वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या मसुद्याला देशातील सर्व राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी एकमताने मंजुरी दिली आहे. १ जुलैपासून हा कायदा लागू करण्यास सर्व राज्ये तयार आहेत.
जीएसटी सोबतच सीजीएसटी, आयजीएसटी आणि एसजीएसटीच्या मसुद्यालाही मान्यता देण्यात आली आहे. १ जुलैपासून पूर्ण देशामध्ये या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे.
परराष्ट्र प्रवक्तेपदी गोपाल बागले
पाकिस्तानच्या राजनीतीमध्ये हातखंडा असलेले गोपाल बागले यांची नियुक्ती परराष्ट्र प्रवक्तेपदावर करण्यात आली आहे.
ते विकास स्वरूप यांची जागा घेतील. स्वरूप यांची नेमणूक कॅनडात उच्चायुक्त पदावर झाली आहे.
गोपाल बागले भारतीय परराष्ट्र सेवेच्या १९९२च्या तुकडीतील अधिकारी असून त्यांनी लखनौ विद्यापीठात रसायनशास्त्रात एमएस्सी केले आहे.
१९९४ ते १९९६मध्ये ते युक्रेनमधील कीव येथे कनिष्ठ आयुक्त होते. त्यानंतर १९९६ ते १९९९ दरम्यान त्यांनी रशियातील भारतीय दूतावासात द्वितीय सचिवपदी काम केले.
१९९९ ते २००२ दरम्यान ते लंडनमध्ये उच्चायुक्तांचे सहायक होते. संयुक्त राष्ट्रातील नेमणूक हाही त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा भाग होता.
माध्यमे, माहिती व संस्कृती या विभागाचे सल्लागार म्हणून ते काम करीत होते. काठमांडूत त्यांनी २००५ ते २००८ दरम्यान काम केले.
भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क वाढावा, त्यातून गुंतवणूकही मिळावी यासाठी एक विभाग परराष्ट्र मंत्रालयात सुरू करण्याचे पायाभूत कामही त्यांनी केले आहे.
२०११ ते २०१४ या काळात ते पाकिस्तानमध्ये उपउच्चायुक्त बनले. नंतर त्यांना पाकिस्तानविषयक सहसचिव हे पुढचे पद मिळाले. त्यांच्यावर पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराण या देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांशी समन्वय साधण्याचे काम होते.
बागले यांनी तीन वर्षे पाकिस्तानात उपउच्चायुक्त म्हणून काम केलेले असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा भारताला राजनैतिक पातळीवर होणार आहे.
माध्यान्ह भोजनासाठी आधार कार्ड बंधनकारक
सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात यावे, असे परिपत्रक मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केले आहे.
त्यामुळे सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यांचे आधार कार्ड ३० जूनपर्यंत बनवावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत आधार कार्ड मिळाले नाही तर आधार नोंदणीची पावती शाळेत दाखवावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला माध्यान्ह भोजन मिळेल.
केंद्र सरकारद्वारा मिळणाऱ्या सर्व सरकारी सुविधांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे, त्याचाच हा एक भाग आहे.
देशात माध्यान्ह भोजन योजनेद्वारे १२ लाख शाळांमधील १२ कोटी मुलांना भोजन दिले जाते.
अंगद वीरसिंग बाजवाला कांस्यपदक
भारतातील दिल्ली येथे आयोजित पहिल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अंगद वीरसिंग बाजवाने मिश्र स्कीट स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.
मात्र हा प्रकार प्रायोगिक तत्वावर खेळवला गेला असल्याने आणि या प्रकाराला अजून मान्यता नसल्यामुळे या पदकाची अधिकृत नोंद झाली नाही.
या स्पर्धेत अंगद हा अमेरिकेच्या हॅली दुन हिच्यासह सहभागी झाला होता. त्यांनी ब्राँझपदकाच्या लढतीत रॉबर्ट जॉन्सन आणि कॅटलिन कॉनर यांना पराजित केले.
भारताचे मिश्र प्रकारातील हे दुसरे पदक ठरले. जितू राय आणि हीना सिंधूने या प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.
माजी खासदार सय्यद शहाबुद्दीन यांचे निधन
भारताच्या परराष्ट्र खात्यातील माजी अधिकारी आणि माजी खासदार सय्यद शहाबुद्दीन यांचे ४ मार्च रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
बाबरी मस्जिद प्रकरणातील ते महत्त्वाचे पक्षकार होते. शहाबानो प्रकरणात त्यांनी न्यायालयात ठामपणे मुस्लिमांची बाजू मांडली होती.
सय्यद शहाबुद्दीन यांचा जन्म १९३५ मध्ये झारखंडमधील रांचीमध्ये झाला होता. शिक्षणानंतर ते भारतीय परराष्ट्र सेवेत काम करत होते. अनेक देशांमध्ये त्यांनी भारताचे उच्चायुक्त म्हणून कामही केले.
परराष्ट्र खात्यात काम केल्यावर ते राजकारणात आले. १९७९ ते १९९६ या कालावधीत ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले.
बाबरी मस्जिद पाडल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला होता. या प्रकरणात ते पक्षकार होते. तसेच बाबरी कृती समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले होते.
शहाबानो या गाजलेल्या प्रकरणात त्यांनी ठामपणे मुस्लिमांची बाजू मांडली होती. १९८९ मध्ये शहाबुद्दीन यांनी इन्साफ पार्टी या राजकीय पक्षाची स्थापनाही केली होती.
२००४ आणि २००७ मध्ये ऑल इंडिया मुस्लिम मजलिस ए मुशावरतचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय अनेक मुस्लिम संघटनांमध्येही ते सक्रीय होते.
मुंबईमध्ये आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठे नवसंकल्पना केंद्र
विविध औद्योगिक वापराच्या विशेष रसायनांच्या निर्मितीतील बीएएसएफ समूहाने मुंबईमध्ये आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठे ‘नवसंकल्पना केंद्र’ सुरु केले.
हे नवसंकल्पना केंद्र बीएएसएफचे भारतातील विद्यमान संशोधन व विकास उपक्रमांना विस्तारित करून त्यामध्ये विशेष रसायनांच्या व्यापक श्रेणीवरील जागतिक आणि प्रादेशिक संशोधनाचा समावेश करेल.
या प्रकल्पामध्ये बीएएसएफ समूहाकडून एकूण ५० दशलक्ष युरोंची (साधारण ३५५ कोटी रुपये) गुंतवणूक केली जाईल. या समूहाची दक्षिण आशियातील ही सर्वात मोठी संशोधन आणि विकासामधील गुंतवणूक असेल.
बीएएसएफच्या या संकुलामधील सर्व जागतिक संशोधनाचे काम बीएएसएफ केमिकल्स इंडिया प्रा. लि.अंतर्गत असतील. ही बीएएसएफ एसईची १०० टक्के मालकीची उपकंपनी आहे.
हे केंद्र २००५मध्ये स्थापित झाले असून २०१४पासून त्यात विस्ताराचे काम हाती घेण्यात आले. या केंद्रात संशोधन व विकास कार्यासाठी ३०० शास्त्रज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.
या केंद्रात शास्त्रज्ञांसाठी निवास, तांत्रिक प्रयोगशाळा, आधुनिक कार्यालये, पूर्ण क्षमतेचे परिषद सभागृह, कॅफेटेरिया आणि कर्मचाऱ्यांसाठी सुविधांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा