चालू घडामोडी : १४ मार्च
अमेरिकतील आरोग्य विमा विभागाच्या प्रमुखपदी सीमा वर्मा
- अमेरिकन प्रशासनातील सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडच्या प्रमुखपदाची धुरा भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य विमा कारभार सांभाळण्यासाठी सीमा वर्मा यांची निवड केली होती. त्यांच्या या निवडीला अमेरिकी सिनेटर्सकडून मंजूरी देण्यात आली.
- १ लाख कोटींचे बजेट असलेल्या सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडकडून अमेरिकेतील सुमारे १३ कोटी नागरिकांसाठी विमा योजना राबवली जाते.
- अमेरिकेतील आबालवृद्धांच्यादृष्टीने सेंटर फॉर मेडिकेयर आणि मेडिकेड सेवेची धोरणे अत्यंत महत्त्वाची असतात.
- वर्मा यांच्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाकडून संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी म्हणून भारतीय वंशाच्या निक्की हेली यांची नियुक्ती करण्यात आली होती.
चौरासियाला इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेचे जेतेपद
- भारताचा आघाडीचा गोल्फ खेळाडू एसएसपी चौरासिया याने सलग दुसऱ्यांदा इंडियन ओपन गोल्फ स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे.
- अशी कामगिरी करणारा चौरासिया जगातील तिसरा तर भारताचा दुसरा गोल्फ खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचा ज्योती रंधवा (२००७), जपानचा केंजी हौशिशी (१९६८) यांनी अशी कामगिरी केली आहे.
- आशियाई मालिका तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चौरासियाचे सहावे विजेतेपद ठरले. विजेतेपदासाठी त्याला १ कोटी ९४ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.
- याशिवाय ही स्पर्धा भारतीय खेळाडूने जिंकण्याची हॅटट्रिक झाली. चौरासियापूर्वी २०१५मध्ये अनिर्बन लाहिरीने ही स्पर्धा जिंकली होती.
ब्रेग्झिट विधेयक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मंजूर
- युरोपीय समुदायातून ब्रिटनने बाहेर पडण्याबाबतच्या वाटाघाटी सुरू करण्याचा मार्ग सुकर करणारे ब्रेग्झिट विधेयक कुठलेही बदल न करता ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मंजूर झाले आहे.
- हाऊस ऑफ लॉर्ड्सने या विधेयकात सुचवलेल्या सुधारणा हाऊस ऑफ कॉमन्सने ३३५ विरूद्ध २८७ मतांनी फेटाळून लावल्या.
- सरकारने ब्रेग्झिट बोलणी तीन महिन्यात सुरू करून युरोपीय समुदायातील नागरिकांचे हितरक्षण करावे, अशी सुधारणा हाऊस ऑफ लॉर्ड्सने सुचविली होती.
- आता या विधेयकास राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मान्यता दिल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
- त्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे लिस्बन करारातील कलम ५०चा वापर करून युरोपीय समुदायातून ब्रिटनला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करतील.
एनबीएफसीच्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा
- रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या (एनबीएफसी) रोख कर्ज वितरणावर मर्यादा घातली आहे.
- रिझर्व्ह बँकेने बिगर वित्तीय बँकिंग संस्थांना रोख कर्ज वितरणाची मर्यादा २५,००० रुपये केली आहे. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयेएवढी होती.
- त्यांमुळे यापुढे ग्राहकांना सोने गहाण ठेऊन कर्ज घेताना केवळ पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरुपात मिळू शकणार आहे. त्यापेक्षा जास्तीची रक्कम धनादेशमार्फतच देण्याचे निर्देश आरबीआयने जारी केले आहेत.
- केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीनंतर, सरकारकडून लोकांना रोख रकमेच्या वापरापासून परावृत्त केले जात आहे.
जगातील पहिला प्रकाशमान बेडूक अर्जेटिनात
- अंधारात प्रकाशित होणारा पहिला बेडूक अर्जेटिनात सापडला असून त्याच्यात हिरवा, पिवळा व तांबडा रंग प्रकाशित रूपात दाखवण्याची क्षमता असते, पण अंधारात तो निळा व हिरवा प्रकाश बाहेर टाकतो.
- कमी तरंगलांबीचा प्रकाश शोषून जास्त तरंगलांबीचा प्रकाश बाहेर टाकण्याच्या गुणधर्माला प्रदीप्तता म्हणतात. आतापर्यंत उभयचरांमध्ये हा गुणधर्म दिसला नव्हता.
- या बेडकाचे शास्त्रीय नाव साऊथ अमेरिकन पोलका डॉट ट्री म्हणजे हिप्सीबोअस पंकटॅटॅस असे आहे. हा बेडूक प्रदीप्त रेणूंचा वापर करत असतो, पण हे रेणू इतर प्राण्यांच्या प्रदीप्त रेणूंपेक्षा वेगळे असतात.
- महासागरातील अनेक प्राणी प्रदीप्तता दाखवतात; त्यात प्रवाळ, मासे, शार्क व हॉकबील कासव (एरेटोमोचेलीस इंब्रिकाटा) यांचा समावेश आहे.
पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफान निलंबीत
- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर संशयित सट्टेबाजाच्या संपर्कात असलेल्या कारणास्तव निलंबनाची कारवाई केली.
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कथित भ्रष्टाचारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत इरफान दोषी आढळलेला चौथा खेळाडू ठरला आहे.
- पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत सामना निश्चितीसाठी एका बुकीसोबत इरफानचे बोलणे झाले होते, असा आरोप त्याच्यावर आहे.
- स्पॉट फिक्सिंगप्रकरणी याआधी शर्जिल खान, खालीद लतीफ आणि शहाबाज हसन यांचे निलंबन करण्यात आले आहे.
- पाकिस्तान सुपर लीगच्या पहिल्या सामन्यानंतर या सर्वांनी बुकीची भेट घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा