यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या कन्या मीरा कुमार यांना काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपप्रणीत एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा राहिलेल्या मीरा कुमार यादेखील रामनाथ कोविंद यांच्याप्रमाणे दलित कुटुंबातून येतात.
मीरा कुमार यांचा जन्म १९४५ मध्ये पाटणा येथे झाला. कायद्यातून पदवी आणि इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
१९७३मध्ये त्यांची भारतीय विदेश सेवेत (आयएफएस) निवड झाली. त्यानंतर त्यांनी स्पेन, ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले.
त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेशमधून सुरू केली.
१९८५मध्ये बिजनौर मतदारसंघातून त्या प्रथम लोकसभेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या पाच वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपदही भूषविले आहे. तर २००९ ते २०१४ या कालावधीत त्या लोकसभाध्यक्ष होत्या.
त्या लोकसभेच्या पहिल्या महिला व दलित समाजाच्या दुसऱ्या अध्यक्षा बनल्या. त्यांच्यापूर्वी दलित समाजातील बालयोगी यांनी हे पद भूषविले होते.
साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर
देशातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा २२ जून रोजी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आली.
२४ भाषांमधील लेखकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये मराठीतील दोन साहित्यिकांचा समावेश आहे.
मराठी भाषा विभागात अकादमीचा युवा पुरस्कार राधानगरी तालुक्यातील राहुल पांडुरंग कोसंबी यांच्या ‘उभं-आडवं’ या कथासंग्रहाला जाहीर झाला.
तर एल. एम. कडू यांच्या ‘खारीचा वाटा’ या पुस्तकाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला.
कोकणी भाषेत ‘मोग डॉट कॉम’ या कवितासंग्रहासाठी अमेय विश्राम नायक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
याशिवाय विन्सी क्वाद्रूस यांच्या जादूचे पेटूल या पुस्तकाला कोकणी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
हिंदीमध्ये तारो सिदिक आणि उर्दूमध्ये रशीद अशरफ खान यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांची साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारासाठी निवड केली जाते. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
युवा पुरस्कारांसह साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणाही केली आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
भारतीय रिफत शाहरूखच्या उपग्रहाचे नासाकडून प्रक्षेपण
रिफत शाहरूख या भारतीय विद्यार्थ्याने तयार केलेल्या जगातील सगळ्यात हलक्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे ‘नासा’ने २२ जून रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
१८ वर्षीय रिफत शाहरुख नासा आणि ‘आय डुडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत सहभागी झाला होता.
या स्पर्धेसाठी त्याने ठोकळ्याच्या आकाराचा ‘कलामसॅट’ नावाचा उपग्रह तयार केला होता.
जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रिफतने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे.
भारतीय विद्यार्थ्याने एका स्पर्धेत बनवलेला उपग्रह पहिल्यांदाच नासाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला आहे.
२४० मिनिटांची ही प्रक्षेपण मोहिम असून तो १२ मिनिटे अंतराळाच्या कक्षेत ‘कलामसॅट’ भ्रमण करणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रवर आरबीआयकडून निर्बंध
बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाढत्या अनुत्पादित कर्जांमुळे (एनपीए) रिझर्व्ह बँकेने या बँकेवर (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन) निर्बंध घातले आहेत.
बँकेची कामगिरी सुधारावी, बँकेच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हावी, नफा वाढावा आणि बँकेच्या मत्तेचा (अॅसेट्स) दर्जा सुधारावा, या उद्देशाने हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
मात्र, या निर्बंधांमुळे बँकेच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शनमधील निर्बंधांनुसार बँकांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नव्या शाखा सुरू करता येत नाहीत. बँकांच्या उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येत नाही.
तसेच बँकांच्या कामकाजातील काही गोष्टींवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहते. बँकांना मान्यतेशिवाय मोठ्या रकमेची कर्ज (कॉपोरेट लेंडिंग) देण्यावरही निर्बंध असतात.
केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी व रोडमॅप निश्चित करण्यासाठी दोन वर्ष ज्ञानसंगम परिषदेचे आयोजन केले होते.
पुण्यातील पहिल्या ज्ञानसंगम परिषदेनंतर बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी इंद्रधनुष्य या सात कलमी कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आली.
बँकांना या निकषांनुसार आपली आर्थिक कामगिरी सुधारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
या आढाव्यानंतरही ज्या बँकांची कामगिरी सुधारलेली नाही, अशा बँकांवर रिझर्व्ह बँकेने बंधने घालण्यास सुरुवात केली आहे.
आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आलेली बँक ऑफ महाराष्ट्र आयडीबीआय, देना, युको आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियानंतरची पाचवी राष्ट्रीय बँक आहे.
संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येबद्दलच्या अंदाजाचा अहवाल प्रसिद्ध
संयुक्त राष्ट्राच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, जगामधील एकूण लोकसंख्या २०५०पर्यंत ९.८ अब्ज इतकी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या जगाची लोकसंख्या सध्या ७.६ अब्ज इतकी आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विषयक विभागाने २०१७मधील लोकसंख्येची समीक्षा करुन अहवाल तयार केला आहे.
संयुक्त राष्ट्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेला लोकसंख्येबद्दलच्या अंदाजाचा हा २५वा अहवाल आहे. याआधीचा अहवाल २०१५मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
टेनिसपटू बोरिस बेकर दिवाळखोर घोषित
सहा ग्रँडस्लॅम जेतेपदांची कमाई करणारा ख्यातनाम माजी टेनिसपटू बोरिस बेकरला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
एका बँकेचे कर्ज थकवल्याने ब्रिटनमधील न्यायालयाने बेकरला दिवाळखोर म्हणून जाहीर केले आहे.
मूळचा जर्मनीचा पण सध्या ब्रिटनमधील लंडन येथे राहणाऱ्या बोरिस बेकरने आर्बटनोट लँथम अँड कंपनी या बँकेचे कर्ज २०१५पासून थकवले होते.
४९ वर्षीय बेकरचा जन्म जर्मनीत झाला होता. त्यानंतर बेकर लंडनमध्ये वास्तव्यास आला होता. तो जर्मनीकडून टेनिस खेळत होता.
नोवाक जोकोविचला बेकरने प्रशिक्षण दिले असून सध्या तो समालोचक म्हणूनही काम करतो.
बोरिस बेकरने १९८५, १९८६ आणि १९८९ साली विम्बल्डनमध्ये जेतेपद पटकावले होते.
याशिवाय १९९१ आणि १९९६मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, १९८९मध्ये यूएस ओपनमध्येही त्याने बाजी मारली होती.
१९८८ आणि १९८९मध्ये त्याने डेव्हिस कपमध्ये पश्चिम जर्मनीला विजेतेपद पटकावून दिले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा