चालू घडामोडी : २४ मार्च

मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकार सकारात्मक

  • बँकांकडून नऊ हजार कोटींचे घेतलेले कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकारने परवानगी दिली आहे.
  • ब्रिटनच्या स्थानिक न्यायालयाने मल्ल्याविरोधात वॉरंट काढण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
  • फेब्रुवारी २०१७मध्ये केंद्र सरकारने भारतातून पलायन केलेल्या मल्ल्याला भारताच्या हवाली करावे अशी विनंती ब्रिटन सरकारला केली होती.
  • त्यावर ब्रिटिश सरकारने सकारात्मक पावले उचलत मल्ल्याच्या प्रत्यार्पणास परवानगी दिली आहे.
  • विजय मल्ल्याला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह १७ बॅंकांनी कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज असे बॅंकांचे ९,००० कोटी रुपये बुडवून त्याने २०१६मध्ये ब्रिटनमध्ये पळ काढला होता.

अंकुर मित्तलला विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

  • अंकुर मित्तलने मेक्सिको आयएसएसएफ शॉटगन विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात कारकिर्दीतील पहिले विश्वकरंडक सुवर्णपदक जिंकले.
  • अंकुरने अंतिम फेरीत आपला ऑस्ट्रेलियाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी जेम्स विलेटला मागे टाकून विलेटच्याच जागतिक विक्रमाशी बरोबरी केली.
  • नुकत्याच दिल्लीत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अंकुरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, तर जेम्सने सुवर्णपदक मिळवले होते.
  • त्यावेळी जेम्सने ७५ गुणांची कमाई करून जागतिक विक्रम रचला होता. तर अंकुरने ७४ गुणांची कमाई केली होती.
  • मेक्सिकोमध्ये अंकुरने ७५ गुणांची कमाई करून अव्वल क्रमांक मिळवला. जेम्स ७३ गुणांसह दुसऱ्या, तर चीनचा यिंग क्वी ५२ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला.
  • नेमबाजीतील बदलानुसार ऑलिंपिकमध्ये डबल ट्रॅप स्पर्धेऐवजी ट्रॅपची मिश्र दुहेरी स्पर्धा होणार आहे. या निर्णयास जागतिक संघटनेने मान्यता दिली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मंजुरी बाकी आहे.

शशांक मनोहर आयसीसी अध्यक्षपदी कायम

  • शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत, पुढील अध्यक्ष निवडला जाईपर्यंत या पदावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आयसीसीमधील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत हे पद सांभाळण्याची विनंती केल्यामुळे मनोहर यांनी राजीनामा तूर्तास मागे घेतला आहे.
  • आयसीसीची वार्षिक परिषद एप्रिलमध्ये होत असून, त्यात नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
  • त्याचप्रमाणे प्रशासन आणि आर्थिक पुनर्रचनेतील बदल जोवर पूर्णत्वास येत नाहीत तोवर अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी विनंती आयसीसीने मनोहर यांना केली होती. 
  • शशांक मनोहर यांची मे २०१६मध्ये दोन वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.
  • परंतु मनोहर यांनी १५ मार्च रोजी वैयक्तिक कारण पुढे करत आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा