भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी ऑस्ट्रियातील विशेष जागतिक हिवाळी ऑलिम्पिकमध्ये ७३ पदकांची कमाई केली आहे.
१०५ देशांच्या सुमारे २,६०० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ३७ सुवर्णपदके जिंकली.
दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात येणारी जागतिक हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा १८ ते २४ मार्च दरम्यान ऑस्ट्रियामध्ये संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये अल्पाईन स्कीईंग, स्नो बोर्डिंग, स्नो शुईंग, फिगर स्केटिंग, स्पीड स्केटिंग, फ्लोर हॉकी या खेळांचा समावेश होता.
यामध्ये भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत ३७ सुवर्ण पदकांसह १० रौप्य आणि २६ कांस्य पदकांची कमाई केली.
भारताने अल्पाईन स्कीईंगमध्ये १० पदकांची कमाई केली. तर स्नो बोर्डिंगमध्ये भारतीय संघाने ८ पदके पटकावली.
भारतीय पुरुषांनी युनिफाईड फ्लोअरबॉलमध्ये नायजेरियाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.
तर फ्लोअर हॉकीमध्ये भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रियाचा ८-० असा धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील पदकांची संख्या ७३ वर नेली.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठीही आधार अनिवार्य
वाहतूक विभागाने ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) मिळवण्यासाठी किंवा त्याच्या नूतनीकरणासाठी आधारकार्ड अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे.
आधारकार्ड नसल्यास नोंदणी करावी आणि तो क्रमांक वाहतूक विभागाला द्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने माध्यान्ह भोजन, नवीन गॅस कनेक्शन इत्यादी विविध सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केले होते.
तसेच काही दिवसांपूर्वीच मोबाइल नंबर आधारकार्डासोबत जोडून घ्यावेत असे आदेश टेलीकॉम कंपन्यांना देण्यात आले आहेत.
यापुढे सरकारने दिलेल्या सवलतीचा किंवा सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड अनिवार्य असेल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
परंतु, आधारकार्ड नसेल तरीही कुणीकोणत्याही सेवेपासून वंचित राहणार नाही. आधारकार्ड नोंदणी केली असेल तर त्या पावतीच्या आधारेही सर्व सेवांचा लाभ मिळेल असे सरकारने म्हटले आहे.
तामिळ भाषेतील प्रभावी साहित्यिक अशोकमित्रन यांचे निधन
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तामिळ भाषेतील प्रभावी साहित्यिक अशोकमित्रन यांचे २३ मार्च रोजी चेन्नईमध्ये निधन झाले.
१९३१मध्ये सिकंदराबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव त्यागराजन होते. पण नंतर त्यांनी १९५२मध्ये ‘अशोकमित्रन’ हे टोपणनाव धारण केले.
उपहासगर्भ अशी त्यांची लेखनशैली असल्याने ‘अनबिन पारिसू’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाची बरीच चर्चा झाली.
साधी पण टोकदार शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़, त्यातूनच त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला अस्वस्थ केले.
चेन्नईला आल्यानंतर त्यांनी १० वर्षे जेमिनी स्टुडिओत काम केले. त्यांच्या ‘माय इयर्स विथ बॉस’ या पुस्तकात त्यांनी जेमिनी स्टुडिओतील अनुभव कथन केले आहेत.
थानीर, अपाविन स्नेगीधर, १८ अवधू अटचाकोडू (दी एटिंथ पॅरलल), द घोस्ट ऑफ मीनांबकम व स्टील ब्लीडिंग फ्रॉम द वुंड ही त्यांची पुस्तके संस्मरणीय ठरली.
१९९८मध्ये त्यांनी एका ऑनलाइन नियतकालिकासाठी चेन्नईवर माहितीपूर्ण लेखन केले. त्यावर नंतर ‘चेन्नई सिटी- अ कॅलिडोस्कोप’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
अशोकमित्रन हे शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. याशिवाय त्यांनी ‘कनाईयाझी’ या तामिळ साहित्य नियतकालिकाचे २५ वर्षे संपादन केले.
त्यांनी ८ कादंबऱ्या व २०० लघुकथा लिहिल्या. युरोपीय भाषांत प्रचलित लघुकथेपेक्षा मोठा व कादंबरीपेक्षा लहान अशा नॉव्हेल या प्रकारातही त्यांनी १५ पुस्तके लिहिली.
‘अप्पाविन स्नेगीधर’ या लघुकथा संग्रहासाठी त्यांना १९९६मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच त्यांना १९९६मध्ये अक्षर पुरस्कार व २०१३मध्ये भारतीय भाषा परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सर्जनशील लेखनासाठी आयोवा विद्यापीठाची विद्यावृत्ती त्यांना मिळाली.
हॅवलॉक बेट चर्चेत
काही दिवसांपूर्वी भाजपाचे राज्यसभेतील खासदार एल ए गणेशन यांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे अंदमान-निकोबार द्वीपसमुहातील एक बेट चर्चेत आले आहे.
१८५७साली झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या विरोधात लढणाऱ्या ब्रिटीश लष्करी अधिकारी हेन्री हॅवलॉकचे या बेटाला दिलेले नाव लवकरात लवकर बदलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रिलायन्सला डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यावर एक वर्षाची बंदी
भांडवल बाजार नियंत्रक सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजवर शेअर बाजारात डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे.
मुकेश अंबानींच्या या कंपनीवर फ्यूचर अॅण्ड ऑप्शन्स व्यवहारात फसवणूक केल्याच्या दहा वर्ष जुन्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
यासोबतच सेबीने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सुमारे एक हजार कोटींचा दंडही ठोठावला आहे.
परंतु सेबीच्या या निर्णयाविरोधात रिलायन्स इंडस्ट्रीज सिक्युरिटीज ट्रिब्युनलकडे दाद मागणार आहे.
हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स पेट्रोलिअमशी संबंधित आहे. रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअरमध्ये डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या या कंपनीचे नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले होते.
रिलायन्ससोबतच सेबीने अन्य १२ कंपन्यांवरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेअर बाजारात एक वर्ष डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा