चालू घडामोडी : २५ मार्च

मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडणे अनिवार्य

  • दूरसंचार मंत्रालयाने सर्व मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांना आपल्या ग्राहकांचे सर्व मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडण्याचे आदेश दिले आहेत.
  • यामुळे आधारकार्डवर आधारित नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रियेद्वारे मोबाइल नंबर आधार सोबत जोडावे लागणार आहेत.
  • ज्या ग्राहकांनी आधार कार्ड देऊनच मोबाइल नंबर घेतले त्यांची पुन्हा तपासणी होणार आहे. ही प्रक्रिया ६ फेब्रुवारी २०१८पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
  • यामुळे आता प्रिपेड आणि पोस्टपेडच्या ग्राहकांना आधारकार्डासोबत आपले नंबर जोडणे बंधनकारक राहणार आहे.
  • भारतामध्ये एकूण १.१ अब्ज मोबाइल ग्राहक आहेत. त्यामुळे या प्रक्रियेसाठी टेलिकॉम कंपन्यांना सुमारे १,००० कोटी खर्च येईल असा अंदाज आहे.
  • मोबाइल क्रमांक आधारला जोडण्याच्या प्रक्रियेची माहिती देशभरात प्रसारित करण्यासाठी सरकार जाहिरातींची मदत घेणार आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून सरकारने सर्व सरकारी योजनांच्या लाभासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमचे नंतर होणार

  • केंद्र सरकारने सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमचे (सीबीईसी) नामांतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड (सीबीआयसी) असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • अप्रत्यक्ष करांची नवी व्यवस्था वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी देशात १ जुलैपासून केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी करून याबद्दल माहिती दिली. कायदेशीर मंजुरीनंतर ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण होईल.

ढाक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर इसिसकडून हल्ला

  • बांगलादेशची राजधानी ढाका येथील हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ मार्च रोजी एका आत्मघातकी बाँबरने स्वत:ला उडवून दिले.
  • या इसमाने पोलीस चौकीसमोर बाँबचा स्फोट केला व स्वत:ला उडवून दिले. या स्फोटात इतर कुणी इसम जखमी झाला नाही. 
  • इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
  • या हल्लेखोराचा उद्देश पोलीस चौकीवर हल्ला करण्याचा होता, मात्र विमानतळावरील कडक बंदोबस्तामुळे त्याला त्यापूर्वीच आत्महत्या करणे भाग पडले.
  • या विमानतळापासून जवळच असलेल्या बांगलादेशच्या रॅपिड अॅक्शन बटालियनच्या शिबिरावर १७ मार्च रोजी अशाच प्रकारचा हल्ला झाला होता.
  • त्यानंतर बांगलादेशच्या सिलहेत प्रांतातील एका पाचमजली इमारतीमध्ये दडून बसलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांवर बांगलादेश लष्कराच्या कमांडोंनी ‘ऑपरेशन ट्विलाइट’अंतर्गत आक्रमण केले होते.
  • दहशतवाद्यांनी या इमारतीमधील तीन फ्लॅटचा ताबा घेतला आहे. या इमारतीमध्ये अजूनही अनेक नागरिक अडकून पडले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा