अटारी येथे देशातील सर्वांत उंच झेंड्याचे ध्वजारोहण
भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी येथे ५ मार्च रोजी ३६० फूट उंचीवर भारताचा तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला असून, हा झेंडा लाहोरमधून दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
देशातील सर्वांत उंचीवरील असलेल्या या झेंड्याला फ्लॅगमास्ट असे नाव देण्यात आले असून, पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी याचे उद्घाटन केले.
५५ टन वजन असलेल्या पोलवर हा झेंडा फडकाविण्यात आला आहे. हा तिरंगा १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढा मोठ्या आकाराचा आहे.
अमृतसर सुधार प्रन्यास प्राधिकरणाचा हा प्रकल्प आहे. यापूर्वी रांचीमध्ये २९३ फूट उंचीवर भारतीय झेंडा फडकाविण्यात आला होता.
हा झेंडा उभारण्यासाठी ३.५ कोटी रुपये खर्च आला असून, भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलओसी) २०० मीटर आतमध्ये भारतीय हद्दीत हा झेंडा आहे.
पाकिस्तानकडून या झेंड्याबाबत तक्रार केली आहे. हेरगिरीचा हा प्रकार असल्याचे पाकिस्तानकडून म्हणण्यात आले आहे.
जगातील पहिल्या पॉवरबोट शर्यतीत कोलमन जोडी विजयी
मुंबईत आणि जगातही प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘नेक्सा पी १ पॉवरबोट इंडियन ग्रां प्रि ऑफ द सीज’ ही शर्यत बॅलेनो आरएस बूस्टर जेट्स संघाच्या सॅम आणि डेसी या कोलमन भाऊबहिण जोडीने जिंकली.
पहिल्या दोन शर्यतींवर राखलेले वर्चस्व अंतिम फेरीतही कायम राखून त्यांनी या शर्यतीत जेतेपदावर कब्जा केला.
सॅम आणि डेसीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच बूस्टर जेट्सने स्पर्धेत ८९ गुणांसह सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली.
त्यामुळे बुस्टरजेट्स संघाला या शर्यतीचा ‘विराट चषक’ देऊन गौरविण्यात आले. हा चषक ‘आयएनएस विराट’च्या इंजिनाला असलेल्या पंख्याच्या पात्यापासून बनवण्यात आला आहे.
लॉयड डॉल्फिन संघाने ८७ गुणांसह उपविजेतेपद पटकावले, तर मनी ऑन मोबाईल मर्लिन्स संघाला ७९ गुणांसह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
भारतीय ड्रायव्हर सीएस संतोष याचा समावेश या विजयी संघात होता. तर स्पर्धेतील अन्य भारतीय ड्रायव्हर असलेल्या गौरव गिलचा अल्ट्रा शार्क संघ ६४ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.
देशातील निम्म्यापेक्षा अधिक बालके अशक्त
देशातील पाच वर्षांपेक्षा कमी वयाची निम्म्यापेक्षा अधिक बालके अशक्त (अॅनीमिक) असल्याची चिंताजनक माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे.
या सर्व मुलांमध्ये रक्ताची कमतरता, थकवा, सतत आजारी पडणे अशी लक्षणे दिसत असून या सर्वांचा मेंदूच्या विकासावर परिणाम होत आहे.
२०१५-१६ या कालावधीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात सहा लाख कुटुंबांचा आढावा घेण्यात आला.
देशातील बेरोजगारीचा दरमध्ये लक्षणीय घट
केंद्र सरकारने रोजगारवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट २०१६च्या ९.५ टक्क्यांवरून कमी होत फेब्रुवारी २०१७मध्ये ४.८ टक्क्यांवर आला आहे.
‘एसबीआय इकोफ्लॅश’ अहवालानुसार, देशातील सर्वात जास्त बेरोजगारी उत्तर प्रदेशमध्ये कमी झाली आहे.
ऑगस्ट २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारीचा दर १७.१ टक्क्यांवरून कमी होत २.९ टक्के झाला आहे.
मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांवरून २.७ टक्के, झारखंडमध्ये ९.५ टक्क्यांवरून ३.१ टक्के, ओडिशामध्ये १०.२ टक्क्यांवरून २.९ टक्के आणि बिहारमध्ये १३ वरून ३.७ टक्क्यांवर आला आहे.
केंद्र सरकारने मागील वर्षांत रोजगारवाढीसाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केल्यामुळे रोजगारवाढ झाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागामध्ये नव्याने रोजगार देण्यात आले आहेत. मनरेगामध्ये रोजगार वाढल्यामुळे बेकारीत घट दिसून येत आहे.
ऑक्टोबर २०१६मध्ये देण्यात आलेले रोजगार ८३ लाख होते. आता फेब्रुवारी २०१७ मध्ये यात मोठी वाढ होत ही संख्या १६७ लाख झाली आहे.
मनरेगामध्ये कामांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. ती २०१६-१७ मध्ये ३६ लाखांवरून ५०.५ लाखांवर पोहोचली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आर्थिक वर्ष २०१८मध्ये मनरेगा योजनेसाठी ४८ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
रोजगारांमध्ये झालेली वाढ योग्य असून, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये याचा मोठा हातभार लागणार आहे.
ऋचा पुजारीला वुमेन इंटरनॅशनल मास्टर किताब
रशियातील बुद्धीबळ स्पर्धेत एकापेक्षा एक ग्रँडमास्टरना पराभूत करत कोल्हापूरच्या ऋचा पुजारी हिने वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला.
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ऋचाने ९ पैकी ३.५ गुणांची कमाई करून किताबासाठीचे पात्रता पूर्ण केली.
वुमेन इंटरनॅशनल मास्टर या किताबासाठी अशा तीन स्पर्धांमध्ये ठसा उमटवणे गरजेचे असते.
ऋचाने यापूर्वी फिलिपिन्स (२०११) आणि उझबेकिस्तान (२०१२) येथील स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध केली होती. पण, त्यानंतरच्या काही स्पर्धांमध्ये तिला अपयश येत होते.
या अपयशाची कसर ऋचाने मॉस्कोमध्ये भरून काढत वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताबावर नाव कोरले.
सुनीत जाधव भारत श्री स्पर्धेत विजेता
महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने सलग दुसऱ्यांदा ‘भारत श्री’ शरीरसौष्ठव ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ जेतेपदाचा चषक उंचावला.
सुनीतने फेब्रुवारी २०१७मध्ये सलग चौथ्यांदा ‘महाराष्ट्र श्री’वरही कब्जा केला होता.
महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत मणिपूरच्या सरिता थिंगबजम सलग दुसऱ्यांदा ‘मिस इंडिया’चा बहुमान पटकावला, तर फिजिक स्पोर्टस् प्रकारात संजना आणि सुमित बॅनर्जीने यश मिळवले.
रेल्वेच्या खेळाडूंनी सांघिक गटात जेतेपद पटकावले. त्यांनी ८५ गुण मिळवीत सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली.
महाराष्ट्राने दोन सुवर्णासह दोन रौप्य जिंकले आणि सेना दलाने २ सुवर्ण आणि ४ कांस्य जिंकत ४५ गुण मिळवले.
अँडी मरेला दुबई टेनिस स्पर्धेचे जेतेपद
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अँडी मरेने दुबई टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह कारकीर्दीतील हे ४५वे जेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या २५ वर्षांच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा मरे इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. अंतिम लढतीत त्याने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोवर ६-३, ६-२ अशी मात केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा