चालू घडामोडी : १७ जून
मोदींच्या हस्ते कोची मेट्रो रेल्वेचे उद्घाटन
- पंतप्रधान नरेंद्री मोदींनी १७ जून रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन तसेच ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांच्या उपस्थितीत कोची मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले.
- २०१२साली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोची मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केले होते. ई. श्रीधरन यांनी या योजनेचे सल्लागार म्हणून काम पाहिले.
- कोची मेट्रो रेल लिमिटेडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची प्रत्येकी ५० टक्के भागीदारी आहे.
- चेन्नईतील अलस्टोमकडून कोची मेट्रोच्या डब्यांची बांधणी करण्यात आली. यामधील ७० टक्के घटक हे भारतामध्येच तयार झाले आहेत.
- कोची मेट्रो हा भारतातील सर्वात वेगाने पूर्ण झालेला प्रकल्प आहे. रस्ते, रेल्वे आणि जल अशा तिन्ही मार्गांना जोडलेला हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे.
- कोची मेट्रोचा विस्तार २७ किमी इतका केला जाणार आहे. यातील १३.३ किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दोन टप्प्यात पूर्ण होईल.
- १३.३ किमीच्या या पहिल्या टप्प्यात ११ स्थानके असतील. तर २५ किमीच्या प्रवासात २२ स्थानके असतील. याच्या पहिल्या टप्प्यासाठी ५१.८१ दशलक्ष रुपये खर्च झाले आहेत.
- कोची मेट्रोच्या प्रत्येक चौथ्या खांबावर व्हर्टिकल गार्डन उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर येथे भारतातील एकमेव मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट सिस्टिम असेल.
- केरळ सरकारच्या कुटुंबश्री योजनेतंर्गत कोची मेट्रोत २३ तृतीयपंथीयांना कामावर ठेवण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर लोकांची नियुक्ती करण्यात आलेली ही देशातील पहिलीच मेट्रो आहे.
काश्मिरींसाठी सीआरपीएफची ‘मददगार’ हेल्पलाईन
- देशभरात वास्तव्यास असलेले काश्मीरमधील नागरिक आणि शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) ‘मददगार’ ही हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.
- त्यामुळे काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिकांना १४४११ या टोल फ्री क्रमांकावर त्यांना मदत मागता येणार आहे. ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे.
- सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न, नैसर्गिक आपत्ती आणि नागरी सुविधांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काश्मिरींना या सुविधेच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे.
- तसेच निमलष्करी दलात भरती होण्यास इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांनाही सल्ला, मार्गदर्शन करण्याचे काम या सेवेद्वारे करण्यात येणार आहे.
- वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही माहिती देण्याचे काम या सेवेच्या माध्यमातून करण्यात येईल.
- सीआरपीएफने सुरु केलेली ही हेल्पलाईन सेवा सुरक्षा दल आणि नागरिकांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यास मदतगार ठरणार आहे.
- सीआरपीएफ हे देशातील सध्याचं सर्वात मोठे दल आहे. देशभरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सीआरपीएफकडून केले जाते.
- काही अनुचित घटनांमुळे काश्मीरमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या तेथे जवळपास ३.१३ लाख जवान तैनात आहेत.
ग्रॅहॅम फारक्वार यांना क्योटो पुरस्कार
- वैज्ञानिक ग्रॅहॅम फारक्वार यांना २०१७चा क्योटो पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानच्या इनामोरी फाउंडेशनचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक आहेत.
- साधारणपणे विज्ञानातील ज्या क्षेत्रात नोबेल दिले जात नाही त्या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. तो सहा लाख डॉलरचा आहे.
- त्यांचे संशोधन हे दुष्काळी भागात टिकू शकतील, अशा पिकांच्या प्रजाती व वनस्पतींमधील पाण्याच्या बाष्पीभवनाचा हवामान बदलावर परिणाम याच्याशी संबंधित आहे.
- भौतिकशास्त्र व गणितातील पदवी घेतल्यानंतर ते जीवशास्त्राकडे वळले. सध्या ते ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीत मानद प्राध्यापक आहेत.
- त्यांनी क्वीन्सलॅण्ड विद्यापीठातून जैवभौतिकशास्त्रात बीएस्सी पदवी तर ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतून पीएचडी पदवी घेतली आहे.
- त्यांच्या जैवभौतिक प्रारूपांमुळे वनस्पतींपासून सगळ्या जंगलापर्यंत जैविक व्यवहार कसे चालतात याचा उलगडा झाला.
- त्यांनी या अभ्यासाच्या आधारे वनस्पतींचे कार्य कसे चालते याची गणितीय प्रारूपे तयार केली होती. त्यांची प्रारूपे आज जगातील कृषी व पर्यावरण वैज्ञानिक वापरतात.
- पृथ्वीवरील जीवनाचा मूलाधार असलेल्या प्रकाशसंश्लेषणाचे आपले जे ज्ञान आहे त्यात त्यांनी मोलाची भर टाकली. त्यांना याआधी प्रतिष्ठेचा रँक पुरस्कार मिळाला आहे.
जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे निधन
- आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे १६ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
- १९८२ ते १९९८ या प्रदीर्घ कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या एकीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
- जर्मनीच्या चान्सलर पदावर सर्वाधिक काळ (१६ वर्ष) राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीने विकासाच्या दिशेने वाटचाल केली.
- हेलमट कोल यांचा जन्म ३ एप्रिल १९३० रोजी झाला होता. १९४६च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रेटीक युनियनमध्ये ते सामील झाले.
- १९९०च्या दशकात बर्लिन भिंत कोसळली आणि पूर्व-पश्चिम जर्मनी एकत्र आले. जर्मनीच्या या एकत्रीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
- त्यांनी पूर्व आणि पश्चिम जर्मनीला एकत्रित केल्यामुळे त्यांना फादर ऑफ रि-युनिफिकेशनच्या नावानेही संबोधले जाते.
- जर्मनीचे एकत्रीकरण केल्यानंतर १९९० ते १९९८च्या कार्यकाळात त्यांनी देशाला प्रगतिपथावर नेत्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
- युरोपीय महासंघातही कोल यांचे योगदान अतुलनतीय होते. २०व्या शतकाच्या पूर्वाधात ते युरोपीय महासंघातील एक प्रमुख नेते म्हणून उदयास आले.
- तसेच शीतयुद्धाच्या काळात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- जर्मनीच्या विद्यमान चान्सलर अँजेला मर्केल यांचे ते राजकारणातील गुरु होते. मर्केल यांना १९९१मध्ये कोल यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.
- विशेष म्हणजे हेलमट यांनी चान्सलर पदावर असताना केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण अँजेला मर्केल यांनी उघडकीस आणले होते.
- २००२मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. जर्मनीचे निर्माता बिस्मार्कनंतरचे सर्वात मोठे नेते म्हणून हेलमट कोल ओळखले जातात.
स्वित्झर्लंडमध्ये एइओआय कराराला मंजुरी
- स्वित्झर्लंडने भारतासह इतर ४० देशांबरोबर बँकिंगविषयक माहितीचे आदान-प्रदान करण्याच्या एइओआय (ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फर्मेशन) कराराला मंजुरी दिली आहे.
- या करारामुळे २०१९पासून भारताला स्वित्झर्लंडकडून स्विस बँकेतील संशयास्पद खात्यांची माहिती दिली जाणार आहे.
- मात्र, या करारात स्वित्झर्लंडकडून गोपनीयता व माहितीच्या सुरक्षिततेसाठी भारतावर काही अटीही लादण्यात आल्या आहेत.
- विदेशात जाणाऱ्या काळ्या पैशावर प्रतिबंध घालणे आणि मनी लाँडरिंगवर प्रतिबंध घालणे हा सरकारचा उद्देश आहे.
- या करारामुळे मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील लढाईतील मोठे यश आल्याचे मानले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा