चालू घडामोडी : १५ जून
भारत-अमेरिका हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द
- भारताच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेसोबतचा ६.५ कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे.
- हेलिकॉप्टरच्या किमतीवर भारत आणि अमेरिकेत बराच काळ झालेल्या वाटाघाटीनंतर भारताने हेलिकॉप्टर खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
- या करारांतर्गत भारत अमेरिकेतील विमान निर्मिती कंपनी सिकोरस्की एयरक्राफ्टकडून १६ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार होता.
- मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधीच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे. २५ जून रोजी मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
- संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळेच हा करार रद्द करण्यात आला आहे.
नवाज शरिफ पनामा पेपर्स प्रकरणी तपास समितीसमोर हजर
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या संयुक्त तपास समितीसमोर हजेरी लावली.
- पंतप्रधानपदी असताना अशा प्रकारे एखाद्या आयोगासमोर हजेरी लावणारे नवाज शरिफ पहिलेच पंतप्रधान आहेत.
- संयुक्त तपास समितीचे प्रमुख वाजिद जिया यांनी शरीफ यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सहा सदस्यीय समितीसमोर सादर केली.
- पनामा पेपर्स लीक प्रकरणातून अनेक जागतिक नेत्यांच्या परदेशात कंपन्या, बँक खाती असल्याचे समोर आले असून, यात नवाझ शरीफ यांच्या नावाचाही समावेश आहे.
- शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाच्या परदेशातील मालमत्तेची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सहाजणांची संयुक्त तपास समिती स्थापन केली होती.
- याप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांना संयुक्त तपास समितीसमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
- पनामा प्रकरण हे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांशी संबंधित आहे. त्यामुळे पाकमधील सत्तारूढ पीएमएल-एन पार्टीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.
कतारचा अमेरिकेकडून लढाऊ विमाने खरेदीचा निर्णय
- कतारने अमेरिकेकडून अत्याधुनिक एफ-१५ लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाऊ विमानांमुळे कतारची क्षमता वाढणार आहे.
- १२ अब्ज डॉलर्स किंमतीच्या या करारामुळे अमेरिका-कतारचे संरक्षणात्मक सहकार्य बळकट होणार आहे.
- अमेरिकेचे संरक्षण मंत्री जीम मॅटीस आणि कतारचे संरक्षण मंत्री खालीद अल अतियाह यांनी लढाऊ विमान खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
- याआधी गेल्या वर्षी, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने कतारला ७२ एफ-१५ ईगल जेट्स विकण्यास मान्यता दर्शविली होती. या कराराची किंमत सुमारे २१ अब्ज डॉलर्स इतकी होती.
- काही दिवसांपूर्वी दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडले आहेत.
- चारही देशांनी कतासबोत फक्त राजकीय संबंधच नाही तर हवाई आणि समुद्री संपर्कही तोडण्याची घोषणा केली आहे.
- तसेच सौदीने आपल्या सर्व मित्र देश आणि कंपन्यांना कतारसोबत संपर्क तोडण्याचे आवाहन केले आहे.
- यामुळे पश्चिम आशियातील वातावरण तणावग्रस्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा