ४ भारतीय महिलांचा समावेश असून, यामध्ये ५.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सावित्री जिंदल प्रथम स्थानी आहे. या यादीत त्यांनी ३०३वे स्थान मिळविले आहे.
- गोदरेज समूहाच्या स्मिता कृष्णा गोदरेज ८१४व्या स्थानी असून बायोकॉनच्या किरण मजूमदार ९७३व्या स्थानी आहे. युएसव्ही इंडियाच्या चेअरपर्सन लिना तिवारी या यादीमध्ये १,०३०व्या स्थानावर आहेत.
अमेरिकमध्ये आठ देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये ई-बंदी
- अमेरिकन सरकारने आठ देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवासी विमानांमध्ये लॅपटॉप, आयपॅड्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगण्यास बंदी घातली आहे.
- त्यामुळे आता इजिप्त, जॉर्डन, कुवेत, मोरोक्को, कतार, सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या देशांतून अमेरिकेला जाणाऱ्या विमानांमधून प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेता येणार नाहीत.
- अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सात मुस्लीमबहुल देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर र्निबध लादले होते. त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
- अमेरिकेकडून या निर्णयामागचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच ही बंदी अनिश्चित काळासाठी लागू केली आहे.
दानशूर उद्यमी डेव्हिड रॉकफेलर निधन
- अमेरिकेत खनिज तेल उद्योगाचा पाया रचणारे जॉन डेव्हिडसन रॉकफेलर यांचे नातू आणि दानशूर उद्यमी डेव्हिड रॉकफेलर यांचे २१ मार्च रोजी वयाच्या १०१व्या वर्षी न्यूयॉर्क येथे निधन झाले.
- वडिलोपार्जित अब्जावधींच्या मालमत्तेचे धनी असूनही त्यांनी रॉकफेलर घराण्याची दानशूरतेची परंपरा अबाधित राखली. त्यांचे आजोबा अमेरिकेतील पहिले अब्जाधीश म्हणून गणले जातात.
- लहानपणापासून त्यांना मिळणाऱ्या खर्चाच्या पैशातून काही हिस्सा समाजकार्यासाठी राखून ठेवण्याचे त्यांच्यावर संस्कार झाले होते.
- २०१५साली १००वा वाढदिवस साजरा करताना त्यांनी अमेरिकेतील मेन या राज्याला राष्ट्रीय उद्यानाजवळील १००० एकर जमीन दान केली होती.
- न्यूयॉर्क शहर आणि जगभरातील अनेक संस्था व प्रकल्पांना त्यांनी मुक्त हस्ताने मदत केली होती. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांना त्यांनी सल्ला दिला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
- हार्वर्ड विद्यापीठातून ते १९३६ साली पदवीधर झाले आणि १९४०साली शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लष्करी सेवाही बजावली.
- त्यानंतर चेस बँकेत रुजू होऊन यथावकाश अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत पोहोचले.
- दक्षिण आफ्रिकेच्या तत्कालीन वर्णद्वेषी राजवटीशी व्यावसायिक संबंध आणि १९७९च्या इस्लामी क्रांतीनंतर पदच्यूत झालेल्या इराणच्या शाह यांना अमेरिकेत वैद्यकीय उपचारांसाठी केलेली मदत यामुळे ते वादात सापडले.
- आपल्या हयातीत त्यांनी १०० देशांच्या २००हून अधिक प्रमुखांच्या भेटी घेतल्या होत्या.
रविंद्र जडेजाने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम स्थानी
- भारतीय संघाचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले. तर अवघ्या सात गुणांच्या फरकाने अश्विनला क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे.
- रांची कसोटीपूर्वी अश्विन आणि जडेजा क्रमवारीत सामाईकरित्या अव्वल स्थानी होते. पण रांची कसोटीत जडेजा अश्विनपेक्षा वरचढ ठरला आणि त्यामुळे त्याला प्रथम स्थान मिळाले.
- फलंदाजांच्या बाबतीत भारताच्या चेतेश्वर पुजाराने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९४१ गुणांसह प्रथम स्थानावर आहे.
- तर पुजाराने ८६१ गुण मिळवत इंग्लंडचा जो रुट (८४८) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (८२६) यांना मागे टाकले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा