उत्तराखंडमध्ये भाजपच्या विजयानंतर त्रिवेंद्रसिंह रावत यांना राज्यपाल के के पॉल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. रावत हे उत्तराखंडचे ११वे मुख्यमंत्री आहेत.
त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासह ७ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर २ आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
रावत हे आरएसएस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. २०१३मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसपदी निवड करण्यात आली होती.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने त्यांना राज्याचे प्रभारी म्हणून पाठवले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमतही मिळवले.
रावत यांनी डोईवाला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या हिरासिंह यांचा २४ हजारांवर मताधिक्याने पराभव केला. २००२नंतर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
रावत हे भाजपकडून उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे पाचवे नेते आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या त्रिवेंद्रसिंह यांनी पत्रकारितेची पदविका देखील मिळवलेली आहे.
उत्तर प्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक झाली. या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला ४०पेक्षा अधिक जागा मिळाल्या नव्हत्या.
७० सदस्यीय उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर कॉंग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या आहेत.
२०००मध्ये उत्तर प्रदेशापासून वेगळे होऊन स्वतंत्र उत्तराखंड राज्य झाले त्यावेळी भाजपचे नित्यानंद स्वामी हे पहिले मुख्यमंत्री झाले.
बुलढाण्यात पहिले एकदिवसीय जिल्हा मराठी संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याच्या घटक संस्थांच्या शाखांच्या सहकार्याने जिल्ह्याजिल्ह्यांत संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार पहिले एकदिवसीय जिल्हा मराठी संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावी २६ मार्च रोजी पार पडणार आहे.
यासाठी करवंड परिसराला ‘राजमाता जिजाऊ साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड असणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन २६ मार्च रोजी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होईल. तर कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे प्रमुख अतिथी असतील.
या संमेलनात नवोदितांना भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक मार्गदर्शन समीक्षक डॉ. एस एम कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध लेखक डॉ. सदानंद देशमुख व रवींद्र इंगळे करतील.
इंद्राणी दासला ज्युनियर नोबेल पुरस्कार
भारतीय वंशाच्या इंद्राणी दास हिने विज्ञानातील ज्युनियर नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार मिळविला आहे.
अमेरिकेत रेजेनेरॉन सायन्स टॅलेंट सर्च ही गणित व विज्ञानावर आधारित स्पर्धा १९४२पासून भरवली जाते. या स्पर्धेचा पुरस्कार यंदा तीन जणांना मिळाला असून त्यात पहिला पुरस्कार इंद्राणीला मिळाला.
विज्ञानातील ज्युनियर नोबेल असे या पुरस्काराचे वर्णन केले जाते. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळालेल्यांपैकी १२ जणांना पुढे खरे नोबेल मिळाले आहे.
इंद्राणी ही न्यूजर्सी येथील बर्जन अॅकॅडमीजची विद्यार्थिनी आहे. मेंदूतील क्रियांच्या संशोधनासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
मेंदूला मार लागल्यानंतर न्यूरॉनचा ऱ्हास होऊन ते मरतात. न्यूरॉन्स वाचण्याची शक्यता कशी वाढवता येईल यावर तिचे संशोधन आहे.
अमरावतीमध्ये पाचवे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन
देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज आहेत.
संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
१९ आणि २० मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या २५ व्यक्ती तसेच १६ संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.
संमेलनाच्या शेवटच्या सत्रात संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार रेसर अश्विन सुंदरचा कार अपघातात मृत्यू
प्रसिद्ध कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा १८ मार्च रोजी झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
चेन्नईच्या संतहोम हाय रोडवर हा भीषण अपघात घडला. अश्विनच्या बीएमडब्ल्यू कारने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिल्यानंतर पेट घेतला.
अश्विन आणि निवेदीता दोघांना कारचे दरवाजे उघडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा