चालू घडामोडी : २३ मार्च

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या जागी नवीन आयोग स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
  • मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, १९९३चा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कायदा रद्द होणार असल्याने ‘नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस’चे (एनसीबीसी- मागासवर्गीय जातींसाठीचा राष्ट्रीय आयोग) अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
  • त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर सोशली अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस’ (एनएसईबीसी) या आयोगाची स्थापना केली जाणार आहे.
  • देशातील ओबीसी प्रवर्गातील घटकांसाठी असलेल्या या आयोगावर एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.
  • एनएसईबीसीच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र सरकार संसदेत विधेयकातील सुधारणा प्रस्ताव मांडणार आहे.
  • एनएसईबीसी ही घटनात्मक संस्था असणार आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये नव्या जातींचा समावेश करण्यासाठी अथवा त्यातून नावे हटवण्यासाठी संसदेची परवानगी लागणार आहे.
  • सद्यस्थितीत ओबीसीमध्ये नवीन जातींचा समावेश अथवा नावे हटवण्यासंदर्भात सरकार पातळीवर निर्णय घेतला जात होता.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसंदर्भातील आयोगांना घटनात्मक दर्जा असल्यामुळे त्या यादीत फेरबदलासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असते. 
  • इतर मागासवर्गीय जातींच्या समावेशाचे अधिकार असलेल्या ‘एनसीबीसी’ला कायदेशीर दर्जा असला, तरी घटनात्मक दर्जा नव्हता.
  • इतर मागासवर्गीयांशी संबंधित तक्रारींची दखल घेण्याचा आणि त्यावर कारवाईचा अधिकारही ‘एनसीबीसी’ऐवजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे होता.

भारतीय हवाई दलाचा इस्रायलमध्ये संयुक्त युद्धाभ्यास

  • भारतीय हवाई दलाचे वैमानिक अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासह इस्रायलमध्ये संयुक्त युद्धाभ्यास करणार आहेत. 
  • हा संयुक्त युद्धाभ्यास हवाई ड्रिल इतिहासातील सर्वात मोठा आणि जटिल संयुक्त युद्धाभ्यास मानला जात आहे. ब्लू फ्लॅग एक्सरसाइज असे या युद्धाभ्यासाचे नाव आहे.
  • जवळपास १०० लढाऊ विमानांचा या युद्धाभ्यासात सहभाग असणार आहे. भारतासह सात देश या युद्धाभ्यासात सहभाग घेणार आहेत. चीन आणि पाकिस्तानला या युद्धाभ्यासात स्थान देण्यात आलेले नाही.
  • इस्रायल भारताला लष्करी साहित्य आणि हत्यारे पुरवणारा प्रमुख देश आहे. भारत पहिल्यांदाच इस्रायलमध्ये इतर देशांसह संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे.
  • याआधी भारतीय हवाई दलाने मे २०१६मध्ये अमेरिकेतील अलास्कामध्ये रेड फ्लॅग एक्सरसाइजमध्ये संयुक्त युद्धाभ्यास केला होता.

अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले

  • तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे दोन पाने हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे.
  • अण्णाद्रमुकमधल्या ओ पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • चेन्नईमधल्या आरके नगर या भागातल्या पोटनिवडणूकीसाठी शशिकला आणि पनीरसेल्वम या दोन्ही गटांनी एआयडीएमकेच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर दावा केला होता.
  • निवडणूक आयोगाने व्ही के शशिकला यांच्या गटाला टोपी हे चिन्ह दिले असून ओ पनीरसेल्वम यांच्या गटाला वीजेचा खांब हे निवडणूक चिन्ह दिले आहे.
  • जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षामध्ये सुरू झालेल्या सत्तास्पर्धेत शशिकला आणि ओ पन्नीरसेल्व्हम यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता.
  • शशिकलांनी या स्पर्धेत बाजी मारली होती पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठोवल्याने त्यांना मोठा हादरा बसला होता.
  • बेहिशेबी मालमत्ता तुरूंगवासाची शिक्षा झाल्यानंतर शशिकला यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत त्यांच्यात गटातल्या पलानीस्वामी यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी बसविले.

मानवी विकास निर्देशांक यादीमध्ये भारत १३१वा

  • संयुक्त राष्ट्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मानवी विकास निर्देशांकाच्या अहवाल भारताला १३१वे स्थान मिळाले आहे.
  • जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेची म्हणजेच भारताची स्थिती मानवी विकास निर्देशांकाबाबतीत खूप खालावली आहे.
  • यामुळे जगातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, झपाट्याने वाढणारी आणि लक्षवेधी अर्थव्यवस्था मात्र मानवी विकासाबाबत उदासीन दिसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
  • २०१४मध्ये देखील भारताचा या यादीतील क्रमांक १३१वा होता. गेल्या काही वर्षात यामध्ये काहीच बदल न झाल्याने अद्यापही भारताचा या यादीतील क्रमांक १३१ आहे.
  • संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या या अहवालानुसार भारत हा मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत मध्यम स्तरात येतो. बांग्लादेश, भूटान, पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळ सारखे देशही याच स्तरात येतात.
  • भारतीय व्यक्तीचे सरासरी आयुष्यमान ६८.३ वर्षे इतके आहे. या देशात तुम्हाला सुरक्षित वाटते का या प्रश्नाला ६९ टक्के उत्तरार्थींनी हो म्हटले.
  • ६९ टक्के लोकांचा भारताच्या केंद्र सरकारवर विश्वास आहे. तर देशातील ७४ टक्के लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

भारती एअरटेलकडून टिकोनाची खरेदी

  • भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने वायरलेस ब्रॉडबँड कंपनी टिकोनाची १६०० कोटीं रुपयात खरेदी केली आहे.
  • टिकोनाचे ५ जागांवरील डिजीटल सर्कल एअरटेलने खरेदी केले आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर टेलिकॉम कंपनीत झालेले हे दुसरे मोठ विलिनीकरण आहे.
  • गुजरात, पूर्व व पश्चिम उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील सर्व हक्क एअरटेलेने विकत घेतले आहेत. तर राज्यस्थानमध्ये दोन्ही कंपन्या मिळून ग्राहकांना फोर-जी सेवा देणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शॉन टेटला भारताचे नागरिकत्व

  • ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याला १९ मार्च रोजी भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.
  • शॉन टेटने २००५साली ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये, तर २००७साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
  • २०११साली त्याने आंतरराष्ट्रीय वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. सध्या तो फक्त ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाचे प्रतिनिधीत्व करतो.
  • २०१०च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान त्यांची भारतीय वंशाची मॉडेल माशुम सिंघासोबत ओळख झाली होती आणि दोघांनी २०१४साली विवाह केला.
  • शॉन टेटने ३ कसोटी, ३५ एकदिवसीय आणि १७१ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे ५, ६२ आणि २१८ विकेट्स घेतल्या आहेत.
  • क्रिकेट विश्वात सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणाऱ्या क्रिकेटपटूच्या यादीत शॉन टेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६१.१ किमी वेगाने चेंडू टाकला होता.

ब्रिटनच्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला इसिस जबादार

  • ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवर २२ मार्च रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. 
  • ब्रिटन संसदेबाहेरच्या परिसरात हल्लोखोरांनी पादचाऱ्यांना कारने चिरडणे, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला होता.
  • यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा ठिकाणी छापे टाकले असून आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा