बीसीसीआयतर्फे वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी विराट कोहलीची निवड झाली आहे.
यापूर्वी २०११-१२ आणि २०१४-१५ या मोसमात विराटने हा पुरस्कार पटकावला आहे. तीन वेळा या पुरस्कारावर नाव कोरणारा कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.
भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याची किमया केली आहे.
यंदाच्या हंगामात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत सर्वाधिक धावांचा मानही कोहलीच्या नावावर आहे.
याबरोबरच भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावणारा अश्विन पहिला खेळाडू आहे.
तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये जेतेपदांवर वर्चस्व राखणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्तम राज्य संघटनेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
मुंबईने या हंगामात कूचबिहार चषक, विजय र्मचट चषक यांच्यासह महिला एकदिवसीय एलिट गट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे.
निर्दिष्ट बँक नोटा (उत्तरदायित्व समाप्ती) कायदा २०१७
चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निर्दिष्ट बँक नोटा (उत्तरदायित्व समाप्ती) कायदा २०१७ केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.
या कायद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २७ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी केली. या कायद्यामुळे जुन्या नोटांबद्दलचे रिझर्व्ह बँकेचे उत्तरदायित्व संपुष्टात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या जुन्या नोटांच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था चालवली जाऊ नये, यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे.
निर्दिष्ट बँक नोट कायदा लागू झाल्यामुळे देशातील नागरिकांना पाचशे आणि हजाराच्या १० पेक्षा अधिक जुन्या नोटा बाळगता येणार नाहीत.
अभ्यासक आणि नाणे-नोटा जमविण्याचा छंद असणाऱ्या व्यक्तीला स्वत: जवळ पाचशे आणि हजाराच्या २५ पेक्षा अधिक जुन्या नोटा ठेवता येणार नाहीत.
या नियमाचा भंग करणाऱ्यास १० हजार रुपये अथवा सापडलेल्या नोटांच्या पाचपट यापैकी जी रक्कम जास्त असेल, तेवढ्या रकमेचा दंड आकारण्यात येणार आहे.
रेल्वे तिकिटे बुकिंगकरिता आधार क्रमांक अनिवार्य
बोगस तिकिट बुकिंग रोखण्यासाठी ऑनलाईन तिकिटे बुक करताना आधार क्रमांक देणे अनिवार्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना १ एप्रिलपासूनच सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.
२०१७-१८साठी तयार केलेली योजना सादर करताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आधार आधारित तिकिटींग यंत्रणा आणणार असल्याचे सांगितले होते.
दलालांपासून सुटका करुन घेण्यासाठी एका नव्या सॉफ्टवेअरवर काम सुरू असल्याची माहितीदेखील रेल्वेकडून देण्यात आली आहे.
यासोबतच खानपान आणि अन्य सेवांचा दर्जा सुधारुन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखदायक करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात येणार आहे.
जेएनयू विद्यापीठाला व्हिजिटर्स पुरस्कार
आंदोलने आणि वादांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला (जेएनयू) सर्वाधिक उत्तम विद्यापीठांच्या विभागात यंदाचा व्हिजिटर्स पुरस्कार जाहीर झाला आहे.
मागील वर्षीदेखील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला तीनपैकी दोन व्हिजिटर्स पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
संधोधन क्षेत्रात बनारस हिंदू विद्यापीठाचे श्याम सुंदर आणि तेझपूर विद्यापीठाचे प्राध्यापक निरंजन करक यांना संधोधनासाठीचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
देशभरातील विद्यापीठांमध्ये स्पर्धा व्हावी आणि त्यांचा दर्जा वाढावा, या हेतूने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४मध्ये विद्यापीठांना त्यांच्या विविध क्षेत्रांमधील कामगिरीचा गौरव करण्यास सुरुवात केली.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी देशभरात ओळखले जाते. याबद्दल जेएनयूचा समावेश देशातील पहिल्या १० विद्यापीठांमध्ये होतो.
मागील वर्षी देशविरोधी घोषणाबाजी, त्यानंतर विद्यार्थी संघटनांमधील वाद तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे जेएनयू वादग्रस्त ठरले होते.
या विद्यापीठाच्या कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटलादेखील सुरू आहे. सध्या हे दोघेही जामिनावर सुटले आहेत.
रिलायन्स जिओची सॅमसंगसोबत भागीदारी
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ४जी सेवेत सुधारणा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनी सॅमसंगसोबत भागीदारी करार केला आहे.
दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीत आय अँड जी (इनफील अँड ग्रोथ) प्रकल्प सुरू केला आहे. याद्वारे सध्याच्या नेटवर्कची क्षमता विस्तारित करणे आणि नेटवर्कचे कव्हरेज वाढविणे याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
८५०, १८०० आणि २३०० एमएचझेड बँडचा वापर करून दाटीवाटीच्या शहरी भागांत इनडोअर आणि आउटडोअर कव्हरेज वाढविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील कव्हरेज वाढवून देशाच्या ९० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे.
याशिवाय देशात ४-जी सेवेसोबतच ५-जी सेवा आणून डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्याचा मानसही रिलायन्स जिओ आणि सॅमसंगने व्यक्त केला आहे.
वेस्ट इंडिजचा फलंदाज ड्वेन स्मिथ निवृत्त
मैदानात आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला गेलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज ड्वेन स्मिथ याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
स्मिथने वेस्ट इंडिजकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत २०१५साली युएईविरुद्ध खेळला होता. त्यानंतर स्मिथला राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही.
त्याने २००३मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. चौदा वर्ष आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मिथने वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले.
स्मिथने वेस्ट इंडिजकडून खेळताना १०५ वनडे सामन्यात १५६० धावा केल्या आहेत. तर ६१ विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्याने १० कसोटी सामन्यात ३२० धावा केल्या आहेत.
२००७, २०१२ आणि २०१४साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने वेस्ट इंडिजच्या संघाचे प्रतनिधित्व केले आहे. ट्वेन्टी-२० मध्ये स्मिथने ११२.७८ च्या सरासरीने ५८२ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये स्मिथने मुंबई इंडियन्स संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. आयपीएलच्या चार मोसमात तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला.
वेगवेगळ्या देशात खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये मात्र स्मिथ खेळत राहणार आहे. तो सध्या दुबईत सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा