मुळचे कोल्हापूरचे निवृत्त एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
हवाई दलात विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या भोसले यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या आयोगात होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ८ जून १९७८ रोजी त्यांची हवाई दलाच्या उड्डाण (दिशादर्शन) शाखेत नेमणूक झाली.
डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे पदवीधर असणाऱ्या भोसले यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून एम एस्सी तर कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमधून व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
सेवा काळात त्यांनी जपानमधील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट अॅण्ड नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्समधून एमफिलची पदवी मिळविली आहे.
हवाई दलातील ३९ वर्षांच्या सेवाकाळात आघाडीवरील तळ आणि कार्यालयीन व्यवस्थेतील विविध पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
हवाई मोहिमांमध्ये सहभाग, भरतीपूर्व लष्करी प्रशिक्षण आणि शिक्षण, हेरगिरी रोखणे, प्रशिक्षण संस्थांची क्षमतावाढ, लष्करी सायबर सुरक्षितता व हवाई उड्डाणातील सुरक्षितता अशा नानाविध विषयांवर त्यांनी काम केले आहे.
पुण्याच्या हवाई दल केंद्राचे मुख्य व्यवस्थापक, नवी दिल्लीच्या हवाई दलाच्या मुख्यालयात गुप्तचर विभागाच्या प्रमुख व्यवस्थापकाची धुरा त्यांनी सांभाळली.
तब्बल पाच हजार २०० तास उड्डाणाचा अनुभव असणारे भोसले प्रथम श्रेणीतील प्रमाणित दिशादर्शन प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारने २००५मध्ये विशिष्ट सेवा पदकाने तर २०१०मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने भोसले यांना सन्मानित केले आहे.
गजेंद्र चौहान यांची एफटीआयआय अध्यक्षपदाची कारकीर्द समाप्त
पुणे येथील भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची वादग्रस्त १९ महिन्यांची कारकिर्द ३ फेब्रुवारी पूर्ण झाली.
विद्यार्थ्याच्या आंदोलनामुळे चौहान यांच्या नियुक्तीचे प्रकरण देशभर गाजले होते. त्यांच्या नियुक्तीविरुद्ध केंद्र सरकारलाही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
त्यामुळे एफटीआयआय अध्यक्षपदासाठी चौहान यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, लवकरच नव्या मंडळाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
चौहान यांची एफटीआयआय अध्यक्षपदी नियुक्ती ९ जून २०१५ रोजी ३ वर्षांच्या कालावधीसाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे ४ मार्च २०१४पासून होती.
तांत्रिकदृष्टय़ा चौहानांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळाला असला तरी प्रत्यक्षात त्यांना फक्त तेरा महिन्यांसाठीच संस्थेचे अध्यक्षपद भूषविता आले.
ज्या एफटीआयआयचे अध्यक्षपद श्याम बेनेगल, अदूर गोपाळकृष्णन, यू.आर. अनंतमूर्ती यासारख्या दिग्गजांनी भूषविले होते, त्यांच्या जागी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी असलेल्या संबंधांमुळे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याचा विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने आरोप होता.
त्याची परिणती प्रदीर्घ आंदोलनात झाली. दिल्लीतही त्याचे पडसाद उमटले. संसदेमध्ये गदारोळ झाला. आक्रमक विद्यार्थ्यांनी संस्थेला वेठीस धरले.
या सगळ्या गोंधळात संस्था बंद पडली होती. अखेपर्यंत केंद्र सरकार बधले नाही. शेवटी कंटाळून विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०१५मध्ये संप मागे घेतला होता.
एफटीआयआयमध्ये गेल्या ५५ वर्षांत ३९वेळा विद्यार्थ्यांनी नानाविध कारणांवरून केलेल्या संपांमुळे केंद्र सरकार त्रस्त आहे. त्यामुळे चौहानांना मुदतवाढ देऊन पुन्हा एकदा टीका ओढवून घेण्याचे टाळले.
अतिश्रीमंत लोकसंख्येच्या यादीत मुंबई २१वी
नाईट फ्रँक या कंपनीने जाहीर केलेल्या ‘संपत्ती अहवाल २०१७’नुसार वाढत्या अतिश्रीमंत लोकसंख्येच्या यादीत मुंबई शहराला २१वे स्थान मिळाले आहे.
वाढत्या संपत्तीबाबत भविष्यातील आशास्थान म्हणून जगातील ४० महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक ११ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
८९ देशांतील सुमारे १२५ शहरांबाबत निरीक्षण करून जागतिक पातळीवरील मालमत्ता क्षेत्रातील हा अहवाल कंपनीने जाहीर केला आहे.
सर्वात महागडी मोक्याची निवासी मालमत्ता खरेदी करण्यामध्ये इस्तनाबूल, मेलबोर्न, दुबईपेक्षाही मुंबईचा क्रमांक वरचा आहे.
श्रीमंत भारतीयांकडून येत्या दोन वर्षांत निवासी मालमत्तांमध्ये ४० टक्के तर परदेशातील मालमत्तांमध्ये २५ टक्के गुंतवणूकही केली जाण्याची शक्यता असल्याचेही या अहवालात नमूद आहे.
२०५०पर्यंत भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश होणार
अमेरिकन थिंक टॅंक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत असून, २०५०मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल.
प्यू रिसर्च सेंटरने जगभरातील लोकसंख्येवर आधारीत अहवाल तयार केला असून, त्यानुसार जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या लोकसंख्येनंतर मुस्लिमांच्या लोकसंख्येचा क्रमांक आहे.
जगातील अन्य धर्मीयांपेक्षा मुस्लिम धर्म वेगाने वाढत असून, यामुळे सन २०५०मध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असणार आहे.
२०१०च्या आकडेवारीनुसार जगातील लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्माची लोकसंख्या २३ टक्के (११६ कोटी) आहे. २०५०पर्यंत यात ७३ टक्क्यांनी वाढ होऊन ती २८० कोटी होईल असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
इंडोनेशियामध्ये सध्या सर्वाधिक मुस्लिम नागरिक आहेत. तसेच भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण व तुर्कीमध्येही मुस्लिमांची संख्या जास्त आहे.
२०५०पर्यंत भारत इंडोनेशियाला मागे टाकेल आणि भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या ३० कोटी होईल, असेही प्यू रिसर्च सेंटरने म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा