स्टीफन मॅकाफ्री यांचा स्टॉकहोम वॉटर प्राइझने सन्मान
जगातील नागरिकांना ‘पाण्याचा हक्क’ मिळवून देणारे अमेरिकी प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय पाणीवाटप कायद्याचे तज्ज्ञ स्टीफन मॅकाफ्री यांना यावर्षीचे स्टॉकहोम वॉटर प्राइझ जाहीर झाले.
जलसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या स्टीफन मॅकाफ्री यांच्या प्रयत्नांमुळे पाणी मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, याला संयुक्त राष्ट्रांनी २०१०साली मानवी अधिकार म्हणून मान्यता दिली.
तसेच पाणी वाटपाविषयीचा १९९७ सालचा आंतरराष्ट्रीय कायदाही संमत करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
सॅक्रेमॅन्टो (कॅलिफोर्निया) येथील पॅसिफिक विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक असलेले प्रा. मॅकाफ्री संयुक्त राष्ट्रांसाठी गेली ३५ वर्षे काम करतात.
संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कायदेविषयक आयोगावर त्यांनी १९८२ ते १९९१ या कालावधीत काम केले. याच आयोगाच्या १९८७मधील अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते.
आधी पाण्याबद्दलचे आंतरराष्ट्रीय कायदे हे केवळ जलवाहतुकीपुरते असल्यामुळे १९८५साली प्रत्यक्ष पाणीवापरासंबंधीचे आंतरराष्ट्रीय कायदे करण्यासाठी त्यांना ‘खास संवादक’ म्हणून नेमण्यात आले.
जगभरच्या अनेक पाणी-प्रश्नांचा अदमास घेऊन त्यांनी १९९१मध्ये जो मसुदा बनवला, तो पाणी-तंटे सोडवणुकीचा आणि हे संघर्ष होऊच नयेत यासाठी सर्वमान्य नियम घालून देणारा पहिला जागतिक मसुदा होता.
मॅकाफ्री यांनी जगातील अनेक पाणी तंट्यांमध्ये मध्यस्थ व सल्लागाराची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. नाईल नदीच्या पाणीवाटपाचा करार यशस्वी होण्यातही त्यांचे योगदान मोठे आहे.
अर्जेटिना-उरुग्वे, भारत-पाकिस्तान, इस्रायल-पॅलेस्टाइन आणि स्लोव्हाकिया-हंगेरी यांच्या पाणी तंटय़ांमध्ये त्यांची कामगिरी महत्त्वाची आहे.
त्यांची अनेक पुस्तके व लेख म्हणजे जलसंवर्धन या विषयावरचे संदर्भ साहित्य बनले आहे. त्यातही ‘द लॉ ऑफ इंटरनॅशनल वॉटरकोर्सेस’ (२००७) हा जगन्मान्यता मिळवलेला ग्रंथ आहे.
पाणी जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी दिला जाणारा ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाला आहे.
२०१५मध्ये भारताचे ‘वॉटर मॅन’ म्हणून ओळखले जाणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
मानसोपचारांसंबंधीचा नवा कायदा मंजूर
मानसोपचारांसंबंधीचा नवा कायदा २७ मार्च रोजी संसदेने मंजूर केल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणे हा यापुढे फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही.
या कायद्यानुसार मनोरुग्ण लहान मुलांना उपचार म्हणून विजेचे शॉक देण्यासही पूर्ण मज्जाव असेल. हे विधेयक ऑगस्टमध्ये राज्यसभेने मंजूर केले होते.
आत्महत्येचा प्रयत्न करणे या गुन्ह्याची भारतीय दंड विधानापासून फारकत करणे ही या विधेयकातील महत्त्वाची तरतूद आहे.
ही कृती व्यक्ती पराकोटीच्या मानसिक उद्वेगापोटी करत असल्याने तो फौजदारी गुन्हा न मानता मानसिक असंतुलन मानले जाईल व त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येतील.
वयाने लहान असलेल्या मनोरुग्णांना विजेचे शॉक अजिबात न देणे व प्रौढांनाही भूल देऊन व स्नायू शिथिल होणारे औषध देऊन मगच हा उपचार करण्याचे बंधन नव्या कायद्यात आहे.
व्यक्तीचे मानसिक संतुलन ठीक नसले तरी त्याच्या मूलभूत मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही व अप्रतिष्ठा होणार नाही, अशा पद्धतीने त्याच्यावर मानसोपचार करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
भविष्यात आपल्याला मानसिक आजार झाल्यास आपल्यावर असे उपचार करायचे व त्याची व्यवस्था कोणी करायची हे आधीपासून ठरविण्याचा हक्क प्रत्येक नागरिकास असेल.
मनोरुग्ण व्यक्तीस इस्पितळांत न डांबता घरी आणि समाजात राहूनच त्याचे मानसिक आरोग्य ठाकठीक करण्यावरही कायद्यात भर आहे.
तुपेलेव १२४ एम विमानांचा ताफा नौदलातून निवृत्त
शत्रूच्या पाणबुड्यांवर अखंड नजर ठेवून भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या सोविएत बनावटीच्या ‘तुपेलेव १२४ एम’ विमानांचा ताफा २९ वर्षांच्या गौरवपूर्ण सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे.
पूर्वीच्या सोविएत संघाकडून घेतलेली ही लांब पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने सन १९८८मध्ये गोव्यात दाभोळी येथे सर्वप्रथम नौदलात दाखल झाली.
जगभर नावाजलेल्या या विमानांनी तेव्हापासून नौदलाच्या प्रत्येक कारवाईत व युद्धसरावात आपली मातब्बरी दाखवून दिली.
टप्प्याटप्प्याने एकूण आठ तुपोलेव विमाने नौदलात दाखल झाली. सध्या त्यापैकी फक्त तीन प्रत्यक्ष सेवेत होती.
तमिळनाडूतील ‘आयएनएस राजली’ हा या विमानांच्या ताफ्याचा सन १९९२ पासून स्थायी तळ आहे.
‘टीयू १४२ एम’ विमानांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळात एकूण ३० हजार तासांची विनाअपघात उड्डाणे केली.
जुनी झाली असली तरी ही विमाने सुस्थितीत आहेत व काही दिवसांपूर्वी ‘ट्रॉपेक्स २०१७’ या नौदल युद्धसरावातही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती.
‘तुपोलेव’ विमाने निवृत्त झाल्यावर त्यांची जागा बोर्इंगच्या ‘पी ८१’ जातीच्या १२ सागरी टेहळणी विमानांचा ताफा घेईल.
ही नवी विमाने युद्धनौकाविरोधी ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, हलक्या वजनाचे पाणसुरुंग, अग्निबाण तसेच अतिप्रगत राडार व सेन्सॉरनी सुसज्ज आहेत.
ज्येष्ठ वकील टी आर अंध्यारुजिना यांचे निधन
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी आर) अंध्यारुजिना यांचे २८ मार्च रोजी वयाच्या ८३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात सन १९९६ ते १९९८ पर्यंत अंध्यारुजिना भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्याआधी सन १९९३ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल होते.
अंध्यारुजिना यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून सर चार्लस सार्जंट शिष्यवृत्ती व विष्णू धुरंधर सुवर्णपदकासह कायद्याची पदवी प्राप्त केली.
यानंतर लगेचच त्यांनी अ. भा. सेवा परीक्षा दिली व त्यात उत्तीर्ण झाल्याने त्यांची भारतीय विदेश सेवेसाठी निवड झाली. परंतु त्यांनी वकिलीच करण्याचे ठरविले.
सुमारे ६० वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी खास करून सर्वोच्च न्यायालयात किचकट घटनात्म मुद्दे असलेली असंख्य प्रकरणे हाताळली.
अंध्यारुजिना मृत्यूदंडाची शिक्षा कायद्यातून कायमची रद्द करण्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.
त्यांनी अनेक महत्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले व त्यांच्याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार आताचा ‘सरफासी’ कायदा केला गेला.
अंध्यारुजिना यांनी अनेक पुस्तकांखेरीज कायदा आणि न्यायालये या विषयांवर वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून विपूल लेखन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा